::: आ दे श :::
( पारित दिनांक : 22/09/2014 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
दिनांक 15/03/2013 रोजी सकाळी 11.00 वाजता मृतक मनोज सदाशिव मोहळे हे अॅटो क्रमांक : एम एच-37/जी-2668 ने कोंडाळा-झामरे ते वाशिम रोडने येत होते. त्यावेळी त्यांचा अॅटो बिना फाटकची रेल्वे रुळ ओलांडत असतांना अचानक रेल्वे रुळावर त्यांचा अॅटो बंद पडला व इंटरसिटी एक्सप्रेसने त्या अॅटोला जबर धडक दिली. या अपघातामध्ये मनोज सदाशिव मोहळे हे गंभीररित्या जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावले तसेच अॅटोचे सुध्दा पूर्ण नुकसान झाले. सदर अॅटो हा दुरुस्त होण्याच्या स्थितीत नाही.
सदर वरील वर्णनांकीत अॅटोचा विमा विरुध्द पक्ष – विमा कंपनीकडे काढलेला होता व त्याचा पॉलिसी क्र. १८२२०२/३१/२०१३/३१८० असून विमा कालावधी दिनांक 07/09/2012 ते 06/09/2013 पर्यंत होता. सदर पॉलिसी प्रमाणे अॅटोची नुकसान भरपाई तसेच थर्ड पार्टी चालक-मालक इ. सर्व बाबी या पॉलिसीमध्ये कव्हर केल्या आहेत. अॅटोची नुकसान भरपाई म्हणून कंपनी जोखीम रुपये 1,40,000/- अंतर्भूत आहे. सदर पॉलिसी प्रमाणे अॅटोची नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ते यांनी सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिला, तसेच कागदपत्रांची सुध्दा पुर्तता केलेली आहे. विरुध्द पक्षाने नोटीस पाठवूनही अॅटोची नुकसान भरपाई दिलेली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ व दिरंगाई करुन, सेवा देण्यात उणीव व अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, वाहनाची नुकसान भरपाई रुपये 1,40,000/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन 18 % दराने व्याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास मिळावे, अशी मागणी, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 11 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब -
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्षाला नोटीस काढली. त्यानंतर निशाणी 8 प्रमाणे विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल करुन,तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे नमुद केले की, अॅटो क्रमांक : एम एच-37/जी-2668 चा विमा विरुध्द पक्ष – विमा कंपनीकडे काढलेला होता व त्याचा पॉलिसी क्र. १८२२०२/३१/२०१३/३१८० असून विम्याचा कालावधी दिनांक 07/09/2012 ते 06/09/2013 पर्यंत होता. परंतु सदर पॉलिसी प्रमाणे अॅटोची नुकसान भरपाई तसेच थर्ड पार्टी चालक-मालक इ. सर्व बाबी या पॉलिसीमध्ये कव्हर केल्या आहेत, तसेच अॅटोची नुकसान भरपाई म्हणून कंपनी जोखीम रुपये 1,40,000/- अंतर्भूत आहे, कागदपत्रांची पुर्तता केली आहे, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारले. विरुध्द पक्षाने पुढे त्यांच्या हक्कास बाधा न येता नमुद केले की, तक्रारकर्त्याच्या अॅटोचे विरुध्द पक्ष यांनी सर्व्हेअर एम.एच.खत्री यांच्यामार्फत सर्व्हेक्षण केले असून, त्यांनी दाखल केलेल्या रिपोर्टनुसार त्यावेळी सदरहू अॅटोने रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या नियमांचे पूर्णत: उल्लंघन केले. तसेच अॅटोचे नुकसान रुपये 76,591/- एवढयापर्यंत झाले आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे जर अंतिम सर्व्हेक्षण अहवालात जर 75 % ( IDV - गाडीची पॉलिसीवर दिलेली किंमत ) चे वरनुकसान झाले तर त्यावेळी पूर्णत: नुकसान भरपाई मिळते. परंतु सर्व्हेअरने दिलेल्या रिपोर्टनुसार सदरहू अॅटोचे पूर्णत: नुकसान झालेले नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 3/4/2013, 20/6/2013, 9/6/2013 आणि दिनांक 17/9/2013 ला पत्र देऊन वेळोवेळी कागदपत्रांची तसेच बिल व क्लेम निकाली काढण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची मागणी केली, परंतु आजपर्यंतही तक्रारकर्त्याने कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता केली नाही. कंपनीने क्लेम निकाली काढण्यापूर्वीच तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केली, त्यामुळे तक्रार ही मुदतपूर्व असून खारिज करण्यांत यावी. विरुध्द पक्ष हे सदरहू अपघातग्रस्त अॅटोचा वरीष्ठ सर्व्हेअरव्दारे पुन्हा सर्व्हे करण्यास तयार आहेत व तक्रारकर्त्याने सदरहू अॅटो हा मेसर्स तिरुपती मोटर्स, वाशिम येथे उपलब्ध करावा, परंतु तक्रारकर्त्याने असे सुध्दा केले नाही. तक्रारकर्ता हा अवास्तव व अवाजवी नुकसान भरपाईची मागणी करीत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यांत यावा. सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्द पक्ष यांचा प्रतिज्ञालेखावर साक्षीपुरावा, उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला.
या प्रकरणात उभय पक्षांना मान्य असलेली बाब म्हणजे, दिनांक 15/03/2013 रोजी मृतक मनोज सदाशिवराव मोहळे हे अॅटो क्रमांक एम एच-37/जी-2668 ने कोंडाळा-झामरे ते वाशिम रोडने येत होते, त्यावेळी त्यांचा अॅटो विना फाटकचे रेल्वे रुळ ओलांडत असतांना, अचानक रेल्वे रुळावर त्यांचा अॅटो बंद पडला व अकोला-हैद्राबाद जाणा-या इंटरसिटी एक्सप्रेसने त्या अॅटोला धडक दिली. त्यात मनोज मोहळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व अॅटोचे नुकसान झाले. तसेच या अॅटोचा विमा विरुध्द पक्ष – विमा कंपनीने काढलेला होता, हे विरुध्द पक्षाला मान्य आहे व या पॉलिसी कालावधीबाबत उभय पक्षात वाद नाही. विरुध्द पक्षाच्या मते या अपघातात अॅटोचे पुर्णत: नुकसान झालेले नाही व त्यांच्या सर्वेअर रिपोर्टनुसार या अॅटोचे नुकसान रुपये 76,591/- एवढेच झाले आहे. या पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे जर सर्व्हेक्षण अहवालात IDV गाडीच्या पॉलिसीमध्ये दिलेल्या किंमतीच्या 75 % च्या वर नुकसान असेल तरच पूर्णत: नुकसान भरपाई मिळते. तसेच मृतकाने रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे, त्यामुळे हा अपघात त्याच्या चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. परंतु तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांमध्ये असे कुठेही दिसून येत नाही की, मृतक मनोज यांनी रेल्वे रुळ ओलांडतांना नियमांचे उल्लंघन केले. कारण दाखल दस्तऐवजांवरुन असा निष्कर्ष निघतो की, अपघातस्थळावर रेल्वे फाटक नव्हते तसेच तिथे कोणत्याही रेल्वे कर्मचा-याची डयुटी लावलेली नव्हती, त्यामुळे विरुध्द पक्षाचा हा बचाव स्विकारता येणार नाही. तसेच रेकॉर्डवर दाखल असलेल्या दस्तांवरुन असे दिसते की, अपघातातील अॅटो हा नवीन होता व अपघाताच्या वेळेस सर्व्हे रिपोर्टनुसार अॅटो हा फक्त 5978 किलोमिटर चालला होता. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअरने नियमानुसार घसारा किंमत काढलेली नाही. कारण सर्व्हेअरच्या तक्त्यानुसार देखील नुकसानीची अंदाजीत किंमत ही रुपये 1,61,461/- दर्शविलेली आहे. सबब सर्व्हेअरने काढलेल्या अॅटोच्या नुकसान भरपाई बाबतचे मुल्यांकन बद्दल मंचाला त्रुटी दिसून येतात व म्हणून विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला न्यायनिवाडा या प्रकरणात लागू पडत नाही, असे मंचाचे मत आहे. रेकॉर्डवर दाखल असलेल्या पॉलिसीच्या प्रतिवरुन असे दिसून येते की, सदर वाहनाच्या मालक-चालकाची जोखीम (रिस्क) या पॉलिसीत अंतर्भूत आहे. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना अॅटोची नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,40,000/- तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 3,000/- दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना अॅटोची, पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम, रुपये 1,40,000/- (रुपये एक लाख चाळीस हजार फक्त) दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रार खर्च रुपये 3,000/-
- तीन हजार फक्त) दयावा.
- तक्रारकर्ते यांच्या इतर मागण्या फेटाळण्यांत येतात.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.