(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–27 जानेवारी, 2020)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि इतर एक यांचे विरुध्द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून, तिचा मृतक पती नामे श्री मनोज मुरलीधर भुसारी हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- पाहुनगाव, पोस्ट ओपारा, तालुका- लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भुमापन क्रं 135 या वर्णनाची होती.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती नामे श्री मनोज मुरलीधर भुसारी याचा दिनांक-30.11.2017 रोजी ट्रॅक्टरवर पडून गंभिर जख्मांमुळे मोक्यावरच मृत्यु झाला. यातील विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीकडे काढण्यात आला असल्याने ती पत्नी या नात्याने “लाभार्थी” आहे. तिचे पतीचे मृत्यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, तालुका-लाखांदुर, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दिनांक-28.03.2018 रोजी दाखल केला होता. विरुध्दपक्षाने ज्या दस्ताऐवजाची मागणी केली त्या दस्ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली होती.
तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तिने विमा दाव्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी कडे वेळोवेळी विचारणा करुनही काहीही कळविले नाही म्हणून तिने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक-07.08.2018 रोजीचे पत्र पाठवून तिच्या विमा दाव्या संबधात माहिती विचारली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दाव्या संबधी कोणताही निर्णय दिलेला नाही वा तिला काहीही कळविलेले नाही आणि ही तिला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-21.04.2017 (ग्राहक मंचाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्तीने तिच्या मागणी स्तंभात सदर विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-21.04.2017 हा चुकीचा नमुद केलेला असून विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीने त्यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-27.03.2018 असा नमुद केलेला आहे) पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी तसेच तिला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 30,000/- आणि तक्रार खर्च रुपये-20,000/- अशा रकमांची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे एकत्रित लेखी उत्तर अभिलेखावर पान क्रं 55 ते 57 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कडून त्यांना तक्रारकर्तीचा विमादावा प्रस्ताव दस्तऐवजांसह प्राप्त झाल्या नंतर दस्तऐवजाचे अवलोकन केले असता त्यांचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्तीचा मृतक पती हा घडलेल्या गुन्हयामध्ये आरोपी असून त्याचे विरुध्द पोलीसांनी भा.दं.वि.चे कलम 384 खाली गुन्हा नोंदविलेला आहे, त्याने स्वतःच निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने अपघात घडलेला असून विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्याने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम देय होत नाही. त्यांनी ही बाब नामंजूर केली की, तक्रारकर्तीचे पतीचा ट्रॅक्टरवर पडून मृत्यू झालेला आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत केलेल्या सर्व मागण्या विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने फेटाळल्यात. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर अभिलेखावर पान क्रं-67 ते 69 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती नामे श्री मनोज मुरलीधर भुसारी याचे मालकीची मौजा पाहुनगाव, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं 135 शेती असल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू दिनांक-30 नोव्हेंबर, 2017 रोजी तलावात ट्रॅक्टरवरुन पडून जख्मी होऊन झाला ही बाब मान्य केली. पतीचे मृत्यू नंतर तक्रारकर्तीने त्यांचे कार्यालयात विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह दिनांक-27 मार्च, 2018 रोजी दाखल केला व त्यांनी पडताळणी करुन पुढे तो विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह त्यांचे वरीष्ठ कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात जावक क्रं 836 दिनांक-28 मार्च, 2018 अन्वये सादर केला. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही त्यांचे अखत्यारीतील बाब नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
05. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 10 नुसार एकूण-10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय-2016-2017, तिने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्ताव, तिने वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांना विमा दाव्या संबधी पाठविलेल्या पत्राची प्रत, तिचे मृतक पतीचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्तऐवज, तिचे पतीचे अपघाता बाबत एफआयआर व ईतर पोलीस दस्तऐवज, मृतकाचा शव विच्छेदन अहवाल, तक्रारकर्तीचे पतीचे वाहन परवान्याची प्रत, तक्रारकर्तीचे पतीचे वयाचा पुरावा अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ट क्रं- 73 व 74 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्ट क्रं-71 व 72 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. पान क्रं 78 वरील यादी नुसार शेतकरी अपघात विमा योजना मार्गदर्शक सुचना परिपत्रकाची प्रत दाखल केली. तसेच मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केलेत.
06. विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर अभिलेखावरील पान क्रं 55 ते 57 वर दाखल केले. पान क्रं 75 व 76 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
07. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र आणि तिने दाखल केलेले दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्तर तसेच विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तर इत्यादीचे ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष विमा कंपनीची ग्राहक होते काय? | -होय- |
2 | वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
08. तक्रारकर्तीचा मृतक पती हा व्यवसायाने शेतकरी होता, त्याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्ये समावेश होता व तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु दिनांक-30/11/2017 रोजी झाला या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत. तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू नंतर पत्नी व कायदेशीर वारसदार या नात्याने ती विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्दा क्रं 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 व 3 बाबत
09. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर यांचे कार्यालयात विमा दावा दाखल केला होता परंतु त्यानंतरही तिचे विमा दाव्या बाबत तिला काहीही कळविण्यात न आल्यामुळे तिने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-07.08.2018 रोजी विमा दाव्या संबधात विचारणा केली होती. तसेच संबधित विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीला, विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने दिनांक-23 मार्च, 2018 रोजी अर्ज पाठविला होता परंतु तिला विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे वा विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कडून विमा दाव्या संबधी कोणतेही उत्तर देण्यात आले नाही वा तिला विमा दाव्या संबधात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे उत्तरात एवढेच म्हणणे आहे की, तिचा दावा नामंजूर झाल्याचे विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने कळविण्यात आले होते परंतु तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूर झाल्याचे कळविल्या बाबत कोणताही लेखी पुरावा विमा कंपनीने दाखल केलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्तीला तिचे विमा दाव्या संबधात आज पर्यंत काहीही कळविण्यात आले नाही या तिने केलेल्या कथनात ग्राहक मंचास तथ्य दिसून येते.
10. सदर तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने लेखी उत्तराव्दारे आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीचे मृतक पतीने स्वतःच निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने अपघात झाला आणि यासाठी तिचा मृतक पती हा स्वतःच जबाबदार आहे आणि तिचे मृतक पतीचे नावाने पोलीसांनी गुन्हा नोंदविलेला आहे. मृतक स्वतःच अपघातात गुन्हेगार असल्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार विमा क्लेम देता येणार नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने लेखी उत्तराव्दारे उपरोक्त नमुद घेतलेल्या आक्षेपा संबधात आम्ही पोलीस दस्तऐवजाचे अवलोकन केले, ज्यामध्ये पान क्रं 26 ते 29 वर दाखल एफ.आय.आर. प्रतीमध्ये दिनांक-30.11.2017 रोजी सायंकाळी अपघाती मृत्यू झाल्याचे नमुद आहे. फीर्यादी श्री एकनाथ महादेव मिसाळ याने एफ.आय.आर.नोंदविते वेळी असे बयान दिले की, दिनांक-30.11.2017 रोजी सायंकाळी 5.00 वाजताचे सुमारास गहू पेरणी करता तो शेतात गेला असता ट्रॅक्टर चालू अवस्थेत थांबलेला दिसल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले तेथे मृतक मनोज मुरलीधर भुसारी हा ट्रॅक्टरचे मागचे चाकात अडकून मृत अवस्थेत दिसला. पुढे एफ.आय.आर. मध्ये असे नमुद आहे की, स्वराज्य कंपनीचा ट्रक्टर चालक नामे मनोज मुरलीधर भुसारी याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर फीर्यादिच्या शेतामध्ये हयगईने व निष्काळजीपणे चालविल्याने तो सदर ट्रॅक्टरवरुन पडून मागील चाकात आला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला असे फीर्यादिच्या तोंडी रिपोर्टवरुन गुन्हा नोंद करुन तपास केला असल्याचे नमुद आहे. पोलीसांचा घटनास्थळ पंचनामा अभिलेखावरील पान क्रं 30 ते 33 वर दाखल असून त्यामध्ये मृतक याने आपले ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालविल्याने तो स्वतःच मृत्यूस कारणीभूत झाल्याचे नमुद आहे. पान क्रं 34 व 35 वर दाखल इन्क्वेस्ट पंचनाम्या मध्ये ट्रॅक्टरच्या मोठया चाकामध्ये दबून मृत्यू असे नमुद आहे. पान क्रं 36 ते 43 वर दाखल वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, जिल्हा भंडारा यांचे शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण
“Crush injury Face and Skull” असे नमुद आहे.
12. उपरोक्त नमुद दाखल पोलीस दस्तऐवजांवरुन ग्राहक मंचाव्दारे असा निष्कर्ष काढण्यात येतो की, हातातील प्रकरणात अपघाती घटने मध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye Witness) ज्याने प्रत्यक्ष सदर घटना पाहिली असा कोणीही नाही. फीर्यादी श्री एकनाथ महादेव मिसाळ याचे शेतात सदर घटना घडलेली आहे. मृतक हा ट्रॅक्टरच्या मागील चाकामध्ये येण्याचे मुख्य कारण असेही असू शकते की, शेतातील मातीमध्ये ट्रॅक्टर अडकून पडला आणि ट्रॅक्टर अडकून पडल्यामुळे मृतकाचे शरीराचे संतुलन गेल्याने तो ट्रॅक्टरवरुन खाली पडून ट्रॅक्टरच्या मागच्या चाकात अडकला आणि त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला असा निष्कर्ष ग्राहक मंचास काढण्यास कोणतीही हरकत नाही. केवळ फीर्यादी म्हणतो म्हणून (फीर्यादिने प्रत्यक्ष घटना पाहिलेली नाही) मृतकाने निष्काळजीपणाने अपघाती घटनेच्या वेळी ट्रॅक्टर चालविला आणि फीर्यादीचे तोंडी कथनावरुन पोलीसांनी मृतकाचे विरुध्द गुन्हा नोंदविला. पोलीसांनी जरी मृतकाचे विरुध्द गुन्हा नोंदविला असला तरी सदर गुन्हा सक्षम न्यायालयात सिध्द झालेला नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्तराव्दारे मृतकाचे विरोधात पोलीस गुन्हा नोंद असल्याने विमा अटी व शर्तीचा भंग झाल्याने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम देय नाही असे जे विधान केलेले आहे, तेच मूळात चुकीचे असल्याचे दिसून येते.
13. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचना संबधाने अभिलेखावर पान क्रं 79 ते 89 वर दाखल शासन परिपत्रक दिनांक-04 डिसेंबर, 2009 चे आम्ही काळजीपूर्वक अवलोकन केले, त्यामध्ये जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहिल अशी एक अट नमुद आहे.
14. हातातील प्रकरणात मृतक श्री मनोज मुरलीधर भूसारी याचे वाहन चालक परवान्याची प्रत अभिलेखावरील पान क्रं 44 वर दाखल असून त्यामध्ये Date of Issue-25-03-2010, 18-05-2017 (TR), Valid till 24-03-2030 (NT) (Non Transport) असे नमुद केलेले असून पुढे -LMV (Light Motor Vehicle) TRANS-19-05-2014 असे नमुद केलेले आहे. यावरुन असे सिध्द होते की, महाराष्ट्र शासनाचे दिनांक-04 डिसेंबर, 2009 चे परिपत्रकातील अटी प्रमाणे अपघाती घटनेच्या वेळी मृतका जवळ वैध वाहन चालविण्याचा परवाना होता ही बाब सिध्द होते. तसेच सदर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकातील इ) विमा कंपनी या सदरातील अक्रं-7) अपघाती मृत्यू संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असे नमुद केलेले आहे.
15. पोलीस दस्तऐवजाचे आधारे तक्रारकर्तीचे पतीने स्वतःच निष्काळजीपणाने ट्रक्टर चालविल्याने तो ट्रॅक्टरचे मागील चाकात अडकल्याने मृत्यू पावला व त्या बाबत पोलीसांनी गुन्हा नोंद केल्याने विमा दावा देय नाही असा जो निष्कर्ष विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने काढलेला आहे त्यासंदर्भात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयांवर ग्राहक मंच आपली भिस्त ठेवीत आहे-
- 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.
सदर मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case” पोलीसांनी नोंदविलेल्या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.
*****
2) 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.
16. याशिवाय तक्रारकर्तीचे वकीलांनी हातातील प्रकरणात खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, II (2019) CPJ 34 (NC) -“New India Assurance Company-Versus-Nitin Kamalkar Ahire”
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, II (2018) CPJ 93 (NC) -“New India Assurance Company-Versus-Neerja Singh”
- Hon’ble Supreme Court of India-IV (2016) CPJ 5 (SC) “Galada Power and Telecommunication-Versus-United India Insurance Company”
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयांचे आम्ही काळजीपूर्वक अवलोकन केले, सदर मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे आणि हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न असल्याचे दिसून येते.
17. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने त्यांचे जवळ कोणताही सक्षम पुरावा नसताना तक्रारकर्तीचे मृतक पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दावा आज पर्यंत निश्चीत केला नाही वा तिला त्या संबधात काहीही कळविले नाही वा तसे कळविल्या बाबत कोणताही दस्तऐवजी पुरावा आमचे समोर दाखल केलेला नाही आणि ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल झाल्या नंतर पहिल्यांदा लेखी उत्तराव्दारे आक्षेप नोंदविला की, पोलीस दस्तऐवजावरुन तक्रारकर्तीचे मृतक पतीने स्वतःच निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टर चालविल्याने तो ट्रॅक्टरचे मागील चाकात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी त्याचे विरोधात गुन्हा नोंदविल्याने विमा अटी व शर्तीचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढून तक्रारकर्तीला विमा दावा देय नाही असे लेखी उत्तरात नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीची सदरची कृती ही त्यांनी तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा दिल्याचे दिसून येते आणि त्यामुळे तिला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे ही बाब स्वयंस्पष्ट आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकरार्थी देत आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर होकारार्थी असल्याने तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे. करीता तक्रारकर्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. महाराष्ट्र शासनाचे दिनांक-04 डिसेंबर, 2009 मधील परिपत्रका प्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून दोन महिन्याच्या आत विमा कंपनीने कार्यवाही न केल्यास वार्षिक-15 टक्के व्याज देय राहिल असे नमुद आहे. हातातील प्रकरणात विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीने सर्वप्रथम विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह त्यांचे कार्यालयात दिनांक-27.03.2018 रोजी दाखल केला आणि तो विमा दावा विमा कंपनीला एक महिन्यात मिळाला असे हिशोबात धरल्यास तो दिनांक-27.04.2018 असा येतो आणि या दिनांका पासून विमा निश्चीतीसाठी दोन महिन्याचा कालावधी हिशोबात घेतला तर तो दिनांक-27.06.2018 असा येतो त्यामुळे तक्रारकर्तीला सदर विमा रकमेवर दिनांक-27.06.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने व्याज मंजूर करणे न्यायोचित होईल. तसेच तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्या रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्याने त्यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व तक्रारकर्तीची सुध्दा त्यांचे विरुध्द तशी कोणतीही तक्रार नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
18. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार, अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, विभागीय कार्यालय, पुणे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर दिनांक-27.06.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याज तक्रारकर्तीला दयावे.
(03) विरुध्दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीला द्यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.