नि.क्र. 28
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र.190/2011
--------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 26/04/2010
तक्रार दाखल तारीख : 03/05/2010
निकाल तारीख : 17/03/2012
----------------------------------------------
1. श्रीमती हयातबी इलाही मुजावर
वय वर्षे – 48, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.दुधोंडी, ता.पलूस, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
डिव्हीजन ऑफिस नं.2, 8, हिंदुस्थान कॉलनी,
अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – 440 015
2. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
101, शिवाजी नगर, 3 रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – 411005
3. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन. शेटे
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड श्री के.ए.मुरचिटे, श्रीमती व्ही.एम.पाटील
जाबदारक्र.2 : स्वत:
जाबदारक्र.3 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती कै.इलाही इब्राहिम मुजावर हे शेतकरी होते व दि.26/5/2008 रोजी ते शेतात गेले असताना तुटलेल्या विद्युत तारेद्वारे विद्युत शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तक्रारदार या त्यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी, दुधोंडी यांचेकडे जून 2008 मध्ये प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार पलूस यांचेकडे पाठविला. जाबदार क्र.3 यांनी सदरचा प्रस्ताव जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अद्याप मंजूर केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.5 च्या यादीने 8 कागद दाखल केले आहेत.
3. जाबदार क्र.1 यांनी याकामी नि.18 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये महाराष्ट्र शासनाबरोबरशेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देणेबाबत करार झाला आहे ही बाब मान्य केली आहे. मयत हे शेतकरी असल्याची बाब जाबदार यांनी नाकारली आहे. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकरी अपघाताने मयत झालेनंतर तीन महिन्याचे आत विमा कंपनीकडे अपघाताबाबत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. परंतु तक्रारदार यांनी श्री इलाही मुजावर यांचे मृत्यूसंबंधी कोणतीही माहिती अगर प्रस्ताव जाबदार क्र.1 यांचेकडे दिली नाही. त्यामुळे विमादावा नामंजूर करणेचा प्रश्न उद्भवत नाही. मयताचे वयाबाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. मयत इलाही हे सदर वयोगटात बसत नाहीत. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.19 चे यादीने 1 कागद दाखल केला आहे.
4. जाबदार नं.2 यांनी नि.15 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी सदरचे विमा करारामध्ये जाबदार क्र.2 यांची जबाबदारी केवळ सल्लागाराची आहे व शेतक-यांकडून आलेले विमादावे तपासण्याचे काम जाबदार क्र.2 करतात व कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची पूर्तता करुन घेवून विमा कंपनीकडे विमाप्रस्ताव दाखल करण्याचे काम जाबदार क्र.2 करतात. सदर जाबदार नं.2 यांनी तक्रारदार यांचे पती यांचा विमादावा दि.28/6/2008 रोजी प्राप्त झाला व त्यामध्ये त्रुटी असलेने त्रुटींची पूर्तता करुन घेवून दि.4/2/2009 रोजी जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविला. सदरचा दावा जाबदार नं.1 यांचेकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सदर जाबदार यांचेवर कोणतेही दायित्व येत नाही असे जाबदार क्र.2 यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.2 यांनी नि.16 वर परिपत्रक हजर केले आहे.
5. जाबदार क्र.3 यांना नोटीस लागूनही ते याकामी हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
6. तक्रारदार यांनी याकामी नि.21 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.23 च्या यादीने 1 कागद दाखल केला आहे. नि.27 वर तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.24 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
7. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्हणणे यांचे अवलोकन केले. जाबदार क्र.1 यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत तक्रारअर्जातील तक्रारअर्ज व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.1 यांचेबरोबर विमा करार केला आहे त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.1 यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
8. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार क्र.1 यांनी नि.19/1 वर विमा कराराबाबत झालेल्या करारपत्राची प्रत दाखल केली आहे. तसेच जाबदार नं.2 यांनी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दाखल केले आहे. यावरुन पॉलिसी कालावधी दि.15/8/2007 ते 14/8/2008 असा असलेचे स्पष्ट होते. जाबदार यांचे करारपत्र पाहता तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू दि.26/5/2008 रोजी विमा मुदतीत झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी दाखल केलेल्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने जाबदार क्र.१ यांच्या बरोबर राज्यातील शेतक-यांसाठी विमा योजना राबविण्यात आली असल्याचे स्पष्ट होते. नि.19/1 वरील करारपत्रानुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय 12 ते 75 वयोगटातील असणे आवश्यक आहे. मृत्यू दाखला व इंक्वेस्ट पंचनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय 53 असे नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे पतीचे वय निश्चितच 12 ते 75 या दरम्यानचे आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी सात-बारा उतारा व खाते उतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे. तक्रारदार यांचे पती यांचे नावावर केवळ अत्यंत कमी क्षेत्र असलेने व त्यामध्ये अनेक हिस्सेदार असलेने तक्रारदार हे शेतकरी होत नाहीत असेही जाबदार यांनी युक्तिवादामध्ये नमूद केले तथापी 7/12 सोबत दाखल असलेला खातेउतारा पाहता तक्रारदार यांचे नावावर अन्य शेतजमीन आहे ही बाब स्पष्ट होते व नेमकी किती शेतजमीन असली म्हणजे ती व्यक्ती शेतकरी होते अशी कोणतीही अट करारात नमूद नाही त्यामुळे तक्रारदार यांचे पती शेतकरी नाहीत या जाबदार यांचे युक्तिवादामध्ये कोणतेही तथ्य नाही. सबब तक्रारदार यांचे पती हे शेतकरी आहेत या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
9. तक्रारदार यांच्या विमादाव्याबाबत जाबदार यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तक्रारदार यांनी विमाप्रस्तावच दाखल केला नाही असे कथन केले आहे. याउलट जाबदार क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये दि.4/2/2009 रोजी जाबदार यांचेकडे त्रुटींची पूर्तता करुन प्रस्ताव पाठविला असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.23/1 वर जाबदार क्र.1 यांनी दि. 29/9/2009 रोजी विमादावा फेटाळलेचे पत्र माहितीच्या अधिकारात प्राप्त करुन दाखल केले आहे. सदर पत्रावरुन तक्रारदार यांची विमा फाईल बंद करणेत येत आहे असे जाबदार यांनी कळविलेचे स्पष्ट होते. यावरुन तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांचेकडे पाठविला आहे ही बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमा प्रस्तावच दाखल केला नाही या जाबदार यांच्या युक्तिवादामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन दिसून येते. तक्रारदार यांनी विमाप्रस्ताव दाखल केला असताना विमा प्रस्तावच दाखल केला नाही असे कथन करुन व अयोग्य कारणाने विमा फाईल बंद केली असल्याने जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/- व सदर रकमेवर विमा प्रस्ताव जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविले तारखेपासून म्हणजे दि.4/2/2009 पासून द.सा.द.शे.९ टक्के व्याज देण्याबाबत आदेश करणे न्याय्य होईल असे मंचाचे मत झाले आहे.
10. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही योग्य निर्णय न घेता अयोग्य कारणाने फाईल बंद केल्याने तक्रारदार यांना या न्यायमंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
11. यातील जाबदार क्र.3 हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.2 यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार क्र.1 यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार क्र.1 यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना जाबदार नं.1 यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये
एक लाख माञ) दि. 4/2/2009 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह अदा करावेत.
3. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी दिनांक 2/5/2012 पर्यंत करणेची आहे.
5. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 17/03/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.