:: आदेश :: (मंचाचे निर्णयान्वये, सौ.सुषमा प्र.जोशी, मा.सदस्या) (पारीत दिनांक :14 मार्च, 2012) 1. अर्जदार हिने सदरचा अर्ज, तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ होण्या करीता दाखल केलेला आहे. 2. तक्रारकर्ती/अर्जदार हिचे संक्षिप्त कथन असे आहे की, तक्रारकर्ती/अर्जदार ही मृतक शेतकरी श्री शरद नारायणराव हांडे यांची पत्नी आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक-15 ऑगस्ट, 2007 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2008 या कालावधी करीता अपघातग्रस्त शेतक-यास व त्याचे कुटूंबियास लाभ देण्या करीता "शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना" गैरअर्जदार क्रमांक-1 यांचे मार्फत राबविली होती. अर्जदार हयांचे पती श्री शरद नारायणराव हांडे यांचा दिनांक-31.08.2007 रोजी शेतामध्ये विद्युत लाईन दुरुस्त करीत असताना, शॉक लागल्याने अपघाती मृत्यू झाला. 3. अर्जदार/तक्रारकर्ती हिचे पुढे असे म्हणणे आहे की, ती शेती करणारी गरीब व अशिक्षीत कास्तकार असून, तिचे पतीचे मृत्यूनंतर विमा दाव्या संबधाने, अर्जदार हिने, गैरअर्जदार क्रमांक-2 तहसिलदार यांचे कार्यालयाशी वारंवार संपर्क केला, त्यांनी त्यांचे कार्यालया मार्फत पत्रव्यवहार केलेला आहे परंतु गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनी कडून माहिती प्राप्त व्हावयाची आहे, असे उत्तर प्रत्येक वेळी दिले, त्यामुळे योग्य सल्ला व मार्गदर्शना अभावी, अर्जदार हिला न्यायमंचा समक्ष तक्रार दाखल करण्यास 04 वर्ष, 04 महिने एवढया कालावधीचा विलंब झालेला आहे व हा विलंब अर्जदार/तक्रारकर्ती हिचे आटोक्या बाहेरील कारणामुळे झालेला आहे, म्हणून सदरचा विलंब माफ व्हावा, अशी विनंती अर्जदार/तक्रारकर्ती हिने केलेली आहे.
4. गैरअर्जदार यांना सदर विलंब माफीचे अर्जाचे अनुषंगाने नोटीस काढण्यात आली, त्यावर गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी असे उत्तर दिले की, अर्जदार हिचे पती हे विद्युत मंडळात लाईनमन म्हणून नौकरीत नव्हते, त्यामुळे शेतातील डि.पी.वर चढून लाईन दुरुस्त करताना श्री शरद हांडे यांचा दिनांक-31.08.2007 रोजी झालेल्या मृत्यू करीता , ते स्वतःच जबाबदार आहेत. अर्जदार हीची अन्य कथने, गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने माहिती अभावी नाकबुल केलीत. अर्जदार हयांनी सदर तक्रार दाखल करते वेळी कशामुळे विलंब झाला? व सदरचा विमा कोणी काढला होता तसेच अर्जदार हयांना न्यायमंचा समक्ष तक्रार दाखल करण्या करीता 04 वर्ष, 04 महिने झालेला विलंब कोणत्या कारणांमुळे झाला? या बद्यल स्पष्ट तक्रारीत नमुद केलेले नाही म्हणून अर्जदार/तक्रारकर्ती हिचा सदर विलंब माफीचा अर्ज खारीज करण्यात यावा, अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने केलेली आहे. 5. गैरअर्जदार क्रमांक-3 यांनी मूळ तक्रार अर्जावर लेखी उत्तर दाखल केले असून त्यानुसार ते शासनाला विनामोबदला मदत करतात. शेतक-यांचे विमा दाव्या संबधाने विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे, तालुका कृषी अधिकारी, तहसिलदार यांना कळवून पुर्तता करुन घेणे व पुर्तता झाल्यास तसे दस्तऐवज विमा कंपनीला पाठवून देणे व विमा दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबधित वारसांना देणे अशा प्रकारचे कार्य करतात. त्यामुळे सदर तक्रारीतून निर्दोष मुक्तता करावी तसेच रुपये-5000/- खर्चासह तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. 6. गैरअर्जदार क्रमांक-2 तहसिलदार यांनी सदर विलंब माफीचे अर्जावर कोणतेही उत्तर दाखल केले नाही. 7. न्यायमंचाने सदर प्रकरणामधील विलंब माफीचे अर्जावर अर्जदार, गैरअर्जदार क्रमांक-1 यांची सुनावणी ऐकून घेतली. गैरअर्जदार क्रमांक-2 व क्रमांक-3 हे सुनावणीचे वेळेस गैरहजर होते. म्हणून उपलब्ध अभिलेखावरुन सदर विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे. 8. अर्जदार/तक्रारकर्ती हिने तिचे तक्रारअर्जा सोबत पान क्रमांक-12 वर दस्तऐवज दाखल केले असून त्यावरुन अर्जदार हिचे पतीचे मृत्यू नंतर, गैरअर्जदार क्रमांक-2 यांचेकडे दिनांक-12.10.2007 रोजी क्लेम फॉर्म सादर केलेला आहे व त्याची प्रमाणित प्रत पान क्रमांक-33 वर दाखल आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक-2 तहसिलदार यांनी त्यांचे दिनांक-11.12.2007 रोजीचे पत्राद्वारे, गैरअर्जदार क्रमांक-3 यांना विमा क्लेम संबधाने विचारणा केलेली आहे, सदर पत्राची प्रमाणित प्रत अभिलेखावर दाखल आहे. पान क्रमांक-31 वर गैरअर्जदार क्रमांक-2 तहसिलदार यांचे दिनांक-28.03.2008 चे पत्राद्वारे, कागदपत्रांची पुर्तता करुन पाठविल्याचे पत्राची प्रमाणित प्रत अभिलेखावर दाखल आहे.
9. गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने, अर्जदार/तक्रारकर्ती हिला न्यायमंचा समक्ष तक्रार दाखल करण्यास झालेला 04 वर्ष, 04 महिन्याचा विलंब कसा झाला ?या बाबत सविस्तर तक्रारीत नमुद केलेले नसल्यामुळे अर्जदार हिचा सदर विलंब माफीचा अर्ज खारीज व्हावा, अशी विनंती केली आहे.
10. न्यायमंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच अर्जदार यांचा विलंब माफीचा अर्ज व त्यावरील गैरअर्जदार क्रमांक-1 चे म्हणणे याचे अवलोकन केले तसेच विलंब माफीचे अर्जावर उभय पक्षाचे युक्तीवादा वरुन न्यायमंच या निर्णयावर पोहचला आहे की, अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्रमांक-2 यांचे मार्फत, गैरअर्जदार क्रमांक-3 यांचेकडे दिनांक-28.03.2008 रोजी कागदपत्रांची पुर्तता करुन विमा दावा पाठविलेला आहे. गैरअर्जदार क्रमांक-3 यांनी सदर विमा दावा अर्जावर कोणतेही उत्तर दिलेले नाही किंवा त्यांचे लेखी उत्तरा मध्ये देखील विमा दावा मंजूरी संबधाने उत्तर दिले होते किंवा काय या बाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे न्यायमंचाचे मते, सदर तक्रारीचे कारण हे सातत्याने घडत आहे म्हणून सदर तक्रार दाखल करण्यास कोणताही विलंब झालेला नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत झाले आहे. 11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, न्यायमंचाद्वारे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. ::आदेश:: 1) अर्जदार/तक्रारकर्तीचा विलंब माफीचा अर्ज मंजूर 2) ग्राहक तक्रार क्रमांक-123/2011 नियमितपणे पुढे चालविण्यात यावे. 3) विलंब माफीचा अर्ज या आदेशाद्वारे नस्तीबध्द करण्यात येत आहे. वर्धा दिनांक :14/03/2012.
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. ANIL N. KAMBLE] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |