::: नि का ल प ञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 24/09/2021)
- तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
- तक्रारकर्त्याची मयत आई श्रीमती सुमन ऊर्फ यशोदाबाई मनोहर कांबळे यांच्या मालकीची मौजा शिवापूर, गांव गनना, ता.मुल,जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. 1 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्त्याची आई ही शेतकरी होती व शेतातील उत्पन्नावरच कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रं. 1 कडून तक्रारकर्त्याचे आईचा रू. 2,00,000/- चा विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्त्याचे आईचा दि. 21/02/2017 रोजी रेल्वेत चढत असतांना पाय घसरुन प्लॅटफॉर्मवर पडल्याने जखमी होवून उपचारादरम्यान अपघाती मृत्यु झाला.
- तक्रारकर्त्याचे आईचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 18/11/2017 रोजी विरूध्द पक्ष क्रं. 3 कडे विम्याची रक्कम मिळण्याकरीता आवश्यक दस्तावेजांसह अर्ज केला व तो वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.2 मार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 विमा कंपनीकडे पाठविला. मात्र विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याचा विमादावा निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्त्याला आयोगासमक्ष तक्रार दाखल करण्याव्यतिरीक्त पर्याय उरला नाही. सबब तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रं. 1 यांचे न्युनतापूर्ण सेवेबाबत प्रस्तूत तक्रार आयोगासमक्ष दाखल केली आहे व विमादाव्याची रक्कम रु.2,00,000/-, प्रवासखर्च, शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.85,000/- तक्रारखर्च रु.5000/- व या संपूर्ण रकमेवर 18% दराने व्याज याप्रमाणे नुकसान भरपाई विरूध्द पक्षांकडून मिळण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्रं 1 ते 3 यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी आयोगासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारीला प्राथमीक आक्षेप नोंदवीत नमूद केले की, अर्जदाराकडून वि.प.क्र.1 ला कोणताही विमादावा प्राप्त झालेला नाही. शिवाय वि.प.क्र.1 व तक्रारकर्ता यांच्यात कोणताही विमाकरार झालेला नाही. त्यामूळे तक्रारकर्त्याला विमादाव्याची रक्कम देण्याबाबत कोणतीही जबाबदारी वि.प.क्र.1 ची नाही. तक्रारीतील इतर कथन अमान्य करुन पुढे आपल्या विशेष कथनामध्ये वि.प.क्र.1 ने नमूद केले की, मयत सुमन यांचा दिनांक 21/02/2017 रोजी रेल्वे अपघातात मृत्यु झाला परंतु तक्रारकर्त्याने प्रस्तूत विमादावा दिनांक 18/11/2017 रोजी म्हणजेच नियमानुसार 90दिवसांचे मुदतीनंतर दाखल केल्याने मुदतबाह्य आहे. याशिवाय मयत सुमन हीचे मृत्युनंतर दोन वर्षांचे कालावधीनंतर प्रस्तूत तक्रार दाखल केल्याने तीदेखील मुदतबाह्य आहे. प्रस्तूत वाद चालविण्याचा अधिकार केवळ रेल्वे लवादाला असून ग्राहक आयोगास सदर अधिकार नसल्यामुळे प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्याने ती खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
- विरूध्द पक्ष क्रं. 2 यांनी प्रकरणात उपस्थीत होवूनही तक्रारीला उत्तर वा अन्य कोणताही बचाव दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द निशानी क्रमांक 1 वर दिनांक 16/01/2019 रोजी लेखी उत्तराविना प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- विरूध्द पक्ष क्रं. ३ यांना नोटीस प्राप्त होवून सुध्दा ते प्रकरणात उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द निशानी क्रमांक 1 वर दिनांक 16/01/2019 रोजी एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञानुषंगाने दाखल केलेले पुर्सीस, लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्रं 1 यांचे लेखी उत्तर, शपथपत्र, रिजॉईंडर, व तक्रार तसेच रिजॉईंडर यांना लेखी व तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्रं. 1 यांचा ग्राहक आहे काय व
आयोगांस त्यावर निर्णय देण्याचा अधिकार आहे काय? होय.
(2) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 यांची ग्राहक आहे काय ? नाही.
(3) तक्रारकर्त्याची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
(4) विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण होय.
सेवा दिली आहे काय ?
(5) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत :-
8. तक्रारकर्त्याने तक्रारीत नि.क्र. ४ वर दाखल केलेल्या दस्त अनुक्रमे ७/१२ उतारा, गांव नमुना ८ या दस्तऐवजावर तक्रारकर्त्याचे मयत आई सुमन यांचे नावाची नोंद आहे. यावरून तक्रारकर्त्याची मयत आई शेतकरी होती व तक्रारकर्ता हा मयत विमाधारक शेतक-याचा मुलगा म्हणून सदर विम्याचा लाभधारक असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. शिवाय प्रस्तूत वाद हा अपघाती मृत्युमुळे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीचे जबाबदारी संबंधीत असल्यामुळे या आयोगांस प्रस्तूत वाद चालविण्याचा अधिकार आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. २ बाबत :-
9. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्त्याचे शेतकरी आईचा विमा काढण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक 3 या शासकीय कार्यालयाने विना मोबदला मदत केली असल्याने तसेच वि.प.क्र.2 हे सदर विमा व्यवहारात केवळ नोडल एजेन्सी असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रमांक 2 व 3 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक 2 याचे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. ३ बाबत :-
10. मयत सुमन यांचा दिनांक 21/02/2017 रोजी अपघाती मृत्यु झाला.
त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 18/11/2017 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे आवश्यक दस्ताऐवजासह विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी प्रस्तूत तक्रारअर्ज विमाधारकाचे मृत्युनंतर 2 वर्षांचे मुदतीत दाखल झालेला नसल्याने मुदतबाहय असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र विमाधारकाचे मृत्युनंतर त्याबाबत तक्रारकर्त्याने विमादावा दाखल केल्याचे दिनांक 18/11/2017 पासून प्रस्तूत तक्रार ही विहीत मुदतीत, दिनांक 03/09/2018 रोजी दाखल करण्यांत आलेली असल्याने प्रस्तूत तक्रार मुदतबाहय नाही असे आयोगाचे मत आहे. सबब मुददा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येते.
मुद्दा क्रं. ४ बाबत :-
11. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदर विमादावा नियमानुसार 90 दिवसांचे मुदतीत दाखल झालेला नसल्याने मुदतबाहय असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासकीय परिपत्रकानुसार 90 दिवसांच्या कालावधीनंतर दाखल होणारे विमादावे स्विकारण्यांत यावेत असे स्पष्ट दिशानिर्देश जारी केलेले असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमादावा मुदतबाहय नाही. तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक ४ वर दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व मुख्यत्वे घटनास्थळ पंचनामा, अकस्मात मृत्यू सूचना, गुन्हयाचे तपशीलाची नोंदवही, या दस्तावेजांचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमाधारकाचे मृत्युचे कारण या शिर्षाअंतर्गत माहितीत “probable cause of death is due to injury to Rt Kidny….” असे नमूद आहे. आकस्मीक मृत्यू सूचना या दस्तावेजात, मृतक ही पवनी रोड रेल्वेकडून भुयार येथे रेल्वे गाडीत चढतांना घसरुन रेल्वेमधून खाली पडल्याने जखमी होवून सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचारादरम्यान दिनांक 21/02/2017 रोजी तिचा मृत्यू झाला अशी नोंद आहे. यावरुन मयत सुमन यांचा अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक 3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला असून सदर दस्तावेजाची प्रत त्यांनी प्रकरणात दाखल केलेली आहे. परंतु विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी सदर विमा दावा निकाली काढला नाही. आयोगाच्या मते विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दर्शविली त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचेकडून विमा दाव्याची रक्कम शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रं. 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ५ बाबत :-
12. मुद्दा क्रं. 1 ते 4 च्या विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 135/18 अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरूध्द पक्ष क्रं. 1 यांनी विमा दाव्याची रक्कम रु. 2,00,000/- तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरूध्द पक्ष क्रं.1 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- तक्रारकर्त्याला दयावी.
- विरूध्द पक्ष क्रं. 2 व 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
- तक्रारकर्ता यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.