(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 जुन 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने दि.7.5.2009 रोजी जेजानी ट्रॅक्टर्स, देसाईगंज वडसा, जि. गडचिरोली यांचेकडून सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला. त्याचा नोंदणी क्र.एम एच 33/एफ 722 असून दुकानातच दि.28.5.2009 ला गैरअर्जदार कंपनीचे एजंटनी ट्रॅक्टरचा विमा काढून विम्याची रक्कम घेतली, विम्याचा कालावधी दि.28.5.2009 ते 27.5.2010 चे मध्यराञीपर्यंत होता. सदर ट्रॅक्टरवर वाहन चालक म्हणून श्री रघुराम मोतीराम निखारे हा चालक परवानाधारक काम करीता होता. दि.22.5.2010 रोजी वन विभाग तुलतुली कुप नं.7 मधून बिट भरण्यासाठी गेले असता 40 ते 50 च्या संख्येत असलेले नक्षलवादी अचानक येऊन वाहन चालकास ट्रॅक्टरवरुन खाली उतरवून डिझेलची टँक फोडून ट्रॅक्टर व ट्रॉली दोन्हीस आग लावून पेटवून दिले, त्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे जळाला व तक्रारकर्त्याची अपरिमीत हानी झाली. याबाबत कुरखेडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन गुन्ह्याची नोंद केली व पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार कंपनीशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी म्हणून गैरअर्जदार कंपनीचे गोंदीयाचे शाखा प्रबंधक यांना लेखी पञ दिले. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार कंपनीचे सांगण्याप्रमाणे सर्व प्रकारच्या कागदपञांची पुर्तता केली. परंतु गैरअर्जदार कंपनीने तक्रारकर्त्यास दाव्याची विमा रक्कम दिली नाही. दि.18.10.2011 रोजी कंपनीने तक्रारकर्त्याकडून प्रतिज्ञापञ लिहून घेतले, परंतु अजुनपर्यंत विमा दाव्याची रक्कम दिली नाही. तक्रारकर्ता गरीब शेतकरी असून शेतीच्या कामासाठी व इतर लहानसहान कामे करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सदर ट्रॅक्टर स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा गांगलवाडीकडून कर्ज घेवून खरेदी केलेले होते. तक्रारकर्त्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे तक्रारकर्ता बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहे. तक्रारकर्त्याने वकील अधि.जगदीश मेश्राम यांचेमार्फत दि.13.2.2013 रोजी नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदाराकडून सदर नोटीसावर कोणतेही उत्तर आले नाही व विमा रक्कम दिली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रुपये 3,25,000/- दि.25.5.2010 पासून द.सा.द.शे.14 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीकडून अर्जदारास जाण्या-येण्याचा झालेला खर्च, आर्थिक, मानसिक व शारिरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रार दाखल करण्यास आलेला खर्च रुपये 10,000/- गैरअर्जदाराकडून वसूल करुन देण्यात यावा अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 8 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.10 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.11 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस काढल्यानंतर नि.क्र.17 नुसार सदर नोटीस तपास लागला नाही असे शेरा मारुन परत आले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.28 व 29 वर गैरअर्जदार क्र.2 चे नाव प्रकरणात वगळण्यात यावे असे अर्ज दाखल केले. सदर अर्ज मंजूर करण्यात आले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने त्याचा स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर क्र.MH-33-F-722 चा ओरिएन्टल विमा कंपनीकडे किसान पॅकेज पॉलिसी दि.28.5.2009 ते 27.5.2010 या कालावधीसाठी घेतलेली होती. अर्जदाराने ट्रॅक्टरचा उपयोग आर्थिक फायद्यासाठी भाड्याने देऊन नफा कमविण्यासाठी वापरलेला होता. व्यापारासाठी सदर ट्रॅक्टरची पॉलिसी गैरअर्जदार कंपनीकडून घेतलेली नव्हती. अर्जदाराने ट्रॅक्टर जंगलातील लाकडाचे वन बिट वाहतुकीचे कामी जंगल कामगार सोसायटी वैरागडे यांचेकडे भाड्याने दिला होता. म्हणजेच अर्जदार ट्रॅक्टरचा कमर्शीयल परपेजसाठी वापर केला होता. विमा पॉलिसीच्या लिमिटेशन अॅज टु युज या अटी व शर्तीचा जाणुन-बुजून भंग केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार कंपनी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अर्जदाराला देण्यास जबाबदार नाही. घटनेच्या दिवशी ट्रॅक्टर ड्रायव्हरजवळ ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नव्हता. अर्जदाराने स्वतःच्या जबाबदारीवर वैध परवाना नसलेल्या ड्रायव्हरला ट्रॅक्टर चालविण्यास दिल्याने विमा पॉलिसीचा अटी व शर्थीचा भंग केलेला आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर रघुनाथ निखारे याचा ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना दि.22.2.1996 पासून दि.10.12.2006 पर्यंत वैध होता. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती, तसेच मोटार वाहन कायद्याच्या नियमाचे आधिन राहून अर्जदाराची नुकसान भरपाईची मागणी फेटाळून लावलेली आहे. अर्जदाराने त्याच्या नुकसान भरपाईच्या मागणीबद्दल दस्ताऐवज सादर केले नाही. अर्जदाराचा ट्रॅक्टर हा 40-50 बंदुकधारी नक्षलवाद्यांनी दि.22.5.2010 रोजी जंगलात जाळला. ट्रॅक्टर ड्रायव्हरजवळ ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नव्हता म्हणून विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार अर्जदाराचा दावा खर्च व नुकसान भरपाईसह खारीज करण्याची विनंती केली.
4. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्र.15 व नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार लेखी युक्तीवाद व नि.क्र.18 अतिरिक्त लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) सदर तक्रार या मंचाचे अधिकार क्षेञात आहे काय ? : नाही.
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. तक्रारकर्त्याने दि.7.5.2009 रोजी जेजानी ट्रॅक्टर्स, देसाईगंज वडसा, जि. गडचिरोली यांचेकडून सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला. त्याचा नोंदणी क्र.एम एच 33/एफ 722 असून दुकानातच दि.28.5.2009 ला गैरअर्जदार कंपनीचे एजंटनी ट्रॅक्टरचा विमा काढून विम्याची रक्कम घेतली, विम्याचा कालावधी दि.28.5.2009 ते 27.5.2010 चे मध्यराञीपर्यंत होता, ही बाब दोन्ही पक्षाना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराची शाखा चामोर्शी रोड गडचिरोली येथे आहे असे तक्रारीत नोंदविलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस काढल्यानंतर नि.क्र.17 नुसार सदर नोटीस तपास लागला नाही असे शेरा मारुन परत आले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.28 व 29 वर गैरअर्जदार क्र.2 चे नाव प्रकरणात वगळण्यात यावे असे अर्ज दाखल केले. सदर अर्ज मंजूर करण्यात आले. अर्जदार सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 कडून घेतलेली पॉलिसी एजंट मार्फत गैरअर्जदार क्र.1 चे शाखेतून चामोर्शी रोड गडचिरोली येथे घेतली होती, ही बाब सिध्द करु शकलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11(2) प्रमाणे.
(अ) विरुध्द पक्ष किंवा ते एकापेक्षा अधिक असल्यास विरुध्दपक्षांपैकी प्रत्येक व्यक्ती फिर्याद दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहात असेल (किंवा व्यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्यक्तीशः काम करीत असले किंवा
(ब) विरुध्द पक्ष एकापेक्षा अधिक असल्यास त्यापैकी कोणीही, फिर्याद दाखल करण्याच्यावेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहात असेल, (किंवा व्यवसाय करीत असेल किंवा शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्यक्तिशः काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्या राहात नसतील (किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल) किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्वे लाभासाठी व्यक्तिशः काम करीत नसतील अशा विरुध्द पक्षानी फिर्याद दाखल करण्यास मूक संमती दिली असेल, किंवा
(क) वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागाशः घडले असेल, अशा जिल्हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्यात येईल.
सदर प्रकरणात अर्जदार हे सिध्द करु शकले नाही की, वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागाशः गडचिरोली येथे घडलेले आहे. यावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराची सदर तक्रार या मंचात अधिकार क्षेञात येत नाही. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार मुळ प्रत सोडून उर्वरीत तक्राराची प्रत व मुळ दस्ताऐवज अर्जदाराला योग्य मंचात दाखल करण्याची परवानगी देवून परत करण्यात येते.
(2) उभय पक्षानी आप-आपला खर्च सहन करावे.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/6/2015