निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 30/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 21/07/2011 कालावधी 06 महिने 14 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 प्रतिभा भ्र.कृष्णा जाधव. अर्जदार वय 27 वर्षे.धंदा. घरकाम. अड.एल.एस.काळे. रा.वैभव नगर.कारेगाव रोड.परभणी. 2 कृपा पि.कृष्णा जाधव. वय 4 वर्षे. अज्ञान,अ.पा.क.सख्खी आई तक्रारदार क्रमांक.1 3 जयदिप पि.कृष्णा जाधव. वय 2 वर्षे.अज्ञान,पालनकर्ती. सख्खी आई तक्रारदार क्रमांक.1 विरुध्द दि ओरियंटल इन्शुरंन्स कं.लि. गैरअर्जदार. तर्फे व्यवस्थापक. अड.नरवाडे जी.व्ही. दौलत बिल्डींग.शिवाजी चौक.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) अपघातात डॅमेज झालेल्या इन्श्युअर्ड इंडिका कारची नुकसान भरपाई विमा कंपनीने दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदारांच्या कौटूंबिक मालकीची इंडिका कार रजि.नं. एम.एच.04/बी.डब्ल्यू. 9852 चा रजिस्टर्ड ओनर अर्जदारचा मयत पती कृष्णा जाधव होता.सदर कारचा गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा उतरविलेला होता.त्या पॉलिसीची मुदत 04/05/2008 ते 28/11/2008 अखेर होती.तारीख 25/04/2008 रोजी मयत कृष्णा जाधव कुटूंबासह औंढा येथे लग्नासाठी कारमधून जात असतांना वसमत ते परभणी रोडवर समोरुन येणारी जीप एम.एच.26 / सी.1119 ने कारला धडक दिल्याने अपघात झाला.कार मधील तीन प्रवासी मयत झाले.अर्जदार सुदैवाने वाचली परंतु गंभीर जखमी झाली ती पाच ते सहा महिने हॉस्पीटल मध्ये इनडोअर पेशंट म्हणून अडमिट होती अपघातात कारचे खुप नुकसान झाले होते.अर्जदार हॉस्पीटल मधून बरी होवुन घरी आल्यावर तारीख 20/05/2008 रोजी विमा कंपनीकडे क्लेमफॉर्म व इतर आवश्यकती सर्व कागदपत्रे गैरअर्जदाराकडे सादर केली.विमा कंपनीतर्फे नेमलेल्या सर्व्हेअरने कारच्या नुकसानीचे स्पॉट इन्सपेक्शन केले.परंतु एक वर्ष होवुन गेले तरी गैरअर्जदाराने मंजुरी बाबत काहीच कळविले नाही.म्हणून गैरअर्जदारास समक्ष भेटून चौकशी केली असता त्यांनी एच.डी.एफ.सी.बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र व वारस दाखल आणावयास सांगितले.त्याचीही पुर्तता 18/06/2010 रोजी केली.त्यानंतरही क्लेम मंजुरी बाबत गैरअर्जदाराने कळविले नाही म्हणून तारीख 01/11/2010 रोजी वकिला मार्फत नोटीस पाठविली नोटीसीलाही त्यांनी दाद दिली नाही म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन इंडिका कारची नुकसान भरपाई रु.2,25,000/- 12 टक्के व्याजासह तारीख 25/04/2008 पासून मिळावी अशी मागणी केली. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यांनी तारीख 17/03/2011 रोजी प्रकरणात लेखी जबाब ( नि.10) दाखल केला आहे. तक्रार अर्जातील अर्जदाराच्या कारच्या मालकी बाबतचा व विमा पॉलिसी बाबतचा मजकूर वगळता इतर सर्व विधाने गैरअर्जदाराने नाकारले आहेत. अपघाताची माहिती विमा कंपनीला दिल्याचा मजकूर व सर्व्हेअर तर्फे सर्व्हे केल्याचा मजकूर त्यांना मान्य आहे तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह अर्जदाराने त्यांचेकडे विमा क्लेम केलेला होता ही बाबही त्यांनी नाकारलेली नाही.परंतु विमा क्लेम फॉर्मवर अर्जदाराच्या चुलत सास-याची सही असल्याने अर्जदारला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार पोहचत नाही तसेच कारचा रजिस्टर्ड ओनर अपघात मयत झाल्यावर कायद्यातील तरतुदी प्रमाणे 30 दिवसांच्या आत वारसाचे नावे करुन घेतली नसल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही.असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जदाराने अपघातातील कार परस्पर भंगारात रु.30,000/- ला विकली आहे.त्यामुळे ती नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही,सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.11) दाखल केले आहे. व पुराव्यातील कागदपत्रात नि.13 लगत असेसमेंट रिपोर्ट, वगैरे 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारा तर्फे अड.दराडे आणि गैरअर्जदारा तर्फे अड. नरवाडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या कारची अपघातात झालेली नुकसान भरपाई आजपर्यंत मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय. असल्यास किती ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदारचा मयत पती कृष्णा गणपतराव जाधव याचे मालकीची इंडिका कार रजि.नं.एम.एच. 04 / बी.डब्ल्यु.9852 चा गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे.तसेच पॉलिसीची मुदत 04/04/2008 ते 28/11/2008 असल्या संबंधीचा तक्रार अर्जातील मजकूरही गैरअर्जदारांने नाकारलेला नाही.अर्जदाराने पुराव्यात नि.4/5वर पॉलिसीची एन्डॉर्समेंटची मुळ कॉपी दाखल केलेली आहे.तारीख 25/04/2008 रोजी इंडिका कारचा परभणी बसमत रोडवर एरंडेश्वर जवळ सकाळी समोरुन येणा-या जीपने निष्काळजीपणे भरधाव वेगात येवुन कारला जोरात धडक दिल्याने अपघात होवुन कार मधील कृष्णा जाधवसह तीन व्यक्ती मयत झाले होते.शिवाय कारचे खुप नुकसान झाले होते.ती गोष्ट शाबीत करण्यासाठी अर्जदाराने पुराव्यात पूर्णा पोलिस स्टेशन गु.र.क्र. 57/08 मधील एफ.आय.आर.(नि.4/1), घटनास्थळ पंचनामा (नि.4/2), इन्क्वेस्ट पंचनामा (नि.4/3), कृष्णा जाधव याचा पी.एम.रिपोर्ट (नि.4/4) दाखल केला आहे.अपघाता नंतर अर्जदाराने गैरअर्जदारास घटनेची माहिती कळविली होती.त्यानंतर कंपनीतर्फे नेमलेल्या सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा सर्व्हे केला होता.अर्जदारच्या चुलत सास-याने त्यानंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा क्लेमफॉर्म सादर केलेला होता.ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे.पुराव्यात नि.4/8 वर अर्जदाराने क्लेमफॉर्म ची छायाप्रत दाखल केलेली आहे. क्लेम मंजुरीचा निर्णय वर्ष होवुन गेले तरी गैरअर्जदाराने न कळवल्यामुळेच अर्जदारने गैरअर्जदारांना समक्ष भेटून चौकशी केली असता त्याने एच.डी.एफ.सी.बँकेचा नाहरकत दाखला व वारस दाखला या कागदपत्रांची मागणी केली होती.ती दोन्ही कागदपत्रांची अर्जदाराने पुर्तता केली होती त्याच्या छायाप्रतीही पुराव्यात अनुक्रमे नि.4/7 व नि.4/8 वर दाखल केलेल्या आहे.वास्तविक त्यानंतर तरी गैरअर्जदारने अर्जदारचा क्लेम मंजूर करायला काहीच हरकत नव्हती.विनाकारण क्लेम रखडत ठेवल्यामुळे अर्जदारने शेवटी वकिला मार्फत तारीख 29/10/2010 रोजी गैरअर्जदारास रजि.नोटीस पाठवावी लागली होती. त्या नोटीसीची स्थळप्रत व पोष्टाच्या पावत्या पुराव्यात 4/9 व 4/10 वर आहेत. त्यालाही दाद न दिलयाने अर्जदारला प्रस्तुंत तक्रार अर्जाव्दारे कायदेशिर दाद मागणी भाग पडले असावे.असाच यातून निष्कर्ष निघतो त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदारकडून निश्चितपणे सेवात्रुटी झाली आहे.प्रकरणात गैरअर्जदारने जो लेखी जबाब (नि.10) दिला आहे त्यामध्ये असा बचाव घेतला आहे की, रजि.ओनरच्या मृत्यू नंतर 30 दिवसात वाहन अर्जदारने नावावर केले नाही व क्लेमफॉर्म अर्जदारने स्वतः न देता चुलत सास-याने दिला म्हणून नुकसान भरपाई मिळणेस ती पात्र नाही.गैरअर्जदाराने घेतलेला हा बचाव मुळीच ग्राह्य धरण्या जोगा नाही व तो कायदेशिरही नाही कारण अर्जदारने विमा कंपनीच्या मागणी प्रमाणे वारस दाखला दिल्यानंतर तीला नुकसान भरपाई देण्यास काहीच हरकत नव्हती.गैरअर्जदार तर्फे नेमलेले सर्व्हेअर अरुण नाईक याने नुकसान भरपाईची कॅशलॉस बेसीसवर रु.1,47,428.16 असेसमेंट केल्याचे पुराव्यातील नि.16/1 वरील असेसमेंट रिपोर्ट वरुन दिसते.अर्जदारने गैरअर्जदाराचे परस्पर कार भंगारात रु.30,000/- ला विकली होती.हे गैरअर्जदारांनी लेखी जबाबात मान्य केले आहे शिवाय अर्जदारतर्फे पुराव्यात नि.17 ला शपथपत्रही दाखल केलेले आहे त्यामुळे रु.1,47,428.16 मधून रु.30,000/- वजा जाता उरलेली रक्कम रु.117428.16 नियमाप्रमाणे अर्जदारला मिळाली पाहिजे ती देण्यास कोणतीही कायदेशिर बाधा येण्याचा प्रश्न उदभवत नाही.गैरअर्जदारानी जाणून बुजून अर्जदाराचा क्लेम विनाकारण बराच काळ प्रलंबित ठेवुन अर्जदारास मानसिकत्रास देवुन आर्थिक नुकसान केलेले आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. वरील सर्व बाबी विचारात घेवुन मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदार क्र.1 ला व अ.पा.क. अर्जदार क्र.2 व 3 करीता इंडिका कारची अपघातात झालेली नुकसान भरपाई रु.1,17,428.16 नोटीस तारखे पासून म्हणजे तारीख 20/10/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी. 3 पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |