जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रं. 8/2019 नोंदणी दिनांक :- 28/01/2019
निर्णय दिनांक :- 31/10/2019
निर्णय कालावधी : -वर्ष 9 म.3 दि.
तक्रारकर्ता/तक्रारकर्ता :- श्री. अवनी अमुल्य रॉय,
वय – 24 वर्षे, व्यवसाय – घरकाम,
राह.वसंतपूर, पो.अडपल्ली, ता.चामोर्शी,
जि. गडचिरोली.
:: वि रु ध्द ::
विरूध्द पक्ष/विरुध्दपक्ष :- 1. दि. ओरिएन्टल इंश्युरंसकंपनी लि.
तर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय,
पागलखाना चौक, छिंदवाडा रोड, नागपूर
2. दि. ओरिएन्टल इंश्युरंसकंपनी लि.
तर्फे शाखा व्यवस्थापक, धनराज प्लाझा
2रा माळा, एम.जी.रोड, चंद्रपूर
3. तालुका कृषी अधीकारी, चामोर्शी
ता.चामोर्शी, जि. गडचिरोली.
तक्रारकर्त्या तर्फे :- अधि. श्री. क्षिरसागर
विरूध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे :- अधि. श्री. के.डी.देशपांडे
विरूध्द पक्ष क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपुर्ती :- श्री. अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष
श्रीमती. रोझा फु. खोब्रागडे, सदस्या
::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. श्री.अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 31/10/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे..
2. तक्रारकर्त्याची आई श्रीमती मिरा अमुल्य रॉय, हया शेतीचा व्यवसाय करीत होत्या व मौजा वसंतपूर, पो.अडपल्ली, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली येथील भूमापन क्र. 206 ही शेतजमीन त्यांच्या नावे होती. तक्रारकर्त्याची आई सदर शेतीच्या उत्पन्नावर सगळ्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. मात्र दिनांक 17/01/2018 रोजी घरी दिवा लावत असतांना तिचे साडीने पेट घेवून झालेल्या अपघातात ती जखमी होऊन मरण पावली. तक्रारकर्त्याचे आईचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 3 कडे रीतसर अर्ज सादर केला तसेच विरूध्द पक्षांचे मागणीनुसार वेळोवेळी दस्तावेज सादर केले. तक्रारकर्त्याने दिनांक 7/9/2018 व 5/11/2018 चे त्रुटीपुर्ततेचे पत्रात वारंवार विनंती करूनही वि.प.ने तक्रारकर्त्याला दाव्याबाबत काहीही कळविलेले नाही व तक्रारकर्त्याला आजतागायत विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने मंचासमक्ष प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची मागणी अशी आहे कि, तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करुन विरूध्द पक्ष विमा कंपनीने विमा द्यावयाची रक्कम रुपये 2 लाख विमा दावा विरूध्द पक्षाकडे प्रस्ताव दिल्याचा दिनांक 28/5/2018 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश व्हावे. तसेच विरूध्द पक्षाने अर्जदारास आर्थिक,मानसिक, शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रुपये 50,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 20,000/- देण्याचे विरुद्ध पक्षांना आदेश व्हावेत.
3. मंचातर्फे विरूध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांना नोटीस पाठविण्यात आली. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी उपस्थित राहून त्यांचे संयुक्त लेखी उत्तर दाखल करून प्राथमीक आक्षेप नोंदविला आहे की, कृषी आयुक्त,पुणे यांचेशी त्यांचा विमाकरार झाला असल्याने ते प्रस्तूत प्रकरणी आवश्यक पक्षकार होते,परंतु त्यांना पक्षकार केले नसल्यामुळे प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने तक्रारकर्त्याचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढत पुढे विशेष कथनात नमूद केले की, विरूध्द पक्ष क्र. 1 ह्यांना तक्रारकर्त्याचा विमादावा 90 दिवसाचे मुदतीत मिळाला नाही तसेच मागणी करूनही त्रुटीपुर्ततेचे दस्तावेज ब्रोकिंग एजन्सीमार्फत प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. सबब त्यांनी कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिली नसून प्रस्तूत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे.
4. विरूध्द पक्ष क्र. 3 त्यांनी उत्तर दाखल करीत नमूद केले की, सदर योजनेअंतर्गत शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांचे विमा प्रस्ताव संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालयात स्वीकारून तहसीलदार यांच्यामार्फत वरिष्ठ यंत्रणेस सादर करण्यात येतात. तक्रारकर्त्याने त्याचे आईचा अपघाती मृत्युविमादावा त्यांचे कार्यालयामार्फत वि.प.क्र.1 कडे सादर केला होता. त्यावर वि.प.क्र.1 ने त्रुटीपुर्तता करण्याबाबत सुचीत केले असल्यामुळे त्यानुसार कृषी विभागामार्फत तक्रारकर्त्यास दिनांक 28/8/2018, 9/10/2018, 19/10/2018, 26/11/2018 रोजीचे पत्रान्वये त्रुटीपुर्ततेबाबत कार्यवाही करण्याची सुचना देण्यांत आली, परंतु तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करूनही मयत र्ता गावात दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्यामुळे सदर पत्रव्यवहार त्याला पोहचविता आला नाही व सदर त्रुटीपुर्तता अद्याप प्रलंबीत आहे. यात वि.प.क्र.3 ने वेळोवेळी उचीत कार्यवाही केली असून कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रार खारीज करण्यांत यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व विरूध्द पक्ष क्र.1, 2 व 3 यांचे लेखी कथन, वि.प.क्र.1 व 2 पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्रं. 3 यांचा ग्राहक आहे काय ? नाही.
3) विरूध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारांस न्युनतापूर्ण
सेवा दिली आहे काय ? नाही.
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत :-
6. तक्रारकर्त्याने निशाणी क्र. 3 सोबत दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याची आई श्रीमती मिरा अमुल्य रॉय यांच्या मालकीची मौजा मौजा वसंतपूर, पो.अडपल्ली, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली येथील भूमापन क्र. 206 ही शेतजमीन होती व सदर शेतीच्या उत्पन्नावर त्या सगळ्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होत्या हे निदर्शनांस येते. तक्रारकर्त्याचा आईचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रू.2,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ह्यांनी नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा मयत विमाधारक शेतक-याचा मुलगा असून सदर अपघात विम्याचा लाभधारक आणी पर्यायाने विरूध्द पक्षक्र.1 व 2 चा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ बाबत..
7. विरूध्द पक्ष क्र. ३ हे शासकीय यंत्रणेचा भाग असून त्यांनी मोबदला स्विकारून सेवा पुरविली नसल्याकारणाने तक्रारकर्ता त्यांचा ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. शिवाय तक्रारकर्त्याचा विमादावा वि.प.क्र.3 मार्फत विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 कडे सादर करण्यांत आलेला असून विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे सुचनेनुसार त्रुटीपूर्ततेकरीता आवश्यक पत्रव्यवहार त्यांनी तक्रारकर्त्याशी केलेलाआहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार विरूध्द पक्ष क्र. ३ यांचेविरूध्द खारीज होण्यांस पात्र आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत :-
8. प्रस्तुत तक्रारीत, विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे आवश्यक दस्तावेजांसह शेतकरी अपघात विमा दाव्याची मागणी करून सुद्धा दाव्याबद्दल विरूध्द पक्ष यांनी काही माहिती दिली नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी विशेष कथनात तक्रारकर्त्याकडून वारंवार मागणी करूनही त्रुटीपूर्तता झाली नसल्यामुळे त्यांनी तो नामंजूर किंवा मंजूर करण्याबाबत कळविले नाही असे स्पष्ट केलेले आहे. तसेच विरूध्द पक्ष क्र. 3 च्या उत्तराचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याने त्याचे आईचा अपघाती मृत्युविमादावा त्यांचे कार्यालयामार्फत वि.प.क्र.1 कडे सादर केला होता. मात्र सदर विमादाव्याबाबत वि.प.क्र.1 ने त्रुटीपुर्तता करण्याबाबत सुचीत केले असल्यामुळे त्यानुसार कृषी विभागामार्फत तक्रारकर्त्यास दिनांक 19/10/2018, दिनांक 26/11/2018 तसेच दिनांक 4/2/2019 रोजी त्रुटीपुर्ततेबाबत कार्यवाही करण्याचे पत्र पाठविण्यांत आले. परंतु तक्रारकर्त्याने मयत विमाकृत शेतकरी श्रीमती मिरा अमुल्य रॉय यांचे नांव नमूद असलेले गाव नमूना 6 क वारसानपत्र दाखल केले नाही तर स्वतः तक्रारकर्त्याचे अवनी अमुल्य रॉय असे नांव अंतर्भुत असलेले 6 क वारसानपत्र दाखल केले. मात्र तक्रारकर्त्याकडून सदर त्रुटीपुर्तता अद्याप प्रलंबीत आहे असे वि.प.क्र.3 ने नमुद केले आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या योजनेअंतर्गत तक्रारकर्त्याला शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळावा यासाठी तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 च्या प्रकरणात दाखल वरील पत्रव्यवहारातील सुचनेनुसार आवश्यक दस्तावेज विरूध्द पक्ष क्र.1 कडे सादर करुन त्रुटीपुर्तता करावी व त्यानंतर विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदर विमादाव्याबाबत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा असे निर्देश देणे न्यायोचीत होईल असे मंचाचे मत आहे. सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 च्या प्रकरणात दाखल दिनांक 19/10/2018 व दिनांक 26/11/2018 रोजीचे पत्रव्यवहारातील सुचनेनुसार आवश्यक दस्तावेज विरूध्द पक्ष क्र.1 कडे सादर करावेत.
2. तक्रारकर्त्याने वरील निर्देशांनुसार त्रुटीपुर्तता केल्यानंतर विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदर विमादाव्याबाबत त्रुटीपुर्तता झाल्यापासून 60 दिवसांचे आंत गुणवत्तेवर निकाली काढावा.
3. विरूध्द पक्ष क्र. 3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
4. उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .