::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ०९/०९/२०२१)
- तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
- तक्रारकर्तीचे मयत पती श्री. सुधीर अशोक कापसे यांच्या मालकीची मौजा पिंपळणेरी ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. ५८ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरूध्द पक्ष क्रं. १ व २ कडून तक्रारकर्तीचे पतीचा रू. २,००,०००/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्तीचे पतीचा दि. १९/०६/२०१७ रोजी मोटरसायकल वरुन जात असतांना एका काळी पिवळी टॅक्सी ने धडक दिल्याने जखमी होऊन अपघाती मृत्यु झाला.
- तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्तीने दि. ०९/०१/२०१८ रोजी विरूध्द पक्ष क्रं. ३ मार्फत विरुध्द पक्ष १ व २ विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. तसेच विरूध्द पक्षांनी मागणी केलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली. परंतु तक्रारकर्तीने रीतसर अर्ज व आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्तीच्या पतिचा मृत्यु दावा दिनांक ०९/०३/२०१८ रोजी ‘अपघातासमयी मृतकाजवळ वैध परवाना नव्हता’ या कारणाने दावा नामंजूर असे कळविले. त्यामुळे तक्रारकर्तीला आयोगासमक्ष तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी सदर विमा दावा नाकारून तक्रारकर्तीला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे.
- तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, विरूध्द पक्षांनी विमा दाव्याची रक्कम रु. २,००,०००/- व त्यावर प्रस्ताव दाखल दिनांक ०९/०१/२०१८ पासून १८ टक्के द.सा.द.शे. व्याजासह देण्याचे आदेश व्हावे, तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. २०,०००/- विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं १ ते ३ यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. १ व २ हजर होवून त्यांनी आपले संयुक्त लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारीतील कथन अमान्य करुन पुढे आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, मयत सुधीर यांचा दिनांक १९/६/२०१७ रोजी मोटर अपघातात मृत्यु झाला परंतु तक्रारकर्तीने सदर दावा हा दिनांक २/७/२०१९ रोजी दाखल केल्याने मुदतबाह्य आहे. याशिवाय मयत सुधीर यांचेजवळ अपघाताचे वेळी लायसन्स नव्हते. मयत सुधीर यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीचे भंग केलेला आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा नियमानुसार निकाली काढला आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्याने खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ यांना नोटीस प्राप्त होवून सुध्दा ते प्रकरणात उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द निशानी क्रमांक १ वर दिनांक ४/११/२०१९ रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद, तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद यालाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी दिनांक १८/०६/२०२१ रोजी पुरसिस दाखल तसेच विरूध्द पक्ष क्रं १ व २ यांचे संयुक्त लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे लेखी कथन, पुरावा शपथपञ, लेखी युक्तिवाद यालाच तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी दिनांक १३/७/२०२१ रोजी पुरसिस दाखल. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र. १ व २ यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांची ग्राहक आहे काय ? होय.
(2) तक्रारकर्ती विरूध्द पक्ष क्रं. ३ यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(3) तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
(4) विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण होय.
सेवा दिली आहे काय ?
(5) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत :-
8. तक्रारकर्तीने तक्रारीत नि.क्र. ४ वर दाखल केलेल्या दस्त क्र. ३, ७/१२ उतारा, गांव नमुना ८ या दस्तऐवजावर तक्रारकर्तीचे पती मयत सुधीर कापसे यांचे नावाची नोंद आहे यावरून तक्रारकर्तीचे मयत पती शेतकरी होते व तक्रारकर्ती ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी म्हणून सदर विम्याची लाभधारक असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांची ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत :-
9. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीचे शेतकरी पतीचा विमा काढण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक ३ या शासकीय कार्यालयाने विना मोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक २ याचे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ३ बाबत :-
10. मयत सुधीर कापसे यांचा दिनांक १९/६/२०१७ रोजी अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर तक्रारकर्तीने दिनांक ९/१/२०१८ रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे आवश्यक दस्ताऐवजासह विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला. विरुध्दपक्ष यांनी दिनांक ९/३/२०१८ रोजी सदर विमा दावा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक २/७/२०१९ रोजी आयोगामध्ये तक्रार दाखल केली. सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आत दाखल केली असल्याने मुदतीत आहे. सबब मुद्दा क्रं. ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत :-
11. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४ वर दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, दिनांक १५/६/२०१७ रोजी मयत सुधीर कापसे हे मोटरसायकलने चिमूर वरुन वासेरा येथे धानाजी बिजाई करिता जात असतांना समोरुन काळी पिवळी गाडी क्रमांक एम.एच. ३१/८५८१ च्या चालकाने गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून मोटरसायकल ला धडक दिली. त्यामध्ये मयत सुधीर हे जखमी झाले असे एफ.आय.आर. /अकस्मात मृत्यु खबरी बुक, गुन्ह्याच्या तपशिलाचा नमुना/घटनास्थळ पंचनामा इत्यादी मध्ये नमूद आहे. मयत सुधीर यांना उपचाराकरिता हॉस्पीटल मध्ये भरती केले परंतु त्यांचे डोक्याला मार लागला असल्याने उपचारादरम्यान त्यांचा दिनांक १९/६/२०१७ रोजी मृत्यु झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचे मृत्युचे कारण ‘Head Injury’ असे नमूद आहे यावरुन मयत सुधीर यांचा अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला. परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. माञ मयत सुधीर यांचा अपघात हा काळी पिवळी गाडी एम.एच. ३१/८५८१ चालकाच्या निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने झालेला आहे. आयोगाच्या मते विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्ती प्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविली त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून विमा दाव्याची रक्कम शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रं. ४ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ५ बाबत :-
12. मुद्दा क्रं. १ ते ४ च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्र. १९/८९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या विमा दाव्याची रक्कम रु. २,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरूध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. ५,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- तक्रारकर्तीला दयावी.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- तक्रारकर्ती यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.