::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ती ही अकोला येथील कायमची रहिवासी असून विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे विमा व्यवसाय अकोला येथे तसेच पूर्ण भारतभर ठिकठिकाणी विमा व्यवसाय करतात. तक्रारकर्तीचे पतीने विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे प्रतिनिधीवर विश्वास ठेवून त्यांचे व त्यांचे कुटूंबासाठी एक इन्डीव्युजवल मेडिक्लेम पॉलीसी काढली. त्या पॉलीसीचा क्रमांक 2005/468 असा असून कालावधी हा दिनांक 16-06-2004 ते 15-06-2005 असा होता. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने सांगितल्याप्रमाणे प्रिमियम रक्कम ₹ 6478/- तक्रारकर्तीचे पतीने विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला विम्यापोटी दिले. पॉलीसीप्रमाणे प्रत्येक सदस्यासाठी सम इन्शुअर्ड अमाऊंट ही एक लाख रुपये प्रति व्यक्ती होती. तक्रारकर्तीच्या पतीने फार मोठी रक्कम प्रिमियम पोटी दिल्यावर सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्तीच्या पतीस फक्त पॉलीसी शेडयुलडच दिले होते. अटी व शर्तीबाबतचे कोणतेही दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्तीस किंवा तिचे पतीस दिले नव्हते. व त्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता किंवा त्या बंधनकारक राहतील असेही केव्हाही म्हटले नाही व त्या अटी व शर्ती आजपर्यंत सुध्दा तक्रारकर्तीस किंवा तिच्या पतीस विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने दिलेल्या नाहीत म्हणून त्या तक्रारकर्तीस बंधनकारक नाहीत.
सदर विमा पॉलीसीचा कालावधी व प्रिमियम रक्कम खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | पॉलीसी क्रमांक | विमा कालावधी | प्रिमियम रक्कम |
1 | 2005/468 | 16-06-2004 ते 15-06-2005 | ₹ 6,478/- |
2 | 2006/460 | 16-06-2005 ते 15-06-2006 | ₹ 6,722/- |
3 | 162100/48/2007/936 | 16-06-2006 ते 15-06-2007 | ₹ 6,847/- |
4 | 162100/48/2008/1067 | 16-06-2007 ते 15-06-2008 | ₹ 6,744/- |
5 | 182200/48/2009/1198 | 16-06-2008 ते 15-06-2009 | ₹ 6,407/- |
6 | 182200/48/2010/1355 | 16-06-2009 ते 15-06-2010 | ₹ 6,289/- |
7 | 182200/48/2011/1915 | 16-06-2010 ते 15-06-2011 | ₹ 6,289/- |
8 | 182200/48/2012/1773 | 16-06-2011 ते 15-06-2012 | ₹ 7,625/- |
9 | 182200/48/2013/1833 | 16-06-2012 ते 15-06-2013 | ₹ 11,402/- |
तक्रारकर्तीच्या पतीने सदर प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे व त्यावर विश्वास ठेवून एकूण प्रिमियम रक्कम ₹ 18,483/- विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला विम्याच्या प्रिमियम पोटी दिली व सदरची हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसी शेडयुलचे गोल्ड प्लॅन विमा पॉलीसी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्यास दिली. सदर विमा पॉलीसीचा क्रमांक हा 182200/48/2014/1987 असा असून सम इन्शुअर्ड ही ₹ 6,00,000/- For Medical Expenses and Personal Accident Benefit sum insured amount ₹ 18,00,000/- अशी असून विमा कालावधी हा दिनांक 16-06-2013 ते 15-06-2014 असा आहे. परंतु ते शेडयुल्ड ऑफ पॉलीसी देतांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी अनवधानाने त्यामध्ये विमा कालावधी हा दि. 16-06-2013 ते 15-06-2014 लिहिण्याऐवजी चुकून दिनांक 17-06-2013 ते 16-06-2014 असे टाकले होते. परंतु, ती चूक लक्षात येताच विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने लगेच दुरुस्ती करुन सदरहू कालावधी 16-06-2013 ते 15-06-2014 असे करुन दुरुस्तीचे एंड्रोसमेंट शेडयुल्ड तक्रारकर्तीस दिले.
तसेच तक्रारकर्ती व त्यांचे कुटूंब हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून नियमित कोणताही खंड न पडता सदरची विमा पॉलीसी प्रत्येक वर्षी मुदतीच्या आंत नुतनीकरण करुन घेतलेली आहे. म्हणून तक्रारकर्ती व त्यांचे विमाकृत प्रत्येक सदस्य हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 पासून नो क्लेमच्या पोटी क्युमिलेटीव बोनस म्हणून प्रत्येक सदस्याच्या सम इन्शुअर्ड अमाऊंटच्या 5 टक्के रक्कम प्रत्येक वर्षी विमा पॉलीसीमध्ये सम इन्शुअर्ड अमाऊंट वाढवून देण्यास विरुध्दपक्ष क्रमांक 1 जबाबदार होता. परंतु, सदर रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने वाढवून दिली नाही. जर ते वाढवून दिले असते तर प्रत्येक विमाकृत सदस्यांच्या सम इन्शुअर्ड रकमेव्यतिरिक्त जवळपास ₹ 75,000/- चे क्युमिलेटीव बोनस जमा झाले असते. सदरची कृती ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अनुचित व्यापार प्रथेचा भाग आहे.
तक्रारकर्ती ही वरील हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसी शेडयुलडचे गोल्ड प्लॅन मध्ये समाविष्ट आहे. जिचा पॉलीसी क्रमांक 182200/48/2014/1987 असा असून विमा कालावधी दिनांक 16-06-2013 ते 15-06-2014 असा आहे. तक्रारकर्तीला जून 2013 मध्ये अशक्तपणा व थकवा वाटत असल्यामुळे आजारी पडली म्हणून तिने डॉक्टर दिपाली शुक्ला, डॉ. मधुसूदन बगडिया, अकोला यांना सदरचे आजार दाखविले असता व तपासणी अंती डॉक्टरांनी असे निदान काढले की, तक्रारकर्तीला डाव्या स्तनाचा कर्करोग ( Carsinoma Left Breast ) झाला आहे. म्हणून तिला पुढील ईलाजासाठी मुंबई सारख्या ठिकाणी जावून सदरहू आजाराचा ईलाज करावा लागेल, असा सल्ला दिला. तक्रारकर्तीला वेगवेगळया दवाखान्यामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. तक्रारकर्तीला दिनांक 25-06-2013, 16-07-2013, 08-06-2013, 06-08-2013 ला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये किमोथेरेपी साठी भरती व्हावे लागले. तसेच तिला दि. 07-07-13 ते 09-07-13 ला आयकॉन हॉस्पिटल, अकोला येथे भरती व्हावे लागले. तेथे तिचा ईलाज डॉ. बगडिया, अकोला यांनी केला. त्यांनतर तिला दि. 03-09-2013 ते 07-09-2013 या कालावधीमध्ये हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे भरती होवून तिच्या डाव्या स्तनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी तक्रारकर्तीला एकूण ₹ 4,94,307/- रुपये खर्च आला. त्यानंतर तक्रारकर्तीचा ईलाज सुरुच असल्यामुळे तिला पुन्हा केमोथेरेपी या उपचारासाठी हिन्दुजा हॉस्पिटल, मुंबई येथे पुन्हा पुन्हा भरती होऊन तेथे तिला दि. 05-11-2013 ते 31-03-2014 पर्यंत सुरुच होता. तसेच संत तुकाराम हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च सेंटर, अकोला येथे दिनांक 21-01-2014 ते 04-03-2014 पर्यंत रेडिओ थेरेपीचे उपचार घ्यावे लागले या कालावधीत तक्रारकर्तीला उपचारासाठी आलेला एकूण खर्च ₹ 2,90,339/- आला.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकतीला आजपर्यंत वरील दावा रकमेपोटी फक्त तुकडया तुकडयामध्ये खालीलप्रमाणे एकूण ₹ 99,901/- दिलेले आहे.
अ.क्र | रक्कम | दिनांक |
1 | ₹ 27,187/- | 03-01-2014 |
2 | ₹ 12,366/- | 09-04-2014 |
3 | ₹ 27,166/- | 16-04-2014 |
4 | ₹ 33,182/- | 30-08-2014 |
उर्वरित रक्कम आजही तक्रारकर्तीला घेणेबाकी असून तक्रारकर्तीचा क्लेम विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 ने विनाकारण प्रलंबित ठेवलेला आहे. तो बेकायदेशीर असून न्यायसंगत नाही. सदर आजार हा Pre-existing Disease नसून तक्रारकर्तीला हा आजार पहिल्यांदाच जून 2013 मध्ये डॉक्टरांकडून निदान झाल्यानंतर कळले व जून 2013 पासूनच संबंधित आजारावर तक्रारकर्तीने ईलाज घेतला आहे. या अगोदर तक्रारकर्तीला सदरहू आजाराचा कोणताही त्रास नसल्यामुळे तसेच त्याबद्दलची माहिती किंवा जाणीव नसल्यामुळे तक्रारकर्तीने या ईलाजाच्या पूर्वी कोणत्याही प्रकारचा ईलाज सदरहू आजारासंबंधी घेण्याचा प्रसंग तक्रारकर्तीवर आलेला नाही. म्हणून सदरचा आजार हा Pre-existing Disease होवू शकत नाही. म्हणून विरुध्दपक्ष सदर खर्च देण्यास जबाबदार आहेत.
सबब, तक्रारकर्तीची प्रार्थना की, तक्रारकर्तीची तक्रार संपूर्णपणे मंजूर करण्यात यावी व तक्रारकर्तीला उपचारासाठी लागलेला व उर्वरित न मिळालेला खर्च ₹ 5,00,099/- व या रकमेवर दिनांक 01-01-2014 पासून तक्रार दाखल करेपर्यंत दर साल दर शेकडा 18 टक्के प्रमाणे व्याज एकूण ₹ 75,015/- तसेच मानसिक, शारीरिक त्रास व आर्थिक नुकसानीपोटी ₹ 2,00,000/- तसेच नोटीसचा खर्च ₹ 1,200/- व सदरहू तक्रारीचा खर्च ₹ 25,000/- तसेच विरुध्दपक्षाने सदर दावा विलंबाने हाताळल्यामुळे व अपूर्ण रक्कम तुकडया तुकडयात दिल्यामुळे सुध्दा तक्रारकर्ती ₹ 1,00,000/- नुकसान भरपाई घेण्यास अधिकारी आहे, असे एकूण ₹ 9,01,314/- व त्या रकमेवर दर साल दर शेकडा 18 टक्के प्रमाणे व्याज तक्रार दाखल तारखेपासून तर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंतचे आदेश विरुध्दपक्ष यांचेविरुध्द वैयक्तिक वा संयुक्तरित्या जबाबदार धरुन तक्रारकर्तीस देण्याचे आदेश पारित करण्यात यावे, ही विनंती.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 36 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत अधिकच्या कथनात असे नमूद केले की, तक्रारकर्तीचे पतीने विरुध्दपक्षाकडे मेडिक्लेम विमा काढला होता. सदरहू विम्याच्या अटी व शर्ती तक्रारकर्तीचे पती यांना पूर्णपणे समाजवून सांगण्यात येऊन पॉलीसी देण्यात आली होती. सदरहू पॉलीसी तक्रारकर्तीचे पतीने वेळोवेळी नुतनीकरण करुन घेतली. तिला अटी व शर्तीबद्दल कागदपत्र मिळाले नाही याबद्दल कधीही कोणतीही तक्रार ईतक्या वर्षात त्यांनी केली नाही. पॉलीसी सन 2004 पासून नियमितपणे वेळोवेळी नुतनीकरण करण्यात आली तेव्हा सुध्दा तक्रारकर्ती तर्फे कोणतेही आक्षेप घेण्यात आलेले नाही. तक्रारकर्तीच्या पतीने घेतलेल्या पॉलीसीप्रमाणे ₹ 1,00,000/- ईतका विमा बनविण्यात आला होता.
कागदपत्रांचे अवलोकन केल्यावर व पुढील माहिती काढल्यावर हे स्पष्ट झाले की, फॅमिली फ्लोटर पॉलीसी घेण्याचे तारखेच्या अगोदरपासून तक्रारकर्तीला सदरहू आजार झालेला होता व त्याबद्दल डॉक्टरांनी निदान सुध्दा केले होते. ही बाब तक्रारकर्ती व तिच्या पतीला पूर्णपणे माहिती असतांना त्यांनी जाणूनबुजून आपल्या क्लेमफॉर्म मध्ये नमूद केलेले नाही. खरे तर दिनांक 13-06-2013 रोजी डॉ. ओमप्रकाश रुहाटिया यांचेकडे ईलाज घेतला आहे तेव्हा तिला सदरहू आजाराची पूर्ण कल्पना होती व निदान झाल्यानंतर ईलाज सुध्दा सुरु झाला होता. दिनांक 15-06-2013 रोजी तिचा टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे ईलाज करण्यात आला होता. अशा परिस्थितीत विम्याचे अटी व शर्तीनुसार फॅमिली फ्लोटर पॉलीसीसाठी हा आजार Pre existing Disease असल्यामुळे सदरहू पॉलीसीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. तक्रारकर्ती व तिच्या पतीला याबद्दल पूर्ण कल्पना देण्यात आली होती. ज्या काळात तक्रारकर्तीला आजार झाला त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पॉलीसीनुसार तक्रारकर्तीला रक्कम देण्यात आली व तितका क्लेम मंजूर करण्यात आला. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीचे पूर्ण आरोप बिनबुडाचे व खोटे असून तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
विरुध्दपक्षाद्वारे तक्रारकर्तीला किंवा तिच्या पतीला पूर्ण कल्पना देण्यात आली व कोणताही अनुचित व्यापार पध्द्तीचा अवलंब करण्यात आलेला नाही. तक्रारकर्तीने जाणुनबुजून व पूर्ण माहिती असल्यावरही विरुध्दपक्षाकडे जास्तीच्या रकमेचा क्लेम दाखल केले व सदरहू तक्रारीमध्ये पहिल्यांदा गंभीर आरोप करुन जास्तीची रक्कम मिळविण्याचे प्रयत्न केलेले आहे करिता तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, ही विनंती.
:: का र णे व नि ष्क र्ष ::
सदर प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्तीचे प्रतिउत्तर, पुरावा व दाखल न्यायनिवाडे तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला तो येणेप्रमाणे.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहिल्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्रमांक 2 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला होता. या प्रकरणात उभयपक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ती व तिच्या पतीने त्यांचे कुंटूंबियासोबत विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून कुठलाही खंड न पडता वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसी दिनांक 16-06-2004 ते 15-06-2013 पर्यंत काढली होती व त्यानंतर दहाव्या वर्षी म्हणजे दिनांक 16-06-2013 ते 15-06-2014 पर्यंतच्या कालावधीत तक्रारकर्तीने वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसी ही नुतनीकरण करतांना हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीमध्ये रुपांतरित केली होती.
तक्रारकर्ती यांचा असा युक्तीवाद आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडील वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसी 10 वर्षापासून सतत कोणताही खंड न पडता नियमित सुरु होती. त्यामुळे, दिनांक 16-06-2013 ते 15-06-2014 हया कालावधीकरिता ही पॉलीसी जरी हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीमध्ये रुपांतरित केली तरी सदर पॉलीसीचे सर्व लाभ तक्रारदारांना मिळणार होते म्हणून तक्रारदारांनी प्रिमियम रक्कम वाढवून सम इन्शुअर्ड रक्कम ₹ 6,00,000/- वैदयकीय खर्चासाठी व ₹ 18,00,000/- वैयक्तिक फायदयासाठी अशी विरुध्दपक्षाकडून करुन घेतली होती तसेच त्यापोटीचा क्लेम न केल्याने तक्रारकर्ती नो क्लेमची बोनस रक्कम घेण्यास सुध्दा पात्र ठरतात असे असतांना, तक्रारकर्ती हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीच्या कालावधीत आजारी पडली व सर्व चाचण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी स्तनाचा कर्करोग असे निदान केले म्हणून पुढील ईलाज मुंबई येथे केला व सर्व उपचारापोटीचा विमा दावा ₹ 7,84,646/- ईतक्या रकमेचा विरुध्दपक्षाकडे दाखल केला. परंतु, विरुध्दपक्षाने तुकडया तुकडयांमध्ये काही रक्कम ₹ 99,901/- ईतकी फक्त दिली व पार्ट पेमेंट चा धनादेश ₹ 2,75,826/- सुध्दा तयार केला होता, पण तो दिला नाही म्हणून तकारकर्तीने याबद्दल विचारणा करणारी कायदेशीर नोटीस विरुध्दपक्षाला पाठविली व त्यानंतर सदर प्रकरण मंचात दाखल केले ते प्रार्थनेप्रमाणे मंजूर व्हावे. तक्रारकर्तीने खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
1) 2013(1) All MR (Journal ) 1
Star Health and Allied Insurance Company Ltd. Vs. Shri Anil
Chandrant Argade
2) 2004(1) CPJ- 22-Supreme Court
United India Insurance Co. Ltd. Vs. M/s Pushpalaya Printers
3) 2014 (III) CPJ -357 National Commission
Abdul Latheef & Ors Vs. Life Insurance Corporation of India &
Ors.
4) 2010 (III) CPJ – 276 National Commission
National Insurance Company Ltd. Vs. Sardar Kulbir Singh
5) 2011 (II) CPJ – 383 – Punjab State Commission
National Insurance Co. Ltd., Vs. Mona Ohri & Anr.
6) 2015 (I) CPJ – 599 NC
New India Assurance Co. Ltd., Vs. Nanak Singla & Ors.
7) 2015 (3) All MR (Journal) 50 Mumbai
Mr. Ashok M. Ahuja Vs. United India Insurance Co. Ltd., & Ors.
8) 2015 (3) All MR (Journal) 53 – Mumbai
Mr. Girish M. Raval Vs. The Oriental Insurance Co. Ltd., & Ors.
9) 2014 (5) All MR (Journal) 20 – Mumbai
The Oriental Insurance Co. Ltd. Vs. Shri Raghunath Londhe
& Anr.
10) 2014 (III) CPJ-340-NC
New India Assurance Co. Ltd., Vs. Rakesh Kumar
11) 2014 (III) CPJ-221-NC
Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd., & Ors. Vs. Raj Kumar
12) 2013 ACJ-2530 Delhi High Court
Oriental Insurance Co. Ltd., Vs. Shanti and others
तक्रारकर्तीचे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने कधीही सदर पॉलीसीच्या अटी शर्तीबद्दल माहिती पुरविली नव्हती. त्यामुळे त्या अटी शर्ती बंधनकारक नाही.
यावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्तीला सदरहू आजाराची कल्पना फॅमिली फ्लोटर पॉलीसी घेण्याच्या तारखेच्या अगोदरपासून होती. परंतु, तरीही ही बाब उघड केली नाही. अशा परिस्थितीत विम्याचे अटी व शर्तीनुसार फॅमीली फ्लोटर पॉलीसीसाठी हा आजार पूर्व अस्तित्वात असल्यामुळे सदर पॉलीसीचे कव्हरेज मिळणार नाही व ज्याकाळात तक्रारकर्तीला आजार झाला त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पॉलीसीनुसार तक्रारकर्तीला रक्कम देण्यात आली व तितका क्लेम मंजूर केला.
उभयपक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीच्या सदरहू आजाराबाबत जे दस्तऐवज रेकॉर्डवर दाखल केले, त्याचे अवलोकन केल्यावर असे निदर्शनास आले की, तक्रारकर्तीला तिला झालेल्या आजाराबद्दलची माहिती ही हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसी घेण्याच्या तारखेच्या अगोदरपासून होती. सदर आजार हा आधीच्या वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसीच्या काळातील होता, त्यामुळे हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीच्या अटी शर्तीनुसार जरी वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसीतून हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीत मायग्रेट होता आले तरी सदर हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसीचे कव्हरेज हे वैयक्तिक मेडिक्लेम पॉलीसी कालावधीतील माहिती असणा-या आजारांना लागू राहणार नाही, असे सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीवरुन दिसून येते. हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलीसी प्रत तक्रारकर्ते यांनी पण दाखल केली आहे तसेच तक्रारकर्ते इतक्या वर्षापासून पॉलीसी घेत आलेले असल्यामुळे त्यांना सदर पॉलीसीच्या अटी शर्ती बद्दल काहीही माहिती नसणे ही पचनी पडणारी बाब नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा, ज्या काळात तक्रारकर्तीला आजार झाला त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पॉलीसीनुसार मंजूर करण्यात काही गैर नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीतर्फे दाखल केलेल्या न्यायनिवाडयातील तथ्ये हातातील प्रकरणात जसेच्या तसे लागू पडत नाही, सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.