निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी त्यांच्या अपघातग्रस्त वाहनाच्या विमा पॉलीसीची रक्कम व्याजासह, तसेच मानसिक व शारीरिक त्रासाची रक्कम सामनेवाले विमा कंपनीकडून मिळावी म्हणून सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांच्या मालकीचा टा्टा कंपनीचा ट्रक क्र.एम.एच.-१८-२१४० हा असून त्याचा सामनेवाले विमा कंपनीकडून विमा दि.०१-०६-२००८ रोजी काढलेला आहे. सदर ट्रकचा विमा घेते वेळी तक्रारदाराने सदर वाहन एलपीजी गॅस सिलेंडर वाहतूकीसाठी वापरत असल्याचे सामनेवालेंना कळविले आहे. दि.०१-०७-२००८ रोजी सदर वाहन जिल्हा जालना येथून जात असतांना त्यास अपघात झाला. त्यात वाहनाचे रक्कम रु.१,५०,०००/- चे नुकसान झाले आहे. सदर नुकसानभरपाई मिळण्यासाठी सामनेवाले यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विमा दावा दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी दि.२४-०३-२०११ च्या पत्राने तो दावा नाकारला आहे. याकामी तक्रारदाराने दि.१८-०४-२०११ रोजी सामनेवालेंना नोटीस पाठविली. परंतु नोटीस मिळूनही सामनेवाले यांनी पुर्तता केली नाही, म्हणून सदरचा अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सदर अपघातात वाहनाचे झालेले नुकसान व दुरुस्तीकामी आलेला खर्च एकूण रक्कम रु.२,२५,०००/- तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकामी रु.५०,०००/- तसेच तक्रार अर्ज व नोटीसचा खर्च रु.१०,०००/- सामनेवाले यांचेकडून मिळावा.
तक्रारदार यांनी त्यांच्या म्हणण्याचे पुष्टयर्थ नि.नं. २ वर शपथपत्र दाखल केले असून नि.नं.४ सोबतचे वर्णन यादीप्रमाणे एकूण ७ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात पंचनामा, सामनेवाले यांना केलेला पत्रव्यवहार, नोटीस, क्लेम फॉर्म इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(३) सामनेवाले यांनी नि.नं.११ वर खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांची तक्रार खोटी, लबाडीची व बनावट असून सामनेवालेंना मान्य नसल्याचे नमूद केले आहे. त्यांचे असे कथन आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या नमूद ट्रकची पॉलीसी दि.०९-०२-२००८ ते दि.०८-०२-२००९ या कालावधीसाठी घेतली असून सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाचा त्यांचे सर्व्हेअरने सर्व्हे केला असून तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या खर्चाच्या रकमेत संदिग्धता असल्याने तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे खर्च झालेला नसल्यामुळेही सदरची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. सदर अपघाताच्यावेळी ट्रक ड्रायव्हरजवळ जे लायसन्स आहे त्यामध्ये ज्वलनशिल पदार्थ वस्तु वाहून नेण्याकरीता “Hazardous” शेरा असलेला कायदेशीर परवाना नसल्यामुळे पॉलिसीच्या अटी शर्तीचा भंग झाला आहे. त्यामुळे सामनेवाले यांचेवर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी नसून सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(४) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचा खुलासा पाहता आणि तक्रारदारांचे विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : होय |
(क)तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | : होय |
(ड)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) मुद्दा क्र.‘‘अ’’ – तक्रारदार यांनी त्यांचे वाहन ट्रक क्र.एम.एच.- १८-२१४० एन-९३५७, ची सामनेवालेंकडून विमा पॉलिसी घेतली आहे. पॉलिसी कालावधी दि.०९-०२-२००८ ते दि.०८-०२-२००९ असा आहे. याबाबत उभयपक्षात कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सदर ट्रकचा दि.०१-०७-२००८ रोजी अपघात झाला. त्याकामी संबंधित पोलीसस्टेशनला फिर्याद दिली आहे. त्याबाबतचे पोलीस स्टेशनची कागदपत्रे, फिर्याद, पंचनामा दाखल केलेला आहे. सदर अपघातात वाहनाचे रु.१,५०,०००/- इतके नुकसान झाले आहे. त्याकामी तक्रारदारांनी सामनेवालेंकडे क्लेम केला, परंतु सामनेवाले यांनी तो दि.३१-०३-२००९ चे पत्राने नाकारला आहे. सदर पत्र नि.नं.४/४ वर दाखल आहे. त्या पत्राप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा क्लेम हा नाकारला आहे. या पत्राप्रमाणे असे दिसते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे सदर वाहन अपघाताचेवेळी एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेत असतांना वाहन चालकाकडे लायसन्सवर ज्वलनशील पदार्थ वाहून नेत असल्यामुळे ड्रायव्हींग लायसन्सवर Hazardous शेरा नव्हता. त्यामुळे पॉलिसीच्या अटी,शर्तीचा तक्रारदाराने भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदाराची क्लेम फाईल “नो क्लेम” म्हणून बंद करण्यात आली आहे. या पत्रावरुन असे दिसते की, सदर वाहन हे अपघाताचेवेळी एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेत होते. त्यावेळी वाहन चालकाकडे ड्रायव्हींग लायसन्स होते परंतु त्यावर ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याकरिता विशिष्ठ प्रकारचे ट्रेनिंग घ्यावे लागते व त्यानंतर Hazardous प्रकारचा शेरा लायसन्सवर दिला जातो, असा शेरा सदर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसन्सवर नव्हता. परंतु या कामी दोन्हीहीपक्षांनी याबाबत सदर वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स तक्रार अर्जात दाखल केलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारचा शेरा असल्याबाबतचा खुलासा स्पष्ट होत नाही.
परंतु याकामी तक्रारदार यांनी वाहन चालक सुभाष विठ्ठल पवार यांनी ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याकरिता विशिष्ठ प्रकारचे ट्रेनिंग घेतले असल्याचा दाखला नि.नं.१९/१ वर दाखल केला आहे. या दाखल्याचा विचार करता यामध्ये वाहन चालक श्री.सुभाष विठ्ठल पवार यांचा ड्रायव्हींग लायसन्स नंबर एम.एच.-१९-७७६-९७ हा असून त्यांनी तीन दिवसांचे “Safe Transportation of Hazardous Goods” प्रशिक्षण जळगांव एल.पी.जी. प्लॅंट येथे दि.१२ जानेवारी ते १४ जानेवारी २००६ या कालावधीत भारत पेट्रोलियम कार्पोरेशन यांचेमार्फत घेतल्याचा दि.१४ जानेवारी २००६ चा दाखला दाखल केला आहे. या दाखल्याचा विचार होता असे स्पष्ट होते की, सदर वाहन चालकाने ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याकामी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे सदर वाहन चालकास ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याकरिता परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सदर अपघाताचे वेळी ड्रायव्हींग लायसन्सवर Hazardous शेरा नव्हता, त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग होत आहे या सामनेवालेंच्या बाचावात तथ्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यावरुन सामनेवाले यांनी केवळ तांत्रीक बाबीचा आधार घेवून विमा दावा नाकारला आहे त्यामुळे सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते.
सदरचा क्लेम हा केवळ तांत्रीक कारणाचा आधार घेऊन सामनेवाले यांनी रद्द केला असे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवालेंच्या बचावात तथ्य नाही असे आमचे मत आहे. वरील बाबीचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारुन सेवेत कमतरता केली आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदरचा क्लेम सामनेवाले यांनी वेळेत मंजूर केला नाही. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास व नुकसान भरपाई सहन करावी लागली आहे. सदर नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. याबाबत सामनेवाले यांनी सदर अपघाताचा सर्व्हे केलेला असून सदर सर्व्हे रिपोर्ट नि.नं.२१/१ वर दाखल आहे. त्याप्रमाणे रक्कम रु.३२,२५०/- एवढी नुकसान भरपाई तक्रारदारास देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. तसेच सदर झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची भरपाई रु.२,०००/- व अर्जाचा खर्च रु.१,०००/- देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना, अपघातग्रस्त वाहन ट्रकची पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम ३२,२५०/- (अक्षरी रक्कम रुपये बत्तीस हजार दोनशे पन्नास मात्र) द्यावी.
(२) तक्रारदार यांना, शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम २,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) (१) मध्ये नमूद केलेली रक्कम सामनेवाले यांनी तीस दिवसांचे मुदतीत न दिल्यास, निकालाचे तारखेपासून संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : २७-०८-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.