नि का ल प त्र :- (मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या) (दि . 20-11-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. दि. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हिचे पती शेतकरी होते व त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. तक्रारदार हिचे पतीचा “जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना ” या योजनेअंतर्गत इंदिरा विकास सेवा संस्था मर्या, केर्ली, ता. करवीर जि.कोल्हापूर यांचेमार्फत वि.प. यांचेकडे विमा पॉलिसी क्र. 161600/47/2008/381 ने विमा उतरविला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा शासनामार्फत वि.प. कंपनीकडे अदा केलेला आहे. यातील तक्रारदार हिचे पती कै. परसू दौलू शिंदे हे दि. 12-12-2010 रोजी त्यांचे केर्ली गावचे हद्दीत पायी चालत असताना दिपक नाथ पाटील यांचे ताब्यातील मोटार सायकल नं. एम.एच. 09-बीएन-3154 ने रत्नागिरी-कोल्हापूर जाणा-या हायवे रस्त्यावर ठोकरुन जखमी केलेने त्यांना औषधोपचाराकरिता कोल्हापूर आर्थोपेडिक सेंटर, कोल्हापूर येथे दाखल केले असता औषधपचार चालू असताना दि. 13-12-2010 रोजी उपचार सुरु असताना मयत झालेले आहेत. तक्रारदारांचे पतीचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झालेले आहे. तेथील डॉक्टरांनी तक्रारदाराचे पती हे मयत झालेले असलेबाबत तसा दाखला दिलेला आहे. व सदर अपघात घटनेची नोंद करवीर पोलिस स्टेशन येथे केली आहे. तक्रारदारांचे पती मयत झालेनंतर “जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना ” योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेसाठी सर्व कागदपत्रांसह क्लेम दाखल केला असता वि.प. कंपनीने दि. 31-03-2011 रोजीच्या पत्राने तक्रारदार यांचे पतीचे वय हे अपघातावेळी 70 वर्षापेक्षा जास्त असलेचे कारणावरुन बेकायदेशीररित्या नाकारला आहे. सबब, तक्रारदार यांनी विमा रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटीची रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत 9 कागदपत्रे दाखल केलेली असून अ.क्र. 1 कडे वि.प. कंपनीकडे भरुन दिलेला विमा प्रस्ताव दि.25-02-2011, अ.क्र. 2 कउे वि.प. कंपनीने विमा प्रस्ताव नाकारलेचे पत्र दि. 31-03-2011, अ.क्र. 3 कडे सी.पी. हॉस्पीटल यांनी दिलेला मृत्यू दाखला दि. 13-12-2010, अ.क्र. 4 कडे प्रेताबरोबर पाठविलेला फॉर्म नं. II दि. 13-12-2010, अ.क्र. 5 कडे वर्दी अपघात दि. 21-12-2010, अ.क्र. 6 कडे घटना स्थळाचा पंचनामा दि. 13-12-2010, अ.क्र. 7 कडे Inquest पंचनामा दि. 13-12-2010, अ.क्र. 8 कडे पी.एम. रिपोर्ट, दि. 13-12-2010, अ.क्र. 9 कडे वि.प. कंपनीचे पत्र दि. 25-01-2011 इत्यादी कागदपत्रे व तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले आहे.
(4) वि.प. यांनी तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांचे तक्रारीतील मजकूर चुकीचा असून मान्य व कबुल नाही असे कथन केले आहे. ज्यावेळी क्लेम फॉर्म दाखल केला त्यावेळी सदरचा क्लेम फॉर्मचे सर्व्हे आणि इन्व्हेस्टीगेशन करताना मयताचे वय 75 वर्षे नमूद होते. जी.पी.ए. पॉलिसीअंतर्गत अटीप्रमाणे वयोमर्यादा 10 ते 70 वर्षे आहे. तथापि मयताचे वय हे 75 वर्षे असलेने वि.प. यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नसलेने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करुन वि.प. याना रक्कम रु. 5,000/- खर्चापोटी मिळावेत अशी वि.प. यांनी विनंती केली आहे.
(5) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे विमा पॉलिसी रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? होय.
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
4. आदेश काय ? अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदारांचे पती कै. परसू दौलू शिंदे यांचा “जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना ” या योजनेअंतर्गत शासनामार्फत वि.प. विमा कंपनी कडे विमा उतरविलेला होता. विमा पॉलिसी क्र. 161600/47/2008/381 अशी होती. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तक्रारदारांचे पती मयत परसू दौलू शिंदे यांचा दि. 12-12-2010 रोजी पायी चालत असताना मोटरसायकलने ठोकरुन अपघात झाला. औषधोपचारासाठी कोल्हापूर आर्थोपेडिक सेंटर, कोल्हापूर येथे दाखल केले असता, औषधोपचार चालू असताना दि. 13-12-2010 रोजी मयत झाले व त्यांचे शवविच्छेदन सी.पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे झाले.
तक्रारदारांनी “जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना ” योजना अंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून वि.प. यांचेकडे क्लेम मागणी केली असता यातील वि.प. यांनी तक्रारदारांचे मयत पती यांचे वय हे अपघातावेळी 70 वर्षापेक्षा जास्त असलेने जी.पी.ए. पॉलिसीनुसार विमाधारकाचे वयोमर्यादा 10-70 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याकारणाने तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारलेला आहे. सबब, सदर कारणाने तक्रारदारांचा क्लेम नाकारुन वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल कागदपत्रे बारकाईने अवलोकन केले असता अ.क्र. 3 कडील सीपीआर हॉस्पटलचे Cause of Death Certificate, , अ.क्र. 4 पोलिस अहवाल, अ.क्र. 5 वर्दी जबाब, अ.क्र. 6 कडील पंचनामा, अ.क्र. 7 कडील इन्क्वेस्ट पंचनामा, अ.क्र. 8 कडील पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी सर्व कागदपत्रामध्ये तक्रारदारांचे मयत पतीचे अपघातावेळी मृत्यूचे समयी वय वर्षे 65 असे नमूद आहे यावरुन मयत परसु शिंदे यांचे दि. 12-12-2010 रोजी अपघातावेळी मयत झालेल्यावेळी वय वर्षे 65 होते हे स्पष्टपणे दिसून येते. दि. 16-09-2014 रोजी तक्रारदारांनी मयत परसू शिंदे यांचे मतदान ओळखपत्र दाखल केलेले असून सदरचे ओळखपत्रावर दि. 1-01-1994 रोजी मयताचे वय 48 वर्षे नमुद आहे. तथापि वि.प. यांनी त्यांचे म्हणणेमध्ये ज्यावेळी तक्रारदारांनी सदरचा क्लेम दाखल केला त्यावेळी सदर क्लेमचा सर्व्हे आणि इन्व्हेस्टीगेशन करताना मयत विमाधारकाचे वय 75 वर्षे दिसून आले आणि जी.पी.ए. च्या पॉलिसीप्रमाणे वयाची मर्यादा 10-70 वर्षे असलेने सदरचा क्लेम नामंजूर केला आहे. तथापि, वि.प. यांनी मयताचे वय 75 वर्षे होते हे दर्शविण्यासाठी इतर कोणताही परिस्थितीजन्य पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर मयताचे वय हे अपघाताचे वेळी मृत्यूसमयी वय वर्षे 65 हे स्पष्टपणे नमुद केले असलेने तक्रारदाराचे पतीचे अपघातासमयी वय वर्षे 65 होते या निष्कर्षास हे मंच येत आहे. तक्रारदार ही अशिक्षित विधवा महिला असून तिचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबूनच असलेने यातील विमा पॉलिसीचा मुळ हेतू उद्देश विचारात न घेता यातील वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम हा केवळ तांत्रिक बाबीचा आधार घेवून चुकीच्या कारणाने नाकारला ही वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:
वर कलम 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि. प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 1,00,000/- व ता. 08-01-2014 रोजी पासून सदरची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी विमा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र. 3 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र . 4 : सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 08-01-2014 रोजीपासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याज द्यावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.