नि.23
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – सौ वर्षा शिंदे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 346/2010
तक्रार नोंद तारीख : 16/07/2010
तक्रार दाखल तारीख : 17/07/2010
निकाल तारीख : 03/08/2013
----------------------------------------------
श्री किसन येसू गरांडे
वय वर्षे 38, व्यवसाय नोकरी/शेती,
रा.लिंगनूर, ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
डिव्हीजनल ऑफिस नं.1:15,
एडी कॉम्प्लेक्स, फर्स्ट फ्लोअर, माऊंट रोड,
सदर नागपूर – 10
2. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि.
जायका बिल्डींग, सिव्हील लाईन्स,
नागपूर 01 ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री पी.के.जाधव
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड श्री के.ए.मुरचिटे
जाबदारक्र.2 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य पशुविमा दावा नाकारलेने दाखल करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला क्र.1 व 2 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर सामनेवाला क्र.1 हे वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. नि.1 वर सामनेवाला क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत. सामनेवाला क्र.2 नोटीस बजावूनही गैरहजर. आजरोजी हे मंच त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी -
तक्रारदार लिंगनूर गावचा रहिवासी असून त्याने त्याच्या गायीचा विमा सामनेवाला क्र.1 कंपनीकडे दि.28/3/08 रोजी सामनेवाला क्र.1 यांचे अधिकृत एजंट नं.2 मार्फत उतरविला होता. सदर विमा हप्त्याची रक्कम रु.562.50 रोखीने भरलेली होती. सामनेवालांकडून तक्रारदारास पशुविमा पॉलिसी क्र. 161107/47/08/01/00000208 मिळालेली आहे. पॉलिसीचा कालावधी दि.28/3/2008 ते 27/3/2009 चे मध्यरात्रीपर्यंत होता. सदर गायीच्या विमासंरक्षणाची रक्कम रु.25,000/- होती. गायीच्या उजव्या कानात असणारा बिल्ला क्रमांक हा OIC/81100/SNG 100301 या क्रमांकाचा होता. सदर विमा उतरविलेली गाय आजारी होती. तिच्यावर डॉ ढगे 14/7/08 पासून उपचार करीत होते. उपचारादरम्यान दि.21/7/08 रोजी पहाटे गाय मयत झाली. मयत गायीचा पंचनामा ग्रामपंचायत लिंगनूरचे सरपंच व पाच साक्षीदारांच्या समोर केला तसेच नमूद गावचे पोलीस पाटील यांनीही दोन पंचासमक्ष पंचनामा केलेला आहे. मयत गायीचे शवविच्छेदन सदरदिवशी सकाळी 11.00 वा. सरकारी डॉ ए.बी.ढगे यांनी केले. गट नं.632 मध्ये मयत गायीस पुरले आहे. त्यावेळी सरपंच पोलिस पाटील पंच व इतर लोक उपस्थित होते.
गाय मयत झालेनंतर तक्रारदाराने विमा पॉलिसीप्रमाणे योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला यांचेकडे पशुविमा दावा दाखल करुन रक्कम रु.25,000/- ची मागणी केली. मात्र सामनेवालाचे मंडल प्रबंधक यांनी पत्र पाठवून गायीच्या कानाचा बिल्ला गायीच्या कानाच्या तुकडयासहीत नसलेने क्लेम नामंजूर केल्याचे कळविले. वस्तुतः तक्रारदाराने बिल्ला पाठवूनही तसेच अशा अटी शर्ती सामनेवालाने तक्रारदारास सांगितल्या नव्हता, तरीही अशा निरर्थक कारणास्तव तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. त्यामुळे दि.21/1/2010 रोजी तक्रारदाराने अॅड चौगुले यांचेमार्फत सामनेवालांना वकील नोटीस पाठवून वर नमूद रकमेची व्याजासह मागणी केली. तरीही सामनेवालाने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे प्रस्तुत मे. मंचासमोर तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्यामुळे सामनेवालास मानसिक त्रास झालेला आहे व आर्थिक नुकसानही झालेले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन गायीचे नुकसान भरपाईची रक्कम रु.25,000/- गायीचे मृत्यू तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत सदर रकमेवर द.सा.द.शे.17 टक्केप्रमाणे व्याज सेवात्रुटीमुळेची नुकसान भरपाई रु.15,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- तक्रारदारास देणेबाबत सामनेवाला यांना हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.3 व 21 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. नि.5 चे फेरिस्ट अन्वये नि.5/1 ते 5/6 ला कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला क्र.2 नोटीस बजावूनही गैरहजर. त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. सामनेवाला क्र.1 वकीलांमार्फत हजर झाले. त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.
5. तक्रारदाराची तक्रार, त्याने दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे आमच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी
केली आहे काय ? होय. सामनेवाला
क्र.1 यांनी
3. तक्रारदार विमा रक्कम तसेच अन्य मागणी केलेल्या रकमा
मिळणेस पात्र आहेत काय ? होय. सामनेवाला
क्र.1 कडून.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
6. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्यांचे एजंट सामनेवाला क्र.2 मार्फत तक्रारदाराच्या गायीचा विमा उतरवून पॉलिसी क्र. SNG 100301 दाखल केली आहे. सबब तक्रारदार सामनेवालाचा ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
7. सामनेवाला क्र.1 यांनी नि.10 वर दि.19/5/2011 रोजी अर्ज दाखल करुन नो से आदेश रद्द होवून म्हणणे दाखल करुन घेणेबाबत विनंती केली होती. तत्कालीन मा.मंचाने त्यावर तक्रारदाराने म्हणणे द्यावे असा आदेश पारीत केला होता. मात्र त्यावर तक्रारदाराने म्हणणे दिलेले नाही. सामनेवाला क्र.1 ने तदनंतर दि.11/8/11 रोजी वकालतनामा व पत्ता मेमो दाखल केला. मात्र सदर अर्जावर निर्णय होणेचे दृष्टीने कार्यवाही केले दिसून येत नाही. तदनंतर दि.15/6/12 रोजी सामनेवाला क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी दि.19/5/11 अर्जासोबत दाखल केलेने म्हणणे पुराव्यात वाचता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 हजर नाहीत. त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. मात्र तक्रारदार व सामनेवाला क्र.1 चे वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे.
8. नि.5/1 वर प्रस्तुत गायीचा विमा उतरविल्याची पॉलिसी दाखल आहे. त्याबाबत वाद नाही. नमूद विमा उतरविलेली गाय मयत होवून मयत गायीची विल्हेवाट लावलेली आहे हे तक्रारदाराने सामनेवालांकडे दाखल नि.5/3 ते 5/6 अन्वये कागदपत्रे दाखल करुन विमा पॉलिसीप्रमाणे रक्कम रु.25,000/- ची मागणी केली होती. मात्र सदर तक्रारदाराचा पशुविमा दावा सामनेवाला क्र.1 यांनी 5/2 वर दाखल असलेल्या दि.11/8/09 चे पत्राने नाकारलेला आहे. सदर पत्रामध्ये ‘ कान का बिल्ला यह कान के टुकडे के साथ लगा हुआ नहीं है इसलिए यह दावा नामंजूर किया जाता है ‘ या कारणास्तव नाकारलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदाराने वेळेत विमादावा दाखल करुन मागणी केलेचे दिसून येते व सदर कारणास्तव विमादावा नाकारलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
9. सामनेवालाने सदरचा क्लेम कानाचा बिल्ला हा कानाच्या तुकडयासहीत नलसेने नाकारलेला आहे. कानाचा बिल्ला सामनेवाला कंपनीकडे पाठवलाच नव्हता असे सामनेवाला यांचे म्हणणे नाही. काया मानवी असो वा जनावराची असो, त्याचे मृत शरीर नाशवंत आहेत. सडण्याची/कुजण्याची प्रक्रिया लगेच सुरु होते. जनावर मृत झाले तर त्याचा पंचनामा त्वरीत करुन सदर मृत शरीराची पुरुन ताबडतोब विल्हेवाट लावली जाते. तसेच यापूर्वी ब-याच प्रकरणामध्ये कानाच्या तुकडयासहीत बिल्ला पाठविला असता त्यामध्ये आळया होतात, असे बरेचवेळेला निदर्शनास आलेले आहे. अशा परिस्थितीत जनावराचे कानासहीत बिल्ला नसल्याने विमा दावा रक्कम नाकारणे हे आजच्या आधुनिक युगात, जिथे आरोग्याच्या बाबतीत विविध रोग स्वाईन फल्यू, चिकन गुनीया, डेंग्यू व मलेरिया व इतर संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखनेसाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत असताना, विमा कंपनी मात्र जनावराच्या कानासहीत बिल्ला पाठवणेचे अटीबाबत आग्रही राहून विमा दावा नाकारत आहे. सदरची अट ही अयोग्य, आरोग्यास घातक आहे. तसेच सदरची अट ही निर्णायक नसून मार्गदर्शक स्वरुपाची आहे. सबब तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सामनेवाला क्र.2 ब्रोकरेज कंपनी केवळ मध्यस्थाचे काम करीत असल्यामुळे विमा रक्कम देणेबाबत त्यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3
11. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन केलेल्या सेवात्रुटीमुळे पॉलिसीप्रमाणे विमा रक्कम रु.25,000/- व सदर रकमेवर क्लेम नाकारले तारीख दि.11/8/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराप्रमाणे व्याज व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कम देण्यास केवळ सामनेवाला क्र.1 हे जबाबदार आहेत.
12. तक्रारदारांचे वकीलांनी नि.22 वर मानसिक त्रासापोटीची रक्कम सोडून देत असलेबाबत पुरसीस दाखल केलेली आहे. त्यामुळे मूळ तक्रारअर्जामध्ये मानसिक त्रासापोटी तक्रारदाराने केलेली मागणी तक्रारदाराने सोडून दिल्यामुळे ती मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 25,000/- (अक्षरी रुपये
पंचवीस हजार माञ) दि.11/8/2009 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह अदा करावेत.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 यांनी तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन
हजार माञ) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
5. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 03/08/2013
( सौ मनिषा कुलकर्णी ) (सौ वर्षा शिंदे )
सदस्या प्रभारी अध्यक्ष