:: नि का ल प ञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-07/ 05/2021)
1) तक्रारकर्ती ही चेकघडोली,पो.विठ्ठलवाडा, तहसील गोंडपिंपरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री सुधाकर भाऊजी एकोणकर यांच्या मालकीची मौजा सुरगांव, तहसील गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक 84 ही शेतजमीन आहे. वि.प. क्रमांक 1 व 2 ही विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 हे शासनाच्या वतीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्वीकारतात. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचे वतीने रू.2 लाखचा विमा उतरविला असून तक्रारकर्ती ही मयत श्री सुधाकर यांची पत्नी व वारस असल्याने विम्याची लाभधारक आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू दिनांक 20/01/2017 रोजी पाणी पिण्यांसाठी विहीरीजवळ गेला असता पाय घसरून विहीरीत पडून झाला. तक्रारकर्तीच्या पतीने उपरोक्त विमा काढला असल्याने तिने आवश्यक दस्तऐवजांच्यासह वि.प. क्रमांक 3 कडे दिनांक 9/8/2017 रोजी विमादाव्याबाबत रितसर अर्ज केला. मात्र 16/10/2017 रोजी वि.प.क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू अपघाती नसून त्यांनी आत्महत्या केली असल्यामुळे या कारणास्तव विमा पॉलिसीचे अट क्र.1 नुसार नामंजूर केल्याचे तक्रारकर्तीस कळविले. मात्र तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू हा अपघाती असून विमादावा फेटाळण्याची कृती ही विमा कंपनीचे सेवेतील न्युनता असल्याचा आक्षेप घेत तक्रारकर्तीने सदर तक्रार वि.प. विरुद्ध दाखल केली असून विमादाव्याची रक्कम सव्याज मिळावी तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.20,000/- मिळावा अशी तिने मंचास प्रार्थना केली आहे.
2) तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करून वि.प. क्रमांक 1 ते 3 यांना आयोगातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. क्रमांक 1 व 2 यांनी आयोगासमक्ष उपस्थित होऊन लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारकर्तीचे कथन खोडून काढीत नमूद केले की तक्रारकर्तीकडून सदर विमा दावा प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष विमाकंपनीने घटनेबाबत दाखल गुन्हयाचे कागदपत्र तपासले असता त्यात गुन्हयाचे दिलेले विवरण आणी त्यात नमूद घटनाक्रमावरून तक्रारकर्तीचे पतीने जाणीवपूर्वक विहीरीत उडी मारून आत्महत्या केली असून त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला नसल्याचे निष्पन्न झाले. सबब सदर मृत्यू हा विमापॉलिसीअंतर्गत विमादाव्यासाठी पात्र नसल्यामुळे विमा पॉलिसीचे अट क्र.1 नुसार तक्रारकर्तीचा विमादावा त्या कारणास्तव फेटाळून तसे दिनांक 16/10/2017 चे पत्रान्वये तक्रारकर्तीला कळविण्यांत आले आहे. वि.प.क्र.1 व2 यांनी नियमानुसार कार्यवाही केली असून तक्रारकर्तीप्रती कोणतीही सेवेतील न्युनता केलेली नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्च बसवून खारीज करण्यांत यावी, अशी त्यांनी आयोगास विनंती केली आहे.
3) वि.प. क्रमांक 3 यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले. त्यात त्यांनी नमूद केले की मयत श्री सुधाकर भाऊजी एकोणकर यांचे अपघाती मृत्यूबाबतचा विमादावा तक्रारकर्तीकडून दिनांक 29/3/2017 रोजी प्राप्त झाल्यानंतर दुसरेच दिवशी दिनांक 30/3/2017 रोजीवि.प.क्र.3 ने तो जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला. विमादावा मंजूर वा नामंजूर करण्याशी त्यांचा संबंध नसून त्यांनी आपली जबाबदारी चोखरीत्या पार पाडली असल्यामुळे त्यांचे सेवेत न्युनता नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार त्यांचेविरूध्द खारीज करण्यांत यावी, अशी त्यांनी मंचास विनंती केली आहे.
4) तक्रारकर्तीची तक्रार, तिने दाखल केलेले शपथपत्र,दस्तावेज तसेच विरूध्द पक्ष क्र.1,2 व 3 यांचे लेखी उत्तर आणि विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले शपथपत्र्, तसेच उभय बाजूंकडून दाखल लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक वाचन केले असता मंचाचे निर्णयास्तव उपस्थीत होणारे मुद्दे व त्यावरील आयोगाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ती ही वि.प.क्र.1 व2ची ग्राहक आहे काय ? होय
2. तक्रारकर्ती ही वि.प.क्र.3 ची ग्राहक आहे काय ? नाही
3. वि.प.क्र.1 व2 ने तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनता केली आहे काय ? होय
4. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
मुद्दा क्रमांक 1बाबत
5)तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेले शेतीचा 7/12 उतारा, फेरफार नोंदवही तसेच इतर दस्तांवरून तक्रारकर्तीचे पती श्री सुधाकर भाऊजी एकोणकर यांच्या मालकीची मौजा सुरगांव, तहसील गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक 84 ही शेतजमीन होती तसेच शासनामार्फत त्यांचा वि.प.1 व2 कडे रू.2 लाखाचा विमा उतरविण्यांत आला असून तक्रारकर्ती सदर विम्याची लाभधारक असल्यामुळे तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत
6)वि.प. क्रमांक 3 हे शासकीय कार्यालय असून विमाधारक व विमाकंपनी यांचेमधील विमाविषयक व्यवहारातील कागद पत्रांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे तक्रारकर्ती ही वि.प.क्र.3 ची ग्राहक नाही. शिवाय प्रस्तूत प्रकरणी त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले असल्यामुळे वि.प. क्रमांक 3 विरुद्ध कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
मुद्दा क्रमांक 3 बाबत
7) तक्रारकर्तीचे पती श्री सुधाकर भाऊजी एकोणकर यांच्या मालकीची मौजा सुरगांव, तहसील गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक 84 ही शेतजमीन होती व तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शासनाचे वतीने रू.2 लाखचा विमा उतरविला असून तक्रारकर्ती ही मयत श्री सुधाकर यांची पत्नी व वारस असल्याने विम्याची लाभधारक आहे याबाबत वाद नाही. मात्र दिनांक 20/01/2017 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू पाणी पिण्यांसाठी विहीरीजवळ गेला असता पाय घसरून विहीरीत पडून झाला ही बाब मात्र विरूध्द पक्ष क्र.1 व2 यांनी नाकारली असून तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू अपघाती नसून त्यांनी आत्महत्या केली असल्यामुळे दिनांक 16/10/2017 रोजीचे पत्रान्वये वि.प.क्र.1 ने तक्रारकर्तीचा दावा विमा पॉलिसीचे अट क्र.1 नुसार नामंजूर केल्याचे नमूद केलेले आहे. मात्र प्रकरणात निशाणी क्रमांक 4 वर दाखल पोलीस दस्तावेज, ज्यामध्ये अकस्मात खबरी बुक, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, गुन्हयाच्या तपशीलाचा नमूना या दस्तावेजांमध्ये तक्रारकर्तीचे पती श्री सुधाकर भाऊजी एकोणकर यांचा पाण्यात बुडून आकस्मीक मृत्यू झाल्याबाबतची नोंद
दिसून येते. मात्र, त्यात सदर मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला असल्याबाबत निष्कर्ष काढल्याची नोंद दिसून येत नाही. असे असतांना विरूध्द पक्ष विमा कंपनीने पोलीस रेकॉर्डमधील नमूद घटनाक्रमावरून तक्रारकर्तीचे पतीने जाणीवपूर्वक विहीरीत उडी मारून आत्महत्या केली असून त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला नसल्याचा निष्कर्ष स्वतः काढलेला आहे असे दिसून येते. विमादावा नाकारल्याबाबत तक्रारकर्तीस कळविण्यांत आले त्या दि. 16/10/2017 रोजीचे पत्रातदेखील वि.प.क्र.1 ने ‘’केलेल्या तपासणीनुसार असे दिसून येते की, सुधाकर भाऊजी एकोणकर यांचा मृत्यू हा अपघाती नसून आत्महत्या आहे व विमा पॉलिसीचे अट क्र.1 नुसार आत्महत्या क्लेमला पात्र ठरत नाही’’ या कारणास्तव नामंजूर केल्याचे नमूद केलेले आहे. वास्तविकतः शेतक-याच्या अपघाती मृत्यू विमादाव्या सारख्या गंभीर व संवेदनशील बाबतीत पुरेशा पुराव्यानिषीच विमादाव्याबाबत निर्णय घेणे अपेक्षीत आहे, मात्र विमाकंपनीने सदर निष्कर्षाचे पुष्टयर्थ कोणताही सज्जड पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. सबब वि.प.क्र.1 व 2 ने तक्रारकर्तीचा विमादावा काल्पनीक आधारावर चुकीच्या पद्धतीने नाकारला असून तक्रारकर्तीला विम्याची रक्कम मिळणे पासून वंचित ठेवले आहे सबब वि.प. क्रमांक 1व2 ह्यांनी तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनता केली असून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत
8) वरील मुद्दा क्र.1 ते 3 वरील मंचाचे अभिप्रायांचे अनुषंगाने आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार क्र. 82/2018 अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरूध्द पक्ष क्र.3 विरूध्द तक्रार खारीज करण्यांत येते.
- विरूध्द पक्ष क्र.1 व2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीला विमादावा रक्कम रू.2 लाख द्यावी.
4. विरूध्द पक्ष क्र.1 व2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई आणी तक्रारीचे खर्चादाखल एकत्रीतरीत्या रू.10,000/- द्यावेत.
5. प्रस्तूत आदेशाची प्रत उभय पक्षांना तात्काळ व विनामुल्य देण्यांत यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे))(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)( श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष