नि.२८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १५४०/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०९/०२/२००९
तक्रार दाखल तारीख : १६/०२/२००९
निकाल तारीख : २७/०९/२०११
-------------------------------------------------------------
दिपक नागेश कुलकर्णी
वय वर्षे ५२, धंदा व्यापार
व इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर,
रा.शिव पार्क अपार्टमेंट, फ्लॅट नं.३,
परांजपे कॉलनी, पाटणकर नगर, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
व्यवस्थापक/मॅनेजर
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.सांगली
शाखा सांगली, कृष्णा कॉम्प्लेक्स,
एल.आर.सी. बिल्डींग, आमराई रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.पी.एस.साळुंखे, ए.एस.माने
जाबदार तर्फे : +ìb÷. श्रीमती एम.एम.दुबे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे मालकीच्या मोटार कार एम एच १० ई ५२६० या वाहनाचा जाबदार यांचेकडे दि.२०/१०/२००८ ते दि.१९/१०/२००९ अखेर विमा उतरविला होता. सदर विमा कालावधीत दि.०४/१२/२००८ रोजी सदर वाहनाचा कणकवली या गावाजवळ अपघात झाला. सदर अपघाताची नोंद तक्रारदार यांनी तात्काळ कणकवली पोलीस स्टेशनला दिली तसेच जाबदार विमा कंपनीलाही अपघाताबाबत कळविले. जाबदार यांचेकडील प्रतिनिधी यांचे सांगणेवरुन वाहन कोल्हापूर येथे शो-रुममध्ये आणले. शो-रुममध्ये आणल्यावर जाबदार यांचे सर्व्हेअर यांनी गाडीची पहाणी केली. जाबदार यांनी गाडीचे काम करुन घ्या व विम्याचे पैसे मिळतील असे सांगितल्याने गाडीचे काम पूर्ण करुन घेतले व खर्चाची रक्कम रु.१,२७,६८२/- कंपनीमध्ये ड्राफ्टने व रोखीने भरली. जाबदार यांचे सांगणेप्रमाणे विमा कंपनीस विमा दावा सादर केला परंतु जाबदार यांनी दि.१५/०१/२००९ रोजी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारताना तक्रारदार यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा नाकारला आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने तक्रारदार यांनी आपल्या विमा दाव्याच्या मागणीसाठी व इतर तदनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने १ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.१४ येथे आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तसेच तक्रार अर्जातील इतर मजकूर अमान्य केला आहे. तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना वाहन चालवून विमा पॉलिसीमधील महत्वाच्या अटीचा भंग केला आहे त्यामुळे तक्रारदार हे विमा दावा मिळण्यास पात्र नाहीत. त्यामुळे तक्रारदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१५ ला शपथपत्र व नि.१३ च्या यादीने एकूण ३ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१७ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे त्यामध्ये त्यांनी जाबदार यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी नि.२० ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२१ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन प्रस्तुत प्रकरणाच्या मुळाशी जाणारे पुढील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. अपघातसमयी तक्रारदार यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध
परवाना होता का ? नाही.
२. वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना वाहन चालवून तक्रारदार
यांनी पॉलिसीमधील अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे काय ? होय.
३. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्यास जाबदार यांनी दिलेले
कारण योग्य व संयुक्तिक आहे काय ? होय.
४. तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
५. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१ ते ४ एकत्रित –सदर चारही मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे सदर मुद्यांचे एकत्रित विवेचन देण्यात येत आहे. तक्रारदार यांच्याकडील वाहन चालविण्याच्या परवान्याची मुदत दि.०९/०१/२००७ रोजी संपली आहे असे तक्रारदार यांनीच त्यांच्या तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे. सदर परवान्याची प्रत जाबदार यांनी नि.१३/२ वर दाखल केली आहे. सदर परवाना हा तक्रारदार यांनी दि.१९/१२/२००८ रोजी नूतनीकरण करुन घेतला आहे. सदर वाहनाचा अपघात हा दि.०४/१२/२००८ रोजी झाला आहे. म्हणजे निश्चितच अपघातसमयी तक्रारदार यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली होती. वाहन चालविण्याच्या परवान्याची मुदत संपली असेल व सदरचा परवाना हा नंतर नूतनीकरण करुन घेतला असेल तर त्याचे परिणाम काय होतात याबाबत दोन्ही विधिज्ञांनी आपल्या तोंडी युक्तिवादामध्ये काही निवाडयांचा उल्लेख व उहापोह केला. तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये 2009 (3) CPR 306या सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा निवाडा दाखल केला आहे. तसेच जाबदार यांनी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा न्यू इंडिया ऍश्युरन्स कं.लि.विरुध्द सुरेशचंद्र आगरवाल हा Civil Appeal No. 44/2003 दि.१०/७/२००९ रोजी दिलेला निवाडा दाखल केला आहे. सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने सदर निवाडयामध्ये वाहन चालविण्याचा परवाना संपल्यानंतर ३० दिवसांचे आत परवान्याचे नूतनीकरणासाठी अर्ज दिला नाही तर सदरचा परवाना हा दरम्यानच्या काळामध्ये वैध रहात नाही व त्यामुळे पॉलिसीतील महत्वाच्या शर्ती व अटीचा भंग होतो तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम ३ चा सुध्दा भंग होतो असा निष्कर्ष काढला आहे. तक्रारदार यांचे वाहन चालविण्याचा परवाना दि.९/१/२००७ रोजी संपला आहे. अपघात हा दि.४/१२/२००८ रोजी झाला आहे व तक्रारदार यांनी परवान्याचे नूतनीकरण हे दि.१९/१२/२००८ रोजी केले आहे. त्यामुळे सदरचा परवाना हा दि.९/१/२००७ ते १९/१२/२००८ या कालावधीमध्ये वैध नव्हता. तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना त्यांनी वाहन चालविले आहे व त्या कालावधीत सदर वाहनास अपघात झाला आहे. तक्रारदार यांनी पॉलिसीमधील महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी योग्य कारणास्तव नाकारला आहे. तक्रारदार यांचा विमादावा नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: २७/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११