नि.क्र.18
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष : सौ वर्षा शिंदे
मा.सदस्या : सौ मनिषा कुलकर्णी
तक्रार अर्ज क्र. 335/2011
--------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 27/12/2011
तक्रार दाखल तारीख : 03/01/2012
निकाल तारीख : 02/08/2013
--------------------------------------------------
श्री महादेव तुकाराम पाटील
रा.गव्हाण, ता.तासगांव जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
तर्फे मॅनेजर
विभागीय कार्यालय – 15 ए.डी. कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेन्शन, सदर,
नागपूर
तर्फे सांगली शाखा, कृष्णा कमर्शियल कॉम्प्लेक्स,
आमराई रोड, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे: अॅड पी.एस.परीट
जाबदारतर्फे : अॅड श्रीके.ए.मुरचिटे
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्या – सौ मनिषा कुलकर्णी
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज ग्राहक सेवेतील त्रुटीबाबत आणि गाईच्या विम्याची रक्कम मिळणेबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 11 व 12 अन्वये दाखल केला आहे.
2. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे -
सदरची तक्रार ही गायीचे विमा क्लेमबाबत, विमा कंपनीने मंजूर वा नामंजूर न केलेने दाखल करणेत आलेली आहे. प्रस्तुतचा तक्रारअर्ज स्वीकृत करणेत येवून जाबदार यांना नोटीसीचा आदेश झालेला आहे. जाबदार यांना नोटीस लागू होवून ते या मंचासमोर हजर होवून त्यांनी म्हणणे दाखल केलेले आहे.
तक्रारदार हे कायमस्वरुपी गव्हाण, ता.तासगांव, जि.सांगली येथे रहातात व शेती व शेतीस पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. जाबदार ही इन्शुरन्स कंपनी असून ती समाजातील विविध घटकांचा विमा उतरवून त्याद्वारे सेवा देणेचा व्यवसाय करते व जाबदार कंपनीची सांगली येथे शाखा आहे. तक्रारदार यांच्या मालकीची काळया, पांढ-या रंगाची, डोक्यावर ठिपका असलेली, शिंगे नसलेली, व शेपूट गोंडा पांढरा असलेली किंमत रक्कम रु.20,000/- ची गाय होती. सदर गायीचा विमा जाबदार कंपनीकडे दि.26/3/08 रोजी उतरविलेला असून त्याचा कानातील बिल्ल्याचा नं. 101902 ओ.आय.सी.181100 असा आहे. अशा प्रकारे जाबदार कंपनीने, तक्रारदार यांच्या गायीचे दायीत्व स्वीकारलेले होते.
2. तक्रारदार यांची वरील वर्णनाची गाय दि.17/1/11 रोजी आजारी पडली व उपचारादरम्यान दि.21/1/11 रोजी मरण पावली. तक्रारदार यांनी दि.9/3/11 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी क्लेम सादर केला. परंतु जाबदारांनी आजअखेर क्लेम मंजूर केला नाही. नोटीस मिळूनही क्लेम रक्कम अदा केली नाही. अशा प्रकारे जाबदार कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरवून सेवेत त्रुटी केलेने प्रस्तुतचा अर्ज क्लेम मिळणेसाठी दाखल केलेला आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारअर्जासोबत नि.2 ला शपथपत्र व नि.4 ला फेरिस्त दाखल केली आहे.
4. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येवून तक्रारअर्जामध्ये तक्रारअर्ज कलम 7 मध्ये नमूद केलेप्रमाणे गायीचा विमा रक्कम रु.20,000/- व रु.15,000/- मानसिक त्रासापोटी अशी एकूण रक्कम रु.35,000/- ची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी नि. 15 ला तक्रारदाराचे मूळ अर्जास आपले म्हणणे दाखल केले आहे.
6. जाबदार यांनी, मयत जनावराबाबत, तक्रारदार यांनी केलेले कथन अमान्य असलेबाबत म्हटले आहे. अर्जातील कलम 3 मध्ये केलेले कथन मान्य नसलेचे जाबदार यांचे म्हणणे आहे. जाबदार यांचे म्हणणेनुसार गायीचे मृत्यूबाबत मुदतीत कळविले नाही, त्यामुळे पॉलिसीचे अटीचा भंग तक्रारदाराने केला आहे, तसेच गाय कोणत्या कारणास्तव मयत झाली याचा सविस्तर तपशील नाही. कलम 7 मध्ये केलेली विमा रकमेची मागणी मान्य नसलेचे जाबदार यांचे म्हणणे आहे. तरी तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा असे जाबदार यांचे म्हणणे आहे.
7. सदर प्रकरणी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. जाबदार यांनी, तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
3. तक्रारदारास तक्रारअर्जात मागितलेल्या मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
कारणे
मुद्दा क्र.1
तक्रारदाराचा अर्ज, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे गायीचा विमा हा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला आहे. तक्रारदार यांनी नि.4/1 ला पॉलिसी क्र. एसएनजी-101992 ची प्रत दाखल केली आहे. सदरची बाब विचारात घेता तक्रारदार हे जाबदार कंपनीचे ग्राहक होतात.
मुद्दा क्र.2
जाबदार कंपनीने गाय कशाने मयत झाली याचे कारणाबद्दल आक्षेप उपस्थित केला आहे. नि.4/4 ला दाखल मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण नमूद आहे. सदरचे तक्रारअर्जामध्ये सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही व ब-याचदा जाबदार कंपनीचे ऑफिसमध्ये विमा रकमेसाठी हेलपाटे मारुनही जाबदार कंपनीने त्याची दखल घेतली नाही व आजअखेर क्लेम मंजूर केला नाही. अशा प्रकारे जाबदारांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेली दिसून येते.
मुद्दा क्र.3
तक्रारदार यांनी जाबदार विमा कंपनीकडे आपला तक्रारअर्ज कलम 1 मध्ये वर्णन केलेल्या गायीचा विमा उतरविलेला होता व सदरचा विमा उतरविलेनंतर दि.21/1/11 रोजी तक्रारदार यांची गाय मरण पावली. तक्रारदाराने सदर विमा क्लेमसाठी लागणारी सर्व कागदपत्रे, विमा पॉलिसी, जाबदार कंपनीस कळविले पत्राची प्रत, क्लेमफॉर्मसोबत पाठविले अर्जाची प्रत, क्लेम फॉर्म व पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट. इ कागदपत्रे दाखल केलेली आहत. या सर्व गोष्टींचे अवलोकन करता तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत असे मंचास वाटते. तक्रारदार यांनी कलम 7 मध्ये रक्कम नमूद केली असली तरी, तक्रारदारांनी त्यांचे दि.29/7/2013 चे पुरसीसमध्ये मानसिक त्रासापोटी मिळणारी रक्कम सोडून देत आहोत असे कथन केले असलेने, तक्रारदाराची मूळ तक्रारीत मानसिक त्रासापोटी मागणी केलेली रक्कम हे मंच मान्य करु शकत नाही. सबब तक्रारदारास विम्याची रक्कम रु. 20,000/- मंजूर करणेस काहीही हरकत नाही या निर्णयाप्रत मंच येत आहे.
मुद्दा क्र.4
वरील सर्व गोष्टींचे अवलोकन करता मंच या निर्णयाप्रत येत आहे की, तक्रारदारास विमा रक्कम देणेस जाबदार विमा कंपनी ही सर्वस्वी जबाबदार आहेत. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना जाबदार यांनी विमा रक्कम रुपये 20,000/- अदा करावेत.
3. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाचे निकाल तारखेपासून 30 दिवसांत
करणेची आहे.
4. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतात.
सांगली
दि. 02/08/2013
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा शिंदे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष