1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही राहणार चिखल परसोडी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तिचा मुलगा योगेश रामदास गोंगल याचे चिखल परसोडी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 297 ही शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 हे विमा सल्लागार आहेत. गैरअर्जदार क्रमांक 4 हे गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांचे मार्फत दावे स्वीकारतात. अर्जदाराच्या मुलाचा दिनांक 12.3.2009 रोजी मोटरसायकलने जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाला. सदरहू मुलाचा विमा गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांचेकडे उतरविला असल्यामुळे अर्जदार हिने गैरअर्जदार क्रमांक 4 कडे दस्तावेजांसह विमा दावा दाखल केला. परंतु सदर दावा दाखल केल्यानंतरही आठ वर्षे उलटून गेल्यावरही दावा मंजूर वा नामंजूर झाला याबद्दल अर्जदाराला काहीही कळविण्यात आले नाही. त्याबद्दल अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस पाठवूनही उत्तर न मिळाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदारांविरुद्ध दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराला विमादाव्याची रक्कम रू.1 लाख, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून दर साल दर शेकडा 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.10,000/- मिळण्याचे आदेश व्हावेत. . 3. अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैर अर्जदार विरुद्ध नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचाचा नोटीस नि.क्र.10 प्राप्त होऊन देखील ते मंचरात उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुद्ध प्रकरण एक तर्फा चालविण्यात आले. 4. विरुद्ध पक्ष क्रमांक 4 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये नमूद केले की अर्जदार यांनी यांचेकडे सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी करून दिनांक 8/6/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांना प्रस्ताव सादर केला आणि अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीस सादर केला. 5. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व2 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढले. त्यांनी अाक्षेप घेतला की कृषी आयुक्त पुणे यांना सदर तक्रारीत पक्ष न केल्यामुळे आवश्यक पक्षकार अभावी तक्रार खारीजकरण्यात यावी. तसेच अर्जदाराच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला याबद्दल माहिती नसल्यामुळे ती बाब मान्य नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित रित्या पार न पडल्यामुळे त्यांचेवर सदर तक्रारीची जबाबदारी येऊन पडते. अर्जदाराने विमाधारकाच्या मृत्यूपासून 90 दिवसाच्या आत कृषी अधिकारी यांचेकडे विमादावा द्यायला हवा होता. परंतु तसा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल नाही. सबब तसा कायदेशीर नोटीसही अर्जदाराला पाठविण्यात आला त्याच प्रमाणे अर्जदाराने आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केली नाही. कोणतेही वैध लायसन्स नसताना दिनांक 12/3/2009 रोजी त्याने मोटरसायकल चालविल्यामुळे सदर अपघात झाला त्याच प्रमाणे ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन यांनी ऑटो ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल केला. अर्जदाराचा मुलगा वैध परवाना नसताना गाडी चालवत होता. तसेच अर्जदाराने त्याचे एमडीएल प्रस्तुत न केल्यामुळे सदर दावा फेटाळण्यात आला. मोटर वेहिकल अॅक्ट च्या कलम 3 नुसार वैध परवाना आवश्यक आहे. त्यापासून कोणालाही सुटका नाही. विद्यामन न्यायालयालाही शेतकऱ्यांना त्यापासून सुटका देण्याचा अधिकार नाही. सदर तक्रारीचे कारण दिनांक 10/10/2008 रोजी घडले तेव्हा अर्जदाराचा मुलगा मयत झाला परंतु तक्रार दिनांक 5/3/2018 रोजी दाखल झाली. सोबत अर्जदाराने कोणताही विलंब माफीचा अर्ज जोडलेला नाही सबब सदर तक्रार मुदतबाह्य असून खारीज करण्यात यावी. 6. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1,2 व 4 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष (1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांची ग्राहक आहे काय ? होय. (2) अर्जदार गैरअर्जदार क्रं.3 व 4 यांची ग्राहक आहे काय ? नाही. (3) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. (4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत :- 7. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्या दस्त 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचा मुलगा योगेश रामदास गोंगल याचे नांवे चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 297 ही शेतजमीन आहे. यावरून अर्जदाराचा मुलगा योगेश हा शेतकरी होता व शेतीतील उत्पन्नावर तो कुटूंबाचे पालन पोषण करीत होता हे सिध्द होते. शासन निर्णयानुसार अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे मुलाचा 2008-09 या कालावधीकरता रू.1,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. तक्रारकर्ती ही मयत विमाधारक शेतक-याची आई असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. . मुद्दा क्रं. 2 बाबत :- 8. गैरअर्जदार क्रं. 3 व 4 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 ने विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार ही विरूध्द पक्ष क्र. 3 व 4 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 3 बाबत..
9. सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत विमाधारकाची पॉलिसी काढण्यांत आलेली असून सदर योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 हे विमा योजनेनुसार जोखीम स्वीकारतात. अर्जदार ही सदर विमा पॉलिसीअंतर्गत मयत विमाधारकाची आई व वारस या नात्याने लाभार्थी असून ती गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची ग्राहक ठरते. अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्तऐवजांवरून असे स्पष्ट दिसून येते की अर्जदाराचा मुलगा श्री योगेश रामदास गोंगल हा दिनांक 12/3/2009 रोजी मोटरसायकलने जात असता दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन मृत्यू पावला. अर्जदार ही मयत विमाधारक शेतकरी मुलाची आई असल्याने तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रकमेची मागणी केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजां वरून तिच्या मुलाचा मृत्यू अपघातात जखमी होऊन झाला ही बाब निशाणी क्रमांक 4 वरील शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळ पंचनामा यावरून सिद्ध होत आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचे लेखी उत्तरात मयत श्री योगेश यांचा दिनांक 12/3/2009 रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला व त्याच्या वारसांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला विमा दावा त्यांना प्राप्त देखील झाला हे मान्य केले आहे, परंतु अपघाताचे वेळी मयत श्री योगेश जवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याकारणाने सदर विमा दावा नामंजुर केला असे त्यांनी नमूद केले आहे. मोटर वेहिकल अॅक्ट च्या कलम 3 नुसार अर्जदाराचे मयत मुलाजवळ वाहन चालवितांना वैध परवाना नसल्याकारणाने गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदर विमा दावा नाकारला असला तरी मा.राज्य आयोग, महाराष्ट्र मुंबई यांनी आय सी आय सी आय लोम्बार्ड विरुद्ध श्रीमती सिंधुबाई खंडेराव खैरनार, अपील कमांक 1009/ 2007 या प्रकरणात दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार, अपघात हा अर्जदाराच्या चुकीमुळे झालेला नसल्यामुळे केवळ त्याच्या जवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा नाकारणे उचित होत नाही असा निर्वाळा दिलेला आहे. प्रस्तुत प्रकरणात देखील समोरील ऑटोचालकांने त्याचे वाहन निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलस्वारास धडक देऊन जखमी केले असे प्रस्तुत तक्रारीत तसेच तक्रार अर्जासोबत जोडलेल्या गुन्ह्याचा तपशील नमुना 4 या पोलीस दस्तावेजांमध्येही स्पष्ट नमूद आहे. सबब मयताच्या चुकीमुळे सदर अपघात झाला ही बाब गैरअर्जदार सिद्ध करू शकले नाहीत. तसेच सदर प्रकरणात मयत श्री योगेश रामदास गोगल अपघाती मृत्यू हा दिनांक 12 3 2009 रोजी झाला व महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 मे 2009 रोजी काढलेल्या शुद्धी पत्रकानुसार, जर शेतकऱ्याचा मृत्यू वाहन अपघातात झाला असेल व सदर वाहन शेतकरी चालवीत असेल तर अशा प्रकरणी त्याचा वाहन चालविण्याचा वैध परवाना सादर करणे आवश्यक राहील असे नमूद केले असले तरी सदर शुद्धिपत्रक शासनाने दिनांक 29 मे 2009 रोजी कार्यान्वित केले असून प्रस्तुत प्रकरणातील विमाधारक श्री योगेश याचा मृत्यू त्यापूर्वीच 12 3 2009 रोजी झालेला असल्यामुळे सदर परिपत्रकातील तरतूद प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही. प्रस्तूत प्रकरणातील हकीकत व परिस्थितीनुसार असे दिसून येते की सदर अपघातास मयत विमाधारक हा जबाबदार नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक 1 ने, केवळ मयताजवळ वैध वाहन परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा फेटाळणे व अर्जदाराला विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे न्यायोचीत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांची कृती ही न्यूनता पूर्ण सेवा या संज्ञेत मोडते व ते अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार ठरतात.
मुद्दा क्र. 4 बाबत :- 10. सबब उपरोक्त विवेचनावरून मंच खालील आदेश पारित करीत आहे. आदेश (1) अर्जदाराची तक्रार क्र.50/2018 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तरीत्या अर्जदारांस विमादाव्याची रक्कम रू.1,00,000/- त्यावर तक्रार दाखल दिनांक 5/3/2018 पासून रक्कम अर्जदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह अर्जदारांस द्यावी. (3) गैरअर्जदार क्र.3 व 4 विरुध्द कोणताही आदेश नाही. (4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तरीत्या अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासाचे नुकसान भरपाईपोटी रू.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 04/10/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |