जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक: 18/05/2010. आदेश दिनांक : 07/10/2010. ग्राहक तक्रार क्रमांक : 276/2010. 1. श्री. भोजलिंग कृष्णा आडत, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. पिंपळवाडी वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर. 2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 281/2010. 1. श्री. प्रभाकर तात्या भाकरे, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. भाकरेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर. 2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) 2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्ली, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत दोन्ही तक्रारींचे स्वरुप, विषय, विरुध्द पक्ष व त्यांचे म्हणणे इ. मध्ये साम्य असल्यामुळे एकत्रितरित्या निर्णय देण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारी थोडक्यात अशा आहेत की, तक्रारदार क्र.2 संघाने त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थेच्या सभासदांच्या गाईंचा पशुधन विमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे विमा उतरविलेला आहे. तक्रारदार यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | टॅग क्रमांक | विमा रक्कम | गाईचा मृत्यू दिनांक | 276/2010 | एस.ओ.एल.पी. 116462 | 116462 | रु.22,000/- | 21/9/2008 | 281/2010 | एस.ओ.एल.पी. 116481 | 116481 | रु.29,000/- | 28/12/2008 |
3. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि उपचारादरम्यान तिचा वर नमूद केलेल्या तारखेस मृत्यू झालेला आहे. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्यांना क्लेमबाबत काहीच न कळविता क्लेम प्रलंबीत ठेवला आहे आणि नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 4. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना गाईच्या विम्याची पॉलिसी अटी व शर्तीस अधीन राहून जारी केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे पी.एम. पावती, खरेदी पावती, मेडीकल बिले, मूळ कव्हरनोट फोटो, पंचनामा, टॅग, फोटो, हेल्थ सर्टिफिकेट इ. कागदपत्रे दाखल केली नाहीत. तसेच अग्रीमेंटच्या अटी व शर्तीनुसार कराराविषयी निर्माण झालेला वाद लवादाकडून सोडविणे आवश्यक आहे आणि केवळ अकोला कोर्टास त्याचे अधिकारक्षेत्र आहे. क्लेमबाबत इन्व्हेस्टीगेटरने चौकशी केली असता, त्यामध्ये भिन्नता आढळून आली. शेवटी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? होय. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 3. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1:- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, विमा कंपनीने कोणतेही कारण नसताना त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवल्यामुळे व नाकारल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. 7. तत्पूर्वी विमा कंपनीने सर्वप्रथम पॉलिसी अग्रीमेंटमधील क्लॉजचा आधार घेत कराराविषयी निर्माण झालेले वाद सामंजस्याने न सुटल्यास ते लवादाकडे पाठविण्यात यावेत आणि त्याचे अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असतील, असे नमूद केले आहे. 8. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या तरतुदीमध्ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे निश्चितच त्यांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येते. तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने 'मॅग्मा फिनकॉप लि. /विरुध्द/ पंडीत ईश्वर देव ठाकूर', 2010 सी.टी.जे. 913 (सीपी) (एनसीडीआरसी) या निवाडयामध्ये असे न्यायिक तत्व प्रस्थापित केले आहे की, Para. 3 : As regards submissions referable to arbitration, it may be stated that the provisions of Section 3 of the Consumer Protection Act, 1986 is in addition and not in derogation of the proceedings of any other law for the time being in force. Thus, even if the Hire Purchase agreement contained arbitration clause, the complaint by the respondent under the Act was legally maintainable under the Act. 9. वरील न्यायिक तत्वानुसार लवादाच्या क्लॉजमुळे जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास अधिकारक्षेत्र प्राप्त होते, या मतास आम्ही आलो असून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 10. मुद्दा क्र. 2 ते 4 :- तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. त्याशिवाय, ज्या इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालांचा विमा कंपनीने आधार घेतलेला आहे, ते इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट शपथपत्रासह रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेले नाही. रेकॉर्डवर उपलब्ध असलेली कागदपत्रे विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईंच्या विम्याची रक्कम तक्रारदार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्यास दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. ग्राहक तक्रार क्रमांक 276/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- तक्रार दाखल दि.18/5/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. ग्राहक तक्रार क्रमांक 281/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.29,000/- तक्रार दाखल दि.18/5/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 4. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |