अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव तक्रार क्रमांक 186/2011 तक्रार दाखल तारीखः- 23/03/2011
तक्रार निकाल तारीखः- 23/01/2014
कालावधी 03 वर्ष 10 महिने
निशाणी – 25
1. ललीता जयराम माळी, तक्रारदार
उ.व. 42 वर्षे, व्यवसाय- घरकाम, (अॅड. महेंद्र सोमा चौधरी)
2. किशोर जयराम माळी
उ.व. 22, धंदा – घरकाम,
3. निलेश जयराम माळी,
उ.व. 14 वर्ष, धंदा – शिक्षण,
4. योगीता जयराम माळी,
उ.व. 19 वर्ष, धंदा – शिक्षण,
सर्व रा. मल्ल्हारपुरा, ता. चोपडा,
जि. जळगांव.
विरुध्द
1. दि ओरिएंटल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड, सामनेवाले
सेंटर फुले मार्केट, जळगांव, (अॅड.एस.बी.अग्रवाल)
ता.जि. जळगांव.
2. कबाल इन्शुरन्स कं.लि. एकतर्फा
श्रीरंग नगर, पंपीग रोड, नाशिक,
ता.जि. नाशिक,
3. जिल्हा अधिक्षक,कृषी अधिकारी स्वतः
कृषी अधिक्षक कार्यालय,
जळगांव, ता.जि. जळगाव.
(निकालपत्र अध्यक्ष श्री. मिलींद सा.सोनवणे यांनी पारित केले)
नि का ल प त्र
तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सेवेत कमतरता झाली म्हणून दाखल केलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, जयराम आत्माराम माळी तक्रारदार क्र. 1 चे पती व क्र. 2 ते 4 चे वडील होते. दि. 21/03/2010 रोजी सायंकाळी 06.30 च्या सुमारास चोपडा येथुन अमळनेरला जात असतांना, वेले गांवाजवळील सुतगिरणी जवळ त्यांच्या मोटार सायकल क्र. एम.एच. 19 जे- 7470 हिला ट्रक ने मागून धडक दिली. दि.22/03/2010 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताबाबत न्यायदंडाधिकारी चोपडा, यांच्या न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. मयत जयराम माळी हे शेतकरी होते. गरताड शिवारातील गट क्र. 274 ही शेत जमीन त्यांच्या नावावर होती.
03. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, शासन निर्णयाअन्वये महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली जाते. सदर योजनेत रस्त्यावरील अपघात, विज पडून मुत्यू किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांचा मुत्यू झाल्यास रू 1 लाख देण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. शासनाशी केलेल्या करारा अंतर्गत सदर रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 यांची आहे. सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्या मार्फत सदरचे प्रस्ताव सादर करण्यात येतात. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू दि. 22/03/2010 रोजी म्हणजेच सदर योजनेच्या कालावधीत झालेला आहे. त्यांचा विमा पॉलीसी क्र. 18/12/47/2010/119 असा आहे.
04. तकाररदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी संपुर्ण कागदापत्रांची पुर्तता करुन विमा दावा सादर केला. मात्र दि. 08/12/2010 रोजी सामनेवाला क्र. 1 यांनी मयत जयराम माळी यांनी विमा अटींचा भंग केला म्हणून, विमा रक्कम देय होत नाही, असे कळवून तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला. वास्तविकपणे जयराम माळी हे शिस्तब्ध व्यक्ती होते. त्यांच्या कडे वाहन चालविण्याचा वैध परवाना होता. ते हळूवार पणे रस्त्याच्या डाव्या बाजूने मोटार सायकल चालवित होते. त्यांना ज्या ट्रक ने धडक दिली त्या ट्रक चालका विरुध्द पोलिसांनी चोपडा येथील न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्या न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केलेले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांनी अयोग्य कारणास्तव त्यांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे विमा रक्कमेचे रू. 1 लाख, दि. 23/03/2010 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह व मानसिक शारीरीक त्रासापोटी रू 10,000/- अर्ज खर्च रू. 10,000/- सह मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
05. सामनेवाला क्र. 1 यांनी जबाब नि. 18 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, जयराम माळी हे पोलीस खात्यात कायम सेवेत नोकरीस होते. त्यामुळे ते शेतकरी नव्हते. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांच्या वारसांना विमा रक्कम मागण्याचा अधिकार नाही. मयत जयराम माळी यांची मुलगी म्हणजेच तक्रारदार क्र. 4 हिने घटनेबाबत फिर्याद देतांना नमूद केलेले आहे की, अपघात समयी जयराम माळी हे तिला व तक्रारदार क्र. 1 ला मोटार सायकल वर बसून अमळनेर कडे निघालेले होते. दोन व्यक्तींची वाहन क्षमता असलेल्या मोटार सायकल वरुन ते तिघे जण जात होते. त्यामुळे जयराम माळी यांनी विमा अटीचा भंग केलेला आहे. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत एखादा शेतकरी वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असतांना, अपघात झाल्यास वाहन चालक शेतकरी सोडून इतर व्यक्तींना,ते शेतकरी असल्यास, नुकसान भरपाई दिली जावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे प्रस्तुत केस मध्ये जयराम माळी यांचे वारस म्हणून तक्रारदारांना विमा रक्कम मागण्याचा अधिकार नाही. वरील कारणास्तव तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 यांनी मंचास केलेली आहे.
06. सामनेवाला क्र. 2 यांच्या विरुध्द नोटीस मिळुनही ते गैरहजर राहीले म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा असे आदेश करण्यात आले. मात्र सामनेवाला क्र. 2 यांची भुमिका कागदपत्रे गोळा करुन विमा कंपनीकडे पाठवावीत, इतक्या मर्यादीत स्वरुपाची आहे. शिवाय त्या कामाचा ते मोबदला देखील घेत नाहीत.
07. सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि.19 दाखल केला. त्यांचे मते, त्यांनी तक्रारदारांकडून मिळालेला विमा प्रस्ताव दि. 21/06/2011 रोजी, सामनेवाला क्र. 2 यांच्या मार्फत सामनेवाला क्र.1 यांच्या कडे सादर केलेला आहे. तो प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांनी अपघातग्रस्त शेतकरी इतर दोघांना घेवून मोटार सायकल चालवित होते, या कारणांस्तव नामंजूर केलेला आहे. थोडक्यात त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यास कोणतीही कमतरता केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
08. उभयपक्षांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आलेत.
09. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.]
मुद्दे निष्कर्ष
1. मयत जयराम माळी शेतकरी होते किंवा नाही ? - होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात
कमतरता केली किंवा नाही ? - सा.वाला क्र. 1
पुरता होय.
3. आदेशाबाबत काय ? -अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दाक्र. 1बाबतः-
10. सामनेवाला क्र. 1 यांचे वकील अॅड. श्री. अग्रवाल यांनी मयत जयराम माळी पोलीस खात्यात कायमस्वरुपी नोकरीला असल्याने शेतकरी नव्हते. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांच्या वारसांना म्हणजेच तक्रारदारांना विमा लाभ मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केलेला आहे. तक्रारदारांचे वकील श्री. चौधरी यांच्या मते, जयराम माळी जरी पोलीस खात्यात नोकरीला होते, तरी गरताड शिवारात गट क्र. 274 ही शेत जमीन त्यांच्या नावे होती. त्याचा 7/12 उतारा नि. 5/1 ला दाखल आहे. त्यामुळे मृत्यू समयी जयराम माळी शेतकरी देखील होते, ही बाब शाबीत होते. परिणामी जयराम माळी यांचे वारस म्हणजेच तक्रारदार विमा लाभ मिळण्यास पात्र आहेत, असा त्यांचा युक्तीवाद आहे.
11. उभय बाजुंनी केलेले वरील युक्तीवाद विचारात घेण्यात आलेत. सरकारी सेवे मध्ये असलेला एखादा व्यक्ती जर शेतजमीन धारक असेल तर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत, त्यास शेतकरी समजण्यात येवू नये, अशी कोणतीही तरतूद त्या योजने संदर्भातील शासन निर्णयात आम्हांस दिसून आली नाही. त्यामुळे पोलीस सेवेत असल्यामुळे जयराम माळी शेतकरी नव्हते, हा सामनेवाला क्र. 1 यांचा युक्तीवाद स्विकारला जावू शकत नाही. यास्तव मुददा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दाक्र. 2बाबतः-
12. सामनेवाला क्र. 1 यांचे वकील अॅड. श्री. अग्रवाल यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत जर एखादा शेतकरी विना परवाना मोटार सायकल चालवित असेल, अथवा मोटार सायकल वरुन वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेवून जातांना त्या वाहनांस अपघात झाल्यास, मोटार सायकल चालविणा-या शेतक-यास विमा लाभ देय होणार नाही, अशी तरतूद आहे, या बाबी कडे आमचे लक्ष वेधले.
13. शेतकरी अपघात विमा योजना 2009 चा शासन निर्णय सामनेवाला क्र. 3 यांनी नि. 15/2 ला दाखल केलेला आहे. त्या शासन निर्णयातील परिच्छेद इ मध्ये विमा कंपनीची जबाबदारी काय असेल, या बाबत तरतूद करण्यात आलेली आहे. परिच्छेद इ मधील 6 व्या नियमात असे नमूद करण्यात आलेले आहे की अपघातग्रस्त वाहन चालकाच्या चुकीमुळे शेतक-याचा मृत्यू झाल्यास, दोषी वाहन चालक वगळता, सर्व अपघातग्रस्त शेतक-यांचे, केवळ अपघात झाला, या कारणांस्तव विम्याचे दावे मंजूर करावेत. म्हणजेच ही बाब स्पष्ट आहे की, एखादया शेतकरी वाहन चालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्या अपघातात त्या शेतकरी वाहन चालकाचा दोष नसेल तर त्याच्या वारसांना विमा दावा मागण्याचा अधिकार असेल.
14. प्रस्तुत केस मध्ये जयराम माळी मोटार सायकल वरुन तीन सिट प्रवास करीत असतांना अपघात झाला व ते मयत झाले, तरी अपघाता बाबतची फिर्याद नि. 5/6 व 5/7 स्पष्ट करते की, त्यांच्या मोटार सायकला ट्रक ने मागून धडक दिल्यामुळे अपघात झालेला आहे. दोन च्या ऐवजी तीन सिट मोटार सायकलवर बसविल्यामुळे अपघात झाला, असे तपास करणा-या पोलीसांचे देखील म्हणणे नाही. अपघाता नंतर ट्रक चालक पळवून गेला व तो नंतर पोलीसांना मिळून आला. त्याच्या विरुध्द न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्या कडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे, ही बाब तक्रारदार क्र. 1 ने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि. 20 मध्ये शपथेवर सांगितलेली आहे. त्यामुळे विमा धारक जयराम माळी यांनी केलेल्या ब्रिच ऑफ कंडीशन मुळे अपघात घडला व त्यामुळे त्यांच्या वारसांना म्हणजेच तक्रारदारांना विमा दावा दिला जावू शकत नाही, हा सामनेवाला क्र. 1 यांचा बचाव स्विकारला जावू शकत नाही. परिणामी, त्या आधारे सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी शासननिर्णयाने त्यांना नेमून दिलेली कामे वेळेवर व व्यवस्थित केलेली असल्याने, त्यांनी सेवेत कमतरता केली, असे म्हणता येणार नाही. यास्तव, मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र.1 पुरता होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
15. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की मयत जयराम माळी पोलीस सेवेत होते तरी त्यांच्या नावे शेत जमीन असल्याने ते शेतकरी देखील होते. शेतकरी अपघात योजनेत सरकारी नोकरीत असलेला शेतकरी त्या योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही, अशी तरतूद नाही. त्याचप्रमाणे जयराम माळी मोटार सायकल वरुन दोन ऐवजी तीन व्यक्ती घेऊन प्रवास करीत होते व त्यामुळे अपघातात त्यांचा दोष होता, असे पोलीसांचे म्हणणे नाही. जयराम माळी यांच्या मोटार सायकलला ट्रक ने मागून धडक दिल्याने अपघात घडलेला आहे. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजना 2009 च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद 6 अन्वये, मयत जयराम माळी यांचे वारस म्हणजेच तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास अपात्र ठरत नाहीत. कायदेशीररित्या सबळ कारण नसतांना सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु. 1 लाख विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 08/12/2010 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे, आमच्या मते तक्रारदारांना एकत्रितरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 8,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- मंजूर करणे न्यायोचित ठरेल. यास्तव मुद्दा क्र. 3 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना विमा दाव्यापोटी रू.1,00,000/- (एक लाख मात्र) विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि. 08/12/2010 पासून ते रक्कम प्रत्यक्ष हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने अदा करावेत.
2. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना एकत्रितरित्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी पोटी रू. 8,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 5,000/- अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्या विरुध्द कोणतेही आदेश नाही.
4. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री.सी.एम.येशीराव )
अध्यक्ष सदस्य
अति.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, जळगाव.