::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 10/10/2019)
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. अर्जदार ही राहणार आष्टी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराच्या पती श्री संभाजी गोविंदा ठाकरे यांच्या मालकीची मौजे आवंढा तालुका भद्रावती येथे भूमापन क्र. 113 ही शेतजमीन आहे अर्जदाराचा पती हा शेतकरी होता व शेतीच्या उत्पन्नावर अर्जदाराच्या पतीचे कुटुंबाचे पालन पोषण करीत होता गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनी असून दोन विमा सल्लागार आहेत तसेच शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र. 3 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात शासनाच्यावतीने गैरअर्जदार क्र. 3 तर्फे सदर विमा योजनेअंतर्गत अर्जदार महिलेच्या पतीचा 1 लाखाचा विमा शासनाच्या वतीने उतरला होता. विमा शासनाच्या वतीने उतरवलेला आला असला तरी मयत संभाजी गोविंदा ठाकरे यांची अर्जदार ही पत्नी असल्याने सदर विमाची लाभधारक आहे अर्जदार बाईच्या पतीचा मृत्यू दिनांक 16.9.2008 रोजी शेताला पाणी देण्याकरिता तलावाजवळ गेला असता पाय घसरून तलावात बुडून मेला. अर्जदाराच्या पतीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढलेला असल्याने मृत्यू झाल्याने तिने गैरअर्जदार क्र. चार कडे दिनांक 16.10.2008 अर्ज केला तसेच वेळोवेळी गैरअर्जदाराने मागवलेले दस्तावेज ची पूर्तता केली, परंतु असे अजून सुद्धा गैरअर्जदार क्र. 1ने अर्जदार महिलेचा पतीच्या दाव्याबाबत दहा वर्षे उलटून गेले असून मंजूर अथवा नामंजूर न कळल्याने वकिलामार्फत दिनांक 17.०३.2018 रोजी गैर अर्जदार क्र. 1 ते 3 ला नोटीस पाठवला व त्याबाबत विचारणा केली परंतु 1 ते 3 गैरअर्जदार यांनी कोणतेही उत्तर अर्जदार हिला कळवीले नाही गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदार बाईचा दावा मंजूर वा नामंजूर केल्याचे न कळवी ल्याने विमा द्यावयाची रक्कम अर्जदार हिला न मिळाल्यामुळे त्यावरील व्याजाला तिला मुकावे लागले.सबब अर्जदार हिने गैर अर्जदाराविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. | |
|
3. अर्जदाराची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराने अर्जदाराला द्यावयाची रक्कम रुपये 1,00,000/- अर्जदार ने गैर अर्जदाराकडे विमा दावा दाखल केल्यापासून म्हणजे दिनांक16.10.2008 पासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक आर्थिक मानसिक त्रासापोटी 30,०००/-रुपये व तक्रारीचा खर्च कोटी रुपये 20,000 अर्जदार हिला देण्यात यावे.
4. अर्जदार बाईची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्र. 1 ला नोटीस पाठवण्यात आला गैरअर्जदार क्र. 1 उपस्थित राहून त्यांचा प्राथमिक आक्षेप दाखलकरून पुढे कथन केले कि,गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 16.11. 2009 पर्यंत अर्जदाराकडून दस्तऐवजाचे पूर्तता न झाल्यामुळे मृत्युच्या वेळी त्याच्या नावाने जमीन असल्याचा पुरावा दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळला व तसे 16. 11. 2009 ते पत्राद्वारे कळवले आहे अशा परिस्थितीत अर्जदाराने 17. 3 2018 रोजी न्यायालयात तब्बल नऊ वर्षानंतर दाखल केलेली तक्रार पूर्णपणे आहे मुदतबाह्य असून अर्जदाराच्या विमा दाव्यामध्ये सन 2009 मध्ये दिनांक 16. 11 2009 रोजी निर्णय झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत म्हणजे 15. 11. 2011 किंवा त्यापूर्वी अर्जदाराने ग्राहक न्यायालयात वाद दाखल करणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत अर्जदाराने विद्यमान न्यायालयाचा अस्तित्वात नसलेला ग्राहक वाद दाखल करण्यास कोणतीही काही कारण नाही. अर्जदाराने दस्त क्र. 9 दाखल केलेल्या नोटीस दिनांक 6.3.2018 गैरअर्जदार क्र. 1 चंद्रपूर कार्यालय पाठवलेला नोटीस नसून नागपूर विभागीय कार्यालयाला पाठवलेला नोटीस आहे. अशा परिस्थितीत नोटीस मिळाला की नाही याचा कोणताही शहानिशा न करता आठ दिवसात अर्जदारांनी विद्यमान न्यायालयात हा ग्राहक दाखल केलेला आहे तसेच दुसरं 2008 पासून 2018 पर्यंत दहा वर्षात कोणतीही कारवाई न करता वकिलामार्फत नोटीस पाठवल्यानंतर दहा दिवस सुद्धा वाट पाहण्याची तसदी अर्जदाराने घेतली नाही. अर्जदाराने विद्यमान न्यायालयात दाखल केले दस्तावेज हे पूर्णपणे वाचण्यायोग्य नाही ,तसेच दस्त क्र.25 वरील दस्तावेज वाचता येण्यासारखे नाही. तसेच पान क्र. 27 वर दाखल केलेला क्लेम फॉर्म हा नंतर घेतलेला फॉरमॅट असून त्यावर अर्जदाराची सही नाही. अर्जदार हिने हा फॉरमॅट गैरअर्जदार क्र. 3 ला दिल्याचे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तांवरून स्पष्ट होते की तालुका कृषी अधिकारी,भद्रावती यांनी अर्जदारांस दिनांक 5.8.2009 चे पत्राद्वारे तिच्या विमा दाव्यात त्रुटी आहे व मृत्यूच्या वेळी 7/12 उताऱ्यावर मृतकाचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित दस्तावेजाची मागणी केली परंतु अर्जदारांनी दिलेल्या मुदतीत दिनांक 14.8.2009 पर्यंत त्रुटीची पूर्तता केली, हे दाखविणारा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. सबब गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने दिनांक 16.11.2009 पर्यंत अर्जदाराकडून दस्तावेजांची पुर्तता न झाल्यामुळे मृत्युच्या वेळी मय्यताच्या नावाने जमीन असल्याचा पुरावा दर्शवणारा 7/12 उतारा दाखल न केल्यामुळे विमादावा फेटाळला व दिनांक 16.11. 2009 च्या पत्राद्वारे तसे अर्जदारांस कळवले. अर्जदाराने दिनांक 17. 3. 2018 रोजी विद्यमान न्यायालयात तब्बल नऊ वर्षानंतर दाखल केलेली ही तक्रार पूर्णपणे मुदतबाह्य आहे,सबब अर्जदार हिचा दावा खर्चासह खारिज होण्यास पात्र आहे.
6. गैरअर्जदार क्र. 2 ह्यांना प्रकरणात नोटीस प्राप्त होऊनसुद्धा हजर न झाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुद्ध एकतर्फा चालविण्याचा आदेश करण्यात आला.
7. गैरअर्जदार क्र.3 यांनी मंचात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की,अर्जदाराने सादर केलेल्या दाव्याची तपासणी करून माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अर्जदाराचा दावा सादर करण्यात आला व माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रस्ताव देऊ विमा कंपनी सादर केला. त्यामुळे त्यांनी कोणतीही त्रुटी केलेली नसून त्यांचेविरूध्द तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
8. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, गैरअर्जदार क्र. 1 यांचे पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. आदेश काय ? आदेशप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
9. तक्रारीतील दोन्ही पक्षाचे उपरोक्त कथन व दस्तावेजांवरून असे दिसून येते की अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. १६.०९.२००८ रोजी शेताला पाणी देण्याकरीता तलावाजवळ गेला असता पाय घसरल्यामुळे तलावात बुडून झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता २००८ मध्ये अर्ज केला. गैरअर्जदाराच्या उत्तरात नमूद असल्याप्रमाणे दि. १६.११.२००९ पर्यंत अर्जदाराकडून दस्तावेजांची पुर्तता न झाल्यामुळे तक्रारकर्तीचा विमादावा खारीज केला. परंतु अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैरअर्जदारांनी पाठविलेले दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्या मते एखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्यानंतर दावा प्राप्त करण्यासाठी तो ९ ते १० वर्ष वाट पाहणार नाही व दावा मिळण्याकरिता त्याचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केल्याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. उलटपक्षी गैरअर्जदाराने त्यांचे कागद पत्रासह अर्जदाराला विमा दावा फेटाळल्याचे दि 16.112009 चे पत्र तक्रारीत दाखल केले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतर केवळ दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही, तसेच दावा दाखल केल्यानंतर १० वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावर दि. 17.03.2018 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवण्यामुळे तक्रारिचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
10. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.६७/२०१८ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.