Maharashtra

Sangli

CC/11/268

Smt.Archana Ajay Walvekar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd., through Sr.Div.Manager, Shri.Arunabh Bardhan etc., 3 - Opp.Party(s)

M.N.Shete

02 Mar 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/268
 
1. Smt.Archana Ajay Walvekar
Bhilavadi, Tal.Palus, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co.Ltd., through Sr.Div.Manager, Shri.Arunabh Bardhan etc., 3
Division Office No.2, 8, Hindusthan Colony, Nr.Ajani Chowk, Wardha Road, Nagpur - 400 015.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  K.D. Kubal MEMBER
 
PRESENT:M.N.Shete, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

 
                                               नि.क्र. 27   
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्‍यक्ष श्री.ए.व्‍ही.देशपांडे
मा.सदस्‍य – श्री.के.डी.कुबल
तक्रार अर्ज क्र. 268/2011
------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   : 20/09/2011
तक्रार दाखल तारीख   13/10/2011
निकाल तारीख          02/03/2013
-----------------------------------------------
 
१. श्रीमती अर्चना अजय वाळवेकर
    वय वर्षे 37, व्‍यवसाय शेती व घरकाम
    रा.भिलवडी, ता.पलूस, जि. सांगली.                    ...... तक्रारदार
   विरुध्‍द
 
१. दि ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,
    डिव्‍हीजन ऑफिस नं.2,8 हिंदुस्‍थान कॉलनी,
    अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – 400 015 चे
    वरिष्‍ठ विभागीयव्‍यवस्‍थापक, श्री.अरुणाभ बर्धन,
    व.व.सज्ञान, धंदा – नोकरी.
२. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.
    101, शिवाजी नगर, 3 रा मजला,
    मंगला टॉकीज जवळ, पुणे 411005 चे
    विभागीय प्रमुख, श्रीमती सुचेता प्रधान,
    व.व.सज्ञान, धंदा – नोकरी.
३. मा.जिल्‍हा कृषी अधिक्षक,
    व.व.सज्ञान, व्‍यवसाय – नोकरी,
    जिल्‍हा कृषी अधिक्षक कार्यालय, मिरज रोड, सांगली.         ..... जाबदार
                                                            तक्रारदार तर्फे  : अॅड एम.एन. शेटे
                                               जाबदारक्र.1 तर्फे : अॅड  के.ए.मुरचिटे
                                                जाबदारक्र.2 व 3 : हजर
                                                 जाबदारक्र. 3   : गैरहजर.
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देश्‍पांडे 
1.    तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार मयत शेतकरी अजय बळवंत वाळवेकर याचे वारस म्‍हणून दाखल केलेला आहे. 
2.  थोडक्‍यात हकिकत अशी की - मयत अजय बळवंत वाळवेकर हा शेतकरी दि.11/09/08 रोजी रात्री 23.00 वाजता सांगली टिळक चौक येथे ट्रॅक्‍टर अंगावरुन गेल्‍याने जखमी झाला व त्‍यास जखमी अवस्‍थतेत मिरज मिशन हॉस्‍पीटल येथे दाखल केले असता दि.12/09/08 रोजी 1 वाजून 10 मिनिटांनी उपचारादरम्‍यान तो मरण पावला. मयत अजय बळवंत वाळवेकर हा मौजे भिलवडी ता.पलूस, जि.सांगली येथील शेतकरी होता व त्‍यास गट नं.927 व 930 हयामध्‍ये एकूण 2 हेक्‍टर 23 आर. जमीन होती व त्‍याचा खाते नंबर 110 असा होता. सदर मृत्‍युबाबत तक्रारदारानी गावकामगार तलाठी भिलवडी यांचेकडे दि.16/03/09 रोजी क्‍लेम फॉर्म दिला व तो क्‍लेम फॉर्म तलाठयाने तहसिलदारकडे पाठविला व तहसिलदाराने त्‍यावर अहवाल देवून जाबदार क्र.3 यांचेकडे पाठवला तदनंतर सदरचा प्रस्‍ताव योग्‍य त्‍या शिफारशींसह जाबदार क्र.3 यांनी ब्रोकर जाबदार क्र.2 यांचेकडे आणि त्‍यानंतर जाबदार क्र.2 हयांनी जाबदार क्र.1 हयांचेकडे योग्‍य त्‍या शिफारशींसह तो प्रस्‍ताव पाठवला. जाबदार क्र.1 यांच्‍या मागणीनुसार तक्रारदार हयांनी वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असूनही दि.17/01/11 रोजीच्‍या पत्राने सदरचा प्रस्‍ताव खोटी कारणे देवून फेटाळलेला आहे व तशी सेवेत त्रुटी केलेली आहे. जाबदार क्र.1 व जाबदार क्र.3 हयांच्‍यात शेतक-यांची जोखीम पत्‍करण्‍याकरीता झालेल्‍या करारानुसार जाबदार क्र.1 विमा कंपनी मयत शेतक-याच्‍या वारसांना रु.1,00,000/- विमा म्‍हणून देवू लागते. क्‍लेम फॉर्म मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आत रु.1,00,000/- रक्‍कम मयत शेतक-याच्‍या वारसांच्‍या बँक खातेवर जमा करणेची जबाबदारी जाबदार क्र.1 हयांची असूनदेखील तसेच तक्रारदारांनी दिलेला क्‍लेम फॉर्म योग्‍य त्‍या अहवालासहीत व सर्व कागदपत्रांसहीत असतानादेखील जाबदार क्र.1 याने तो क्‍लेम चुकीचे कारण देवून फेटाळलेला आहे व तक्रारदारांना सदोष सेवा दिलेली आहे. सबब  तक्रारदारांना सदर विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- तसेच तक्रारदारांचा विमा दावा चुकीचे कारण देवून फेटाळला व मानसिक त्रास दिला म्‍हणून रक्‍कम रु.40,000/- तसेच रक्‍कम रु.50,000/- ही नुकसानभरपाई म्‍हणून तक्रारदारास देण्‍यास जाबदार क्र.1 जबाबदार आहेत. तशी ती रक्‍कम जाबदार क्र.1 हयांनी तक्रारदारास दयावी व विम्‍याच्‍या रकमेवर मृत्‍युच्‍या तारखेपासून दरमहा द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज तक्रारदारास देणेचा हुकूम व्‍हावा तसेच सदर अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- तक्रारदार हयास दयावी अशी मागणी तक्रारदाराने केलेली आहे. 
3.  तक्रादारानी सदरकामी नि.4 सोबत एकूण 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच नि.2 ला तक्रारीच्‍या पृष्‍ठयर्थ आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. 
4.    प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.1 आणि 2 हजर होवून त्‍यांनी आपापले लेखी म्‍हणणे नि.15 व नि.19, अनुक्रमे, ला दाखल केलेले आहेत. जाबदार क्र.3 तर्फे कोणीही हजर झालेले नसून त्‍यांचेतर्फे लेखी कैफियतदेखील दाखल झालेली नाही. त्‍यांचेविरुध्‍द कसलेही हुकूमदेखील पारीत करणेत आलेले नाहीत. तथापी प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षकारांनी आपापला लेखी पुरावा देवून युक्तिवाददेखील संपवलेला आहे. सबब प्रस्‍तुतचे प्रकरण जाबदार क्र.3 हयाचेविरुध्‍द त्‍यांचे लेखी कैफियतीवीना चालवणे क्रमप्राप्‍त आहे. 
5.    जाबदार क्र.1 हयांनी आपल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये तक्रारदाराचा संपूर्ण तक्रारअर्ज अमान्‍य केलेला असून तक्रार अर्जातील एकूणएक विधाने स्‍पष्‍टपणे नाकारलेली आहेत. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मयत अजय वाळवेकर हा ट्रॅक्‍टर अंगावरुन गेल्‍याने जखमी होवून मयत झालेला नाही. अर्जदारानी जाणीवपूर्वक खरी वस्‍तुस्थिती मंचासमोर आणण्‍याचे जाणीवपूर्वक टाळलेले आहे. मयत अजय वाळवेकर हा गणेश विसर्जनाचेवेळी मोठया प्रमाणात मदय प्राशन करुन बेधुंद अवस्‍थेत गणेश विसर्जन मिरवणुकीत सामिल झाला. त्‍यावेळेला रात्र झालेली होती. मोठया प्रमाणात मदय प्राशन केल्‍यामुळे त्‍यास कोणत्‍याही गोष्‍टीचे भान नव्‍हते त्‍याचा शरीरावर ताबा नव्‍हता. गणेश विसर्जनावेळी झालेल्‍या प्रचंड गर्दीत मदयधुंद अवस्‍थेत मयत हा स्‍वतःच खाली पडला व मयत झाला. मादक पदार्थाची नशा केल्‍यामुळे मयत हा स्‍वतः त्‍याच्‍या मृत्‍युस कारणीभूत झालेला होता. व्हिसेरा चौकशीचेवेळी मयताचे शरीरात 100 टक्‍के मदय आढळून आले. मदय सेवानाने मयत अजय यास त्‍याचा तोल सावरता न आलेने तो स्‍वतःहून ट्रॅक्‍टर ट्रॉलीचे खाली आला सबब मयताचा मृत्‍यु हा केवळ त्‍याचे हलगर्जीपणामुळे व निष्‍काळजीपणाने झालेला आहे. त्‍या कारणाकरीता शेतकरी विमा योजनेअंतर्गत नुकसानीची कोणतीही रक्‍कम मिळणेस अर्जदार पात्र नाही हया कारणावरुन जाबदार क्र.1 हयाने अर्जदार हयाचा विमा दावा नामंजूर केलेला आहे व तो रास्‍त व बरोबर असल्‍याने विमा कंपनीने कोणतीही दुषीत सेवा दिलेली नाही. सबब तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेस पात्र आहे. 
6.    जाबदार क्र.1 हयाने पुढे असेही म्‍हणलेले आहे की मयत अजय हा शेतकरी नव्‍हता. तो सांगली येथील जी.ए.कॉलेज ऑफ कॉमर्स येथे प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत होता व ही बाब जाबदार क्र.1 हयाने सांगली येथील मोटार अपघात नुकसानभरपाई प्राधीकरण हयांचेपुढील मोटर ऍक्‍सीडेंट क्‍लेम नंबर 04/2009 मध्‍ये सिध्‍द केलेली आहे. मयत अजय हयाने कधीही शेती केलेली नाही व नोकरी हेच त्‍याचे उपजिवीकेचे साधन होते. त्‍यामुळे तक्रारदारास शेतकरी विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदरचा तक्रार अर्ज अर्जदार हयानी पश्‍चात बुध्‍दीने व लबाडीने मयत हा शेतकरी होता असे खोटे कथन करुन रक्कम लुबाडणेचे हेतुने केलेला आहे. मदय प्राशन हेच मयताच्‍या मृत्‍युचे एकमेव कारण असल्‍याने त्‍याचे झाले मृत्‍युस शेतकरी विमा योजनेअंतर्गत काहीही नुकसानी देण्‍यास जाबदार क्र.1 जबाबदार नाही त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळणेस पात्र आहे. अशा कथनांवरुन सदरची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी जाबदार क्र.1 हयांनी केलेली आहे. 
7.    जाबदार क्र.1 हयांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ नि.16 सोबत एकूण 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
8.    जाबदार क्र.2 हयांनी आपले लेखी कैफियत नि.19 मध्‍ये असे म्‍हणणे मांडले आहे की जाबदार क्र.2 ही बिमा विनीयामक और विकास प्राधीकरण, भारत सरकार, यांची अनुज्ञप्‍ती प्राप्‍त विमा सल्‍लागार कंपनी असून ती महाराष्‍ट्र राज्‍य शासनाला शेतकरी अपघात विमा योजना चालविण्‍याकरीता विनामोबदला सहाय करते. जाबदार क्र.1 विमा कंपनीने राज्‍य सरकारकडून विमा प्रिमीयम घेवून शेतक-यांची जोखीम स्विकारलेली आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.2 हयांचे ग्राहक होवू शकत नाहीत परंतु जाबदार क्र.1 हयांचे ग्राहक होवू शकतात. सल्‍लागार म्‍हणून काम करताना शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसिलदार हयांच्‍यामार्फत जाबदार क्र.2 हयांच्‍याकडे आल्‍यानंतर सदरचा विमा दावा अर्ज योग्‍यपणे भरला आहे का, सोबतची जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्‍याप्रमाणे आहेत का, नसल्‍यास तालुका कृषी अधिकारी/तहसिलदार हयांना कळवून त्‍यांची पूर्तता करुन घेणे व सर्व योग्‍य कागदपत्रे मिळाल्‍यावर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे आणि विमा कंपनीकडून दावा मंजूर आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढा सहभाग जाबदार क्र.2 चा सदर योजनेच्‍या अंमलबजावणीत आहे व त्‍याकरीता महाराष्‍ट्र शासन अथवा शेतक-यांकडून कोणताही मोबदला जाबदार क्र.2 घेत नाही. मयत अजय वाळवेकर गाव भिलवडी तालुका पलूस जि.सांगली हयाचा अपघात दि.11/09/08 रोजी झाला. त्‍याचा प्रस्‍ताव जिल्‍हा कृषी अधिकारी हयांच्‍या कार्यालयामार्फत जाबदार क्र.2 हयांच्‍या कार्यालयाला दि.27/10/09 रोजी प्राप्‍त झाला व तो प्रस्‍ताव पुढील कारवाईसाठी जाबदार क्र.1 इन्‍शुरन्‍स कंपनी हयांच्‍याकडे दि.29/10/09 रोजी पाठविण्‍यात आला व त्‍यानंतर सदरील विमा कंपनीने तो दावा नामंजूर केलेला असून तसे तक्रारदारास दि.17/01/2011 च्‍या पत्राने कळविण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे जाबदार क्र.2 कोणतीही रक्‍कम तक्रारदारास देणे लागत नसल्‍याने सदरचा तक्रारअर्ज रक्‍कम रु.5,000/- हया खर्चासह जाबदार क्र.2 हयांचेविरुध्‍द खारीज करण्‍यात यावा अशी मागणी जाबदार क्र.2 हयांनी केलेली आहे. जाबदार क्र.2 हयांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
9.    सदर कामात दोन्‍हीही पक्षांतर्फे मौखीक पुरावा देण्‍यात आलेला नाही.     
10.   सदर कामात दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्रे व त्‍यांचे वकिलांनी सादर केलेले युक्तिवाद आम्‍ही ऐकून घेतला. 
11.  प्रस्‍तुत प्रकरणात खालील मुद्दे आमच्‍या विचारार्थ उपस्थित होतात.
      मुद्दे                                                          निर्णय             
 
1 तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होतात का      -                          होय.
2. जाबदारांनी सदोष सेवा दिली आहे काय      -                          होय. 
3. अंतिम आदेश                          -                          खालीलप्रमाणे.
 
 
 
12.   आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत. 
कारणे
13.   मुद्दा क्र.1 व 2 – वास्‍तविक पहाता तक्रारदार ही ग्राहक आहे हयाबद्दल दोन्‍हीही गैरअर्जदाराने कोणताही आक्षेप किंवा उजर नोंदविलेला नाही. तथापी जाबदार क्र.1 विमा कंपनी आणि जाबदार क्र.3 शासन हयांच्‍यामध्‍ये राज्‍यातील शेतक-यांच्‍या अपघातासंबंधी किंवा अपघाती मृत्‍युसंबंधी नुकसानभरपाई, विमा स्‍वरुपी देण्‍याचा करार झालेला असून तो अस्त्त्विात आहे हयाबद्दल कोणताही उजर गैरअर्जदारानी घेतलेला नाही. दि.06/09/08 च्‍या शासन निर्णय क्र.शेअवि2008/प्रक्र187/11ए हया शासन निर्णयानुसार शेती व्‍यवसाय करीत असताना व नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात उदाः रस्‍त्‍यावरील अपघात, वीज पडणे, वीजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात तसेच अन्‍य कोणतेही अपघात हयामुळे शेतक-यांचा मृत्‍यु ओढवतो किंवा काहींना अपंगत्‍व येते व अशा अपघातांमुळे सदर शेतक-याचे कुटुंबाचे उत्‍पनाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होत असलेने अशा अपघातग्रस्‍त         शेतक-यास/त्‍याच्‍या कुटुंबास आर्थिक लाभ देणेकरीता कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसल्‍याने सदर विमा योजना दि.15/08/08 ते 14/08/09 हया कालावधीकरीता महाराष्‍ट्र शासनाने राबविली. सदर योजनेखाली जाबदार क्र.1 सह इतर दोन विमा कंपन्‍यांनी महाराष्‍ट्र शासनासोबत महाराष्‍ट्रातील सर्व शेतक-यांना व्‍यक्तिगत अपघातापासून संरक्षण मिळण्‍याकरीता विम्‍याचे करार केले व प्रती शेतकरी रक्‍कम रु.8/- प्रमाणे सेवा करासह, महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांचेवतीने विमा हप्‍ता एकरकमी सदर कंपन्‍यांना भरला.  त्‍या विमा करारानुसार सदर कालावधीमध्‍ये झालेल्‍या व्‍यक्तिगत अपघातांमुळे उद्भवणा-या परिस्थितीनुरुप किती रकमची भरपाई शेतक-यांच्‍या वारसास देण्‍यात यावी, ही योजना कशा पध्‍दतीने राबवण्‍यात यावी इ.बाबी सदर शासन निर्णयाच्‍या जोडपत्रांमध्‍ये नमूद केलेली आहे. त्‍याचे अवलोकन करता असे दिसते की सदर कालावधीत अपघातात मृत्‍यु पावलेल्‍या किंवा जखमी झालेल्‍या         शेतक-यांना/वारसदारांना विम्‍याची रक्‍कम देण्‍यास विमा कंपनी जबाबदार आहे. शेतक-याच्‍या अपघाती मृत्‍युप्रसंगी त्‍याच्‍या वारसास रक्‍कम रु.1,00,000/- विमा म्‍हणून देण्‍यास विमा कंपन्‍या जबाबदार आहेत. हयाबाबतीत जाबदार क्र.1 व 2 हयांनी कसलाही उजर केलेला नाही. तक्रारदार ही मयत अजय वाळवेकर हयाची विधवा असून ती त्‍याची वारस आहे हयाबद्दल देखील जाबदारांनी कुठला उजर केलेला नाही. त्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार ही पात्र आहे ही गोष्‍ट आपोआपच सिध्‍द होते आणि त्‍यायोगे ती ग्राहक ठरते हे स्‍पष्‍ट होते. सबब तक्रारदार ही ग्राहक आहे या ठाम निश्‍चयाला सदरचे मंच आलेले आहे आणि म्‍हणून मुद्दा क्र.1 हयाचे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे. 
14.   सदर अजय वाळवेकर हा मोटर अपघातामुळे झालेल्‍या जखमांमुळे मरण पावला हयाबद्दल कसलाही वाद नाही. वाद आहे तो मयत हा शेतकरी होता किंवा नाही हयाबा‍बतीत. जाबदार क्र.1 हयांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मयत हा शेतकरी नसून प्राध्‍यापक होता आणि त्‍याच्‍या अपघाती मृत्‍युस तो स्‍वतः जबाबदार होता आणि अपघाताचेवेळेला तो मदयाच्‍या अंमलाखाली असल्‍यामुळे जाबदार क्र.1 व जाबदार क्र.3 हयांच्‍यामध्‍ये झालेल्‍या करारातील अटीअनुसार जाबदार क्र.1 त्‍याच्‍या मृत्‍युबद्दल कसलीही रक्‍कम देण्‍यास जाबदार जबाबदार नसलेने सदरचा विमा प्रस्‍ताव जाबदार क्र.1 हयाने नाकारला होता म्‍हणून त्‍यांनी कोणतीही सदोष सेवा तक्रारदारास दिलेली नसल्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज चालू शकत नाही असे जाबदार क्र.1 चे म्‍हणणे आहे.  
15.   जाबदार क्र.1 हयांच्‍या सदर दोन्‍ही मुद्दयांचा उहापोह करणे गरजेचे आहे. तक्रारदाराने मयतास शेतजमीन होती हे दाखविण्‍याकरीता नि.4 सोबत मयताचा खातेउतारा, 7/12 उतारा आणि गावनमुना 6 हक्‍काचे पत्र हयाच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यावरुन असे दिसते की मौजे भिलवडी, ता.पलूस जि.सांगली हया गांवी मयत अजय बळवंत वाळवेकर हयास गट नं.927, 930, 1127अ, 1109 अशा चार जमिनी होत्‍या. त्‍या जमिनीत तो त्‍याचा भाऊ संजय बळवंत वाळवेकर हयाच्‍यासोबत समाईक मालकी हक्‍काने वहिवाट करीत असल्‍याने 7/12 उता-यातून दिसते. मयताच्‍या मृत्‍युनंतर फेरफार क्र.8645 अन्‍वये तक्रारदार आणि तीची मुले हयांची नावे मयताच्‍या हिश्‍श्‍यास त्‍याचे वारस म्‍हणून लागलेली आहेत. हयावरुन हे वादातीत रित्‍या सिध्‍द होते की मयतास शेतजमिनी होत्‍या आणि तो शेती करत होता. तथापी जाबदार क्र.1 विमा कंपनी हयांनी आजरोजी दाखल केलेल्‍या एमएसीपी नं.04/2009 हया नुकसानभरपाईच्‍या अर्जातील कथनावरुन असे दिसते की मयत हा जीए हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज सांगली येथे कनिष्‍ठ अधिव्‍याख्‍याता मणून काम करीत होता वत्‍यास रु.17,280/- इतका पगार होता. ही बाब मोटार अपघात नुकसानभरपाई प्राधीकरणाने मान्‍य केल्‍याचे कथन जाबदार क्र.1 हयांच्‍यातर्फे वारंवार करण्‍यात आले. आणि त्‍यावरुन मयत हा शेतकरी नव्‍हता असे प्रतिपादन करण्‍यात आले. वादाकरीता हे गृहीत धरले की मयत हा एका महाविदयालयामध्‍ये कनिष्‍ठ अधिव्‍याख्‍याता होता व त्‍यास मासिक पगार होता तरीदेखील त्‍याच्‍याजवळ काही शेतजमिनी होत्‍या आणि तो शेती करीत होता हया बाबीकडे दूर्लक्ष करता येत नाही. शेतकरी हया संज्ञेमधून जो शेतकरी शेतीशिवाय इतरही व्‍यवसाय करतो किंवा नोकरी करतो हयास वगळले आहे असे जाबदार क्र.1 हयाने कोठेही दाख्‍वलेले नाही. ज्‍याअर्थी मयताला शेती होती आणि ज्‍याअर्थी सामाईकरित्‍या ती जमिन कसत होता त्‍याअर्थी तो शेतकरीच होता. शासनाच्‍या वरील निर्णयाचे अवलोकन करता त्‍यात लाभार्थी शेतक-याची कोणतीही व्‍याख्‍या शासनाने ठरवून ठेवलेली दिसत नाही. अमूक एक क्षेत्र असलेला शेतकरीच आणि केवळ शेती हा व्‍यवसाय करणारा शेतकरी त्‍या विमा योजनेखाली लाभार्थी आहे असा कोणताही शासन निर्णय जाबदार क्र.1 हयांनी आमचे निदर्शनास आणलेला नाही. हयाचा अर्थ असा होतो की एक गुंठा जमिनीपासून ते हजारो एकर शेतजमिनी असणारा आणि त्‍यासोबत इतरही व्‍यवसाय करणारा इसम त्‍या योजनेचा लाभार्थी ठरू शकतो. मग जर असे असेल तर केवळ मयत हा एका महाविदयालयामध्‍ये अधिव्‍याख्‍याता म्‍हणूनदेखील काम करीत होता म्‍हणून तो शेतकरी नव्‍हता असे म्‍हणता येत नाही. सबब जाबदार क्र.1 हयाचा हा मुद्दा खोडून काढावा लागेल. त्‍याअर्थी मयत अजय वाळवेकर हा शेतकरी होता हया निष्‍कर्षाला हा मंच आलेला आहे. 
16.   जाबदार क्र.1 हयाचे दुसरे म्‍हणणे असे की अपघाताच्‍या वेळेला मयत हा मदयप्राशन करुन होता आणि त्‍याच्‍या अमलाखाली होता म्‍हणून जाबदार क्र.1 आणि महाराष्‍ट्र शासन यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या दि.29/08/07 च्‍या करारपत्रातील पान क्र.4 वरील अट क्र.11 अन्‍वये जाबदार क्र.1 कसलीही विमा भरपाई देण्‍यास जबाबदार नाही. सदर करारपत्राचे अवलोकन करता असे दिसते की जर शेतक-याचा मृत्‍यु नशेच्‍या किंवा दारुच्‍या अंमलाखाली झाला असेल तर विमा कंपनी विमा देण्‍यास जबाबदार नाही. ज्‍याअर्थी विमा कंपनी हया अटीला अधीन राहून आपली विमा रक्‍कम देण्‍याची जबाबदारी टाळत आहे त्‍याअर्थी अपघातासमयी मयत हा मदयाच्‍या अंमलाखाली होता आणि मदयामुळे त्‍याचा मृत्‍यु झाला ही बाब शाबीत करण्‍याची जबाबदारी जाबदार क्र.1 हयाची आहे. ही जबाबदारी पार पाडणेकरीता जाबदार क्र.1हयाने इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टेम नोटस् आणि केमिकल अॅनेलायझर पुणे यांचा व्हिसेरा परिक्षणाचा जो रिपोर्ट दिलेला आहे त्‍यावर आपली भिस्‍त ठेवलेली आहे. इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा आणि पोस्‍ट मार्टेम नोटस् ही कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केलेली आहेत. इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍याप्रमाणे पंचांनी मयताच्‍या तोंडातून मादक पदार्थ सेवन केल्‍याचा वास येत असल्‍याचे पंचनाम्‍यात नमूद केलेले दिसते. पोस्‍ट मार्टेम नोटसप्रमाणे मयताच्‍या पोटात व लहान आतडयांमध्‍ये, तोंडामध्‍ये, दातांना, जीभेला व कंठामध्‍ये दारुचा वास येत असल्‍याचे नमूद केलेले दिसते. केमिकल अॅनेलायझरच्‍या नि.16 ला दाखल केलेल्‍या रिपोर्टवरुन असे दिसते की मयताच्‍या पोटातील व आतडयातील अंशामध्‍ये तसेच त्‍यामधील पदार्थांमध्‍ये तसेच मेंदू, फुफफुस, यकृत, हदय, मुत्राशय हयांच्‍या तुकडयात 117 मि.ग्रा.आणि 104 मि.ग्रा.प्रती 100 ग्रा.हया प्रमाणात इथील अल्‍कोहोल आढळून आले. हया बाबीवरुन जाबदार क्र.1 असे म्‍हणतात की मयताचा मृत्‍यु हा त्‍याने मदय प्राशन केल्‍याने व तो मदयाच्‍या अंमलाखाली असल्‍याने झालेला असल्‍यामुळे त्‍याची विमा भरपाई देण्‍यास जाबदार क्र.1 हे जबाबदार नाहीत आणि म्‍हणून त्‍याचा विमा दावा फेटाळण्‍यात त्‍यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. जाबदार क्र.1 हयाच्‍या हया बचावाचे संपूर्ण विश्‍लेषण करणे जरुरीचे आहे. 
17.   लाईफ इन्‍शुरन्‍स कार्पोरेशन ऑफ इंडिया विरुध्‍द श्रीमती रणजीत कौर (2011(3) सीपीआर 266) हयामध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने असे नमूद केले आहे की केवळ रक्‍तामध्‍ये अल्‍कोहोल सापडले आणि ते जरीही विहीत प्रमाणापेक्षा जास्‍ती प्रमाणात आढळले तरीही ती बाब सदरचा इसम मदयाच्‍या अंमलाखाली होता हे सिध्‍द करण्‍यास पुरेशी नाही. प्रस्‍तुतचे प्रकरणामध्‍ये जाबदार क्र.1 हयांनी असा कोणताही पुरावा आणलेला नाही की ज्‍या प्रमाणात मयताच्‍या व्हिसेरामध्‍ये अल्‍कोहोल आढळून आले त्‍यामुळे अपघातसमयी मयत हा दारुच्‍या अंमलाखाली होता हे सिध्‍द होते. जाबदार क्र.1 नी असा कोणताही साक्षीदार तपासलेला नाही की जो सांगेल की अपघाताचेसमयी मयत हा दारुच्‍या अंमलाखाली होता. केवळ मयताच्‍या व्हिसेरामध्‍ये दारुचा अंश आढळला त्‍यावरुन असा निष्‍कर्ष काढणे योग्‍य होणार नाही की अपघातसमयी मयत हा दारुच्‍या अंमलाखाली होता.  हे जरुर आहे की मयताने अपघातसमयी दारु पिल्‍याचे दिसते. पण दारु पीणे वेगळे आणि त्‍याच्‍या अंमलाखाली असणे हे वेगळे. वरील करारपता्रच्‍या अटींचे अवलोकन करता असे दिसते की मृत्‍युस जबाबदार असलेला अपघात हा दारुच्‍या अंमलाखाली झालेला असल्‍यास किंवा दारुच्‍या अंमलामुळे झालेला असल्‍यास विमा कंपनी विम्‍याची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही. त्‍यामुळे केवळ मयताच्‍या रक्‍तात दारुचा अंश सापडला म्‍हणून त्‍याच्‍या मृत्‍युकरीता भरपाई देण्‍यास आम्‍ही जबाबदार नाही असे जाबदार क्र.1 विमा कंपनीला म्‍हणता येत नाही आणि त्‍यामुळे जाबदार क्र.1 हयांनी अयोग्‍यरित्‍या विमा दायित्‍व नाकारले आणि त्‍यायोगे सदोष ग्राहक सेवा दिली असेच म्‍हणावे लागेल आणि म्‍हणून आम्‍ही वर नमूद केलेला मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे. 
18.   प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र.2 व 3 हयांनी आपल्‍यावर असलेल्‍या जबाबदारीत कसलीही कसूर केली नसल्‍याचे आम्‍हास दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदारानी मागितलेल्‍या रकमेस जाबदार क्र.2 व 3 हे वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत असे आम्‍हास वाटत नाही. सबब सदरची तक्रार जाबदार क्र.2 व 3 हयांचेविरुध्‍द मान्‍य करता येत नाही व ती त्‍यांचेविरुध्‍द अमान्‍य करावी लागेल. सबब आम्‍ही तसे जाहीर करतो. 
19.   प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये तक्रारदार ही मयत अजय वाळवेकर हयाच्‍या अपघाती मृत्‍युमुळे रक्‍कम रु.1,00,000/- जाबदार क्र.1 कडून मिळणेस पात्र आहे असे आम्‍ही जाहीर करीत आहोत. त्‍याचबरोबर तक्रारदार हीस झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी तीने मागितल्‍याप्रमाणे रक्‍कम रु.40,000/- ही जाबदार क्र.1 हयांचेकडून मिळणेस पता्र आहे असेदेखील आम्‍ही जाहीर करतो. तथापी तक्रादाराने मागिततलेली रक्‍कम रु.50,000/- ही नुकसानभरपाई सदृष्‍य असल्‍याने आणि आम्‍ही तीस नुकसानभ्‍रपाईदाखल मागितलेल्‍या रकमांवर व्‍याज देणार असल्‍यामुळे सदरची रु.50,000/- ची रक्‍कम ही अप्रस्‍तुत वाटते त्‍यामुळे आम्‍ही ती नामंजूर करीत आहेात. प्रस्‍तुत कामात तक्रारदार नुकसानभरपाईदाखल विम्‍याच्‍या रकमेवर सदयसथितीत लागू असलेल्‍या बँक रेटप्रमाणेम्‍हणजे द.सा.द.शे.8.5 टक्‍के दराने तक्रार दाखल केल्‍या तारखखेपासून व्‍याज मिळणेस पात्र आहे असे आम्‍ही ठरवितो. सदर तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.3,000/- हा जाबदार क्र.1 हयांनी तक्रारदारास दयावा असेही आम्‍ही ठरवितो आणि खालील अंतिम आदेश पारीत करतो. 
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना जाबदार नं.1 यांनी विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रुपये 1,00,000/-(अक्षरी रुपये
   एक लाख माञ) दि.21/09/2011 पासून द.सा.द.शे. 8.5% दराने व्‍याजासह अदा करावेत.
3. तक्रारदार हयांना जाबदार क्र.1 यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई दाखल रक्‍कम रु.40,000/-  व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 3,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी आजपासून 45 दिवसांत करणेची आहे.
5. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द  
   ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि.02/03/2013                        
 
                  (के.डी.कुबल)                          (ए.व्‍ही.देशपांडे)
                         सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                               जिल्‍हा मंच, सांगली.                    जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ K.D. Kubal]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.