निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 30/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/08/2011 कालावधी 07 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्रीमती मुक्ताबाई भ्र.रामजी जाधव. अर्जदार वय 59 वर्ष.धंदा.घरकाम. अड.आर.आर.जोंधळे. रा.देगाव.ता.पुर्णा.जि.परभणी. विरुध्द दि.ओरीएंटल इंशोरन्स कं.लि. गैरअर्जदार. तर्फे शाखा व्यवस्थापक. अड.ए.डी.गिरगावकर. शाखा.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) जनता वैयक्तिक अपघात विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीने दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदारचा पती रामजी जाधव याचा 16/02/2009 रोजी पूर्णा ते झिरोफाटा रोडवरुन पायी जात असतांना मोटार सायकल एम.एच. 22/ इ. 8112 वरील चालकाने भरधाव वेगात येवुन रामजी जाधव याला धडक दिल्याने तो जबर जखमी होवुन जागीच मरण पावला. पूर्णा पोलिस स्टेशनला मोटार सायकल चालकाविरुध्द गुन्हा रजि. नं.31/09 प्रमाणे पूर्णा पोलिस स्टेशन ने गुन्हा दाखल केला. मयत रामजी व त्याच्या कुटूंबातील इतर तीन सदस्यांच्या नावे 27/01/2006 ते 26/01/2011 अखेर पाच वर्षे मुदतीची गैरअर्जदार कंपनीकडून जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतलेली होती कंपनी तर्फे लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस लि. यांचे लाईफ केअर कार्ड क्रमांक U2006 / MH - 02 - 036986 - 36987 दिलेले होते.अर्जदारने पतीच्या मृत्यू नंतर गैरअर्जदारकडे पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह माहे फेब्रुवारी 2010 मध्ये क्लेम केला, परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही.म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी तसेच मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जासोबत अर्जदारचे शपथपत्र (नि.2) व पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत 16 कागदपत्रे दाखल केली आहेत. मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस गेल्यावर त्याने आपले लेखी निवेदन तारीख 23/03/2011 रोजी (नि.11) दाखल केले आहे.तक्रार अर्जातील अपघात घटने संबंधीचा मजकूर वैयक्तिक माहिती अभावी गैरअर्जदाराने अमान्य केलेला आहे.पॉलिसी संबंधी त्याचे म्हणणे असे की, तक्रार अर्जात वर्णन केलेल्या पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाईची हमी ओरियंटल कंपनीने दिलेली नसून लाईफ लाईन केअर लि.या कंपनीने दिली आहे.त्याच्याशी ओरियंटल कंपनीचा डायरेक्ट संबंध नाही.मोटार सायकल स्वाराची अपघातात काहीच चुक नव्हती अपघातातील मृत्यूला मयत रामजी जाधव हाच स्वतः कारणीभुत होता त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस तो पात्र नाही. याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणतीच सेवात्रुटी झालेली नाही.अर्जदाराने घटने नंतर नियमाप्रमाणे सात दिवसाचे मुदतीत क्लेम दाखल केलेला नव्हता त्याबाबत अर्जदारकडे वेळोवेळी कागदपत्रांची मागणी करुनही तीने पुर्तता केलेली नाही.त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही, सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदना सोबत गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि12) दाखल केले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारतर्फे अड.जोंधळे यांनी लेखी युक्तिवाद सादर केला गैरअर्जदारतर्फे अड गिरगावकर यांने तोंडी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रु.1,00,000/- देण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदारचा मयत पती रामजी जाधव याने त्याच्या हयातीत स्वतःसह कुटूंबातील इतर तीन सदस्यांची गैरअर्जदार विमा कंपनीकडून जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी उतरविलेली होती त्या पॉलिसीच्या सर्टीफिकेटची कॉपी पुराव्यात (नि.4/4) दाखल केलेली आहे तीचे अवलोकन केले असता अर्जदारचे नावे रु.50,000/- मयत रामजीचे नावे रु.1,00,000/- रेखाचे नावे रु.50,000/- व मुकूंदचे नांवे रु.1,00,000/- जोखमीची असून तीची मुदत 27/01/2006 ते 26/01/2011 असल्याचे नमुद केले आहे. वरील चौघांचे पॉलिसी नंबर्स पॉलिसी सर्टीफिकेटवर आहेत.दिनांक 16/02/2009 रोजी अर्जदाराचा पती पूर्णा ते झिरोफाटा रोडने पायी निघाला असतांना मोटार सायकल नं एम.एच.22 ई. 8112 वरील चालकाने भरधाव वेगात येवुन रामजीला धडक दिल्याने अपघातात तो जबर जखमी होवुन जागेवरच मयत झाला होता.अपघाताची खबर पूर्णा पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी गुन्हा रजि.नं.31/09 प्रमाणे मोटार सायकल चालका विरुध्द इ.पी.को.कलम 279, 304 ए प्रमाणे गुन्हा दाखल केला होता ही वस्तुस्थिती पुराव्यातील पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीची छायाप्रत (नि.4/8), घटनास्थळ पंचनामा (नि.4/10), मरणोत्तर पंचनामा( नि.4/6), पी.एम.रिपोर्ट (नि.4/7) ही कागदपत्रे दाखल केलेली आहे.त्यामधून अपघाताची घटना शाबीत झाली आहे.मयत रामजी पुंजाजी जाधव याचे नावे गैरअर्जदार कंपनीकडून 1,00,000/- रु.हमीची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीची घेतली असल्यामुळे आणि त्याचा मृत्यू पॉलिसी मुदतीत झालेला असल्याने पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळणेसाठी अर्जदारने गैरअर्जदार विमा कंपनीकडे तारीख 22/12/2009 रोजी लाईफ लाईन लाईफ केअर लि.यांच्या तारीख 06/10/2009 च्या पत्राप्रमाणे (नि.4/1) विमा कंपनीकडे आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम पाठवलेला होता हे पुराव्यात नि.4/3 वर दाखल केलेल्या आहे क्लेमफॉर्मच्या छायाप्रतीवरुन शाबीत झालेले आहे एवढेच नव्हेतर क्लेमफॉर्म पाठविल्यानंतरही गैरअर्जदारांनी पुन्हा अर्जदाराकडून दि.25/01/2010 च्या पत्राव्दारे (नि.4/12) आणखी ज्याकाही कागदपत्राची मागणी केली होती त्या कागदपत्रांची पुर्तता तारीख 24/02/2010 च्या पत्राव्दारे केलेली होती त्या पत्राची स्थळप्रत ही अर्जदारने पुराव्यात (नि.4/11) दाखल केलेली आहे.गैरअर्जदारांनी वास्तविक अर्जदाराच्या पतीची अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रु.1,00,000/- क्लेम दाखल केल्यानंतर मंजूर करावयास काहीच हरकत नव्हती मात्र ती देण्याच्या बाबतीत आजपर्यंत टाळाटाळ करुन अर्जदारला मानसिकत्रास दिला आहे व सेवात्रुटी केली आहे असेच यातून अनुमान निघते.लेखी जबाबात विमा कंपनीकडे आवश्यकती कागदपत्रे अर्जदाराकडून मिळाली नाही हा घेतलेला बचाव खोटा व चुकीचा आहे तसेच संबंधीत पॉलिसी मधून नुकसान भरपाईची हमी लाईफ लाईफ केअर लि.या कंपनीने घेतली आहे व त्या कंपनीची अर्जदार ग्राहक आहे असाही जो बचाव घेतला आहे तो चुकीचा असून पॉलिसी सर्टीफिकेटवर दोन्हीही कंपनीची नावे आहेत.शिवाय 25/01/2010 चे पत्रातून मागणी केलेली कागदपत्रे गैरअर्जदार कंपनीचेच असल्याचे स्पष्ट दिसते त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच हा खोटा बचाव घेतला असल्याचे खेदाने म्हणावे लागते.सबब मुद्दा क्रमांक 1 च उत्तर होकारार्थी देण्यात येवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांचे आत अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- अर्ज दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 06/01/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटीची नुकसान भरपाई रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु. 1,000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |