नि.क्र. २३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र.२७८/२०१०
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ११/६/२०१०
तक्रार दाखल तारीख : १४/६/२०१०
निकाल तारीख : २७/९/२०११
------------------------------------------
श्री अशोक तायाप्पा गायकवाड
वय वर्षे – ५०, व्यवसाय – शेती व घरकाम
रा. नेर्ली ता.कडेगाव, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.
डिव्हीजन ऑफिस नं.२, ८, हिंदुस्थान कॉलनी,
अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – ४४००१५
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. एम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे : +ìb÷. के.ए.मुरचुटे
जाबदारक्र.२ : स्वत:
जाबदारक्र.३ : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे वडील कै.तायाप्पा दाजी गायकवाड हे शेतकरी होते. सदर कै.तायाप्पा दाजी गायकवाड यांचा दि.१९/२/२००९ रोजी अपघात झाला व त्यातच त्यांचे दि.२१/३/२००९ रोजी निधन झाले. तक्रारदार हे त्यांचे सुपुत्र व कायदेशीर वारस आहेत. सदर तक्रारदार यांनी विमा योजनेनुसार रक्कम मिळणेकरिता मार्च २००९ मध्ये गावकामगार तलाठी नेर्ले यांचेकडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर गावकामगार तलाठी नेर्ले यांनी योग्य त्या शिफारशीसह सदरचा प्रस्ताव तहसिलदार कडेगाव यांचेकडे पाठविला. तहसिलदार कडेगाव यांनी सदरचा प्रस्ताव योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. परंतू जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा दि.६/४/२०१० च्या पत्राने खोटया कारणास्तव नाकारला. त्यामुळे विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेले आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने १० कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.१ व महाराष्ट्र शासन यांचेतील झालेल्या करारानुसार सदरची विमा पॉलिसी ही १२ ते ७५ वयोगटातील शेतक-यांसाठी होती व आहे व ही पॉलिसीमधील अत्यंत महत्वाची अट आहे. तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांचे वयाबाबतचा योग्य तो पुरावा अनेकवेळा आणण्यास सांगूनही तक्रारदार यांनी वयाबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टवर तक्रारदार यांचे वडिलांचे वय ७० दर्शविले आहे परंतु ते चुकीचे आहे मयताच्या वारसाने जाबदार यांचेकडे सादर केलेल्या शपथपत्रामध्ये तक्रारदार यांचे वय ६० दर्शविले आहे. यावरुन मृत्यूसमयी तक्रारदार यांचे वडीलांचे वय निश्चितच ७५ पेक्षा जास्त होते व सदरची बाब तक्रारदार यांनी लपवून ठेवण्यासाठी वयाचा कोणताही पुरावा दिला नाही अथवा मंचासमोर आणला नाही. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे मुदतीत विमाक्लेम सादर केला नाही. तक्रारदार यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे विमाक्लेम मिळणेसाठी अर्ज सादर केला आहे. तक्रारदार यांचे वडील शेतकरी नाहीत. तक्रारदार यांचे वडीलांचे आडनावामध्ये तफावत आहे. या सर्व कारणांचा विचार करता तक्रारदार यांचा विमादावा फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१६ ला शपथपत्र व नि.१७ चे यादीने १ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार नं.३ यांना नोटीसची बजावणी होऊनही ते याकामी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
५. जाबदार क्र.२ यांनी नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी सदरचे विमा करारामध्ये जाबदार क्र.२ यांची जबाबदारी केवळ सल्लागाराची आहे व शेतक-यांकडून आलेले विमादावे तपासण्याचे काम जाबदार क्र.२ करतात व कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची पूर्तता करुन घेवून विमा कंपनीकडे विमाप्रस्ताव दाखल करण्याचे काम जाबदार क्र.२ करतात. त्यामुळे सदर जाबदार यांचेवर कोणतेही दायित्व येत नाही असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१३ वर परिपत्रक हजर केले आहे. तक्रारदार यांनी नि.१९ वर लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. जाबदारतर्फे नि. २० वर लेखी युक्तिवाद केला आहे. तक्रारदारतर्फे नि.२२ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
६. तक्रारदाराचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार १ यांचेबरोबर विमा करार केला आहे त्यामुळे मयत शेतकरी व त्यांचे कुटुंबिय हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो, त्यामुळे तक्रारदार या मयत शेतकरी तायाप्पा दाजी गायकवाड यांचा मुलगा आहे हे नि.५/१ वरील कागदपत्रांवरुन दिसून येते. मयत तायाप्पा दाजी गायकवाड यांच्या इतर वारसांनी सदरची रक्कम तक्रारदार यांचे नावे मिळण्यास हरकत नाही असे संमतीपत्र लिहून दिले आहे. सदरचे संमतीपत्र नि.५/८ वर दाखल आहे. त्यामुळे तक्रारदार हे लाभार्थी म्हणून ग्राहक होतात असे या मंचाचे मत आहे.
७. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार यांनी नि.१७ ला पॉलिसीबाबत झालेले करारपत्र हजर केले आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.१५/८/२००७ ते १४/८/२०१० असा असल्याचे दिसून येते. सदर नि.१७ वरील पॉलिसीबाबतच्या करारपत्रावरुन राज्यातील शेतक-यांचा विमा जाबदार क्र.१ यांचेकडे उतरविल्याचे दिसून येते. तक्रारदार यांच्या वडीलांचे निधन दि.२१/३/२००९ रोजी पॉलिसी मुदतीत झाले आहे ही बाब समोर येते.
८. सदर पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार अपघातग्रस्त मयत व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व मृत्यूसमयी तिचे वय १२ ते ७५ वयोगटातील असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी नि.५/२ वर मौजे नेर्ली येथील सातबारा उतारा व खातेउतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर मयताचे नाव तायाप्पा दाजी चांभार असे नमूद आहे. परंतु तायाप्पा दाजी चांभार व तायाप्पा दाजी गायकवाड या दोन्ही नावाच्या एकच व्यक्ती आहेत असा गावकामगार तलाठी नेर्ली यांचा दाखला तक्रारदार यांनी नि.५/३ वर दाखल केला आहे. मयत तायाप्पा गायकवाड यांचे पश्चात त्यांच्या वारसांची नावे नमूद करण्यात आली आहेत यावरुन तक्रारदार यांचे पूर्वहक्कदार हे शेतकरी होते ही बाब समोर येते. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पती शेतकरी असल्याबाबतची बाब नाकारली आहे. परंतु त्याच्या पृष्ठयर्थ जाबदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांचे वडील शेतकरी नाहीत असे जाबदार यांनी आपले म्हणणेमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे वडील हे शेतकरी नव्हते हे सिध्द करण्याची संपूर्ण जबाबदारी जाबदार यांची आहे व जाबदार यांनी त्याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचे वडील हे शेतकरी होते व आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
९. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा ज्या कारणासाठी नाकारला, ते विमा दावा नाकारलेचे पत्र नि.५/१० वर दाखल आहे. सदरचे पत्र दि.६/४/२०१० रोजीचे आहे. त्यामध्ये अपघातग्रस्त मयत व्यक्तीच्या वयाबाबत पुरावा सादर केला नाही व मयत व्यक्तीच्या आडनावामध्ये तफावत आढळून येते. आडनावामधील तफावतीबाबतचा ऊहापोह वर विवेचनामध्ये केला आहे. अपघातसमयी मयत व्यक्तीचे वय हे ७५ वर्षापेक्षा जास्त होते असे जाबदार यांनी नमूद केले आहे. मयत व्यक्तीचे वय किती होते याबाबत मंचासमोर आलेला पुरावा पाहता तक्रारदार यांनी त्याबाबत पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिका-यांनी मयताचे वय ७० वर्षे दर्शविले आहे. तसेच तक्रारदार यांनी सरपंच ग्रामपंचायत नेर्ली यांच्या दाखल्याची प्रत नि.२० च्या यादीने दाखल केली आहे त्यामध्ये सरपंच ग्रामपंचायत नेर्ली व ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांनी स्थानिक चौकशीवरुन मयताचे वय ७० वर्षे घोषीत केले आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत त्यांच्या रेशनकार्डची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. त्यामध्ये तायाप्पा दाजी गायकवाड यांचे वय ६५ दर्शविले आहे. सदरचे रेशनकार्ड हे २००० साली काढण्यात आले आहे व तक्रारदार यांचे वडिलांचा मृत्यू सन २००९ मध्ये झाला आहे. यावरुन रेशनकार्ड विचारात घेता त्यांचे वय मृत्यूसमयी साधारण ७४ वर्षे असलेचे दिसून येते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांवरुन मृत्यू समयी मयत तायाप्पा गायकवाड यांचे वय ७५ च्या आत असलेचे दिसून येते. जाबदार यांनी मयताचे वय ७५ पेक्षा जास्त असावे हे दर्शविण्यासाठी मयताच्या वारसांनी सन २००९ मध्ये जाबदार यांचेकडे करुन दिलेले शपथपत्र याच्याकडे मंचाचे लक्ष वेधले. सदरचे शपथपत्राची प्रत नि.५/८ वर दाखल आहे. त्यामध्ये मयताचा थोरला मुलगा ईश्वर तायाप्पा गायकवाड यांनी त्यांचे वय ६० वर्षे नमूद केले आहे. त्यामुळे मयताचे वय त्यांच्या पेक्षा १८ वर्षांनी जास्त असले पाहिजे म्हणून मृत्यूसमयी मयताचे वय ७५ पेक्षा जास्त आहे असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. जाबदार यांनी केलेला युक्तिवाद हा तार्किक आहे. जाबदार यांनी मयताच्या वयाबाबत कोणताही स्पष्ट कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. महाराष्ट्र शासनाबरोबर झालेल्या नि.१७/१ वरील विमाकराराचे अवलोकन केले असता परिच्छेद ५ मध्ये वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, मतदानकार्ड, शाळेचा मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राहय धरले जाईल असे नमूद केले जाईल. तक्रारदार यांनी वयाच्या पुराव्याबाबत एकूण ३ कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यामध्ये शवविच्छेदन अहवाल, रेशनकार्ड, तसेच ग्रामपंचायत दाखला सादर केले आहेत. या सर्व कागदपत्रांवरुन मयताचे वय मृत्यूसमयी ७५ पेक्षा कमी असल्याची बाब समोर आलेली आहे. तक्रारदार यांचा वयाबाबतचा पुरावा खोडून काढणेसाठी जाबदार यांनी कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे तायाप्पा गायकवाड यांचे वय मृत्यूसमयी ७५ पेक्षा जास्त होते ही बाब जाबदार यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करता तक्रारदारांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
१०. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये विमादाव्यापोटी रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. त्यामुळे सदरची रक्कम विमादावा नाकारलेपासून व्याजासह मंजूर करण्यात येत आहे.
११. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव नाकारलेने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
१२. यातील जाबदार ३ हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासनाने जाबदार २ यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार १ यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार नं.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये १,००,०००/-(अक्षरी रुपये एक
लाख माञ) दि.६/४/२०१० पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक १२/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक
संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११