::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- २५/०१/२०२२)
- तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
- तक्रारकर्तीचे पती मयत श्री तुकाराम जनार्धन भोयर यांच्या मालकीची मौजा शिवनीचोर, तालुका व जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ३३५ ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक ३/५/२०१७ रोजी शेतात मोटरपंप सुरु करण्यास गेला असता विद्युत झटका लागल्याने मृत्यु झाला. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरूध्द पक्ष क्रं. १ व २ कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू. २,००,०००/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीने दिनांक ८/६/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक ३ कडे रितसर अर्ज केला होता तसेच विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ ने दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर असे काहीही न कळविल्याने तक्रारकर्तीने तिच्या नातेवाईकांमार्फत कृषी आयुक्त, महाराष्ट्र यांना दिनांक १३/०६/२०१८ रोजी माहितीच्या अधिकारात सदर दाव्याबाबत माहिती विचारली असता तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी “No MSEB Certificate” या कारणाने नाकारल्याचे कळविले परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी सदर विमा दावा मंजूर अथवा नामंजूर बाबत काहीही माहिती तक्रारकर्तीस दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला आयोगासमक्ष तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी सदर विमा दावा नाकारून तक्रारकर्तीला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्षांनी, तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम रु. २,००,०००/- व त्यावर प्रस्ताव दाखल दिनांक ८/६/२०१७ पासून १८ टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. २०,०००/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं १ ते ३ यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ हजर होवून त्यांनी आपले संयुक्त लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारीतील कथन अमान्य करुन पुढे आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, मयत तुकाराम जनार्धन भोयर यांचा मृत्यु विजेचा झटका लागल्यामुळे झाला ही बाब पोलिसांचा अहवाल आणि माहिती अभावी अमान्य आहे. मयत तुकाराम जनार्धन भोयर यांचा विजेचा झटका लागल्यामुळे अकाली मृत्यु झाला याबाबत विद्युत निरीक्षकांचे वैध प्रमाणपञ तसेच संबंधीत विद्युत निरीक्षकाचे अहवाल नसल्याकारणाने विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. मयत तुकाराम जनार्धन भोयर यांचा मृत्यु दिनांक ३/५/२०१७ रोजी झाला परंतु तक्रार ही दिनांक १८/२/२०१९ रोजी दाखल केली त्यामुळे सदर तक्रार ही मुदतबाह्य आहे. तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाच्या कारणाचे योग्य स्पष्टीकरण दिले नाही तसेच विलंब माफीचा अर्ज सुध्दा दाखल केला नाही. सदर विमा दाव्याचा प्रस्ताव हा कृषी अधिका-याकडे ९० दिवसांचे आत दाखल करावयास पाहिजे होता परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे सदर विमा दावा हा दिलेल्या मुदतीत सादर केल्याबाबत कोणताही दस्तावेज अभिलेखावर नाही. सबब प्रस्तुत तक्रार ही खोटी व बोगस आहे, या कारणास्तव खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तसेच विरूध्द पक्ष क्रं १ व २ यांचे संयुक्त लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे प्रकरणात उपस्थित होऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्याने त्यांचे लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आयोगाने दिनांक २०/११/२०१९ रोजी निशानी क्रमांक १ वर आदेश पारित केला आणि उभयपक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणि त्यावरील निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(१) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांची ग्राहक आहे काय ? होय.
(२) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. ३ यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(३) तक्रारकर्तीची तक्रार विहीत मुदतीत आहे काय ? होय
(४) विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण होय
सेवा दिली आहे काय ?
(५) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत :-
5. तक्रारकर्तीने तक्रारीत नि.क्र. ४ वर दाखल केलेल्या दस्त क्र. ४, ७/१२ उतारा, गांव नमुना ८ (अ), गांव नमुना ६(क) वारस प्रकरणांची नोंदवही या दस्तऐवजावर तक्रारकर्तीचे पती मयत तुकाराम भोयर यांचे नावाची नोंद तसेच त्यांचे मृत्युनंतर तक्रारकर्तीच्या नावाची नोंद वारस प्रकरणाच्या नोंदवहीमध्ये आहे यावरून तक्रारकर्तीचे मयत पती शेतकरी होते हे स्पष्ट होते. शासनाने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्रमांक ३ मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे इतर शेतक-यांसह तक्रारकर्तीचे मयत पतीचा विमा काढलेला होता व तक्रारकर्ती ही मयत तुकाराम भोयर यांची पत्नी असल्याने तक्रारकर्ती ही सदर विमा पॉलिसी अंतर्गत लाभार्थी या नात्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत :-
6. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीचे शेतकरी पतीचा विमा काढण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ या शासकीय कार्यालयाने विना मोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक २ याचे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ३ बाबत :-
7. मयत तुकाराम भोयर यांचा दिनांक ०३/०५/२०१७ रोजी अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर जनार्धन भोयर यांनी तक्रारकर्तीस विमा दावा रक्कम मिळण्याकरिता दिनांक ८/६/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे आवश्यक दस्ताऐवजांसह अर्ज केला. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्तावाबाबत मंजूर वा नामंजूर काहीही न कळविल्याने तक्रारकर्तीचे नातेवाईकाने दिनांक १३/६/२०१८ चे अर्जान्वये माहिती अधिकाराअंतर्गत वर नमूदविमा दावा अर्जाबाबत माहिती मागितली असतामाहितीअधिकारी तथा कृषी उपसंचालक(सां-२) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २७/११/२०१८ रोजीचे पञान्वये तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी ‘No MSEB Certificate’ या कारणास्तव नाकारल्याने दस्तऐवजांसह कळविले. सदर पञ प्रकरणात निशानी क्रमांक ४ वरील दस्त क्रमांक २ सोबत दाखल आहे. विमा दावा अर्ज नाकारल्याचे कारण कळल्यानंतर तक्रारकर्तीने दिनांक १२/०३/२०१९ रोजी विरुध्द पक्षांविरुध्द आयोगामध्ये तक्रार दाखल केली. प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आंत दाखल केली असल्याने मुदतीत आहे. याशिवाय तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक ३/५/२०१७ रोजी अपघाती मृत्युनंतर शासनाचा विमा दावा योजनेअंतर्गत विमा दावा रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे ९० दिवसाचे आत म्हणजे दिनांक ८/६/२०१७ रोजी विमा दावा अर्ज सादरकेला असल्याने तो सुध्दा योजनेनुसार मुदतीत आहे. सबब मुद्दा क्रं. ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत :-
8. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४ वर दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत तुकाराम भोयर यांचे नदीचे काठावर उपरोक्त शिवनीचोर शेत असून शेतात पिकाला पाणी देण्याकरिता वर्धा नदिच्या पाञात सबमर्सिबल पंप लागला आहे. दिनांक ३/५/२०१७ रोजी मयत तुकाराम भोयर वर्धा नदीच्या पाञात सबमर्सिबल पंपाचे वायर जोडणी करीत असतांना विजेचा धक्का लागल्याने मरण पावले असे मरणान्वेषण प्रतिवृत्त, गुन्ह्याच्या तपशिलाचा नमुना/घटनास्थळ पंचनामा इत्यादी मध्ये तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये सुध्दा मृत्युचे कारण ‘Shock due to electrocution’ असे नमूद आहे यावरुन मयत तुकाराम यांचा विजेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ मार्फत अर्ज केला. परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा ‘No MSEB Certificate’ या कारणास्तव नामंजूर केल्याचे तिला माहिती अधिकारान्वये माहिती मागितल्यानंतर समजले. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी मयत तुकाराम याला विजेचे मशीन हाताळण्याचा अनुभव असल्याचे MSEB चे अधिकृत प्रमाणपञ नव्हते तसेच अनुभव नसतांना स्वतः जोखीम पत्करल्याने त्यांना विजेचा धक्का लागून मरण पावले व असा दावा विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही असा आक्षेप घेतलेला आहे परंतु सदर बाब विरुध्द पक्ष यांनी योग्य पुरावा/दस्तावेज दाखल करुन सिध्द केले नसल्याने ग्राह्रय धरणे योग्य नाही. सदर शेतकरी विमा योजना ही कल्याणकारी योजना असून शेतक-याचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचे कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता महाराष्ट्र शासन ही कल्याणकारी योजना राबवत आहे. सदर योजनेमध्ये सुध्दा ‘अपघाती मृत्यु संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येत नाही’ असे नमूद आहे. तक्रारकर्तीने मयत तुकारामला विजेचा धक्का लागून मृत्यु झाला याबाबत उपरोक्त दस्तावेज दाखल केलेले आहे व त्या दस्ताऐवजांवरुन मयत तुकाराम यांचा मृत्यु हा विजेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यु झाला हे स्पष्ट होत आहे. माञ मयत तुकाराम यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतरही विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा अयोग्य/तांञिक कारणास्तव नाकारुन तक्रारकर्ती प्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविली, या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून विमा दाव्याची रक्कम, शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रं. ४ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ५ बाबत :-
9. मुद्दा क्रं. १ ते ४ च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्र. १९/३८ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या विमा दाव्याची रक्कम रु. २,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. ५,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- तक्रारकर्तीला दयावी.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- तक्रारकर्ती यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.