Maharashtra

Bhandara

CC/19/54

SUNANDA N. WADAI - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE COMPANY - Opp.Party(s)

MR U.P.KSHIRSAGAR

31 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/54
( Date of Filing : 18 Mar 2019 )
 
1. SUNANDA N. WADAI
BHILEWADA KARDHA TAH DIST BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE COMPANY
SHETRIYA OFFICE PAGALKHANA CHOWK CHINDWADA ROAD
NAGPUR
MAHARASHTRA
2. TALUKA KRUSHI ADHIKARI
BHANDARA, TAH. DIST. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR U.P.KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 31 Dec 2019
Final Order / Judgement

                                       (पारीत व्‍दारा  श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष.)

                                                                                                     (पारीत दिनांक–31 डिसेंबर, 2019)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर एक विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा मृतक पती नामे श्री नरीहरी भैय्याजी (दाखल कागदपत्रांवरुन तक्रारकर्तीचे मृतक पतीचे वडीलांचे नाव बहयाजी असे दिसून येते) वाढई हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- भिलेवाडा, तालुका- जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं 56/15-अ या वर्णनाची होती.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती  नामे श्री नरीहरी बहयाजी वाढई  याचा दिनांक-21.03.2017 रोजी मित्रा सोबत मोटरसायकलवर मागे बसून जात असताना एका ट्रकने धडक दिल्‍याने गंभिर जख्‍मी होऊन मोक्‍यावरच मृत्‍यु झाला. (याठिकाणी ग्राहक मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, पोलीस दस्‍तऐवजावरुन ट्रकने धडक दिला नसल्‍याचे दिसून येते तर सायंकाळचे अंधारात रस्‍त्‍याचे कडेला उभ्‍या असलेला व इंडीकेटर नसलेल्‍या ट्रॅक्‍टर ट्रॉलिला मोटरसायकलने धडक दिल्‍याने अपघात झाला असे नमुद आहे) यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने “लाभार्थी” आहे. तिचे पतीचे मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-2 तालुका कृषी अधिकारी भंडारा, तालुका- जिल्‍हा भंडारा  यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-17.06.2017 रोजी दाखल केला होता. विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली होती.

    तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने दिनांक-20.02.2018 रोजीचे पत्राव्‍दारे अपघाताचे वेळी मृतका जवळ वैध वाहन चालविण्‍याचा परवाना नव्‍हता असे कारण दर्शवून तिचा विमा दावा नामंजूर केला आणि ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तकारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याचा दिनांक-17.06.2017 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 50,000/- आणि तक्रार खर्च रुपये-20,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 52 ते 54 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीचा पती हा अपघाती घटनेच्‍या वेळी मित्रासोबत डबलसिट जात होता हे म्‍हणणे नामंजूर केले मात्र तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू दिनांक-21 मार्च, 2017 रोजी झाल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने विमा दावा प्रस्‍ताव दसतऐवजांसह दाखल केला होता ही बाब मान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी त्‍वरीत कागदपत्रांची तपासणी करुन दिनांक-22.02.2018 रोजीचे पत्रान्‍वये कळविले होते की, अपघाती घटनेच्‍या वेळी मृतक विना परवाना मोटर सायकल चालवित होता त्‍याचे जवळ वैध चालक परवाना नसल्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती नुसार विमा दावा नामंजूर करण्‍यात आला होता. सदरचे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीने स्‍वतः दाखल केलेले आहे. त्‍यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता तिची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांना ग्राहक मंचा तर्फे रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली परंतु ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ग्राहक मंचाव्‍दारे पारीत करण्‍यात आला.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय-2016-2017, तिचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत वि.प. विमा कंपनीचे पत्र, तिने विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्‍ताव, तिचे मृतक पतीचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्‍तऐवज, तिचे पतीचे अपघाता बाबत एफआयआर व ईतर पोलीस दस्‍तऐवज, मृतकाचा शव विच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे पतीचे वाहन परवान्‍याची प्रत, तक्रारकर्तीचे पतीचे वयाचा पुरावा अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 60 व 61 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-62 व 63 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 52 ते 54 वर दाखल केले.

07.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र आणि तिने दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्‍तर इत्‍यादीचे ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची ग्राहक होते काय

-होय-

2

वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

3

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

                                                                                                   :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

08.  तक्रारकर्तीचा मृतक पती हा व्‍यवसायाने शेतकरी होता, त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता व तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यु दिनांक-21/03/2017 रोजी झाला या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत. तक्रारकर्तीचे पतीचे मृत्‍यू नंतर पत्‍नी व कायदेशीर वारसदार या नात्‍याने ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 व 3 बाबत

09.   तक्रारकर्तीने तक्रारी बरोबर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता पान क्रं 15 वर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वरीष्‍ठ कार्यालय म्‍हणजे विभागीय व्‍यवस्‍थापक, ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी, पुणे यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत पत्राची प्रत दाखल आहे, त्‍यामध्‍ये अपघात हा दुचाकी वाहन चालविताना झालेला आहे व अपघात समयी मृतकाकडे दुचाकी वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नव्‍हता आणि त्‍या आधारावर विमा दावा रद्द करण्‍यात येत आहे असे नमुद केलेले आहे.

10.    तक्रारकर्तीने तक्रारी सोबत पान क्रं 43 वर तिचे मृतक पती श्री नरहरी  भैय्याजी वाढई याचे वाहन चालक परवान्‍याची प्रत दाखल केली त्‍यानुसार सदर वाहन चालक परवाना हा दिनांक-17.04.2009 रोजी जारी केलेला असून तो दिनांक-04.01.2017 पर्यंत वैध असल्‍याचे त्‍यात नमुद आहे आणि तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू हा दिनांक-21 मार्च, 2017 रोजी झालेला आहे असे दाखल मृत्‍यू प्रमाणपत्रावरुन दिसून येते. यावरुन असेही दिसून येते की, जानेवारी, 2017 रोजी वाहन चालक परवान्‍याची मुदत संपली आणि त्‍यानंतर लगेच दोन महिन्‍यात म्‍हणजे मार्च, 2017 मध्‍ये अपघात झालेला आहे.

11.   आम्‍ही पान क्रं 24 ते 27 वर दाखल एफ.आय.आर.प्रतीचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की, सायंकाळी 6.30 ते 06.45 वाजता मयत आटोपून मृतक श्री नरहरी बहयाजी वाढई हा त्‍याचा मित्र प्रविण पचारे याचे सोबत मोटरसायकलने गावाकडे जात असताना बाजूलाच उभ्‍या असलेल्‍या ट्रॅक्‍टर ट्रालीवर मोटरसायकल आदळल्‍याने अपघात झाला असून यामध्‍ये ट्रॅक्‍टर मालकाने इंडीकेटर न लावल्‍याने त्‍याचे चुकीमुळे अपघात झाल्‍याचे नमुद आहे. पान क्रं 30 ते 33 इन्‍क्‍ेवस्‍ट पंचनाम्‍या मध्‍ये नादुरुस्‍त ट्रक्‍टर ट्राली इंडीकेटर न लावता रस्‍त्‍यावर धोकादायक अवस्‍थेत उभी ठेवल्‍याने व सदर ट्रक्‍टर ट्राली मृतकाला न दिसल्‍याने दोघेही अपघातात मरण पावले अशी फीर्याद तोंडी दिल्‍याने गुन्‍हा नोंदवून घटनास्‍थळ पंचनामा करण्‍यात आला.

12.  अभिलेखावरील दाखल पोलीस दस्‍तऐवजा वरुन असे दिसून येते की, प्रत्‍यक्ष घटनेच्‍या वेळी कोणीही प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार (Eye Witness) ज्‍याने सदरची घटना त्‍यावेळी पाहिली असा कोणीही व्‍यक्‍ती नाही. मृतक श्री वाढई याचे पुतण्‍याने फीर्याद दिल्‍या नंतर पोलीसांनी एफ.आय.आर.आणि इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा तयार केला. अपघाती घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा मृतक पती नामे श्री नरहरी बहयाजी वाढई कि त्‍याचा मित्र प्रविण पचारे हा मोटरसायकल चालवित होता? ही बाब पोलीस दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत नाही. मात्र एफ.आय.आर मध्‍ये मोटरसायकल क्रं-MH-36-P-7648 ही तक्रारकर्तीचे मृतक पती श्री नरहरी बहयाजी वाढई याचे मालकीची  असल्‍याचे नमुद आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की, अपघाती घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा मृतक पती नामे श्री नरहरी बहयाजी वाढई हाच मोटरसायकल चालवित होता. तक्रारकर्तीचा पती हाच अपघाताचे वेळी मोटरसायकल चालवित होता ही बाब जर पोलीस दस्‍तऐवजा वरुन तसेच प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार याचे बयानावरुन सिध्‍द झाली असती तरच वैध वाहन चालक परवान्‍याची अट (Valid Driving License) महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका प्रमाणे बंधनकारक (Mandatory) होती आणि तक्रारकर्तीने सुध्‍दा पान क्रं 60 व 61 वर दाखल केलेल्‍या शपथपत्रमध्‍ये तिचा पती हा त्‍याचा मित्र नामे श्री प्रविण पचारे याचे सोबत दिनांक-21.03.2017 रोजी मोटरसायकलवर बसून जात असताना अपघात होऊन  त्‍याचा मृत्‍यू झाला. पोलीस एफ.आय.आर आणि पोलीसांच्‍या फायनल रिपोर्टमध्‍ये कुठेही तिचा पती हा अपघाती घटनेच्‍या वेळी वाहन चालवित होता हे नमुद नाही आणि अपघाती घटनेच्‍या वेळी नेमका कोण वाहन चालवित होता? हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची आहे असे नमुद केलेले आहे. याउलट विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने शपथेवरील पुरावा सुध्‍दा दाखल केलेला नाही. आम्‍हाला तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या शपथपत्रात तथ्‍य दिसून येते याचे कारण असे की, अपघाती घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा पती हाच मोटरसायकल चालवित होता ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने योग्‍य त्‍या पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेली नाही.  

13.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे जवळ कोणताही सक्षम पुरावा नसताना तक्रारकर्तीचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा नामंजूर करुन तिला सेवेत त्रृटी दिल्‍याची बाब दिसून येते आणि त्‍यामुळे तिला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे ही बाब स्‍वयंस्‍पष्‍ट आहे. करीता तक्रारकर्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल आणि सदर विम्‍याचे रकमेवर विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-20.02.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्‍याज मंजूर करणे न्‍यायोचित होईल.तसेच ति‍ला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्‍या  रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्‍याने त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व तक्रारकर्तीची सुध्‍दा त्‍यांचे विरुध्‍द तशी कोणतीही तक्रार नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 तालुका कृषी अधिकारी भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

14.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                                                    :: आदेश ::

(01)  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) दयावी आणि सदर विमा रकमेवर विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-20.02.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला दयावे.

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं. 1  विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04) विरुध्‍दपक्ष क्रं-(2) तालुका कृषी अधिकारी, तालुका-जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी  विमा दावा नामंजूर केल्‍याचा दिनांक-20.02.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.