निकालपत्र (दि.27.05.2016) द्वाराः- मा.सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1 वि.प. विमा कंपनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. तर्फे वकीलांचा तोंडी/लेखी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3 तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
वि.प. ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून ती वेगवेगळया प्रकारचा विमा व्यवसाय करते. तक्रारदार हे मजकूर गावचे कायमचे रहिवाशी असून मजकूर गावी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तक्रारदारांचा जनता व्यक्तीगत अपघात विमा योजना, या योजनेअंतर्गत वि.प.कंपनीकडे श्री. जोर्तिलिंग विकास सेवा संस्था मर्या. तरसंबळे, ता.राधानगरी यांचे माध्यमातून उतरविलेला होता व आहे. सदर विमा पॉलीसीचा हप्ता हा वि.प.कंपनीकडे वर नमुद केले संस्थेमार्फत अदा केलेला होता व आहे. दि.28.09.2009 रोजी तक्रारदारांचे मयत पती-कै.सुरेश बापू कांबळे हे राजारामपूरी येथील श्री.लिंग्रज यांचे घराचे बांधकामाचे प्लंबिगचे काम करीत असताना, अचानक व अनावधनाने पाय घसरुन, घरावरुन खाली पडलेने, त्यांचे डोकीस जबर मार लागला होता. त्यावेळी त्यांना औषधोपचाराकरीता सिटी हॉस्पीटल, राजारामपूरी, कोल्हापूर येथे दाखल केलेले होते. तथापि मयत सुरेश कांबळे यांचा उपचार सुरु असातना मृत्यु झालेला होता व आहे. सदर मृत्युबाबत सिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांनी राजारामपूरी पोलीस ठाणे यांचेकडे सदर अपघाताची वर्दी दिेली असून राजारामपूरी पोलीस ठाणे यांचेमार्फत सदर अपघाताची संपूर्ण चौकशी झालेली आहे. तक्रारदारांचे पती मयत झालेनंतर त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन हे सी.पी.आर.हॉस्पीटल, कोल्हापूर येथे करणेत आलेले होते व आहे. सदरहू घटनेनंतर तक्रारदारांनी वि.प.कंपनीकडे श्री.जोर्तिलिंग विकास सेवा संस्था मर्या.तरसंबळे, ता.राधानगरी, यांचे माध्यमातून विमा क्लेमची मागणी करुन व योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा प्रस्ताव दाखल केला होता. तथापि वि.प.कंपनीने तक्रारदार हिस दि.07.12.2011 रोजीचे पत्राने पोलीसांचा अंतीम अहवाल व उपविभागीय दंडाधिकारीसो, कार्यालयातून मृत्यु विषयीचा दाखला या कागदपत्रांची मागणी केली. परंतु सदरचे कागद हे मिळणेस कमीत कमी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो असे संबंधीत कार्यालयातून तक्रादारांना तोंडी सांगण्यात आले. तक्रारदार ही सदरचे कागद वि.प.कंपनीस देऊ शकलेली नाही. परंतु तक्रारदार हिचा विमा प्रस्तावाबाबत न्यायनिर्णय करीता सदरचे कागदपत्रांची आवश्यकता नव्हती व नाही. वि.प.कंपनीने दि.05.01.2012 रोजीचे पत्राने तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव बंद केलेबाबत बेकायदेशीरपणे कळविलेले आहे. तक्रारदार ही दुर्गम भागातील शेतकरी असून ती विधवा व निराधार आहे. तक्रारदारांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रस्तुतच्या क्लेमची रक्कम तात्काळ मिळणे न्यायाचे व जरुरीचे आहे, म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार या मंचात दाखल केली. तक्रारदारांचे पतीस अपघाताने झालेल्या जखमामुळे जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा क्लेमची रक्क्म रु.1,00,000/-, द.सा.द.शे.15टक्के दराने वसूल होऊन मिळावे. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च वकील फीसह रक्कम रु.3,000/- वि.प.यांचेकडून तक्रारदारांना अदा व्हावी अशी सदरहू मंचास विनंती केली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि.07.12.2011 रोजी वि.प.विमा कंपनीचे कागद मागणी पत्र व वि.प.कंपनीने विमा प्रस्ताव नाकारलेचे पत्र तसेच तक्रारदारांनी दि.18.02.2016 रोजीचे पुराव्याचे शपथपत्र, तक्रारदारांचे पतीचे मृत्युबद्दलची सिटी हॉस्पीटल मार्फत दिलेली वर्दी, इंन्क्वेस्ट पंचनामा, कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, पी.एम.रिपोर्ट, रुपेश कांबळे यांचा जबाब, घटनास्थळचा पंचनामा, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5 वि.प. यांनी दि.04.03.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार ही पूर्णपणे खोटी, चुकीची व लबाडीची असून वि.प.यांचेविरुध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण आजतागायत घडलेले नव्हते व नाही. तक्रारदारांचे तक्रारीतील कलम-1 मधील मजकूर अंशत: बरोबर आहे. तक्रारदारांची तक्रार केलेली कथने ही वि.प.यांना मान्य व कबुल नाहीत तसेच त्यातील मजकूर खोटा व चुकीचा असल्याने ते स्पष्टपणे इन्कार करतात. तक्रारदारांनी कधीही वि.प.यांचेकडे कागदपत्रांची पूर्तता केलेली नव्हती व नाही. यातील वि.प.यांनी बेकायदेशीरपणे कळविले आहे, वगैरे सर्व मजकूर वि.प.यांना मान्य व कबुल नाही. तक्रारदारांचे पतीचा विमा यातील वि.प. यांचेकडे श्री. जोतिर्लिंग विकास सेवा संस्था यांचेतर्फे उतरवला होता, हे वि.प. यांना मान्य व कबुल आहे. दि.20.10.2010 रोजी मयत यांचे अपघाती मृत्युबाबत कळविले होते. वास्तविक पहाता अपघातानंतर 10 दिवसांचे आत वि.प.यांना माहिती देणे हे इन्शुरन्स पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार बंधनकारक आहे. तक्रारदारांनी एक वर्षानंतर वि.प.यांना कथित घटनेबाबत कळविले आहे. ज्यामुळे तक्रारदारांनी सदर पॉलीसी शर्तीचा भंग केला आहे. तक्रारदारांना कागदपत्रे मिळण्यास दोन ते तीन वर्षे लागतील हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे व खोटे आहे. तक्रारदारांना तीन ते चार वेळा लेखी पत्राने कळवून देखील तक्रारदारांनी संबंधीत पोलीस स्टेशनमधून कागदपत्रे घेतली नव्हती. पुन्हा पुन्हा पत्रे पाठवून देखील तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. वि.प.यांनी स्वत:हून कागदपत्रांची वारंवार मागणी केली परंतु पूर्तता केलेली नाही अथवा तक्रारदारांचेकडून कोणताही प्रतिसाद न आलेने पॉलीसी नियमांनुसार त्यांचा क्लेम नाकारला आहे व तसे करण्यापूर्वी त्यांना सुचना वजा पत्र दि.07.12.2011 ला देखील पाठविले आहे. परंतु तरी देखील तक्रारदार अगर संबंधितांनी कोणतीही पूर्तता केलेली नाही अगर स्वत:हून भेटून वा लेखी मुदत देखील मागितलेली नाही. त्यामुळे वि.प.यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नव्हती व नाही. तक्रारदारांना अगर काही अडचण कागदपत्रे मिळवण्यास होती व तर ती त्यांनी कधीही वि.प.यांचेकडे मांडलेली नव्हती अगर नाही. त्यामुळे सदरचा क्लेम घेणेचा नाही असे समजून तक्रारदारांना वि.प.क्र.1 यांचेविरुध्द तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नव्हते व नाही. वेळेत कागदपत्रांची पूर्तता न करता विनाकारण सदरची तक्रार वि.प.यांचे विरुध्द दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
6 वि.प. यांनी दि.04.03.2014 रोजी इन्शुरन्स पॉलीसी व अटी शर्तीची नक्कल दाखल केली आहे. तसेच दि.03.05.2016 रोजी वि.प. यांनी विमाधारक यांना पाठविलेले पत्रे- दि.03.03.2011, दि.20.04.2011, दि.31.05.2011, दि.05.10.2011, दि.29.11.2011, दि.07.12.2011 व दि.05.01.2012 रोजीं तक्रारदारांना पाठविलेली स्मरणपत्रें, शासनाचा शेतकरी जनता अपघात जी.आर. व दि.05.04.2016 रोजी वि.प.तर्फे श्री.राजेंद्र जयसिंह टोपराणी यांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
7 तक्रारदारांची तक्रार, वि.प. यांची कैफियत, दाखल अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र तसेच उभयतांचे लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद यांचा विचार होता, न्यायनिर्णसाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | वि.प.-विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे विमा पॉलीसीची विमा रक्कम मिळणयास पात्र आहेत का ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
4 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे. |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1:- तक्रारदारांचे पती घराचे बांधकामाचे प्लबींगचे काम करीत असताना पाय घसरुन, घरावरुन खाली पडलेने त्यांचे डोक्यास मार लागला. औषधोपचाराकरीता सिटी हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. तक्रारदारांनी वि.प.यांचेकडे विमा क्लेमची मागणी केली असता, दि.05.01.2012 रोजी कागदपत्रांची पुर्तता न केलेमुळे तक्रारदारांचे क्लेम नाकारण्यात येऊन दावा फाईल बंद केली. सबब, सदर कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारुन वि.प.यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत प्रकरणी या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. उपलब्ध कागदपत्रामध्ये दि.28.09.2010 रोजी सिटी हॉस्पीटल यांनी राजारामपूरी पोलीस ठाणे यांना दिेलेली वर्दी, इन्क्वेस्ट पंचनामा, कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, पी.एम.रिपोर्ट, रुपेश महादेव कांबळे यांचा जबाब, घटस्थळाचा पंचनामा, इत्यादी कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी तक्रारीत कथन केलेप्रमाणे, सुरेश बापू कांबळे यांचा मृत्यु अपघाती झाला आहे, ही वस्तुस्थिती या मंचाचे निर्दशनास येते. युक्तीवादाच्या वेळी, वि.प.यांचे वकीलांनी पॉलीसीबाबतची वस्तुस्थिती तसेच अपघाताची वस्तुस्थिती मान्य केलेली आहे. परंतु वि.प.विमा कंपनीने दि.07.12.2011 रोजी पत्राने पोलीसांचा अंतिम अहवाल व उप विभागीय दंडाधिकारीसो कार्यालयातून मृत्यु विषयी दाखला, या कागदपत्रांची मागणी केली. सदरची कागदपत्रे प्राप्त न झालेने दि.05.01.2012 रोजी विमा प्रस्ताव बंद केलेला आहे.
वि.प.यांनी लेखी युक्तीवादामध्ये, अपघातानंतर 10 दिवसांचे आत वि.प.यांना माहिती देणे हे इन्शुरन्स पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार बंधनकारक आहे. तक्रारदारांनी एक वर्षानंतर वि.प.यांना कथित घटनेबाबत कळविले आहे. ज्यामुळे तक्रारदारांनी सदर पॉलीसी शर्तीचा भंग केला आहे. तक्रारदारांना कागदपत्रे मिळण्यास दोन ते तीन वर्षे लागतील हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे व खोटे आहे. तक्रारदारांना तीन ते चार वेळा लेखी पत्राने कळवून देखील तक्रारदारांनी संबंधीत पोलीस स्टेशनमधून कागदपत्रे घेतली नव्हती. पुन्हा पुन्हा पत्रे पाठवून देखील तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. वि.प.यांनी स्वत:हून कागदपत्रांची वारंवार मागणी केली परंतु पूर्तता केलेली नाही अथवा तक्रारदारांचेकडून कोणताही प्रतिसाद न आलेने पॉलीसी नियमांनुसार त्यांचा क्लेम नाकारला आहे. त्या अनुषंगाने वि.प.यांनी दि.29.11.2010, दि.03.03.2011, दि.20.04.2011, दि.31.05.2011, दि.05.10.2011 व दि.07.12.2011 व दि.05.11.2012 रोजीची स्मरणपत्रे दाखल केलेली आहेत. वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. दि.03.03.2011 रोजी वि.प.यांनी दाखल केलेल्या स्मरणपत्रावरुन, सदरचे घटनेची माहिती तक्रारदारांनी वि.प.यांना दि.11.10.2010 रोजी (intimation) कळविलेचे दिसून येते. तथापि तक्रारदारांनी वि.प.यांना कागदपत्र मुदतीत न दिलेने दावा फाईल बंद केलेचे स्पष्ट होते. तथापि तक्रारदारांनी क्लेम फॉर्मसोबत पाठविलेल्या कागदपत्रांवरून तक्रारदारांचे पतीचा मृत्यु हा अपघाती आहे हे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदार ही दुर्गम भागातील शेतकरी विधवा, निराधार असून तिचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. वि.प.यांनी मागणी केलेल्या कागदपत्रे मिळविणेस कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो असे संबंधीत कार्यालयातून तक्रारदारांना तोंडी सांगणेत आलेचे तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. यावरुन सदरची वि.प.यांनी मागणी केलेली कागदपत्रे तक्रारदारांनी उपलब्ध करणेचा पूर्णपणे प्रयत्न केलेचे स्पष्टपणे दिसून येते.
वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे पतीचा अपघाती मृत्यु दि.29.09.2010 रोजी झाला. दि.11.10.2010 रोजी तक्रारदारांनी वि.प.यांनी सदरचे घटनेचे प्रथम (intimation) दिले.
त्या कारणाने, पॉलीसीतील मुळ हेतु विचारात न घेता, केवळ कागदपत्र मुदतीत न दिलेने वि.प. विमा कंपनी तक्रारदारांचा दावा फाईल बंद करुन तक्रारदारांना यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे पॉलीसीनुसार पॉलीसीची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख फक्त) व सदर रक्कमेवर तक्रार स्विकृत दि.26.11.2013 रोजी पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3:- प्रस्तुतची तक्रार ही वि.प. यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार फक्त) मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना विमा पॉलीसीनुसार विमा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख फक्त) व सदर रक्कमेवरती तक्रार स्विकृत दि.26.11.2013 पासून ते सदरची रक्कम संपूर्ण मिळेपावेतो द.सा.द.शे.6% प्रमाणे व्याज अदा करावे.
3 वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.