::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/10/2016 )
माननिय सदस्य श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा मंगरुळपीर, जि. वाशिम येथील रहिवाशी आहे. तक्रारकर्ता हा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवितो. तक्रारकर्त्याकडे तवेरा जीप क्र. एम.एच. 37-जी-1110 असून, सदर वाहनाचा अपघात विमा विरुध्द पक्षाकडे दिनांक 28/08/2013 ते 27/08/2014 पर्यंत अस्तित्वात होता. दिनांक 25/05/2014 रोजी तक्रारकर्त्याचे मित्र श्री. मानेकर हे लग्नाला जाण्याकरिता मित्रत्वाच्या नात्याने तक्रारकर्त्याची गाडी घेऊन गेले. लग्नावरुन परत येत असतांना, कारंजा ते मंगरुळपीर रोडवर सोहळ फाट्यानजीक गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडी पलटी झाली व गाडीतील सहा व्यक्ती मरण पावले व तीन व्यक्ती जखमी झाले. त्याचवेळी याच लग्नसोहळयावरुन परत येणा-या मागील गाडीतील व्यक्ती हे अपघातग्रस्त वाहन खड्डयातून बाहेर काढण्याकरिता गेले व ते सुध्दा गाडी हातातून सुटल्यामुळे जखमी झाले. परंतु पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता या इतर जखमींची सुध्दा नावे लिहून घेतली. वास्तविक अपघातग्रस्त गाडीमध्ये चालकासह फक्त 10 व्यक्ती प्रवास करीत होते. सदर घटनेची माहिती तक्रारकर्त्याने तात्काळ विरुध्द पक्ष यांना दिली, त्यावरुन विरुध्द पक्षाने वाहनाच्या निरीक्षणाकरिता सर्व्हेअरला पाठविले. त्याबाबतचा दावा विरुध्द पक्षाकडे दाखल करण्यांत आला. नंतर दिनांक 06/08/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पत्र देवून सदरहू अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास सांगीतले. वाहनाचे पुर्ननिरीक्षण सर्व्हेअर मार्फत करण्यात आले. त्याचवेळी तक्रारकर्त्याने खर्चाची एकूण बिले रुपये 3,00,140/- ची विरुध्द पक्षाकडे जमा केलीत. तरीसुध्दा विरुध्द पक्षाने अपघाताच्या वेळी सदरहू वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत होते, या कारणाने दावा नामंजूर केला. विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन, तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर केला. नुकसान भरपाई देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली, व विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास वाहनाची नुकसान भरपाई रुपये 3,00,140/-, मानसिक, त्रासापोटी रुपये 50,000/-, तक्रारीचा व कागदपत्राचा खर्च रुपये 5,000/-, वकील फी रुपये 12,000/- असे एकूण रुपये 3,67,140/- व्याजासह देणेबाबत आदेश पारित व्हावा, तसेच ईष्ट व न्याय दाद तक्रारकर्त्याच्या हितावह देण्यात यावी, अशी प्रार्थना केली. सदर तक्रारीसोबत निशाणी-4 प्रमाणे एकंदर 18 दस्त पुरावा म्हणून दाखल केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब - विरुध्द पक्षाने निशाणी 10 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याचे वाहन क्र. एम.एच. 37-जी-1110 हे विरुध्द पक्षाकडे खाजगी वाहन म्हणून विमाकृत होते. परंतु घटनेच्या वेळी तक्रारकर्त्याने सदरहू वाहन हे लग्नाकरिता भाडयाने दिले होते व ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये लेखी जबाबात नमूद केल्याप्रमाणे सहा मृतक व नऊ जखमी व्यक्ती, प्रवास करीत होते. त्या सर्व व्यक्तींनी मोटार अपघात दावा प्राधिकरण, मंगरुळपीर व अकोला येथे अपघाताबाबत नुकसान भरपाई मिळण्याकरिता दावे दाखल केलेले आहेत. सदरहू जखमी व मृतक व्यक्तींनी अपघाताबाबत दावा दाखल करतांना ते गाडीमध्ये प्रवास करीत असल्याबाबत म्हटले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे की, अपघाताचे वेळी इतर काही लोक हे दुस-या गाडीमध्ये प्रवास करीत होते व गाडी पलटी होतांना सदरहू व्यक्ती जखमी झाले हे म्हणणे खोटे ठरते. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला असल्यामुळे विमा कंपनी तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईस जबाबदार नाही. अपघातानंतर विरुध्द पक्ष यांच्या सर्व्हेअरने केलेल्या सर्व्हे रिपोर्टवरुन, सालव्हेज व पार्टसचे घसारा आणि पॉलिसी एक््सेस चे असेसमेंट नंतर गाडीचे नुकसान हे फक्त रुपये 1,20,000/- एवढेच देय म्हणून नमुद केले आहे. पोलीस स्टेशन, कारंजा यांनी संपूर्ण शहानिशा व प्रकरणाचा संपूर्ण तपास करुन, फायनल रिपोर्ट (चार्जशिट) दाखल केली असून त्यावेळी तक्रारकर्त्याने तपासाबाबत कुठलिही तक्रार वरीष्ठ अधिका-याकडे केली नाही. परंतु ज्यावेळी विमा कंपनीने, विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती बाबत तक्रारकर्त्याला पत्र दिले, त्यावेळी तक्रारकर्त्याने स्वतःच्या बचावासाठी ही खोटी भुमिका घेतली. सदरहू गाडीमध्ये 14 अधिक 1 = 15 व्यक्ती प्रवास करीत होते, त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला व त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा खर्चासह खारीज करण्यांत यावा.
3) कारणे व निष्कर्ष :: तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तसेच उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज व केलेला युक्तिवाद
विचारात घेऊन, या प्रकरणात मंच खालील निष्कर्षाप्रत आलेले आहे.
उभय पक्षांना मान्य असलेली बाब म्हणजे, तक्रारकर्त्याने त्याची गाडी तवेरा शेवरलेट क्र. एम.एच. 37-जी-1110 चा विमा विरुध्द पक्षाकडे उतरविलेला होता व सदरहू विमा पॉलिसी क्र. 182202/31/2014/2763 ही दिनांक 28/08/2013 ते 27/08/2014 पर्यंत अस्तित्वात होती. सदरहू विमा पॉलिसी अंतर्गत एखादा दावा उद्भवल्यास रुपये 7,50,000/- पर्यंत दावा मंजूर करण्याची तरतूद होती. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे त्याच्या गाडीचा विमा काढून विरुध्द पक्षाची सेवा घेतलेली आहे त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याची गाडी त्याचे मित्र श्री. श्री. मानेकर हे लग्नाला जाण्याकरिता मित्रत्वाच्या नात्याने तक्रारकर्त्याची गाडी घेऊन गेले. लग्नावरुन परत येत असतांना, कारंजा ते मंगरुळपीर रोडवर सोहळ फाट्यानजीक गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडी पलटी झाली व गाडीतील सहा व्यक्ती मरण पावले व तीन व्यक्ती जखमी झाले. त्याचवेळी याच लग्नसोहळयावरुन परत येणा-या मागील गाडीतील व्यक्ती हे अपघातग्रस्त वाहन खड्डयातून बाहेर काढण्याकरिता गेले व ते सुध्दा गाडी हातातून सुटल्यामुळे जखमी झाले. याबाबत पांडूरंग तुकाराम राऊत यांनी घटनेचा एफआयआर नोंदविला तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना अपघाताबाबत सुचना दिली. त्यानंतर वाहनाच्या निरीक्षणाकरिता विरुध्द पक्षाने सर्व्हेअरला पाठविले, त्यानंतर तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्म विरुध्द पक्ष यांच्याकडे भरुन दिला. नंतर दिनांक 06/08/2014 रोजी विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पत्र देवून, गाडी दुरुस्त करण्यास सांगितले व त्यानंतर वाहनाचे पुर्ननिरीक्षण सर्व्हेअर मार्फत केले तसेच दुरुस्तीचे बील, जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तक्राकर्त्याने खर्चाची एकूण बिले रुपये 3,00,140/- ही विरुध्द पक्षाकडे जमा केलीत. परंतु विरुध्द पक्षाने सदरहू वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत असल्याच्या कारणावरुन तक्रारकर्ता यांचा नुकसान भरपाईचा दावा नामंजूर केला.
विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, सदरहू गाडीची क्षमता ही 10 व्यक्तींची होती. परंतु घटनेच्या वेळी सदरहू वाहनामध्ये एकूण 15 व्यक्ती प्रवास करीत होते व त्यांची नांवे ही नमूद आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे हे म्हणणे फेटाळले की, अपघाताच्या नंतर मागून येणा-या दूस-या गाडीतील व्यक्ती अपघातग्रस्त वाहन सरळ करतांना जखमी झाले व त्यांची नांवे प्रकरणात नमूद करण्यात आली. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, सदरहू गाडीचा सर्व्हे केल्यानंतर व घसारा आणि पॉलिसीची असेसमेंट नंतर रुपये 1,20,000/- एवढी रक्क्म देय, सर्व्हेअरने नमूद केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा हा अवास्तव व अवाजवी स्वरुपाचा असल्यामुळे खारिज करावा.
सर्व दाखल दस्तऐवजाचे अवलोकन वि. मंचाने केले. विरुध्द पक्षाचाअसा आक्षेप आहे की, अपघाताच्या वेळी तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत होते. तसेच तक्रारकर्त्याने खाजगी गाडी ही भाडेतत्वावर दिली होती. या दोन्ही बाबी सिध्द करण्याची ( Burden of proof ) जबाबदारी ही विरुध्द पक्षाची आहे. त्याबाबत विरुध्द पक्षाने पोलीस स्टेशन, कारंजा यांनी तयार केलेल्या चार्जशीटची प्रत प्रकरणात दाखल केली आहे, तिचे अवलोकनावरुन असे दिसून येते की, चार्जशीटमध्ये नमूद असलेली जबाबांवर त्या व्यक्तींच्या सहया नसतात व त्या व्यक्तींनी वि. फौजदारी न्यायालयात साक्ष दिल्यानंतर ते जबाब सिध्द होतात व असे झाल्याशिवाय गृहीत धरता येऊ शकत नाहीत. विरुध्द पक्षाच्या इन्वेस्टीगेटरने तक्रारकर्ता, एफआरआर दाखल करणारे श्री. पांडूरंग तुकाराम राऊत, ओंकार बोबडे, अमोल अवधूत मानेकर, यांचे जबाब घेतले. परंतु गाडीमध्ये क्षमतेपेक्ष जास्त व्यक्ती व गाडी भाडेतत्वावर असल्याबाबत त्यांचे रिपोर्टमध्ये नमूद करुन, प्रकरणात दाखल केले नाहीत. विरुध्द पक्षाने त्यांच्या प्रतिऊत्तरात ही बाब मान्य केलेली आहे की, गाडीमध्ये प्रवास करीत असलेल्या व्यक्तींपैकी सहा व्यक्ती मयत झालेत व तीन व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेले आहेत. याबाबत त्यांचे मोटार अपघात प्रकरण क्रमांक प्रतिऊत्तरात नमूद आहेत. याऊलट, तक्रारकर्त्याने त्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले आहे की, गाडी ही मित्रत्वाच्या नात्याने दिली होती व गाडीमध्ये फक्त 9 पाहूणेमंडळी व चालक एवढेच लोक प्रवास करीत होते. तसेच अमूल अवधूतराव मानेकर ज्याचे नांव अतिरीक्त या तीनमध्ये विरुध्द पक्षाने नमूद केले आहे, त्याचेसुध्दा प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याच्या म्हणण्यानुसार दिनांक 25/05/2014 रोजी त्याचे लग्न होते व त्याकरिता त्याने स्वतःसाठी नवरदेव नवरी येण्याकरिता इंडीका गाडी केली होती व पाहूणेमंडळी लग्नाला नेण्या-आणण्यासाठी मित्रत्वाच्या संबंधामुळे तक्रारकर्त्याची गाडी घेऊन गेले होते. तसेच संजय रामहरी मानेकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन, नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा दत्ता संजय मानेकर वय 15 वर्षे हा दिनांक 25/05/2014 रोजी लग्न आटोपून परत येत असतांना पलटी झालेल्या गाडीच्या मागून येणा-या दुस-या गाडीमध्ये प्रवास करीत होता व पलटी झालेल्या गाडीला सरळ करण्याकरिता मागील गाडीतील लोकांनी उतरण्याची घाई केली तेंव्हा त्याला धक्का लागून फाटक उघडल्या गेले व तो जखमी झाला. परंतु चुकीने पोलिसांनी त्याचे नांव अपघातग्रस्त वाहनांमधील व्यक्तींमध्ये समाविष्ट केले.
यावरुन, विरुध्द पक्ष ही बाब सिध्द करु शकले नाही की, अपघातग्रस्त वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अतिरीक्त व्यक्ती प्रवास करीत होते व तक्रारकर्ते यांनी वाहन हे भाडेतत्वावर दिलेले होते. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला गाडीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर त्याबाबतचे सर्व कॅश बील व मजूरीची पक्की बिले दिनांक 06/08/2014 च्या पत्रान्वये मागीतली. परंतु दिनांक 11/05/2015 च्या पत्रान्वये व 02/06/2015 च्या पत्रान्वये वेगवेगळी कारणे नमूद करुन तक्रारकर्त्याचा विमा दावा गैरवाजवी खारिज केलेला आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने वेळोवेळी मागणी करुनसुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारलेला आहे.
विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणात लागू पडत नाहीत. याऊलट तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा . .
2016 DGLS (SC) 18 ( SUPREME COURT )
Lakhmi Chand - Vs. – Reliance General Insurance
Motor Vehicles Act, 1988, S. 147 – Liability of insurance Company – To pay compensation – Determination – Insured vehicle met with accident on account of rash and negligent driving of offending vehicle – Insurance Company tried to avoid its liability on account of fact that five persons were travelling in goods carrying vehicle which has seating capacity of 2 person’s only – Held, insurance company is liable to pay compensation for damage caused to insured vehicle.
या न्यायनिवाडयातील निकष प्रस्तुत प्रकरणात लागू पडतात.
वरील सर्व विश्लेषणावरुन, तक्रारकर्ता हा त्याला लागलेली दुरुस्ती खर्चाची रक्कम रुपये 3,00,140/- तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा वेळेत निकाली न काढल्यामुळे त्याला झालेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल रुपये 3,000/- व प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याचा दावा अंशत: मंजूर करण्यांत येतो.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रुपये 3,00,140/- ( रुपये तीन लाख एकशे चाळीस फक्त ) दयावी.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 3,000/- व प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 3,000/- ( रुपये तीन हजार फक्त ) दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री.ए.सी.उकळकर ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri