तक्रारदार तर्फे वकील :- श्रीमती एस.एम.पोतदार सामनेवाले तर्फे वकील :- श्री.पी.आर.कोळेकर
निकालपत्र-(दि.12/06/2014)
व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा पशु विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2 तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :- यातील सामनेवाला ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून तक्रारदार यांच्या म्हैशीचा, श्री ज्ञानेश्वरी सह. दुध व्यावसायिक संस्था मर्या. सावरवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर मार्फत सामनेवाला यांचेकडे विमा उतरविलेला होता. सदर जनावरांचा बिल्ला नंबर अनुक्रमे OIC/161600/150661 असा आहे.
3 तक्रारदार यांची सदर विमाधारक म्हैस पॉलीसीच्या कालावधीमध्येच दि.10.11.2013 रोजी मयत झाली. तदनंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.10,000/- इतकी विमा रक्कमेची मागणी केली असता, दि.09.01.2014 रोजी सामनेवाले यांनी लेखी पत्राव्दारे टॅग तुटलेल्या अवस्थेत आहे असे अत्यंत चुकीचे उत्तर देऊन तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारलेला आहे. तदनंतर, श्री ज्ञानेश्वरी सह. दुध व्यावसायिक संस्था मर्या. सावरवाडी व तक्रारदार यांनी दि.21.01.2014 रोजी लेखी पत्राव्दारे सामनेवाले यांना अशी वस्तुस्थिती सांगितली की, म्हैशीच्या उजव्या कानामध्ये बिल्ला होता परंतु पोस्टमार्टेम केलेनंतर कान कापताना कानातील बिल्ला निघून खाली पडला (पेचातून व्यवस्थीत न काढलेने) व त्याचे दोन भाग झालेचे संस्थेचे सचीव यांच्या निदर्शनास आले तसाच बिल्ला आपल्याकडे पाठविला आहे. तरी टॅगबद्दल कोणतीही शंका घेण्यासारखी नसून तक्रारदारांचा क्लेम मंजूर होऊन मिळावा ही विनंती. तसेच दि.22.01.2014 रोजी प.वै.अधिकारी राहूल चौगुले यांनी देखील अशीच वस्तुस्थिती लेखी पत्राव्दारे सामनेवाले यांना कळविली तरी देखील सामनेवाले यांनी दि.29.01.2014 रोजी पूर्वीचेच कारण सांगून तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारला. क्लेम फॉर्मसोबत टॅग नं.OIC/161600/150661 असणारी म्हैसच मरण पावल्याबाबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे सामनेवाले यांचेकडे पाठविलेली आहेत. याकारणे, तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे OIC/161600/150661 हा बिल्ला असणा-या म्हैशीचाच क्लेम मागितलेला आहे. तसेच मृत्युसमयी सदर विमाधारक म्हैशीच्या कानामध्ये पॉलीसीमध्ये व क्लेम फॉर्ममध्ये नमुद असलेला टॅग नं. OIC/161600/150661 हाच टॅग होता. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांचा न्याययोग्य चुकीच्या कारणास्तव नाकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना ग्राहक दयावयाच्या सेवेत फार मोठी त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर होऊन सामनेवाला विमा कंपनीकडून विमा दाव्याची रक्कम रु.10,000/- दि.09.01.2014 पासून द.सा.द.शे.18% व्याजासहित मिळावेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
4 तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत अ.क्र.1 ला दि.09.01.2014 चे पहिले क्लेम रिजेक्शन लेटर क्र.1, अ.क्र.2 ला श्री ज्ञानेश्वरी सह. दुध व्यावसायिक संस्था मर्या. सावरवाडी यांनी सामनेवाले यांना पाठविलेले पत्र, अ.क्र.3 ला दि.21.01.2014, तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठविलेले पत्र, अ.क्र.4 ला डॉ.राहुल चौगले यांनी दि.21.01.2014 रोजी सामनेवाले यांना पाठविलेले पत्र, अ.क्र.5 ला दि.29.01.2014 रोजीचे सामनेवाले यांचे दुसरे क्लेम रिजेक्शन पत्र तसेच व्हेटर्नरी सर्टीफिकेट, पशु मृत्यू दाखला, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, व्हॅल्यूएशन सर्टीफिकेट, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5 सामनेवाला यांनी दि.28.04.2011 रोजी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये पुढे कथन करतात की, तक्रारदाराच्या म्हैशीची पॉलीसी सामनेवाला यांचेकडे उतरविलेली होती हे सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदारांची म्हैस ही दि.10.11.2013 रोजी मयत झालेली असुन सदरच्या म्हशीच्या कानातील टॅग हा तुटलेल्या अवस्थेत दाखल केला. दि.09.01.2014 चे पत्राने मयत म्हैशीच्या कानातील टॅग नं.OIC/161600/150661 तुटलेल्या अवस्थेत असून तक्रारदारांना आणखीन एक संधी देण्यासाठी तुटलेल्या टॅगबाबत खुलासा करणेबाबत कळविले. तक्रारदारांनी केलेला खुलासा योग्य व समाधानकारक आढळून न आलेने दि.29.01.2014 रोजीच्या पत्राने सदरचा क्लेम अटी व नियमाप्रमाणे देय होत नाही असे कळविले. विमा धारकांनी मयत जनावरांचे कानातील टॅग हा व्यवस्थित व अखंड सामनेवाले कंपनीकडे हजर करणे जरुरीचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांची तक्रार ही कायदयाने चालणेस अपात्र असलेने तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च तक्रारदाराकडून मिळावा व तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
6 तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्हणणे, तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा लेखी व तोंडी युक्तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून विमा रक्क्म मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार मंजूर |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1 – तक्रारदारांचे म्हैशीचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडे श्री.ज्ञानेश्वरी सहकारी दुध व्यवसायिक संस्था मर्या., सावरवाडी, ता.करवीर यांचेमार्फत विमा उतरविलेला आहे. विमा पॉलीसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. विमा रक्कम रु.10,000/- आहे. तक्रारदारांची विमाधारक म्हैस दि.10.11.2013 रोजी मयत झालेनंतर सामनेवाले विमा कंपनीकडे मयत म्हैशीचा विमा क्लेम मागितला असता, सामनेवाले विमा दि.29.01.2014 रोजी Tag no.161600-150661 along the claim paper submitted by you to us on 25.11.2013 is in broken condition चे कारणास्तव तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. सदरचा क्लेम याकारणास्तव नाकारुन सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, मयत म्हैशीचे कानातील टॅग नं.OIC-161600-150661 नमुद आहे. सामनेवाले यांनी दि.28.04.2014 रोजीचे म्हणणेमध्ये सदरचे मयत विमाधारक म्हैशीचा टॅग नं.OIC-161600-150661 मान्य केलेला आहे. तथापि दि.09.01.2014 रोजीचे पहिले क्लेम रिजेक्शन पत्राने सदरचा टॅग तुटलेले अवस्थेत असलेने क्लेम दयेय होत नाही. त्याअनुषंगाने, दोन आठवडेचे आत तुटलेला टॅगसंबंधी खुलासा देणेबाबत कळविले. दि.29.01.2014 रोजी दुसरे क्लेम रिजेक्शन पत्राने तक्रारदारांनी केलेला खुलासा योग्य व समाधानकारक आढळून न आलेने तक्रारदारांचे मयत म्हैसीचा टॅग तुटलेल्या अवस्थेत असलेने तक्रारदारांचा क्लेम तक्रारादारांचा क्लेम नाकारलेला आहे असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सदरचे मुद्दयांचे अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेले अ.क्र.2, दि.21.01.2014 रोजीचे श्री.ज्ञानेश्वरी सहकारी दुध व्यवसायिक संस्था मर्या., सावरवाडी, ता.करवीर यांनी सामनेवाले विमा कंपनी यांना पाठविलेले पत्र व अ.क्र.3 कडील तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनी यांना पाठविलेले पत्रांचे अवलोकन केले असता, सदरचे पत्रामध्ये टॅग नं.OIC-161600-150661 म्हैशीच्या उजव्या कानामध्ये बिल्ला होता. परंतु पोस्टमार्टम केले नंतर कान कापताना बिल्ला खाली पडला व त्याचे दोन भाग झालेले संस्थेचे सचिव यांचे निदर्शनास आले. तसेच ते पाठविले आहेत टॅग तुटला नसुन पेचातून निघाला आहे असे नमुद असुन त्यावर सेक्रेटरी, चेअरमन- श्री.ज्ञानेश्वरी सहकारी दुध व्यवसायिक संस्था मर्या., सावरवाडी, ता.करवीर व तक्रारदार यांच्या सहया आहेत. सदरचे पत्र हे तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि.09.01.2014 रोजीचे पहिल्या क्लेम रिजेक्शन पत्राप्रमाणे दोन आठवडयाचे आत दि.21.01.2014 तुटलेल्या टॅगबाबत योग्य खुलासा कळविलेले आहे. तसेच अ.क्र.4 कडील व्हेटेनरी डॉक्टर राहुल चौगले यांनी दि.22.01.2014 रोजी सामनेवाले विमा कंपनीस सदरचा टॅग पोस्टमार्टेम झालेनंतर कानातून काढतेवेळी तो व्यवस्थित न काढलेने पेचातून निघाला परंतु सदरचा टॅग पोस्ट मार्टम करतेवेळी उजव्या कानात व्यवस्थित होता असे नमुद आहे. तसेच दि.14.11.2013 रोजीचे सदर डॉक्टरांचे पोस्ट मार्टम सर्टिफिकेट दाखल केलेले असून त्यावर त्यांची सही आहे.
वरील सर्व कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता, केवळ टॅग तुटलेल्या अवस्थेत होता. तथापि तक्रारदारांनी त्या अनुषंगाने सामनेवाले विमा कंपनीस पहिल्या क्लेम रिजेक्शन पत्राप्रमाणे मुदतीत योग्य खुलासा देऊन देखीलही केवळ तांत्रिक कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3 – उपरोक्त मुद्दा क्र.1 चे विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून विमा रक्कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारीख म्हणजे दि.04.03.2014 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेमुळे तकारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब, हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.04.03.2014 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे.
3 सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासुन 30 दिवसांचे आत अदा करावेत.
4 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
(श्रीमती रुपाली डी. घाटगे) (श्री. दिनेश एस. गवळी) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb