जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार अर्ज क्रमांक - 250/2014
तक्रार अर्ज दाखल तारीखः- 09/06/2014
तक्रार अर्ज निकाल तारीखः- 04/04/2016
श्री.साहेबराव बारकू पाटील, .....तक्रारदार
उ वय 55 वर्षे धंदा शेती,
रा. खडकदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, ... .सामनेवाला.
दि.ओरिएण्टल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड,
हॉल नं.जी/एच,महात्मा जे फुले सेंटर म्युनिसिपल मार्केट,
शास्त्री टॉवर,जळगांव ता.जि.जळगांव.
कोरम
श्री.व्हि.आर.लोंढे. अध्यक्ष.
श्रीमती.पुनम नि. मलिक. सदस्या.
तक्रारदार तर्फे अड.सिमीत एस न्याती.
सामनेवाला तर्फे अड. आर.व्ही.कुलकर्णी.
नि का ल प त्र
द्वारा – मा.श्रीमती पुनम नि मलिक,सदस्या
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली ती मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हा खडकदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव येथील रहीवाशी असून शेती करतो. तक्रारदाराने टाटा इन्होवा कार क्र.एम.एच. 17/एस 10 ही सेकंड हँण्ड कार रक्कम रु.5,51,000/- ला दि.29/03/2011 रोजी विकत घेतलेली होती. सदरील वाहनाचा विमा कंपनीमार्फत पॉलिसी क्र.1824200/31/2012/1080 दि.09/08/11 ते 08/08/2012 या कालावधी करीता उतरवलेला होता. सदरील टाटा इन्होवा कार तक्रारदाराचे परिचीत व्यक्ती हाजी इजाज अब्दुल सत्तार बागवान यांना कुठलेही भाडे न घेता त्यांना दिली. दि.12/02/2012 रोजी हाजी इजाज अब्दुल सत्तार बागवान हे तक्रारदाराची टाटा इन्होवा कार घेऊन जात असतांना सकाळी 5.30 वाजताचे सुमारास नगर-पुणे रस्त्यावर कराडी जकात नाक्याजवळ तक्रारदाराच्या काराचा ट्रक क्र.एम.एच.11/एम.5297 च्या चालकाचे चुकीने अपघात झाला. सदरील अपघाताची फिर्याद हाजी अब्दुल सत्तार बागवान यांनी विमानतळ पोलिस स्टेशन पुणे येथे त्याच दिवशी दिली. त्याप्रमाणे विमानतळ पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं.30/12 वर अपघाती नोंद होऊन त्याच दिवशी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सदरील अपघातात टाटा इन्होवा कार क्र.एम.एच.17/एस 10 ही पुर्णपणे क्षतीग्रस्त झाली तीला छत्री ऑटोमोबाईल्स येथे दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली तेथे वाहन दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.7,13,440/- इतका आला. त्यानंतर दि.14/02/202 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रितसर क्लेमफॉर्म भरुन दिला त्यावर सामनेवाला यांनी दि.20/09/2012 रोजी पत्राने You have committed breach of the limitation as to use condition of the policy असे कारण दाखवून क्लेम नामंजुर केला. सामनेवाला यांनी चुकीचे कारण दाखवून क्लेम नामंजुर केला म्हणुन तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.4,00,000/- व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत व नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.50,000/- आणि शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
सामनेवाला यांना मंचाची नोटीस मिळाली त्यांनी हजर होऊन आपला खुलासा दाखल केला त्यांचे कथन असे की, तक्रारदाराचे तक्रारीतील म्हणणे खोटे व लबाडीचे असून कबुल नाही. तक्रारदार यांनी कार तिी किंमतीला घेतली व तीला काय खर्च केला हा मजकूर तक्रारदार यांनी शाबीत करावा. सदर कारचा विमा तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडे काढलेला होता. तक्रारदाराचे परिचीत व स्नेही येथपासून ते शेवटी ही त्यांचे कडे दिली हा मजकुर खोटा असून कबुल नाही. तक्रारदार यांनी त्यांची कार भाडयाने दिलेली होती. तक्रारदार यांचे कारला अपघात झाला व कारची दुरुस्ती करावी लागणार होती हे म्हणणे तक्रारदार यांनी शाबीत करावे छत्री ऑटोमोबाईल यांनी दिलेले इस्टीमेट हे चुकीचे व आवस्वत आहे ते कबुल नाही. इस्टीमेट हे नेहमी जास्त व चुकीचे दिलेले असते त्यावरुन क्लेमची नक्की रक्कम काढता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुरुस्ती करुन ती पक्की बिले सामनेवाला कंपनीकडे सादर करावी लागतात तसेच त्यातुन घसारा वजा करुन नक्की किती रक्कमेचे नुकसान झाले ते काढण्यात येते. त्यासाठी अधिकृत सर्व्हेयर तर्फे प्राथमिक सर्व्हे व फायनल सर्व्हे करणे आवश्यक असते ते कोणतेही सर्व्हे झालेले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला कपंनीकडे क्लेम फॉर्म भरुन क्लेम दाखल केला होता. त्याबद्यल सामनेवाला कंपनीने चौकशी अधीकारी नेमून यांचेतर्फे चौकशी केली चौकशीत असे आढळले की, तक्रारदार यांनी त्यांची कार ही भाडयाने दिलेली होती त्यामुळे तक्रारदार यांनी काढलेल्या विमा पॉलिसीचे शर्ती व अटींचा भंग झाला आहे असे दि.20/09/2012 चे पत्र देवून कळविले आहे आणि ते योग्य व बरोबर आहे. सामनेवाले हे तक्रारदार यांना कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे वाहन इनोव्हा कार एमएच 17/एस 10 यांचा विमा पॉलिसी क्र.18424200/31/2012/1080 कालावधी ता.09/08/2011 ते 08/08/2012 पर्यंत काढलेला आहे. तक्रारदार सामनेवाले कंपनीचे ग्राहक आहेत. सामनेवाला कंपनीने तक्रारदार यांना कोणतीही सेवा देण्यात कसूर केलेला नाही. सदर वाहनास दि.12/02/2012 रोजी अपघात होवून त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणुन सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्म भरला परंतु त्यांनी पक्की बिले सादर करणे आवश्यक होते तशी पक्की बिले त्यांनी दिलेली नाहीत. तक्रारीत नमुद कारचे रु.4,00,000/- चे नुकसान तक्रारदार यांनी शाबीत करावे. विमा पॉलिसीनुसार फक्त वाहनास झालेले नुकसान देय असते परंतू वाहन दुरुस्ती अभावी पडुन राहील्याने नुकसान किंवा शारिरीक व मानसिक त्रास देय नाही. तक्रारदार यांनी छत्री ऑटोमोबाईल यांचे ईस्टीमेट चुकीचे व आवास्तव आहे ते कबुल नाही. सामनेवाले यांनी चौकशी अधिका-यामार्फत चौकशी केली त्यात तक्रारदार यांनी त्यांची कार ही भाडयाने दिलेली होती तसा अहवाल सामनेवाला यांना प्राप्त झालेला आहे त्या आधारे तक्रारदार यांनी काढलेला विमा पॉलिसीचे शर्ती व अटींचा भंग झालेला आहे. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदार यांना कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात काहीएक कसूर केलेला नाही. तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेला पुरावा शपथपत्र कागदपत्र तसेच सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र याचे अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर.
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केला आहे काय?
त्रुटी केली आहे काय ? नाही.
2. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2
तक्रारदार यांची तक्रार त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे व शपथपत्र सामनेवाले यांचा खुलासा व दोघांचा युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता, तक्रारदार साहेबराव बारकु पाटील हे इन्होव कार क्र.एम एच 17/एस 10 यांचे मालक आहे व त्यांनी सामनेवाला विमा कंपनी मार्फत दि.09/08/2011 ते 08/08/2012 या कालावधीसाठी कारचा विमा उतरवलेला आहे. दि.12/02/2012 रोजी हाजी इजाज अब्दुल सत्तार बागवान हे तक्रारदाराचा इन्होवा कार घेऊन पुण्याला निघाले सदरील कार ही शेख चॉंद इसा शेख चालविता होता दि.13/02/2012 सकाळी 5.30 वाजताचे सुमारास नगर-पुणे रस्त्यावर कराडी जकात नाक्याजवळ तक्रारदाराचे इन्होवा कारचे अपघात झाला व सदर गाडीला छत्री ऑटोमोबाइल येथे वाहन दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले. सदर दुरुस्तीला रक्कम रु.7,13,440/- चा खर्च आला. तक्रारदाराने सदर अपघात व खर्चासंबंधी सामनेवाला यांचेकडे कागदपत्र दाखल केले व मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.20/09/2012 रोजी सदरचा क्लेम हा पॉलिसीचे अटी व शर्तींचे भंग झाल्यामुळे देऊ शकत नाही म्हणुन तक्रारदाराला पत्र दिले. तक्रारदाराची तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेला खुलासा पहाता सदरील तक्रारदाराने अपघातग्रस्त गाडी ही स्वतः करीता वापर न करता भाडेतत्वावर दिलेले आहे ही बाब मंचासमोर स्पष्ट आलेली आहे म्हणुन पॉलीसीचा अटी व शर्ती चा भंग झालेला दिसत आहे. म्हणुन सदरची तक्रार नामंजूर करण्यात येते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. तक्रारदार व सामनेवाला यांना निकालाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
दि.04/04/2016
जळगांव. (श्रीमती.पुनम नि. मलिक) (श्री.विनायक आर.लोंढे)
सदस्या अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.