Exh.No.30
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 12/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 03/02/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 26/10/2015
- आरती शशीशेखर दळी
वय सु.46 वर्षे, धंदा – घरकाम,
राहणार मु.पो. चांदेराई,
ता.रत्नागिरी, जिल्हा – रत्नागिरी.
- सौ. प्रणिता पंकज दळी
वय सु.46 वर्षे, धंदा – घरकाम,
राहणार मु.पो.कलमठ,
ता.कणकवली, जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इंश्युरंस कंपनी लि.
तर्फे शाखाधिकारी,
राहणार सदाचार मंदिर,
साडगावनाका, रत्नागिरी,
ता.रत्नागिरी, जिल्हा – रत्नागिरी
पिन- 415 612 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री उमेश सावंत, श्री चंद्रकांत सावंत
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्रीमती सविता मसूरकर.
निकालपत्र
(दि. 26/10/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार क्र.1 व 2 यांना देण्यात येणा-या विमा सेवेमध्ये कसुर करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार क्र.2 यांनी तक्रारदार क्र.1 कडून MH08-W-0567 हे महिंद्रा कंपनीने महिंद्रा जीनीओ डीसी हे चारचाकी वाहन वैयक्तिक कामासाठी खरेदी केले. हस्तांतरणाच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झालेनंतर सदरच्या वाहनाचे अधिकृत मालक म्हणून तक्रारदार क्र.2 यांच्या नावाची नोंद वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रासह झाली.
3) सदर वाहन दि.8/8/2012 ते दि.7/8/2013 या कालावधीकरीता तक्रारदार यांचे नावे विरुध्द पक्ष यांचेकडे विम्याद्वारे संरक्षित केलेले होते. त्या पॉलिसीचा क्रमांक 161602/31/2013/3099 असून विमा कालावधीतच सदर वाहनाला दि.7/7/2013 रोजी कणकवली-वेंगुर्ला मार्गावर अपघात झाला व वाहनाचे नुकसान झाले. अपघातानंतर सदर बाब विरुध्द पक्ष यांना कळविल्यानंतर श्री एस.एस. मराठे, कणकवली या सर्व्हेअरमार्फत अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर विरुध्द पक्ष यांच्या सूचनेनुसार अथने सर्व्हेअर, कोल्हापूर यांचेमार्फत मे. ट्रेन्ही व्हिल्स, प्रा.लि. शिरोली, एम.आय.डी.सी. नागाव, कोल्हापूर यांचेकडे जाऊन दि.1/8/2013 रोजी अपघातग्रस्त वाहनाची तपासणी करणेत आली. सदर अपघातग्रस्त वाहन मे.ट्रेन्डी व्हील्स यांचेकडे असून दरदिवशी रु.150/- प्रमाणे प्रतिदिन भाडे आकारणेत येत आहे असे तक्रारदाराचे कथन आहे.
4) तक्रारदार यांनी वाहनाचे अपघातानंतर विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा पॉलिसीच्या आधारे अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई मिळणेसाठी मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी दि.16/8/2013 रोजी तक्रारदार क्र.1 यांना पत्र पाठवून त्यांचा इंश्युरेबल इंटरेस्ट संपला असल्याने विमा दाव्याचा विचार करणे शक्य होणार नाही असे कळवून विमा दाव्याची मागणी फेटाळली. विरुध्द पक्ष यांची ही कृती तक्रारदार यांचेवर अन्यायकारक आहे. ज्या दिवशी अपघातग्रस्त वाहन तक्रारदार क्र.2 यांचे नावे कायदेशीररित्या हस्तांतर झाले त्याचदिवशी वाहनाचा विमा हा तक्रारदार क्र.2 यांचे नावे मोटर वाहन कायदयातील तरतुदींप्रमाणे हस्तांतरीत झाला. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंन्डेम्निटी या तत्वाप्रमाणे देखील विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई देणे कायदयाने बंधनकारक आहे. ती कृती विरुध्द पक्ष यांनी केली नसल्याने त्यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे म्हणून तक्रार दाखल केली असे तक्रारदार यांचे कथन आहे.
5) तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील कथनाचे पुष्टयर्थ नि.4 वर कागदाचे यादीसोबत 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये तक्रारदार क्र.1 यांना दिलेली अपघाताची सूचना (नि.4/1), विरुध्द पक्ष यांनी विमा दावा फेटाळल्याचे पत्र(नि.4/2), अथने सर्व्हेअर, कोल्हापूर यांचे पत्र क्र.(नि.4/3), वाहनाची विमा पॉलिसी (नि.4/4), वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (नि.4/5), श्री मराठे यांचे सर्व्हे बील (नि.4/6), अपघातग्रस्त वाहनाचा दुरुस्तीसाठी येणारा खर्च व सर्व्हीस कोटेशन (नि.4/7) आणि ट्रेन्डी व्हिल्स, कोल्हापूर यांनी त्यांचे गॅरेजमध्ये अपघातग्रस्त वाहन असल्याने बील आकारलेसंबंधाने पत्र दाखल केले आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी गाडीच्या झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम कामगार खर्च, गॅरेज भाडे, मानसिक व शारीरिक त्रासामुळे नुकसान भरपाई मिळून एकूण रु.5,85,950.61 आणि तक्रार खर्च विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
6) तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवणेत आली. विरुध्द पक्ष यांचे वकील प्रतिनिधीमार्फत हजर होऊन त्यांनी तक्रारीतील मजकुर नाकारलेला आहे. विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार मोटर वाहन कायदयातील तरतुदीनुसार तक्रारदार क्र.2 यांनी वाहन त्यांचे नावे झाल्यानंतर 14 दिवसांत कळवणे बंधनकारक होते. तसेच गाडीची विमा पॉलिसी दुरुस्त करुन घेणे आवश्यक होते. तक्रारदार क्र.2 यांनी तशी कोणतीही सूचना विरुध्द पक्ष यांना दिली नसल्याने कोणतीही दाद मागता येणार नाही. तसेच वाहनाचे अपघाताचेवेळी वाहन तक्रारदार क्र.2 चे नावांने हस्तांतरीत झाल्याने तक्रारदार क्र.1 शी विरुध्द पक्ष यांचा झालेला विमा करार संपुष्टात आलेला असल्याने त्यांना कोणतीही दाद मागता येणार नाही. सबब तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे लेखी म्हणणे मांडले.
7) विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणण्यातील मजकूर तक्रारदार क्र.2 यांनी नाकारला असून पुराव्याचे शपथपत्र नि.15 वर दाखल केले आहे. तक्रारदार क्र.2 यांस लेखी प्रश्नावली विरुध्द पक्ष यांनी नि.17 वर दाखल केली असून त्यास लेखी उत्तरावली तक्रारदार क्र.2 यांनी नि.19 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.22 वर दाखल केले असून लेखी युक्तीवाद नि.24 वर आहे. त्यासोबत मा.सर्वोच्च न्यायालयातील निवाडा (citation – 1999 Law Suit (SC) 437 दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद नि.26 वर दाखल केला आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.29 लगत मा.सर्वोच्च न्यायालयाचा 2014 (3) Civil LJ 431 Mallamma (dead) through LRs. V/s National Insurance Co. Ltd. And others चा निवाडा सादर केला आहे.
8) तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांची लेखी कथने, कागदोपत्री पुरावे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार क्र.1 व 2 हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक होतात काय ? | होय |
2 | तक्रारदार क्र.1 व 2 यांना देण्यात येणा-या विमा सेवेमध्ये विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? आदेश काय ? | होय. अंशतः |
9) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार क्र.1 च्या मालकीचे वाहन MH08-W-0567 हे दि.8/8/2012 ते 7/8/2013 या कालावधीकरीता विमा पॉलिसी क्र.161602/31/2013/3099 अन्वये विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमीत होते. सदर विमीत वाहन तक्रारदार क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांचे नावे विक्रीद्वारे मालक म्हणून हस्तांतरीत केले. सदर वाहनास दि.7/7/2013 रोजी अपघात झाला. त्यावेळी ते वाहन तक्रारदार क्र.2 यांचे नावे झालेले आहे याची माहिती विरुध्द पक्ष विमा कंपनीला होती हे तक्रारदाराने दाखल केलेले पत्र नि.4/2 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार क्र.1 व 2 हे विरुध्द पक्ष कंपनीचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते.
10) मुद्दा क्रमांक 2- i) प्रस्तुतची तक्रार अपघातग्रस्त वाहनाचे मूळ मालक तक्रारदार क्र.1 आणि त्यांचेकडून वाहन खरेदी केलेले खरेदीदार तक्रारदार क्र.2 या दोघांनी मिळून दाखल केलेली आहे. मोटर वाहन कायदा कलम 157(1) नुसार ज्यावेळी एखादे मोटर वाहन एकाकडून दूस-याकडे तबदील केले जाते त्यावेळी विमा पॉलिसीचा फायदा हस्तांतरणाचे दिनांकापासून नवीन मालकांकडे आपोआप हस्तांतरीत होतो असे कायदयाचे तत्व आहे. तथापि विरुध्द पक्षाने तक्रारदार क्र.1 यांनी केलेला विमा दावा ता.16/8/2013 च्या पत्राने (नि.4/2) नाकारला आहे. तक्रारदारांचे म्हणणे आहे की वाहनाचे अपघाताचे वेळी विमीत वाहन हे तक्रारदार क्र.2 चे नावाने कागदोपत्री हस्तांतरीत झालेले होते ही बाब विरुध्द पक्ष यांनी नि.क्र.4/2 चे पत्रामध्ये मान्य केलेली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या तत्वानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना अपघातग्रस्त वाहनाची भरपाई देणे कायदयाने बंधनकारक आहे. तक्रारदार यांच्या वकीलांनी युक्तीवाद करतांना 2014 (3) Civil LJ 431 Mallamma (dead) through LRs. V/s National Insurance Co. Ltd. And others या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयाचा आधार घेतलेला आहे.
ii) याउलट विरुध्द पक्ष यांचे वकील श्रीमती मसुरकर यांचा आक्षेप असा आहे की, ज्यावेळी वाहनाचा अपघात झाला त्यावेळी वाहन तक्रारदार क्र.1 यांच्या नावाने नव्हते त्यामुळे तक्रारदार क्र.1 यांचे वाहनासंबंधाने विमा हित (Insurable interest) नव्हते. त्यामुळे त्यांना विमा क्लेम मिळणारा नाही. तसेच तक्रारदार क्र.2 यांनी मोटर वाहन कायदयाप्रमाणे 14 दिवसांचे आत वाहन त्यांचे नावाने झाल्याचे कळवणे बंधनकारक होते व त्याप्रमाणे गाडीच्या पॉलिसी पेपरमध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडून दुरुस्ती करुन घेणे आवश्यक होते, परंतु तक्रारदार क्र.2 यांनी विरुध्द पक्ष यांना कोणतीही सूचना न दिल्याने त्यांना विरुध्द पक्ष यांचे विरुध्द कायदयाने कोणतीही दाद मागता येणारी नाही. विरुध्द पक्ष यांचे वकीलांनी युक्तीवाद करतांना 1999 Law Suit (SC) 437 G Govindan V/s. New India Assurance Co. Ltd. या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे. त्यांचा असा युक्तीवाद आहे की सदर न्यायनिवाडा आणि तक्रारदार यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा हा थर्ड पार्टीच्या फायदयासंबंधाने आहेत. त्यामुळे तक्रारदार यांच्या वैयक्तिक फायदयाचा विचार या निवाडयाच्या आधारे करता येणार नाही.
iii) उभय पक्षांची कथने, पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद, मा.सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आणि कायदेशीर बाबींचा साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. तक्रारदार क्र.1 ने अपघातग्रस्त वाहन विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमीत केले होते. आणि तेच वाहन तक्रारदार क्र.1 ने तक्रारदार क्र.2 यांचे नावे मालकी हक्काने हस्तांतरीत केले ही बाब विरुध्द पक्षाने मान्य केली आहे. अपघात झाला तेव्हाही वाहनाचा विमीत कालावधी होता. मोटर वाहन कायदा कलम 157 (1) प्रमाणे वाहन कायदेशीररित्या हस्तांतरीत झाल्यानंतर विमा पॉलिसीच्या हक्कासह ते हस्तांतरीत होते. तक्रारदार क्र.2 ने मोटर वाहन कायदा कलम 157(2) ची पुर्तता करणे आवश्यक होते. परंतू तशी पूर्तता केली नाही म्हणून विमीत वाहन असतांना अपघात होऊनही नुकसान भरपाई टाळणे ही बाब विरुध्द पक्ष विमा कंपनीने त्यांचे ग्राहक हिताचा विचार करता नैतिकदृष्टया योग्य नाही. सदर वाहन अपघातामुळे वापरयोग्य राहिले नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या सर्व्हेअरने तक्रारदार क्र.1 यांना वाहन निरुपयोगी करण्याच्या (dismantle) सूचना दिल्याचे पत्र दि.13/8/2013 चे दिले होते ते नि.4/3 वर आहे. त्या पत्राचाही विचार न करता दि.16/8/2013 रोजी विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार क्र.1 यांना पत्र (नि.4/2) पाठवून विमा दाव्याचा विचार करणे शक्य होणार नाही असे कळविले आहे. ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
11) मुद्दा क्रमांक 3 – तक्रारदार क्र.1 व 2 यांनी नि.4/4 वर वाहनाची विमा पॉलिसी दाखल केली आहे. त्यामध्ये वाहनाची विमीत किंमत (I.D.V.) रक्कम रु.4,75,000/- दाखवणेत आली आहे. अपघाताचेवेळी विमीत वाहन हे तक्रारदार क्र.2 यांच्या नावाने हस्तांतरीत झालेले असल्याने वाहनाची नुकसान भरपाई मिळणेस तक्रारदार क्र.2 हे पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना अपघातग्रस्त विमीत वाहनाचा क्लेम न दिल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार क्र.2 हे नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. विमीत वाहन विरुध्द पक्ष कंपनीने तक्रार दाखल दिनांक 3/2/2015 पासूनचे पार्कींग चार्जेस भरुन मे.ट्रेंडी व्हिल्सकडून ताब्यात घ्यावे आणि तक्रारदार नं.2 यांनी त्यास सहमती देऊन पूढील कायदेशीर बाबींची पुर्तता करणेस विरुध्द पक्ष कंपनीस सहकार्य करणेचे आहे, असेही मंचाचे मत आहे.
वर मुद्दा क्र.1 ते 3 मध्ये विवेचन केल्याप्रमाणे मंच तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करीत असून पूढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार क्र.2 यांना विमा दाव्यासंबंधाने रक्कम रु.4,75,000/- (रुपये चार लाख पंचाहत्तर हजार मात्र) व त्यावर दि.26/10/2015 पासून 9% दराने व्याज रक्कम फिटेपर्यंत दयावी.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार क्र.2 यांना मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसानीची रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- दयावा.
4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने विमीत वाहन तक्रार दाखल दि.3/2/2015 पासूनचे पार्कींग चार्जेस भरुन मे. ट्रेंडी व्हिल्स प्रा.लि. कोल्हापूर यांचेकडून ताब्यात घ्यावे. तक्रारदार क्र.2 यांनी त्यांस सहमती देऊन कायदेशीर बाबींची पुर्तता करावी.
5) दि.3/2/2015 पूर्वीचे वाहनाचे पार्कींग चार्जेस तक्रारदार क्र.2 यांनी भरणेचे आहेत.
6) वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष यांनी आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे. आदेशाची पुर्तता 45 दिवसात न केलेस तक्रारदार क्र.2 विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतात.
7) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि. 10/12/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 26/10/2015
सही/- सही/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.