नि का ल प त्र :- (दि.12/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर आहेत. सामनेवाला यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार यांचे पती शेतकरी आहेत. तक्रारदार यांचे पतीचे नावे शेतजमीन असून त्यांचे शेतजमिनीचा खाते नं. 5 असा आहे. तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. तक्रारदार यांचे पतीचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविला आहे. तक्रारदारांचे पती दि. 31/08/2010 रोजी त्यांचे अंब्याचे टोण या नावाने ओळखणा-या शेतामध्ये भात पिक राखणीकरिता गेले असता त्यांना गवा रेडयाचे संरक्षणासाठी म्हणून फटाकडी लावली होती. सदर फटाकडीची फुंगणीमुळे झोपडीस आग लागली व त्या आगीत तक्रारदार यांचे पती भाजल्याने गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना औषधोपचाराकरिता सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले होते. तथापि औषधोपचार चालू असतानाच दि. 6/09/2010 रोजी तक्रारदारांचे पती मयत झालेले आहेत. तक्रारदार यांचे पतीचे शवविच्छेदन सी.पी.आर. येथे झालेले आहे. व त्यांचा मृत्यू हा अपघातात भाजून झालेबाबत दाखला दिलेला आहे. सदरचा अपघाती निधन झाले असल्याने तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे क्लेमची मागणी केलेली आहे. परंतु सामनेवाला कंपनीने क्लेमबाबत अद्यापही काहीही कळविलेले नाही. सबब, तक्रारदारांची विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांचा सामनेवाला कंपनीकडे दिलेला विमा क्लेम प्रस्ताव, गट नं. 171 चा 7/12 चा उतारा, 8 अ चा उतारा, 113 चा डायरी उतारा, लक्ष्मीपुरी पोलिसांनी राधानगरी पोलिसांना दिलेले पत्र, घटना स्थळाचा पंचनामा, सी.पी.आर. हॉस्पीटल यांचेकडील मृत्यू दाखला, पी.एम. नोटस, मरणोत्तर पंचनामा इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा दि. 31/08/2010 रोजी झालेला आहे. जनता वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी नं. 18200/47/2010/119 असा असून त्याचा कालावधी दि. 15/08/2009 ते दि. 14/08/2010 असा आहे. तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू हा पॉलिसी कालावधीत नसल्यामुळे तक्रारदारास सदर क्लेम रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. सबब, सामनेवाला विमा कंपनी यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. जनता व्यक्तीगत अपघात विमा पॉलिसी क्र. 18200/47/2010/119 या पॉलिसीच्या कालावधीत दि. 15/08/2009 ते दि. 14/08/2010 असा आहे. तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू दि. 31/08/2010 रोजी झालेला आहे. सदरचा अपघाती मृत्यू हा पॉलिसी कालावधीमध्ये झालेला नसल्याचे दिसून येते. तक्रारदार हे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा क्लेम रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |