(आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. वामन वि. चौधरी)
- आदेश -
तक्रारकर्तीने तिचे पती श्री. प्रशांत उर्फ अभय राधेशाम मिश्रा यांच्या अपघाती मृत्युबद्दल दाखल केलेल्या विमा दाव्याबद्दल पाच वर्षे उलटून गेली तरीसुध्दा विरूध्द पक्ष यांनी दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार विद्यमान न्याय मंच गोंदीया येथे दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही राह. सावरा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीच्या पतीच्या मालकीची मौजा सावरा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्र. 558 ही शेत जमीन आहे. तक्रारकर्तीचे पती शेती व्यवसाय करीत असल्यामुळे ते शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात.
3. विरूध्द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 2 हे विमा कंपनीचे दावे स्विकारतात व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. प्रशांत उर्फ अभय राधेशाम मिश्रा हे दिनांक 29/06/2008 रोजी शेतात पाणी देत असतांना इलेक्ट्रीक पंपचा करंट लागून त्यात त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्ती महिलेच्या शेतकरी पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे दिनांक 25/03/2009 रोजी विमा दावा मिळण्याकरिता सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला.
6. तक्रारकर्तीने रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्या पतीच्या विमा दाव्याबाबत 5 वर्षे उलटून गेली, तरीसुध्दा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे तक्रारकर्तीला न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 03/04/2014 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस विरूध्द पक्ष 1 यांना पाठविली. परंतु विरूध्द पक्ष 1 यांचेकडून तक्रारकर्तीला अद्याप उत्तर मिळाले नाही. शासनाने मृतक शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु विरूध्द पक्ष 1 हे शासनाच्या योजनेच्या उद्देशाला तडा देत असून ही विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे.
7. तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारकर्तीने विमा दावा रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यासाठी दिनांक 16/04/2014 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली आहे.
8. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 25/04/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 28/04/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दिनांक 21/08/2014 रोजी दाखल केला.
9. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारीतील मुद्दा क्र. 1 माहितीअभावी अमान्य केला असून मुद्दा क्र. 2 ते 4 मध्ये तक्रारकर्तीचे पती शेतकरी आहे व ते रू. 1,00,000/- च्या विमा दाव्यास पात्र असल्याचे अमान्य केले आहे. मुद्दा क्र. 5 नुसार तक्रारकर्तीने सादर केलेला दावा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 यांना प्राप्त झाला नसल्यामुळे दावा मंजूर अथवा नामंजूर करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे म्हटले आहे. मुद्दा क्र. 11 नुसार सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्यामुळे विमा दाव्याची रक्कम व नुकसानभरपाई मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 26/09/2008 रोजी झाला व तक्रार 2014 मध्ये दाखल करण्यात आल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही barred by limitation असल्यामुळे खारीज करण्यायोग्य असल्याचे लेखी जबाबात म्हटले आहे.
10. विरूध्द पक्ष 2 यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर वारंवार संधी देऊन सुध्दा ते मंचासमोर हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 19/11/2014 रोजी पारित करण्यात आला.
11. तक्रारकर्तीने सदर तक्रारीसोबत विरूध्द पक्ष 1 हे आवश्यक पक्ष असल्यामुळे त्यांना तक्रारीत जोडण्याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज पृष्ठ क्र. 4 वर दाखल केला असून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना शासन निर्णय दिनांक 24/08/2007 रोजीची प्रत पृष्ठ क्र. 15 वर दाखल केली आहे. तसेच सात/बाराचा उतारा पृष्ठ क्र. 31 वर, वारसा प्रकरणाची नोंद नमूना 6-क /वारस फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 32 वर दाखल केले आहे. गाव नमुना आठ-अ पृष्ठ क्र. 34 वर दाखल केले असून घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 35 वर, मरणान्वेषण प्रतीवृत्त (फौजदारी व्य. स. कलम 174) पृष्ठ क्र. 36 ते 45 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 46 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
12. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 29/06/2008 रोजी शेताला पाणी देता असतांना इलेक्ट्रीक पंपचा करंट लागून झाला. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असून सदर प्रकरणात 7/12 चा उतारा व फेरफार नक्कल जोडली असून तक्रारकर्ती ही अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी या व्याख्येत मोडते. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा दाखल केल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे न कळविल्याने ही Continuous Cause of Action असल्यामुळे सदर दावा हा मुदतीत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह मंजूर करण्यात यावी. तसेच क्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाती झाल्याने विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे दिनांक 25/03/2009 रोजी तक्रारकर्तीने रितसर अर्ज केला आहे. शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्व मुद्दा क्र. 10 नुसार सदरहू योजनेअंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज/कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही असा युक्तिवाद केला.
13. विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे ऍड. आय. के. होतचंदानी यांनी लेखी जबाब हाच त्यांचा लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिनांक 19/11/2014 रोजी दाखल करून तोंडी युक्तिवाद केला.
14. विरूध्द पक्ष 2 यांना वारंवार संधी देऊन सुध्दा ते गैरहजर राहिल्यामुळे सदर प्रकरण आदेशाकरिता बंद करण्यात आले.
15. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष 1 यांचा लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच तक्रारकर्तीच्या वकिलांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
16. तक्रारकर्तीच्या पतीच्या नावाने मौजे पो. सावरा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्र. 558, क्षेत्रफळ 0.46 हे. आर. या वर्णनाची शेती असल्याबाबतचा 7/12 उतारा सदर प्रकरणात दाखल केलेला असल्यामुळे तक्रारकर्तीचे पती शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 29/06/2008 रोजी झाला हे मृत्यु प्रमाणपत्रावरून सिध्द होते. वैद्यकीय अधिक्षक, उप जिल्हा रूग्णालय, तिरोडा यांनी दिलेल्या पृष्ठ क्र. 44 वरील पोस्टमार्टेम रिपोर्टवरून इलेक्ट्रीक शॉकमुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला हे सिध्द होते. पृष्ठ क्र. 37 वरील पोलीस स्टेशन दवनीवाडा यांच्या पोलीस रिपोर्टमध्ये तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा इलेक्ट्रीक करंट लागून झाल्याचे नमूद केल्यावरून सिध्द होते.
17. माननीय राज्य आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांच्या III (2011) CPJ 285 – SADHANA RAMDAS @ JAMBUWANT SALUNKE versus STATE OF MAHARASHTRA & ORS. या न्यायनिवाड्यामध्ये “Consumer Protection Act, 1986 – Sections 2(1)(g), 15, 24-A – Insurance – Group Personal Accident Policy – Limitation – Claim repudiated – Forum dismissed complaint holding complaint after 3 years barred – Hence appeal – Accident on 30.03.2008 – Post-mortem report issued on 16.09.2008 after which complaint filed – Cause of death is cause of action to file complaint – Cause of death ascertained from post-mortem report – Complaint filed on 29.04.2010 not barred by limitation – Claim not settled as not forwarded by respondent 1 to concerned authority – No fault on part of complainant – Complainant be given opportunity to submit claim and concerned authority to decide the same according to law.” असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
18. वरील न्याय निवाड्याप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा सुध्दा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर अथवा नामंजूर झाल्याबद्दल कुठलेही Repudiation Letter तक्रारकर्तीला न दिल्यामुळे तसेच तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्यामुळे व ही Continuous Cause of Action असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 16/04/2014 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.