नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि.12-02-2016)
1) वि. प. विमा कंपनी यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार हे वाघापूर, ता. भुदरगड, जि.कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्यांनी वि.प. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत “जनता व्यक्तीगत दुर्घटना विमा क्लेम” पॉलिसी क्र. 161600/07/2012/000191 असून पॉलिसीचा प्रकार “जनता पर्सनल अॅक्सीडेंट विमा क्लेम” असा आहे.
3) तक्रारदार यांना दि. 14-03-2011 रोजी त्यांच्या शेतात काम करताना डोळयास फांदी लागुन,त्यावरील कीड चावलेने उजव्या डोळयाला इजा झाली. तक्रारदार यांचेवर प्रथमत: डॉ. मंदार पाटील, बिंदू चौक, कोल्हापूर येथे उपचार केले व नंतर विवेकानंद नेत्रालय लायन्स क्लब येथे दि. 21-03-2011 रोजी ऑपरेशन झाले. त्यांना 40 % अपंगत्व आले.
4) तक्रारदार यांनी दि. 5-05-2011 रोजी श्री. किसान सहकारी संयुक्त कृषी संस्था मर्या, वाघापूर,ता. भुदरगड, जि. कोल्हापूर या संस्थेमार्फत वि.प. कडे क्लेम भरुन सर्व कागदपत्रांची पुर्तता केली तथापि दि. 27-03-2012 रोजी विमा कंपनीने संयुक्तीक कारणाशिवाय फाईल बंद केली.
5) तक्रारदार हे गरीब असून, त्यांची उपजिविका शेतावर असून त्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 63,500/- होते. तथापि, त्यांना उजवा डोळा निकामी झाल्याने शेतात काम करणे जमत नाही. तक्रारदार यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आले.
6) तक्रारदार यांनी वि.प. कडून नुकसानभरपाई रु. 50,000/-, मानसिक त्रास व शारिरीक त्रास या सदराखाली रक्कम मिळणेसाठी अर्ज दाखल करुन, कागदपत्रे दाखल केली.
7) तक्रारदार यांनीदि. 8-05-2014 रोजी विलंब माफीचा अर्ज दिला व मंचाने दि. 3-09-2014 रोजी अर्ज मंजूर केला.
8) वि.प. यांनी आपले लेखी म्हणणे दाखल करुन, विमा पॉलिसी तक्रारदार यांनी घेतली होती असे कथन करुन वि.प. ची जबाबदारी विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असणा-या शर्ती व अटीनुसार होते असे म्हटले आहे.
9) वि.प. यांनी तक्रारदार यांना जखम झाली, उजव्या डोळयाला इजा झाली. डॉ. मंदार पाटील यांचेकडे व मिरज येथे उपचार झाले हे स्पष्टपणे नाकारले. तक्रारदारांच्या अर्जातील सर्व मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला आहे. वि.प. यांनी म्हटले की, नुकसान भरपाईसाठी विविध मुद्दयाखाली केलेली मागणी चुकीची व अवास्तव असून वि.प. यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याचे म्हटले आहे.
10) वि. प. यांनी परि. 9 मध्ये असे म्हटले की, वि.प. यांनी दि. 5-05-2011, 23-08-2011, 20-01-2012 व 27-03-2012 रोजी कागदपत्रांची मागणी करुनही तक्रारदार यांनी पुर्तता केली नाही. वि.प. पुढे म्हणतात, तक्रारदार यांना मंचात दाखल कागदपत्रांवरुन अपघात दि. 14-03-2011 रोजी झाला असे सांगून डॉ. मंदार पाटील यांचे सर्टिफिकेटवरुन तक्रारदार दि. 21-02-2011 रोजीपासून आपल्या डोळयावर उपचार घेत असल्याचे दिसून येते.
11) वि.प. यांनी परि. 9 मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचा उजवा डोळा पुर्णपणे निकामी झाल्याचे दिसून येत नाही. वि.प. यांनी पुढे म्हटले आहे की, विमा कंपनी तेंव्हा जबाबदार होते जेंव्हा झालेल्या जखमेमुळे विमाधारकाची अपघात तारखेपासून 12 महिन्याच्या आत एका डोळयाची दृष्टी पूर्णपणे बंद होते आणि ज्यामुळे दृष्टी परत येणे असंभव असते.
12) वि.प. पुढे स्पष्टपणे म्हणतात की, तक्रारदाराचे अपंगत्व अपघातामुळे नसून आधीपासून औषधोपचार चालू असल्याने झाले. तक्रारदाराने दाखल केलेले लायन्स लॅब आय हॉस्पीटलचे दि. 12-06-2011 रोजीचे सर्टिफिकेटमध्ये उजव्या डोळयाची दृष्टी पूर्ण गेल्याचे नमूद नाही. तक्रार अर्ज नामंजूर करुन वि.प. यांना मानसिक त्रासापोटी तक्रारदार यांचेकडून रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
13) दोन्ही बाजूंचे म्हणणे व कागदपत्रांचे अवलोकन करता, खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे
सेवेत त्रुटी आहे काय ? होय.
2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा-
14) तक्रारदार व वि.प. यांनी आपल्या म्हणणेच्या समर्थनार्थ कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, यांचे तक्रारदारांचे पासबुकाची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, दृष्टीदिप नेत्रसेवा येथील प्रिस्क्रीबशन, लायन्स लॅब आय हॉस्पीटलचे पत्र डिसॅबिलिटी प्रमाणपत्र, क्लेम फॉर्म, वि.प. क्लेम फाईल बंद केल्याचे दि. 27-03-2012 रोजीचे पत्र, पुराव्याचे शपथपत्र, डॉ. शहापुरकर मिरज यांचे सर्टिफिकेट दि. 9-09-2015 व डॉ. चांदेकर यांचे दि. 19-09-2011 रोजीचे सर्टिफिकेट व पुरसीस दि. 8-02-2016 रोजी दाखल केली.
15) वि.प. यांनी लेखी म्हणणे, पुराव्याचे शपथपत्र, डॉ. अशोक जाधव यांचे रिपोर्ट व प्रतिज्ञापत्र, विमा पॉलिसी व तक्रारदार यांचा मागणी अर्जाच्या झेरॉक्स प्रती सादर केल्या.
16) तक्रारदार यांनी विमा पॉलिसी घेतली याबाबत कोणताही वाद नाही. तक्रारदार आपल्या मुळ अर्जात अपघात दि. 14-03-2011 रोजी झाल्याचे म्हणतात व नंतर डॉ. पाटील यांचे उपचार घेतले असे म्हटले आहे. डॉ. पाटील यांचे सर्टिफिकेटवरुन उपचार फेब्रुवारीमध्ये घेतल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी दि. 8-02-2016 रोजी पुरसीस दाखल करुन, अपघात दि. 14-03-2011 रोजी झाला नसून दि. 14-02-2011 रोजी झाल्याचे म्हटले आहे. सदरची पुरसीस प्रकरण अंतिम आदेशासाठी असताना शेवटच्या क्षणी दाखल केल्याने मंचाने नामंजूर केले.
17) जनता व्यक्तीगत बीमा दुर्घटना पॉलिसी मधील मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
Janata Personal Accident Insurance Policy (C) If such injury shall within twelve Calender months of its occurance be the sole and direct cause of the total and irrecoverable loss of sight of one eye, fifty (50%) percent of the capital sum insured stated in the schesdule hereto.
18) तक्रारदार यांनी आपल्या युक्तीवाद व सरतपासाचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले की, दि. 20-03-2011 रोजी विवेकानंद नेत्रालय, मिरज मध्ये अॅडमिट होऊन दि. 21-03-2011 रोजी अपघातग्रस्त उजव्या डोळयावर शस्त्रक्रिया झाली व दि. 23-03-2011 रोजी डिस्चार्ज मिळाला. डॉ. अर्चना बिरादार, लॉयन्स एनबी आय हॉस्पीटल, मिरज यांनी दि. 12-06-2011 रोजी सर्टिफिकेट देऊन तक्रारदार यांचेवर उपचार केल्याचे स्पष्ट दिसून येते. सदर पत्राचा भाग खालीलप्रमाणे आहे. “This is to certify that, Mr. Rajendra Tukaram Jathar, 36 years Male came to us on 20-03-2011 with C/o- diminition of vision, pain and redness following H/o insect bite on Right eye.”
19) सदर पत्रावरुन तक्रारदार हे आपल्या अर्जात परि. 3 मध्ये म्हटलेप्रमाणे डोळयास फांदी लागून व त्यावरील किड चावलेने जखम होऊन उजव्या डोळयाला जखम झाल्याचे दिसते. डॉ. बिरादार यांनी आपल्या सर्टिफिकेटमध्ये नमूद केले की, “Right Eye therapeutic Keratoplasty was done on 21-03-2011 and he was treatsed with systematic and topical antibiotic and antifungals. Now his vision in R.E. is PL + PR inaccurate and LE. 6/6.” छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पीटल, कोल्हापूर यांनी डिसॅअॅबिलिटी प्रमाणपत कॉलम-बी मध्ये “Blindness or low vision” या सदरामध्ये उजवा डोळा पुर्ण Blind असे म्हटले आहे. डॉ. मंदार पाटील यांनी तक्रारदार यांचेवर दि. 21-02-2011 रोजी उपचार केलेचे व औषधोपचार केल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते.
20) डॉ. अशोक जाधव सर्टिफिकेट देऊन, संपूर्ण कागदपत्र मागवून घेणे आवश्यक असून, फायनल ओपिनियम मध्ये (1) Pl. Get all above documesnts in order (2) will review असे म्हटले आहे.
21) मंचाने संपूर्ण कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले, यावरुन तक्रारदार यांनी अर्जात केलेली तारीख चुकीची असली तरी, तक्रारदार यांना विमा पॉलिसी कालावधीमध्ये उजवा डोळा अपघातामुळे निकामी झाल्याचे दिसून येते.
22) वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांचा अर्ज दि. 5-05-2011 रोजी मिळाला असल्याचे मान्य केले आहे. तक्रारदार यांच्या अर्जावर 10 महिने कोणताही निर्णय न घेता दि. 27-03-2012 रोजी फाईल बंद करणे ही सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदार हे विमा करारातील अटीप्रमाणे विम्याची रक्कम 50% रु. 50,000/- दि. 5-07-2011 रोजीपासून द. सा. द.शे. 9 % व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच वि.प. यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना तक्रार अर्ज दाखल करावा लागलेने मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
23) मंच पुढील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना विमा कराराच्या (क) प्रमाणे विम्याची 50 % रक्कम रु. 50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) दि. 5-07-2011 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याजासह द्यावी.
3) वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.