नि का ल प त्र :- (दि.20.07.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार यांचे पतीचा किसान पॅकेज पॉलिसी या योजनेअंतर्गत विमा श्री. हनुमान सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्या, वडकशिवाले, ता. करवीर यांचे माध्यमातून सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. विमा पॉलिसीचा क्र. 161600/48/2011/786 असा आहे. तक्रारदारांचे पती दि. 16/05/2010 रोजी घरात कोणाशी न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर दि. 25/05/2010 रोजी तक्रारदारांचे पती हे बाचणी गावचे हद्दीतील बंगाली या नावाने ओळखणारे जवळील दुधगंगा नदीपात्रात त्यांचे प्रेत आढळले. तक्रारदारांच्या पतीचा नदी पात्रात पाय घसरुन मृत्यू झाल्याचे कळून आले. तक्रारदारांच्या पतीच्या मृत्यूचे शवविच्छेदन केलेले आहे व त्यामध्ये पाण्यात बूडून मयत झाल्याचा दाखला ग्रामीण रुग्णालय, सिध्दनेर्ली यांनी दिलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे मुदतीत योग्य त्या सर्व कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन दिलेला आहे. परंतु सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम हा आत्महत्या या कारणास्तव बेकायदेशीरपणे दि. 18/10/2010 रोजीचे पत्राने नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारांची विमा क्लेमची रक्कम रु. 80,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना दिलेले पत्र, श्री. विनायक जनार्दन पाटील यांचा वर्दी जबाब, घटना स्थळाचा पंचनामा, मयताचे अडव्हान्स सर्टीफीकेट, पी. एम. रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा इत्यादींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, पोलिस पेपर्सवरुन तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेले नसून मुलाबरोबर झालेल्या मतभेदामुळे नदीत उडी मारुन आत्महत्या केलेली आहे. सदरचा मृत्यू हा आत्महत्या असल्याने तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, सदरची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला कंपनीचे किसान पॅकेज पॉलिसी ही तक्रारदारांच्या पतीना दिलेली होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असून सामनेवाला कंपनीने बेकायदेशीरपणे क्लेम नाकारला याबाबतचा उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी विहित मुदतीत क्लेमची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनला एफ.आर. आय. दाखल झालेला आहे. तसेच प्रस्तुत प्रकरणी शवविच्छेदन दाखलाही दाखल झालेला आहे. या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पतीच्या मृत्यूचे कारण हे पाण्यात बुडून झालेला आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा आत्महत्तेमुळे झालेला नाही यावर प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला कंपनीने त्यांचे म्हणणेशिवाय दुसरा कोणताही कागदोपत्री पुरावा म्हणून दाखल केलेला नाही. सामनेवाला विमा कंपनीने क्लेम निश्चित करीत असताना कोणत्याही प्रकारचा तपास केलेला नाही. केवळ तर्कावरुन वापर करुन तांत्रिकपणे निर्णय घेतलेला असल्याचे दिसून येते. यामध्ये सामनेवाला कंपनीची सेवा त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, तक्रारदार हे क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार हे व्याजाची रक्कम मिळण्यास पात्र असल्याने मानसिक त्रासापोटी रक्कम देण्यात आलेली नाही. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 80,000/- (अक्षरी रुपये ऐंशी हजार फक्त) द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि.18.10.2010 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. 4. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |