(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) गैरअर्जदार विमा कंपनीने विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिली या कारणावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. (2) त.क्र.422/10 तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तिने गैरअर्जदार ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे “नागरिक सुरक्षा” पॉलीसी अंतर्गत दि.20.07.2009 ते दि.10.07.2013 या कालावधीसाठी विमा उतरविला होता. दि.31.08.2009 रोजी सकाळचे वेळेस चहा करीत असताना गरम चहाचे भांडे तिचे अंगावर पडून ती 25% भाजली. सदर घटनेनंतर तिचे मुलाने तिला सरकारी दवाखान्यात नेले आणि तेथून केअर हॉस्पीटल सिल्लोड या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिलेली असून, त्यांनी गुन्हयाची नोंद करुन पंचनामा व चौकशी केली. तिला खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी रक्कम रु.34,600/- आणि औषधासाठी रक्कम रु.12,000/- खर्च करावे लागले. म्हणून तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलीसीमधील तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रासह विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावा सादर केला. परंतू विमा कंपनीने दि.02.12.2009 रोजी तिला पत्र पाठवून आणखी कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार तिने दि.15.12.2009 रोजी सर्व कागदपत्रे पाठविली. गैरअर्जदार विमा कंपनीकडे वारंवार विमा रक्कम मिळावी म्हणून सतत पाठपुरावा केला. वास्तविक विमा कंपनीने विमा दावा दाखल केल्यानंतर तीन महिन्याचे आत विमा रक्कम देणे आवश्यक होते. परंतू विमा कंपनीने अद्याप तिच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. अशाप्रकारे गैरअर्जदार विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिली, म्हणून तक्रारदाराने विमा रक्कम रु.2,00,000/- व्याजासह गैरअर्जदार विमा कंपनीकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराची घटना दि.31.08.2009 रोजी घडलेली असून, घटनेची माहिती पोलीसांना दि.03.09.2009 रोजी दिलेली आहे. तक्रारदारास उपचार घेण्यासाठी रक्कम रु.34,600/- आणि औषधासाठी रु.12,000/- एवढा खर्च आलेला नाही. तक्रारदाराने विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. या कारणावरुन तिचा विमा दावा दि.05.01.2010 रोजी फेटाळला. विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळण्यात आल्यामुळे विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. गैरअर्जदार क्र.2 लाईफ लाईन लाईफ केअर लिमिटेड यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले, म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. (3) त.क्र.422/10 तक्रारदाराने पुरावा म्हणून स्वतःचे शपथपत्र आणि यादीसह कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अरविंदकुमार रविकर यांचे शपथपत्र व विमा दावा फेटाळण्याचे पत्र दाखल केले आहे. मंचाने दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड.फारुक पटेल आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड आर.एच.जोबनपुत्र यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे “नागरिक सुरक्षा” पॉलीसी अंतर्गत दि.20.07.2009 ते दि.19.07.2013 या कालावधीसाठी विमा उतरविला होता या विषयी वाद नाही. विमा कालावधीमध्येच दि.31.08.2009 रोजी तक्रारदाराचे अंगावर गरम चहाचे भांडे पडल्यामुळे ती 25% भाजली आणि त्यासाठी तिने केअर हॉस्पीटल सिल्लोड या खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर तिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा रक्कम रु.2,00,000/- मिळावेत म्हणून विमा दावा सादर केला, परंतू विमा कंपनीने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्याबाबत विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्र दाखल केली नाहीत म्हणून तिचा विमा दावा फेटाळला. तक्रारदाराचे अंगावर दि.31.08.2009 रोजी गरम चहाचे भांडे पडल्यामुळे ती 25% भाजली, आणि त्यासाठी तिने केअर हॉस्पीटल, सिल्लोड या खाजगी दवाखान्यात दि.11.09.2009 ते दि.30.09.2009 या कालावधीत भरती होऊन उपचार घेतले आणि त्यासाठी तिला रक्कम रु.34,000/- एवढा खर्च आला, ही बाब केअर हॉस्पीटल सिल्लोड येथील डॉक्टर मोहसीन खान यांनी दिलेल्या हॉस्पीटलच्या बिलावरुन स्पष्ट दिसून येते. तसेच तक्रारदाराने तिला औषधासाठी रक्कम रु.12,000/- एवढा खर्च आल्याचे म्हटले आहे, परंतू तक्रारदाराने औषध खरेदीच्या दाखल केलेल्या पावत्यांवरुन तिला रक्कम रु.9,494/- एवढा खर्च आल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार औषधाचा खर्च म्हणून रक्कम रु.9,494/- मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र.2 लाईफ लाईन लाईफ केअर लिमिटेड यांनी तक्रारदारास दि.02.12.2009 रोजी पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रासह विमा दावा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दि.15.12.2009 रोजी कागदपत्रांसह विमा दावा पाठवल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यानंतर विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा दि.05.01.2010 रोजी फेटाळल्याचे दाखल केलेल्या पत्रावरुन दिसून येते. सदर पत्र अर्धवट लिहीलेले आहे, पत्रातील मजकुरावरुन विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा कोणत्या (4) त.क्र.422/10 कारणामुळे फेटाळला हे स्पष्ट होत नाही. विमा कंपनीच्या सदर पत्रामधील मजकुर खालीलप्रमाणे आहे. “आपण कळविलेल्या माहितीवरुन आपघात दि.21.08.2009 रोजी चहाचे पातीले पायावर पडल्या कारणाने एवढी मोठी जखम होणे शक्य नाही, डॉक्टरांचे बिल हे लेटर हेडवर आहे. बिलामध्ये ब-याच ठिकाणी खाडाखोड झालेली आहे, केवळ ड्रेसींगसाठी रु.20,000/- दाखवण्यात आले आहे हे सर्व पाहता” अशा पध्दतीने सदर पत्रामध्ये मजकुर अर्धवट लिहीलेला आहे. तसेच सदर पत्र तक्रारदाराला पाठवले व ते पत्र तक्रारदाराला मिळाले या संबंधीचा कोणताही पुरावा विमा कंपनीने दाखल केला नाही. यावरुन विमा कंपनीच्या या पत्रावर विश्वास ठेवता येणार नाही. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळल्याचे भासवले असून, विमा कंपनीच्या सेवेत निश्चितपणे त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने विमा रक्कम रु.2,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतू तक्रारदाराने उपाराकरीता रक्कम रु.34,600/- आणि औषधासाठी रु.9,494/- एवढा खर्च आल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र.1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास उपचाराची रक्कम रु.34,600/- आणि औषधाच्या खर्चाची रक्कम रु.9,494/- दि.15.12.2009 पासून पूर्ण रक्कम देईपर्यंत 9% व्याजदराने निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 3) गैरअर्जदार क्र.1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,500/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |