नि.१५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४६८/२०१०
---------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – १५/९/२०१०
तक्रार दाखल तारीखः – १६/०९/२०१०
निकाल तारीखः - २७/०९/२०११
----------------------------------------
श्री दत्तात्रय ज्ञानदेव जाधव
वर्षे – ५०, धंदा – शेती व पशुपालन
रा.चिंचणी, ता.तासगांव जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय–१, १५, ए.डी.कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेंन्शन, सदर, नागपूर-४४०००१ ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री एम.एन.शेटे
जाबदार तर्फे : +ìb÷. सौ एम.एम.दुबे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या पशु विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करतो व त्यासाठी त्याने गायी व म्हैशी सांभाळल्या आहेत. तक्रारदाराने त्याच्या गायीचा रक्कम रु.३५,०००/- इतक्या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.३१/०३/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्याकडून विमा पॉलिसी ही देण्यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेली गाय आजारी पडून दि.२९/३/२००९ रोजी मयत झाली. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना ताबडतोब दूरध्वनीवर कळविले. तक्रारदार याचे गायीचे शासनाचे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी गायीच्या कानातील बिल्ला काढून तक्रारदारांचे ताब्यात दिला. गायीचे मृत शरीर ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत निर्णय घेताना खोटी व चुकीची कारणे देऊन दि.१९/१२/२००९ च्या पत्राने विमा दावा नाकारल्याबाबत कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने ११ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील विमा पॉलिसीनुसार गाय मयत झालेनंतर गायीच्या कानातील बिल्ला हा कानाच्या तुकडयासह जाबदार कंपनीकडे क्लेमफॉर्मसोबत दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी कराराप्रमाणे कानाचा तुकडा पाठविला नाही. त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला आहे. तसेच क्लेमफॉर्मसोबत आवश्यक ती मूळ कागदपत्रे जाबदार यांचेकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१२ ला शपथपत्र दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.१३ ला लेखी युक्तीवाद व नि.१४ चे यादीने निवाडे दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार याने याकामी नि.५/११ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये विमा पॉलीसीचा कालावधी नमूद नाही. परंतु जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये विमा पॉलिसी दि.३१/३/२००८ रोजी उतरविल्याचे नमूद केले आहे. तसेच पॉलिसीचे अवलोकन केले असता पॉलिसी ही दि.३१/३/२००८ रोजी उतरविली असल्याचे दिसून येते. पॉलिसी उतरविलेपासून एक वर्षाचे आत तक्रारदार यांचे गायीचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच तक्रारदार यांचे गायीचा विमा कालावधीत मृत्यू झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्याचे पञ तक्रारदार यांनी नि.५/१० वर दाखल आहे. त्यामध्ये विमा दावा नाकारताना ओरिजिनल विमा पॉलिसी, पोस्ट मॉर्टेम केल्याची रु.५० ची पावती, जनावराच्या दूध क्षमतेबाबत प्रमाणपत्र, या कारणास्तव तक्रारदार यांचे विमा दावा नाकारलेचे नमूद केले आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मात्र विमा प्रस्तावाबरोबर कानातील बिल्ला हा कानाचे तुकडयासह दाखल केला नाही याबाबत विमा दावा नाकारला असल्याचे नमूद केले आहे. जाबदार यांचे म्हणणे व विमा दावा नाकारलेचे पत्र यामधील कारणांमध्ये तफावत दिसून येते. विमा दावा नाकारलेच्या पत्रामध्ये पोस्टमार्टेम पावतीची रिसीट नाही, खरेदी पावती नाही या कारणास्तव विमादावा नाकारला आहे. तक्रारदार यांचा विमादावा नाकारणेच्या कारणांचे अवलोकन केले असता पोस्टमॉर्टेम केले असलेबाबत रु.५०/- ची पावती नाही, खरेदी पावती नाही ही कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. विमादावा प्रस्ताव पाठविताना कोणकोणती कागदपत्रे पाठविणे गरजेचे आहे हे दाखविण्यासाठी जाबदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा ज्या कारणासाठी नाकारला, ती कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, शवविच्छेदन अहवाल इ. कागदपत्रे सादर केली आहेत, त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्यामुळे तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम रु.३५,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.१९/१२/२००९ पासून व्याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
५. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना गायीच्या विमा दाव्यापोटी रक्कम रु.३५,०००/-
( अक्षरी रुपये पस्तीस हजार फक्त ) दि.१९/१२/२००९ पासून द.सा.द.शे. ९
टक्के दराने व्याजासह अदा करावेत.
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा
करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.१२/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.