निकालपत्र :- (दि.04/10/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलीसी घेतली होती. सदर पॉलीसीचा नंबर 181200/4/08/00091 असा होता. या पॉलीसीच्या काळातच तक्रारदार जनावरांचे वैरण घालणेस गेले असता शिडीवर चढून वैरण काढत असताना पाय घसरल्याने शिडीवरुन पडले. त्यामुळे त्यांच्या मानेला व पाठीसही मुक्का मार लागला. या दुखापतीमुळे त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. तक्रारदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला. परंतु सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- विमा क्लेमची रक्कम न देता फक्त रक्कम रु.50,000/- तक्रारदारांना दिले. तक्रारदार हे अडाणी, अशिक्षीत असल्यामुळे व त्यांना पॉलीसीचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी ते पैसे स्विकारले. परंतु पॉलीसीतील अटी व शर्तीप्रमाणे दोन दुखापतीमुळे निकामी झाले असतील तर तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/- देणे आवश्यक व रास्त होते. परंतु तसे न करता सामनेवालाने तक्रारदारांना फक्त रु.50,000/- देणे ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चितच गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मंजूर व्हाव्यात अशी विनंती केली आहे. सामनेवाला यांचेकडून क्लेमची उर्वरित रक्कम रु.50,000/- मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी क्लेम मंजूरीसाठी कागदपत्रांची मागणी केलेले पत्र, सामनेवाला यांचेकडून तक्रारदारांना रक्कम रु.50,000/-चा मिळालेला चेक, तक्रारदार हे 100 टक्के अंपग असलेचे प्रमाणपत्र, तक्रारदारांना दुसरा JPA पॉलीसी अंतर्गत 100 टक्के क्लेम मिळालेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) सामनेवालाने आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला विमा कंपनी आपल्या कथनात पुढे असे सांगतात की, तक्रारदाराला अपघात झाल्यावर तक्रारदाराची विमा पॉलीसी तसेच त्याच्या दुखापतीचे स्वरुप लक्षात घेऊन सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसीतील अटीप्रमाणे तक्रारदारांना फुल अॅन्ड फायनल सॅटीसफॅक्शन म्हणून रक्कम रु.50,000/- दिले आहेत व सदर रक्कम तक्रारदारानेही विनाअट फुल अॅन्ड फायनल सॅटीसफॅक्शन म्हणून स्विकारले आहे. एकदा अशा त-हेने विनाअट तक्रारदाराने विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.50,000/- स्विकारले आहेत. त्यामुळे तक्रारदारांना आता या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याचा हक्क व अधिकार नाही. सामनेवालाने आपल्या सेवेत कोणतीही सेवात्रुटी केली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (4) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात, तक्रारदाराच्या कथनामधील दुस-या कंपनीच्या जनता अपघात पॉलीसीव्दारे रक्कम रु.1,00,000/- मिळाले आहेत. त्यामुळे तक्रारदारांना यास तक्रारीतही रक्कम रु.1,00,000/- मिळायला हवेत हे तक्रारदाराचे म्हणणे योग्य नाही. तसेच तक्रारदाराने आपल्या दोन्ही हातांना कायमचे अपंगत्व आले आहे असे म्हटले आहे. परंतु ही बाब तक्रारदाराने पुराव्याने शाबीत करणे आवश्यक आहे. तशा त-हेचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. त्यामुळे सामनेवालाने पूर्ण जबाबदारीने व योग्य विचार करुनच तक्रारदाराचा विमा क्लेम रक्कम रु.50,000/- मंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवाला संस्थेची कुठलीही सेवा त्रुटी नाही. त्यामुळे सामनेवालाची प्रस्तुत प्रकरणात कुठलीही सेवात्रुटी नाही. सबब सदरची तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत महाराष्ट्र शासनाची शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची प्रत दाखल केली आहे. (6) आम्ही दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासले. (7) सामनेवालाने तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत यात वाद नाही. आता पुढील मुद्दयांचा विचार करु 1. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या क्लेमबाबत निर्णय घेण्यात सेवात्रुटी केली आहे का?--- होय. 2. असल्यास सामनेवाला तक्रारदाराला नुकसानभरपाई देय आहे काय? --- होय. 3. काय आदेश ? --- पुढीलप्रमाणे. (8) तक्रारदाराला अपघात झाला व सदर अपघातात तक्रारदाचे दोन्ही हात कायमचे अपंग झाले हे तक्रारदाराने दाखल केलेल्या निशानी क्र.38 चे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल मधील डॉ.परदेशी यांनी तक्रारदारांना दिलेल्या सर्टीफिकेट वरुन स्पष्ट होत आहे. तक्रारदाराने सदर सर्टीफिकेट दाखल केल्यावर संबंधीत डॉक्टरांचे शपथपत्र घालून ते पुराव्याने शाबीत करुन घेणे आवश्यक होते असा युक्तीवाद सामनेवाला यांनी केला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदयान्वये संक्षिप्त प्रोसीजर लागू होते. त्याला पुराव्याचा कायदा तंतोतंत लागू होत नाही. तक्रारदारावर उपचार करणा-या डॉ. परदेशी यांचे 100 टक्के अपंगत्वाबद्दल दिलेले सर्टीफिकेट व वस्तुस्थिती लक्षात घेता तक्रारदाराचे दोन्ही हात निकामी झाले आहेत हे लक्षात घेऊन सामनेवाला विमा कंपनीने जनता अपघात विमा पॉलीसीच्या नियमाप्रमाणे (अट 10 क्र.3) रु.1,00,000/- नुकसानभरपाई देणे आवश्यक होते. तसे न देता सामनेवाला यांनी नुकसानभरपाई केवळ 50 टक्के तक्रारदारास देणे ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चित त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी सांगितलेली Full and Final Settlement चा मुद्दा जनता अपघात विमा योजनेला लागू होत नाही. या सर्व बाबीं लक्षात घेऊन हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमची रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार फक्त) अदा करावी.सदर रक्कमेवर दि.24/09/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चा पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |