नि का ल प त्र :- (दि. 20/09/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी आहेत. तक्रारदारांच्या वडिलांचा ’शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत विमा उतरविलेला होता. दि. 31/01/2009 रोजी दाजीपूरहून त्यांचे ओलवण गावी सकाळी 11.00 वाजणेचे सुमारास महालक्ष्मी तलावाच्या कडेने येत असताना पायवाटेने पाय घसरुन तलावात पडले त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर येथे झाले असून त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याबाबत डॉक्टरांनी सांगितले. तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यू अपघाती झाला असल्याने मुदतीत दि. 12/06/2009 रोजी तालुका कृषीअधिकारी, राधानगरी यांचेमार्फत क्लेम फॉर्म व योग्य त्या कागदपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम मागणी केली. परंतु आज अखेर अद्यापी कळविलेले नाही. सबब, तक्रारदारांचा न्याय क्लेम रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीला दाखल केलेला विमा प्रस्ताव, गट नं. 340 चा 7/12 चा उतारा, शेतीचा खाते नं. 45 चा 8 अ चा उतारा, डायरी नं. 329 अ चा उतारा, गाव नमुना 6 क वारसा नोंदवही, डायरी नं. 385 अ चा डायरी उतारा, ग्रामपंचायत ओलवण यांचेकडील मृत्यू दाखला, मारुती केशव पाटील यांचा जबाब, घटना स्थळाचा पंचनामा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेकडील मृत्यू दाखला, पी.एम. रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, दिपक केशव पाटील यांचा जबाब इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने म्हणणे देऊन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची प्रस्तुत तक्रार ही मुदतपूर्व दाखल केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार खोटी व चुकीची आहे. तक्रारदारांनी मयत वडिलांची कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी सामनेवाला व शासनाचे दरम्यानचा करार, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक, सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला. तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदारांनी त्यांचे वडिलांचा मृत्यू दि. 31/01/2009 रोजी तलावात पाय घसरुन पडून मृत्यू झाला याबाबत तालुका कृषीअधिकारी, राधानगरी यांचेमार्फत क्लेम दाखल केलेला आहे. त्याबाबत क्लेमफॉर्मची स्थळप्रत व तदनुषंगिक कागदपत्रे सामनेवाला कंपनीकडे पाठविलेली आहेत त्यांच्या प्रती प्रस्तुत कामी दाखल आहेत. सदर कागदपत्रांमध्ये मृत्यू दाखला, जबाबाची प्रत, शवविच्छेदन अहवाल इत्यादीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे वडिलांचा मृत्यू हा तलावात पाय घसरुन बुडून मृत्यू पावले ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. सदरचा क्लेम हा मुदतीत सामनेवाला विमा कंपनीकडे पाठविलेला आहे. व सदर क्लेम वर कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे सदरची तक्रार दि. 30/04/2011 रोजी या मंचात दाखल केलेली आहे. सामनेवाला कंपनीचे वकिलांनी युक्तीवादाचे वेळेस दि. 17/01/2011 रोजी क्लेम नाकारलेचे पत्र प्रस्तुत कामी दाखल केलेले आहे. सदरचे पत्र हे तक्रारदारांना पाठविले नसल्याची वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार मुदतपूर्व दाखल केलेली आहे हे सामनेवाला विमा कंपनीचे म्हणणे हे मंच फेटाळत आहे. सदरच्या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांना रातआंधळेपणा असल्यामुळे क्लेम देय होत नाही असे कारण दिलेले आहे. परंतु उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या वडिलांचा मृत्यू सकाळी 11.00 वाजता झालेला आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. सदर तक्रारीस कारण दि. 31/01/2009 रोजी कारण घडलेले आहे व तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदारांच्या क्लेमवरती कोणताही निर्णय घेतलेला नाही. व युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला कंपनीचे वकिलांनी दि. 17/01/2011 रोजी क्लेम नाकारलेचे पत्र प्रस्तुत कामी दाखल केलेले आहे. उपरोक्त विवेचन विचारात घेता सामनेवाला कंपनीच्या सेवेत गंभीर सेवा त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि. 31/01/2009 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रु. 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |