नि. 28
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 214/2010
तक्रार नोंद तारीख : 06/05/2010
तक्रार दाखल तारीख : 07/06/2010
निकाल तारीख : 12/03/2013
----------------------------------------------
सांगली कर्टन हाऊस सांगली तर्फे प्रोप्रा.
1. श्री निजाम सलीम पाशा
वय 34 वर्षे, धंदा – व्यापार
2. श्री अब्दुल शकूर वाहिदखान
वय 34 वर्षे, धंदा – व्यापार
दोघे रा.सि.स.नं. 1675, प्लॉट नं.9,
साईश्रध्दा कॉम्प्लेक्स, सम्राट व्यायाम मंडळजवळ,
आंबेडकर रोड, सांगली ता.मिरज जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. शाखा प्रबंधक,
दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
विभागीय कार्यालय, कृष्णा कमर्शियल कॉम्प्लेक्स,
एल.आय.सी. बिल्डींग जवळ, आमराई रोड,
सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड व्ही.बी.मोरे
जाबदारतर्फे : अॅड श्री के.ए.मुरचिटे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने जाब देणार यांचेविरुध्द सदोष सेवा दिल्यामुळे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे झालेल्या नुकसानीकरिता रक्कम रु.7,88,785/- इतकी नुकसान भरपाई व त्यावर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज मिळण्याकरिता दाखल केला आहे.
2. तक्रारअर्जातील थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार ही फर्म 2004 सालापासून सांगली येथे कर्टन क्लॉथ, कोचिंग क्लॉथ, फोम, कोचिंग मटेरियल इ. साहित्य विक्रीचा व्यवसाय गेले 5-6 वर्षापासून करीत आहेत. तक्रारदार क्र.1 व 2 हे तिचे प्रोप्रायटर आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या फर्मचे साहित्य व फर्निचरचा विमा जाबदार क्र.1 या इन्शुरन्स कंपनीकडे उतरविलेला असून त्यांच्या नियमाप्रमाणे देय होणारे हप्ते वेळोवेळी भरले आहेत. सदर विमा पॉलिसी क्र. 162600/48/2009/2415 ही दि.20/12/08 ते 19/12/09 या कालावधीकरिता नूतनीकरण करुन घेतलेली होती. सदर पॉलिसीने तक्रारदारांचे फर्ममधील सर्व साहित्य, माल, फर्निचर इ. वस्तूंची रिस्क जाबदारांनी कव्हर केली होती. त्यामुळे सदर कालावधीत तक्रारदार फर्मचे जे काही नुकसान होईल, ती नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी जाबदारांवर आहे आणि त्याअर्थी तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत.
तक्रारदारांचे पुढे म्हणणे असे की, सन 2008 ते 2009 या कालावधीमध्ये विमा पॉलिसी अस्तित्वात असताना दि.29/9/2009 रोजी एकूण रु.9,78,372/- चा माल हजर स्टॉकमध्ये होता. त्याशिवाय सदर फर्ममध्ये तक्रारदारांनी रु.1 लाख खर्च करुन व्यवसायासाठी नवीन फर्निचर व शो पीस म्हणून 2 सोफे इ. साहित्य ठेवलेले होते. दि.29/9/2009 रोजी रात्री 12.00 ते 1.00 वाजणेचे दरम्यान सांगली शहरात भरपूर पाऊस पडला व रस्त्यावर पाणी जमा झाले. सदरच्या पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत जाऊन तक्रारदाराच्या फर्ममध्ये शिरले व त्या पाण्याची पातळी 2.5 ते 3 फूटापर्यंत दुकानामध्ये होती. सदर साठलेल्या पाण्यामध्ये तक्रारदार फर्ममधील सर्व साहित्य, फर्निचर इ. भिजून पूर्णपणे खराब झाले. सदर नुकसानीची माहिती तातडीने जाबदारांना फोनवरुन दि.30/9/09 रोजी सकाळी 10.45 वा. दिली व त्याचदिवशी सदर बाबतीत लेखी माहिती जाबदार विमा कंपनीचे एजंट श्री सुधाकर पाटील यांच्यासोबत जावून दिली. तद्नंतर जाबदार कंपनीचे अधिकृत व्हॅल्युअर व वरिष्ठ अधिकारी इ. इसमांनी फर्ममध्ये येवून संपूर्ण स्थितीची पाहणी केली व फोटोग्राफ्स काढून घेतले. सर्व्हेअर यांनी खराब झालेल्या मालाची सविस्तर किंमतीसह एक यादी तयार करुन घेतली व त्याची प्रत तक्रारदारांना देवून अस्सल प्रत, फोटोग्राफस इ. जाबदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व व्हॅल्युअर घेवून गेले. सदर सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे खराब झालेला एकूण माल व फर्निचर याची एकूण किंमत रु.7,88,785/- एवढी होते. रु.2,69,713/- चा माल विक्रीसाठी योग्य असा शिल्लक राहिला होता. सदर माल, साहित्य व फर्निचर यांचा विमा उतरविला असल्यामुळे सदर पॉलिसीने जाबदारांवर खराब झालेल्या फर्निचर व साहित्याची किंमत रु.7,88,785/- तक्रारदारांना देण्याची जबाबदारी होती व आहे. त्यानुसार तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुन देखील जाबदारांनी नुकसान झालेल्या मालाचा व साहित्याचा क्लेम तक्रारदारास दिलेला नाही. उलट दीर्घ विलंबाने म्हणजेच दि.5/4/2010 रोजी तक्रारदार फर्मचे भिंतीतून पाणी येत असल्याचे व भिंतीस क्रॅक गेल्याचे कारण पुढे करुन तक्रारदाराचे झालेले नुकसान सदर विमा पॉलिसीस अनुसरुन कव्हर होत नसल्याचे जाबदार यांनी कळविले व क्लेम नामंजूर केला. त्यायोगे जाबदार यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. अशा एकूण कथनावरुन तक्रारदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई व त्यावर व्याज मागितलेले आहे व त्यासोबत शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- मागितलेले आहेत.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.5 च्या यादीने 10 कागद दाखल केले आहेत.
3. सदरकामी जाबदार विमा कंपनीने नि.11 ला आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण तक्रार व म्हणणे अमान्य केले आहे. तक्रारीमधील संपूर्ण बाबी जाबदार यांनी स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. तथापि, वादातील इन्शुरन्स पॉलिसी ही श्री अब्दुल वाहिदखान व श्री एन.एस.पाशा यांच्या नावाने होत्या ही बाब जाबदार यांनी मान्य केली आहे. जाबदारांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांची सदरचा क्लेम हा फुगवून आणि खोटे नुकसान दाखवून दाखल केलेला आहे. सदरच्या घटनेत तक्रारदार म्हणतात एवढया रकमेचे नुकसान झालेले नव्हते. घटनास्थळाचे निरिक्षण करता असे आढळून आले होते की, सदर दुकानात केवळ 2 ते 2.5 फूट उंचीपर्यंत पाणी साठलेले होते. तथापि, सदर दुकानामध्ये जवळपास 7 ते 8 फूट उंचीचे कापडांचे गठ्ठे ठेवलेले होते त्यामुळे तक्रारदार म्हणतात एवढे त्यांचे नुकसान झालेले नव्हते. तसेच ज्या वास्तूत सदरचे दुकान होते त्या वास्तूचे बांधकाम सदोष होते. सदरचे दुकान हे जमीनीच्या पातळीपासून जवळपास 7 ते 8 फूट खाली आणि जमीनीच्या पातळीपासून साधारण 3 ते 4 फूट उंचीवर होते. आजूबाजूला असलेल्या इतर दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी गेल्याचे आढळून आलेले नाही तसेच त्या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे आढळून आलेले नाही, फक्त तक्रारदाराच्याच दुकानामध्ये पाणी शिरल्याचे दिसते हे केवळ बांधकामाच्या असलेल्या दोषांमुळे घडले. दुकानाच्या भींतीच्या बाजुला त्या संबंधीत इमारतीचा पाण्याचा साठा केल्याचे दिसते आणि त्या पाण्याच्या साठयातून तक्रारदारांच्या दुकानात पाणी शिरल्याचे दिसून आले, हे पावसाचे पाणी नव्हते, त्यामुळे तक्रारदाराचे अपघाताने नुकसान झालेले नसून त्याबाबत जाबदारांची कोणतीही भरपाई देण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे जाबदार तक्रारदारांना काहीही देणे लागत नाहीत. जाबदारांनी तक्रारदाराचा क्लेम हा सुयोग्यरित्या नाकारलेला असून त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही किंवा सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे सदरची तक्रार चालण्यास पात्र नाही या व अशा इतर कथनांवरुन जाबदार यांनी सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रारीसोबत झालेल्या नुकसानीचे परिशिष्ट व विमा पॉलिसी आणि इतर कागदपत्रे दाखल केली आहेत. तद्वतच जाबदारांमार्फत नि.13 सोबत घटनास्थळावरुन घेतलेले फोटोग्राफ्स, संबंधीत विमा पॉलिसीचा नमुना, सर्व्हे रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.3 ला शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच नि.16 ला जाबदार यांचे कैफियतीला प्रतिउत्तर शपथेवर दाखल केले आहे.
5. सदर कामी युक्तिवाद संपल्यानंतर तक्रारदारांतर्फे नि.27 ला पुरसिस दाखल करण्यात आली असून त्यात तक्रारदारांनी सदर घटनेत केवळ जेवढा त्यांचा माल खराब झाला त्या मालाच्या किंमतीइतकीच म्हणजे रु.2,80,000/- इतपत आपली नुकसान भरपाईची मागणी सीमीत केली आहे. त्यात तक्रारदारांचे असे म्हणणे की, सदर घटनेत त्यांचा काही माल पूर्णपणे भिजला होता व काही माल पाण्याने अर्धवट भिजला होता. त्यापैकी अर्धवट भिजलेल्या मालाची नुकसान भरपाई वगळता पूर्ण भिजलेल्या मालाची किंमत रु.2,80,000/- इतकी होते व तेवढी नुकसान भरपाई जाबदार विमा कंपनीकडून विनाव्याज तक्रारदारास देवविण्यास हरकत नाही. सदर पुरसिसवरुन हे स्पष्टपणे दिसून येते की तक्रारदारांनी आपल्या नुकसान भरपाईच्या मागणीतील मोठा भाग सोडून दिलेला आहे आणि ही नुकसान भरपाई रु.2,80,000/- पर्यंतच सीमीत केलेली आहे.
6. प्रस्तुतच्या घटनेच्या वेळेस तक्रारदारांनी जाबदार विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली होती व ती घटनेच्या दिवशी अस्तित्वात होती व त्यायोगे नैसर्गिक आपत्तीनुसार होणा-या नुकसानीची भरपाई करुन देण्याची जबाबादारी जाबदार यांनी स्वीकारली होती ही बाब जाबदार यांनी अमान्य केलेली नाही. तथापि, त्यांचे म्हणणे असे की, तक्रारदाराचे नुकसान हे पावसाच्या पाण्याने झालेले नसून सदोष बांधकामामुळे सदर दुकानगाळयात पाणी शिरुन झालेले असल्यामुळै विमा कंपनी तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. विमा कंपनीच्या या कथनामध्ये आम्हांस तथ्य वाटत नाही. घटनेच्या दिवशी भरपूर पाऊस होवून दुकानामध्ये पाणी शिरले होते ही बाब जाबदार यांनी नाकबूल केलेली नाही. त्यांनी आपल्या कैफियतीत जी कथने केलेली आहेत त्या कथनांच्या शाबीतीकरणाची जबाबदारी ही जाबदार यांचेवर होती. सदोष बांधकामामुळे बाजूच्या पाण्याच्या साठयामधून तक्रारदारांच्या दुकान गाळयात पाणी शिरले व त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले ही बाब सिध्द करणारा कोणताही पुरावा जाबदार विमा कंपनीने दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरची कथने ही पुराव्यानिशी शाबीत झालेली नाहीत असे म्हणावे लागेल. आम्ही हे वर नमूद केलेच आहे की, सदर घटनेवेळी जोरदार पाऊस झाला व दुकानात पाणी शिरले ही बाब जाबदार विमा कंपनीने स्पष्टपणे नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची कथने ही अमान्य करण्यासारखी कोणतीही कारणे दिसत नाहीत. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुरसिसमध्ये त्यांनी नुकसान भरपाईचा दावा हा मोठया प्रमाणात घटविलेला आहे या बाबीला योग्य ते मूल्य द्यावे लागेल. सदर पुरशिशीला जाबदार यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही त्यामुळे आमचे असे मत आहे की, सदर घटनेत पावसाचे पाणी तक्रारदाराच्या दुकानामध्ये शिरुन तक्रारदाराचे रु.2,80,000/- एवढे नुकसान झाले व त्या नुकसानीची भरपाई जाबदार विमा कंपनीने करुन देणे क्रमप्राप्त आहे. तसे न करता जाबदार विमा कंपनीने काही अयोग्य कारणांवरुन जाबदारांचा नुकसान भरपाईचा दावा नाकारलेला आहे व त्यायोगे तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असून सदोष सेवा दिलेली आहे असे आमचे मत झाले आहे. त्यामुळे सदरची तक्रार ही मान्य करुन तक्रारदारांना एकूण भरपाई रु.2,80,000/- तसेच त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.50,000/- व सदर तक्रारीचा खर्च रु.3,000/- अशी रक्कम विमा कंपनीने तक्रारदारास द्यावी असे आम्हांस वाटते. त्यामुळे सदर प्रकरणी आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार ही अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास झालेल्या नुकसानीबद्दल रक्कम रुपये 2,80,000/- (अक्षरी रुपये दोन लाख ऐंशी हजार माञ) व त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार माञ) सदर आदेशापासून 30 दिवसांचे आत द्यावेत. अन्यथा तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 वा 27 मधील तरतूदींनुसार दाद मागू शकतील.
3. तसेच वर नमूद रकमेवर जाबदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केले तारखेपासून म्हणजे दि. दि.6/5/2010 पासून द.सा.द.शे.8.5% व्याज तक्रारदारास द्यावे.
4. तसेच जाबदार यांनी तक्रारदार यांना रु.3,000/- तक्रारीचा खर्च म्हणून द्यावेत.
सांगली
दि. 12/03/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.