निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/08/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/08/2012
तक्रार निकाल दिनांकः- 03/07/2013
कालावधी 10 महिने. 05 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
रावसाहेब पिता निवृत्ती गिते. अर्जदार
वय 38 वर्षे. धंदा.जिप ड्रायव्हर. अड.अब्दुल जलील.
रा.देवसडी,ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
दि ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि. गैरअर्जदार.
तर्फे शाखाधिकारी, अड.नरवाडे.जी.व्ही.
दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार गैरअर्जदाराने त्याच्या वाहनाचे अपघाताची नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे, याबद्दलची तक्रार दिलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे. अर्जदार हा MH - 22 - H -2952 महिंद्रा मॅक्स जिपचा मालक आहे. अर्जदार हा सदरची जिप घेवुन 07/11/2010 रोजी सांयकाळी 7 वाजता जिंतूरहून देवसडीकडे जात असतांना जिंतूर कडून हिरो होंडा स्पलेंडर क्रमांक MH-22-K-3493 ने जिपला अचानकपणे मागुन येवुन धडकले, त्यामुळे जिपच्या पाठीमागचा काच फुटला व अर्जदाराचे सुमारे 45,580/- रुपयाचे नुकसान झाले व गाडीतील लोकांना मार लागला अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदर घटनेची तक्रार पोलिस स्टेशन जिंतूर येथे दिली, पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 23/10 असा नोंदविला. पुढे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची महिंद्रा जिप गैरअर्जदार कंपनीकडे विमाकृत होती, आणि अपघाताच्या दिवशी म्हणजेच 07/11/2010 रोजी विमा पॉलिसी वैध होती.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज केला, परंतु गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली व त्याचे कोठलेही कारण दिलेले नाही,अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरचे प्रकरण गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा प्रलंबीत ठेवुन सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराकडून अर्जदारास रु.45,580/- जिपचे अपघातात नुकसान भरपाई म्हणून व तसेच मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 11 कागदपत्रांच्या यादीसह 11 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये 4/1 वर एफ.आय.आर., 4/2 वर मोटार क्लेमफॉर्म, 4/3 वर घटनास्थळ पंचनामा, 4/4 वर आर.सी. बुक, 4/5 वर इन्शुरंन्स कव्हरनोट, 4/6 वर सर्व्हेअरची फि दिल्याबाबतची प्रत, 4/7 वर अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेला विमा दावा, 4/8 वर न्यु संजिवनी मोटर्सचे बिल, 4/9 वर न्यु संजिवनी मोटर्सचे बिल, 4/10 वर व्यंकटेश ऑटोमोबॉईलचे बिल, 4/11 वर ड्रायव्हींग लायसेंन्स, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीस पाठविण्यांत आल्यावर गैरअर्जदारांनी नि. क्रमांक 7 वर लेखी जबाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, पण जिप क्रमांक MH - 22 - H -2952 चे नुकसान रु. 45,580/- झाले हे गैरअर्जदारास मान्य नाही. गैरअर्जदारास अर्जदार हा सदर जिप क्रमांक MH - 22 - H -2952 चा मालक आहे हे सुध्दा मान्य आहे. व सदर जिप ही गैरअर्जदाराकडे विमाकृत होती हे सुध्दा गैरअर्जदारास मान्य आहे व सदरची जिपचा प्रायव्हेट परपझसाठी वापर होता हे सुध्दा गैरअर्जदारास मान्य आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अक्सीडेंट झाल्यानंतर गैरअर्जदाराने श्री. एस.पी.परळीकर यांना सर्व्हेअर व लॉस असेसर म्हणून नियुक्त केले होते, व एस.पी.परळीकर यांनी स्पॉट सर्व्हे केला आणि तसेच श्री.संजय बी.यादवडकर यांनी बिलचेक रिपोर्ट गैरअर्जदाराकडे सोपविला. बिलचेक रिपोर्ट नुसार अर्जदाराचे रु.9,000/- चे नुकसान झालेले आहे, तरीपण गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने ब्रीच ऑफ पॉलिसी केल्यामुळे तो ते मिळण्यास पात्र नाही, गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची पॉलिसी प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी होती व सदर घटनेच्या वेळेस त्यात प्रवासी बसून जात होते,म्हणून ब्रिच ऑफ पॉलिसी असल्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदारास कोठलेही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही, म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही,म्हणून गैरअर्जदाराने अशी विनंती केलेली आहे की, सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराने नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व नि.क्रमांक 11 वर बिलचेक रिपोर्ट दाखल केलेले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारांनी अर्जदाराचा अपघात विमादावा प्रकरण
मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने नि.क्रमांक 4/4 वरील आर.सी.बुकवरुन हे सिध्द केले आहे की, अर्जदार हा महिंद्रा कंपनीची जिप क्रमांक MH - 22 - H -2952 चा मालक होता तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 4/1 व 4/3 वरील कागदपत्रावरुन हे सिध्द केले आहे की, सदरच्या जिपचा अपघात दिनांक 07/11/2010 रोजी झाला होता, सदरचा अपघात हा हिरो होंडा स्पलेंडर क्रमांक MH-22-K 3493 यांने पाठीमागुन येवुन अर्जदाराच्या जिपवर आदळली व जिपचे नुकसान झाले ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरच्या जिपचा विमा काढला होता व सदरचा विमा हा 13/03/2010 पासून ते 12/03/2011 पर्यंत वैध होता ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रा वरुन सिध्द होते, तसेच अपघाताच्या दिवशी म्हणजेच दिनांक 07/11/2010 रोजी सदरची पॉलिसी वैध होती ही बाब देखील नि.क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने अपघात झाल्यानंतर गैरअर्जदाराकडे मोटार दावा फॉर्म दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते,तसेच गैरअर्जदाराच्या जबाबावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदाराने निर्णय न देता प्रलंबित ठेवुन सेवेत त्रुटी व मानसिकत्रास दिला आहे. अर्जदाराचे हे म्हणणे की, सदरच्या गाडीच्या दुरुस्तीसाठी रु. 45,580/- खर्च आला हे मंचास योग्य वाटत नाही, अर्जदाराने दाखल केलेल्या बिलांच्या पावत्या हे योग्य वाटत नाही, पण गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी जबाबात मान्य केले आहे की, अर्जदाराचे सदरच्या गाडीचा अपघातात बिलचेक रिपोर्ट प्रमाणे रु.9,000/- चे नुकसान झालेला आहे. व त्याबद्दल गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वरील बिलचेक रिपोर्ट दाखल केलेला आहे,म्हणून अर्जदार हा रु.9,000/- नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे.असे मंचास वाटते. तसेच गैरअर्जदाराने सदरच्या घटनेच्या वेळी सदरचे वाहन Hire & Reward साठी वापरले होते, हे सिध्द केलेले नाही, वा तसा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत रु.9,000/-
फक्त ( अक्षरी रु.नऊहजार फक्त) द्यावे, व मानसिकत्रासापोटी रु.3,000/-फक्त
(अक्षरी रु.तीनहजार फक्त) द्यावेत.
3 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष