(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 मार्च 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याची मय्यत आई श्रीमती रेशमाबाई वारलु गेडाम शेतीचा व्यवसाय करीत होती. शेतीतील उत्पन्नावर तक्राकर्त्याची आई कुटूंबाचे पालनपोषण करीत होती. शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- चा विमा तक्रारकर्ताची आईच्या नावे गैरअर्जदार क्र.3 तर्फे उतरविण्यात आला होता. मय्यत आई ही दि.28.7.2008 ला जंगलात ओरंबी आणण्यासाठी गेली, घरी आली नसल्याने शोध घेतला असता दि.3.8.2008 रोजी नाल्याच्या पाण्यात बुडून मरण पावलेली सापडली. तक्रारकर्त्याच्या आईचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 तर्फे गैरअर्जदार क्र.1 कडे सदर विमा योजने अंतर्गत दि.11.11.2008 ला रितसर अर्ज केला. गेल्या पाच वर्षापासून सदर प्रस्तावावर कोणताच निर्णय घेत नसल्याने तक्रारकर्त्याने जिल्हा नियंञण समिती यांचेकडे अर्ज केला होता, त्यावरही कोणताही निर्णय झाला नाही. गैरअर्जदार हे सेवेमध्ये ञुटी देत असून अनुचीत व्यापार पध्दत अवलंबत आहे. त्यामुळे अर्जदारास मानसीक ञास झाला. त्यामुळे, गैरअर्जदारांनी विमा पॉलिसीप्रमाणे दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. तसेच, गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्याचे आदेश द्यावेत अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 16 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 नुसार प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार लेखी उत्तर व सोबत 6 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने प्राथमिक आक्षेपासह दाखल केलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, तक्रारकर्त्याने तक्रारीत कृषि आयुक्त पुणे, महाराष्ट्र शासन यांना पार्टी करणे आवश्यक होते, म्हणून तक्रार नॉन जाईन्डर ऑफ प्रॉपर अॅन्ड नेसेसरी पार्टी मुळे तक्रार खारीज करावी. तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र.1 तर्फे दि.13.12.2009 रोजी त्याचा दावा नामंजूर केल्याचे लेखी कळविण्यात आले होते व तक्रारकत्याची तक्रार कोर्टापुढे दि.17.8.2013 रोजी दाखल केली. त्यामुळे तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे खारीज करावी. गैरअर्जदाराने लेखी बयानातील विशेष कथनात म्हटले की, मृतक रेशमाबाई ही दि.28.7.2008 रोजी घरुन कोणालाही न सांगता निघून गेली, त्यानंतर तिचा मृतदेह दि.3.8.2008 रोजी नाल्याच्या काठावर झाडाला पदर अटकून कुजलेल्या स्थितीत सापडला होता. घरातील कौटुंबिक वादामुळे मृतक रेशमाबाईने जाचाला कंटाळून आत्महत्या केली. मृतदेह हा पाण्यात असता तर पाण्यातील जलजंतू, जीवप्राणी यांनी डेडबॉडीवर कुरतडल्याच्या खुणा पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांना आढळून आल्या असत्या व त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केल्या असत्या. नाल्याच्या पाण्यात असलेला मृतदेह कुजत नाही तो फुगतो व सदर प्रकरणात मृतदेह हा कुजलेला आढळला आहे यावरुन मृतक रेशमाबाई हीचा आकस्मीक मृत्यु नसून ती आत्महत्या आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार आत्महत्या केल्यामुळे होणा-या मृत्युसाठी नुकसान भरपाई मिळण्याचा प्राविधान नाही. तक्रारकर्त्याची तक्रार तथ्यहीन, मुदतबाह्य असल्यामुळे खारीज करावी अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन ही जोखीम स्विकारलेली आहे, त्याचेच ग्राहक होऊ शकतात. गैरअर्जदार क्र.2 केवळ मध्यस्थ सल्लागार आहे व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. गैरअर्जदार क्र. 2 ने पुढे नमूद केले की, सदर प्रस्ताव हा तहसील कार्यालय चामोर्शी मार्फत कबाल नागपूर कार्यालयास दि.30.3.2009 रोजी उशिरा प्राप्त झाल्यानंतर त्या स्थितीमध्ये दि.1.4.2009 रोजी ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला प्रस्ताव पाठविला असता, सदर दावा ओरिएंटल इंन्शुरंस कंपनीने दि.31.12.2009 च्या पञाव्दारे उशिरा प्राप्त झाल्याचे कारणाने दावा नामंजूर केला असून तसे वारसदारास कळविण्यात आलेले आहे. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचे पञ दि.6.6.2011 व दि.19.5.2011 चे जिल्हा नियंञण समिती अध्यक्ष (कलेक्टर) सभेचे कार्यवृतांत वरील मृत व्यक्तीचा दावा निपटारा करण्याबाबतीत ओरिएंटल इंशुरंस कंपनीला प्रस्ताव विमा कंपनीकडून मंजूर करुन घेणेबाबत पञ दिले व पञ प्राप्त होताच दि.3.7.2013 ला ओरीएंटल इंशुरंस कंपनीला पोहोचते केले. या प्रस्तावावर ओरीएंटल इंशुरंस कंपनीने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे, कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने अर्जाचा खर्च रुपये 5000/- अर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीतून पूर्णपणे मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, अर्जदाराचा प्रस्ताव दि.11.11.2008 रोजी कार्यालयास प्राप्त झाला. या कार्यालयाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांना पञ क्र.1856 दि.1.12.2008 अन्वये दस्ताऐवजासह सादर केला. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडून पञ क्र.853 दि.18.3.2009 अन्वये संदीप खैरनार, कबाल इंसुरंस सर्व्हीसेस प्रा.लि. यांना दस्ताऐवजासह प्रस्ताव सादर केला.
6. अर्जदाराने नि.क्र.16 नुसार शपथपञ व नि.क्र.17 नुसार लेखी युक्तीवाद व नि.क्र.19 नुसार केस लॉ दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.20 नुसार शपथपञ, नि.क्र.22 नुसार 3 दस्ताऐवज, नि.क्र.23 लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) सदर तक्रार कारण घडल्यापासून मुदतीत दाखल केली : होय.
आहे काय ?
3) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : अंतिम आदेशाप्रमाणे
मिळण्यास पाञ आहे काय ?
5) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. तक्रारदाराची आई श्रीमती रेशमाबाई वारलु गेडाम याचे मालकीचे मौजा -चंदनखेडी, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली येथे सर्व्हे नं.56 ही शेतीची जमीन आहे. तक्रारदाराची आई शेतीचा व्यवसाय करीत होती व त्या शेतीतील उत्पन्नावर कुटूंबाचे पालन पोषण करीत होती. शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत तक्रारदाराच्या आईचा रुपये 1,00,000/- चा विमा गैरअर्जदार क्र.3 व 2 च्या मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडून उतरविण्यात आला होता. तक्रारदाराची आई ही दि.28.7.2008 रोजी तेथील जंगलात गेली होती व त्यांचा शोध घेतांना दि.3.8.2008 रोजी नाल्याच्या पाण्यात पडून मरण पावलेल्या अवस्थेत सापडली. तक्रारदाराचे आईने शासनातर्फे गैरअर्जदार क्र.1 कडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंतर्गत विमा काढलेला होता व त्यांचा मृत्यु झाला होता या संदर्भात कोणताही वाद नाही. तक्रारदार हा मय्यतचा मुलगा आहे, त्याअनुषंगाने तक्रारदार गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे, असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
8. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 नी त्याचे लेखीउत्तरात असा प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदाराचा अर्ज दि.13.12.2009 रोजी नामंजूर केला होता व त्यासंदर्भात तक्रारदाराला लेखी माहिती दिली होती. तक्रारदाराने सदर तक्रार दि.17.8.2013 रोजी दाखल केलेली आहे, सदर तक्रार मुदतीचे बाहेर असल्यामुळे तक्रार खारीज करावे अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.1 नी नि.क्र.22 दस्त क्र.1 वर दि.31.12.2009 चे पञ दाखल केला, तसेच नि.क्र.22 दस्त क्र.3 वर गैरअर्जदार क्र.1 ची कंपनीचा डाकभार वहीची प्रत दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 नी नि.क्र.22 वरील दस्तावेज त्याच्या लेखी युक्तीवादाचे वेळी दाखल केलेले आहे. अर्जदारांचे युक्तीवादामध्ये त्याचे अधिवक्ता यांनी मंचासमक्ष असे सांगितले की, गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले पञ दि.31.12.2009 व त्याची डाकवही हे गैरअर्जदार क्र.1 ला सिध्द करणे आवश्यक होते व गैरअर्जदार क्र.1 नी त्याकरीता कोणताही पुरावा व साक्षी बयाण घेतले नाही म्हणून नि.क्र.22 वरील दस्त क्र.1 व 3 असलेले दस्तावेज गैरअर्जदार क्र.1 सिध्द करु शकलेले नाही, त्यावर अर्जदाराने मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयाची प्रत दाखल केली.
I(2006) CPJ 53 (NC), Praveen Shekh –Vs.- LIC & ANR.
Consumer Protection Act, 1986 – Section 21(b) – Life Insurance – Limitation – Contention, Complaint after more than two years of repudiation, barred by limitation – Copy of repudiation letter not produced on record – Interpolation in entries in Despatch Register found – Genuineness doubted - Service of alleged letter not proved – Complaint within limitation, wrongly dismissed by Fora below – Order set aside – Matter remanded for adjudication afresh.
सदर प्रकरणात सुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेली कंपनीची डाकवही सिध्द करुन शकलेले नाही, तसेच गैरअर्जदार क्र.1 चे उत्तरामध्ये असे आले आहे की, दि.13.12.2009 ला तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करण्यात आलेला होता. परंतु, गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 31.12.2009 चे दाखल केलेले पञ व गैरअर्जदाराचे लेखी बयाणात विमा क्लेम नामंजूर करण्याची बाब सुसंगत वाटत नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 या सदर प्रकरणात दाखल पञ दि.31.12.2009 सुध्दा सिध्द करु शकलेले नाही म्हणून गैरअर्जदार क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे सदर तक्रार मुदतीच्या बाहेर आहे हे मंचाचे मतानुसार बरोबर नाही. तक्रारदाराने दि.26.1.2010 रोजी जिल्हा नियंञण समितीला त्याच्या आईचा मृत्युचा विमा क्लेम संदर्भात तक्रार दिली होती व त्यानंतर गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 ने कोणत्याही सुचना किंवा लेखी पञ तक्रारदाराला त्या क्लेमच्या संदर्भात दिले नसून सदर तक्रारीचे कारण तक्रार दाखल पर्यंत सतत सुरु होते म्हणून सदर तक्रार मुदतीचे आंत आहे असे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.2 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबत :-
9. गैरअर्जदार क्र.1 ने त्याचे लेखी बयाणात सदर तक्रारीत असा आक्षेप घेतला होता की, तक्रारदाराची आई दि.28.7.2008 रोजी घरी कोणालाही न सांगता निघून गेली, त्यानंतर ती घरी आली नाही व तीचा मृत्युदेह दि.3.8.2008 रोजी नाल्याच्या काठावर झाडाला पदर लटकून कुजलेल्या स्थितीत सापडला होता. तक्रारदाराचे घरातील कौटूंबिक वादामुळे रेशमाबाई घरातून निघून गेली होती व जाचाला कंटाळून तीने आत्महत्या केली. रेशमाबाई हीचा मृत्यु हा आकस्मिक मृत्यु नसून ती आत्महत्या होती म्हणून गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर केला. यावर अर्जदाराने मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय दाखल केला.
2010(2) CPR 120, Bharti & Ors. –Vs.- National Insurance Company & Anr.
Consumer Protection Act, 1986 – Section 12 and 17 – Claim under Janata Personal Accident Policy – Respondent – Insurer resisted claim on ground that deceased insured committed suicide – Deceased had been to Nagpur for some work and his body was found in Gandhi Sager Lake – Post-mortem report showed cause of death was ‘drowning’—Question was whether deceased committed suicide or it was an accidental death – Police report had found that it might be a suicide as deceased was involved in financial obligations – Insurance Co. relied on its investigator’s report and investigator had relied upon statements recorded by police – There was absolutely no evidence that it was suicidal death – It was for respondent to produced evidence regarding suicidal death – No affidavit of Police Officer who had shown suspicion of suicidal death – Complainant was entitled to Policy amount of Rs. 5 lakhs with interest 7.5 % per annum.
Where Insurance Company sought to repudiate claim on ground that insured committed suicide and it was not accidental death, onus would be on Insurance Company to produced evidence regarding suicidal death.
सदर प्रकरणात सुध्दा गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारदाराच्या आईचा मृत्यु आकस्मिक मृत्यु नव्हता व ती आत्महत्या होती यासंदर्भात कोणताही पुरावा किंवा साक्षीदाराचे बयाण दाखल केलेले नाही. म्हणून या मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 हे, तक्रारदाराच्या आईचा मृत्यु ही आत्महत्या होती हे सिध्द करु शकलेला नाही.
10. गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दि.31.12.2009 चे पञ सुध्दा गैरअर्जदार क्र.1 सिध्द करु शकलेला नाही. सदर पञात तक्रारदाराच्या आईचा विमा क्लेम मुदतीमध्ये दाखल झाला नाही म्हणून रद्द केलेला आहे असे दिसून येते. परंतु, शेतकरी जनता अपघात विमा योजना 2010-11 शासन निर्णय 10 ऑगष्ट 2010 प्रमाणे परिच्छेद क्र.8 मध्ये नमूद आहे ते खालील पमाणे.
‘‘8. विमा प्रस्ताव विहित कागदपञासह योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच, योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत तालुका कृषि अधिका-याकडे प्राप्त झालले प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसानंतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत
या कारणास्तव विमा कंपन्याना प्रस्ताव नाकारता येणार नाहीत.’’
11. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारदाराच्या आईचा विमा क्लेम ज्या कारणामुळे नाकारला आहे ते कारण चुकीचे आहे. मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 नी तक्रारदाराच्या आईच्या अपघात विमा क्लेम संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही किंवा चुकीचा घेतला असून गैरअर्जदार क्र.1 चे कंपनीने अर्जदाराच्या प्रती सेवेत न्युनता दाखविलेली आहे किंवा दर्शविलेली आहे व तक्रारदार हा त्याच्या आईचा वारस असून तो त्याच्या आईच्या विमाचा लाभार्थी असून सदर तक्रारमध्ये खालील आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे. म्हणून मुद्दा क्र. 3 व 4 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
12. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी शासना तर्फे अर्जदाराच्या आईचा शेतकरी अपघात विमा विना मोबदला काढण्यासाठी मदत केली म्हणून गैरअर्जदार 2 व 3 विेरुध्द कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रमांक 5 बाबत :-
13. मुद्दा क्र.1 ते 4 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 नी तक्रारदाराला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावी, विमा रक्कम 30 दिवसाचे आत न दिल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 2000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-28/3/2014