निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/10/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 30/10/2012
तक्रार निकाल दिनांकः- 07/01/2014
कालावधी 01 वर्ष. 02महिने.08दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
तुकाराम उर्फ कुमार पिता मसाजी घनसावध. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.वकिली व्यवसाय. स्वतः
रा.हुतात्मा स्मारक,जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
दि ओरिएंटल इंश्युरंस कंपनी लिमीटेड. गैरअर्जदार.
मार्फत शाखा व्यवस्थापक, अॅड.बी.ए.मोदानी.
दि ओरिएंटल इंश्युरंस कंपनी लिमीटेड.
दौलत बिल्डींग,शिवाजी चौक,
परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या महिंद्रा लोगन नं. MH-22 H 4610 गाडीचा अपघात नुकसान भरपाई विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जिंतूर येथील रहिवाशी असून तो वकीली व्यवसाय करतो, त्याने घरगुती वापरासाठी महिंद्रा लोगन --1.5 DLX कंपनीची मोटारकार ज्याचा नं. MH-22 H 4610 इ.स. 2009 मध्ये खरेदी केली होती.
अर्जदाराचे म्हणणे की, तो अपंग असल्याने तो वाहन चालवु शकत नव्हता, त्यामुळे सदर वाहन चालवण्यासाठी त्याने चालक नेमला होता, अर्जदाराने सदर गाडीची गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती, ज्याचा पॉलिसी नं. 182003/31/2012/1346 असा होता व सदर पॉलिसीचा कालावधी 29/11/2011 ते 28/11/2012 पर्यंत वैध होता.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार व त्याचे कुटूंब दिनांक 14/05/2012 रोजी जिंतूरहून पूणे येथे जाण्यासाठी निघाले, त्यावेळी दादाराव सानप हा सदर गाडीवर चालक होता दरम्यान बिड येथे मुक्काम करुन परत अर्जदार व त्याचे कुटूंब 15/05/2012 रोजी पुण्याकडे निघाले दरम्यान रात्री 11 वाजता. अचानक रोडवरचा दगड उडून गेअरबॉक्सच्या हाऊजींगवर लागला व त्यामुळे गेअरबॉक्सचे नुकसान झाले व सदर अपघातामुळे गाडी जागेवरच बंद पडली. सदर अपघातास चालकाची काहीही चुक नव्हती.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघात घडल्यानंतर त्याने बिड येथील नातेवाईकास फोन केला व नातेवाईकांनी बिडवरुन मॅकेनिक घेवुन आले व त्याने एमसील लावुन गाडी तात्पुरती दुरुस्त करुन दिली व कसेबसे अर्जदार व त्याचे कुटूंब पुणे येथे पोहचले अर्जदाराने पुणे येथे महिंद्रा कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर सिल्वर ज्युबली मोटार्स लिमिटेड पिंप्री पुणे येथे सदर गाडी दुरुस्तीसाठी घेवुन गेला त्यावेळी सिल्वर ज्युबली मोटार्सच्या व्यवस्थापकाने गैरअर्जदार कंपनीस फोनव्दारे माहिती दिली त्यावेळी गैरअर्जदार विमा कंपनीचे प्रतिनीधी सर्व्हेअर जोशी यांना सिल्वर ज्युबली मोटार्स लिमीटेड पुणे येथे पाठवले व सर्व्हेअर जोशी यांनी सदर गाडीची पहाणी केली व अहवाल सिल्वर ज्युबली मोटार्स लिमीटेड यांच्याकडून घेतला व अर्जदाराकडून क्लेमफॉर्म भरुन घेतला व अर्जदाराला गाडी दुरुस्ती करण्याची परवानगी दिली व त्यानंतर अर्जदाराचे वाहन दुरुस्तीसाठी 15 दिवस होती व दिनांक 31/05/2012 रोजी गाडीचे काम पूर्ण झाले नंतर गैरअर्जदार विमा कंपनीचे सर्व्हेअर जोशी यांचे समक्ष अर्जदाराने गाडी ताब्यात घेतली व दुरुस्तीसाठी लागणारा खर्च रु. 33,831/- अर्जदाराने दिले.
अर्जदाराने सदर गाडीच्या नुकसान भरपाई रक्कमे बद्दल विमा कंपनीस अनेक वेळा चौकशी केली व शेवटी विमा कंपनीने गाडीचे आर.सी. बुक व ड्रायव्हींग लायसेंसची मागणी केली व त्याप्रमाणे अर्जदाराने विमा कंपनीकडे सदर कागदपत्राची पुर्तता केली . अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 24/09/2012 च्या पत्रान्वये अर्जदारास गाडीचा अपघात नुकसान भरपाई दावा नामंजूर केल्याचे कळविले, विमा कंपनीने नामंजूर करण्याचे कारण खालील प्रमाणे दिले.
“ Motor Driving licence No. MH-22 20080003695 of driver i.e. LMV tractor w.e.f. 03.11.2008 to 02.11.2028 is not effective and LMV transport goods 03.11.2008 to 02.11.2011 not valid on the date of accident to drive said private car ”
अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे कारण एकदम चुकीचे आहे. कारण चालकाचा वाहन चालवायचा परवाना 02/11/2028 पर्यंत वैध होते. चुकीचे कारण देवुन विमा कंपनीने सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले तसेच अर्जदाराचे म्हणणे की, त्याची गाडी दुरुस्तीसाठी 15 दिवस लागल्यामुळे त्याला भाडयाने गाडी घ्यावी लागली व भाडयापोटी 45,000/- रु. चे नुकसान झाले.
विमा कंपनीने दावा नामंजूर केलेमुळे मानसिकत्रास झाला. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, वाहन नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी 1 लाख रुपये अर्जदारास द्यावे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 5 वर 5 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 09/08/2012 रोजी लिहिलेले पत्र, विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 24/09/2012 रोजी लिहिलेले पत्र, पॉलिसी प्रत, सिल्वर मोटार्सची पावती, ड्रायव्हींग लायसेंन्सचे प्रत दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्याकरीता मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने मान्य केले आहे की, अर्जदाराने त्याचा गाडीचा विमा त्यांच्याकडे काढला होता विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या वाहनाची अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीने ताबडतोब सर्व्हेअर जोशी यांची नियुक्ती केली व त्यानी वाहनाची पहाणी करुन अहवाल विमा कंपनीकडे सादर केला. तसेच वाहनाचे दुरुस्ती नंतर दुसरे सर्व्हेअर आर.व्ही.फडणीस यांनी वाहनाची तपासणी करुन बिलचेक रिपोर्ट सादर केले, त्यांच्या अहवाला प्रमाणे रु. 17,330/- चे रक्कमेचा मागणीस विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन न झाल्यास तक्रारदार पात्र आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराचे वाहन चालक दादाराव सानप यांच्याकडे असलेले वाहन चालवण्याचा परवाना क्रमांक MH 22-20080003695 असा असून सदर वाहन परवाना आर.टी.ओ. परभणी यांनी दिनांक 03/11/2008 रोजी LMV ट्रॅक्टर चालवण्यासाठी दिनांक 03/11/2008 ते 02/11/2028 या कालावधीसाठी दिलेला आहे तसेच त्यास LMV Transport goods हे वाहन चालवण्यासाठी दिनांक 03/11/2008 ते 02/11/2011 या कालावधीसाठी दिलेला होता, जीप क्रमांक MH-22 H 4610 हे वाहन अर्जदाराने स्वतःच्या वापरासाठी विकत घेतले होते. अर्जदाराने घेतलेली विमा पॉलिसी ही Private car package policy ची होती, त्यामुळे वाहन चालकास LMV Non Transport या प्रकारचा वाहन चालवण्याचा परवाना सदरील वाहन चालवण्यासाठी आवश्यक होता व ते अपघाता वेळी चालका जवळ नव्हता, म्हणून विमा कंपनीने अर्जदाराने पॉलिसीच्या अटीचे व शर्तीचे उल्लंघन केले आहे. म्हणून अर्जदाराचा दावा नामंजूर केला. व विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा व अर्जदाराच्या विरोधात 10,000/- नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी.
गैंरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 13 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 13 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत, आर.सी. बुकची प्रत, MDL Particular, सर्व्हे रिपोर्ट,आर.व्ही.फडणीस, Bill check report of R.V. Fadnis अर्जदारास पत्र, अर्जदारास पत्र, अर्जदारास पत्र, Postal Acknowledge receipt, Letter to complainant कागदपत्रे दाखल केली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहन क्रमांक
MH-22 H 4610 च्या वाहनाची अपघात नुकसान भरपाई
देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा त्याचे वाहन क्रमांक MH-22 H 4610 चा मालक होता व अर्जदाराने सदर गाडीचा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमाकृत केली होती, ज्याचा नंबर 182003/31/2012/1346 होता व सदरचा विमा कालावधी 29/11/2011 ते 28/11/2012 पर्यंत वैध होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. सदर अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाला व त्यानंतर विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहनाचे पाहणी करण्याकरीता सर्व्हेअर जोशी यांची नियुक्ती केली, ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्ट आहे. फक्त वादाचा मुद्दा हा आहे की, अर्जदाराच्या सदर गाडीचा अपघाता दिवशी म्हणजे 15/05/2012 रोजी सदर गाडीच्या चालकाजवळ Valid Driving License होते की नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीने सदर अर्जदाराच्या गाडीचा अपघाता दिवशी गाडी चालका जवळ ट्रान्सपोर्टचे Valid Driving License नव्हते, म्हणून अर्जदाराचा अपघात वाहन विमादावा नाकारला ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटरवरुन सिध्द होते, सदरचे गैरअर्जदार विमा कंपनीचे अर्जदाराचा विमा दावा नाकारण्याचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण नि.क्रमांक 5/5 वर दाखल केलेल्या संबंधीत गाडी चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्सचे अवलोकन केले असता चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्स हे LMV Non Transport साठी 02/11/2028 पर्यत वैध होते व LMV Transportसाठी Validity ही 02/11/2011 पर्यंत होती. अर्जदाराच्या गाडीचा अपघात हा दिनांक 15/05/2012 रोजी घडला. त्यावेळी संबंधीत गाडी चालकाचे लायसेन्स हे LMV Non Transport करता वैध होते, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराची सदरची गाडी ही Transport या सदराखाली येते, या बद्दल कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही.व तसेच अर्जदाराने पॉलिसीच्या अटीचे उल्लंघन कोठेही केल्याचे आढळून येत नाही, असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघाता मध्ये त्याच्या वाहनाचे रु. 1 लाखाचे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही कारण या बाबत अर्जदाराने मंचासमोर कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा आणला नाही. याउलट गैरअर्जदार विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात म्हंटले आहे की, अर्जदाराच्या गाडीचे सदर अपघाता मध्ये त्यांच्या कंपनीचे सर्व्हेअर आर.व्ही.फडणीस यांच्या अहवाला प्रमाणे रु. 17,330/- चे नुकसान झाले होते व ही बाब नि.क्रमांक 13/4 वरील सर्व्हेअर रिपोर्टवरुन व नि.क्रमांक 13/5 वरील बिलचेक रिपोर्ट वरुन सिध्द होते. गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या Case Law मधील वस्तुस्थिती व सदर प्रस्तुत तक्रारी मधील वस्तुस्थिती विभीन्न आहेत.
निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदाराचा वाहन अपघात नुकसान भरपाई विमादावा फेटाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे ठाम मत आहे. अर्जदार हा गैरअर्जदार विमा कंपनीकडून त्याचे गाडीचे नुकसान भरपाई म्हणून रु. 17,330/- मिळवणेस पात्र आहे, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास त्याच्या
वाहनाच्या अपघात नुकसान भरपाई पोटी रु.17,330/- फक्त (अक्षरी रु.
सतराहजार तिनशे तीस फक्त ) द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.