नि.क्र. २९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र.२७२/२०१०
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ९/०६/२०१०
तक्रार दाखल तारीख : ९/०६/२०१०
निकाल तारीख : २३/०९/२०११
------------------------------------------
१. श्रीमती राजश्री भरत यादव
वय वर्षे – २८, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.महादेवनगर, ता.वाळवा, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
डिव्हीजन ऑफिस नं.२, ८, हिंदुस्थान कॉलनी,
अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – ४४० ०१५
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. एम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे : +ìb÷. के.ए.मुरचुटे, व्ही.एम.पाटील
जाबदारक्र.२ व ३ : स्वत:
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतकरी होते व त्यांना दि.१९/१/२००८ रोजी मोटार अपघातात निधन झाले. तक्रारदार या त्यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी महादेवनगर यांचेकडे प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार वाळवा यांचेकडे पाठविला. तहसिलदार वाळवा यांनी सदरचा प्रस्ताव योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. जाबदार यांनी दि.१५/१२/२००९ च्या पत्राने तक्रारदार यांचा विमादावा चुकीच्या कारणाने नाकारला. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१७ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतकरी असल्याबाबतचे कथन जाबदार यांनी नाकारले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विलंबाने विमादावा दाखल केला आहे. त्यामुळे तो मंजूर होणेस पात्र नाही. तसेच तक्रारदार यांनी मोटार अपघात न्यायाधीकरणामध्ये दावा दाखल करुन अपघाताची नुकसान भरपाई मिळविली आहे त्यामुळे तक्रारदार कोणतीही रक्कम मिळणेस पात्र नाही. या सर्व कारणांचा विचार करता तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर होणेस पात्र नाही. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१८ ला शपथपत्र व नि. २१ चे यादीने ४ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.२ यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी सदरचे विमा करारामध्ये जाबदार क्र.२ यांची जबाबदारी केवळ सल्लागाराची आहे व शेतक-यांकडून आलेले विमादावे तपासण्याचे काम जाबदार क्र.२ करतात व कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची पूर्तता करुन घेवून विमा कंपनीकडे विमाप्रस्ताव दाखल करण्याचे काम जाबदार क्र.२ करतात. त्यामुळे सदर जाबदार यांचेवर कोणतेही दायित्व येत नाही असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१४ वर परिपत्रक हजर केले आहे.
५. जाबदार नं.३ यांनी नि.२५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. सदर म्हणण्यामध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा योग्य त्या कागदपत्रांसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला होता असे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी अयोग्य कारणास्तव विमादावा नाकारला आहे असे जाबदार क्र.३ यांनी आपले म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
६. तक्रारदार यांनी नि.१६ वर प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार क्र.१ यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२१ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ तर्फे नि.२७ ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व जाबदार क्र.१ यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
७. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल कागदपञांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे, त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
८. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२१/१ वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. यावरुन सदरची विमा योजनाही ही दि.१५ ऑगस्ट २००७ ते १४ ऑगस्ट २००८ या कालावधीसाठीची असल्याचे दिसून येते. सदर पॉलिसीनुसार राज्यातील शेतक-यांच्या विमा पॉलिसीसाठी विम्याच्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने विमा कंपनीस अदा करण्यात आली आहे. सदरील तक्रारदार यांचे पती यांना दि.१९/१/२००८ रोजी विमा मुदतीत अपघात झाला आहे ही बाब समोर येते.
९. सदर पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय १२ ते ७५ वयोगटातील असणे आवश्यक आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय ३४ वर्षे असे नमूद आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पतीच्या वयाबाबत कोणताही वाद उपस्थित केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पतीचे वय निश्चितच १२ ते ७५ या दरम्यानचे आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी नि.५/२ ला खाते उतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे व त्यांचे पश्चात तक्रारदार यांचे पतीचे वारसांची नावे नमूद आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पती हे शेतकरी नव्हते असे युक्तिवादामध्ये नमूद केले. परंतु तसे दाखविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे दाखल खातेउता-यावरुन तक्रारदार यांचे पती शेतकरी होते ही बाब स्पष्ट होते.
१०. तक्रारदार यांनी याकामी नि.५/९ ला जाबदार यांचे पत्र दाखल केले आहे. जाबदार यांनी सदर पत्रानुसार तक्रारदार यांचा विमादावा दि.१५/१२/२००९ रोजी नाकारला आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदार यांचा विमादावा नाकारताना योग्य ती कागदपत्रे सादर केली नाहीत तसेच विमाप्रस्ताव हा विमा कंपनीस विलंबाने सादर करण्यात आला ही कारणे नमूद केली आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून कोणकोणती कागदपत्रे पाहिजेत हे विमादावा नाकारणेपूर्वी तक्रारदारांना कळविलेले नाही असे तक्रारदार यांनी आपले युक्तिवादामध्ये नमूद केले. जाबदार यांनी असे कळविले होते, याबद्दल कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे कागदपत्रे दिली नाहीत या जाबदारांच्या विमादावा नाकारण्याच्या कारणामध्ये तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी विमादावा नाकारणेस दुसरे जे कारण दिले आहे, ते जाबदार यांचेकडे विमाक्लेम विलंबाने सादर केला. त्याबाबत तक्रारदार यांनी 2008 (3) CPR Page 50 या निवाडयाचा ऊहापोह केला असून त्यामध्ये सन्मा. राज्य आयोग, महाराष्ट्र यांनी पुढील निष्कर्ष काढला आहे. Policy condition that claim in respect of accident injury shall be submitted within a one month of the accident to be interpreted which is favourable to claimant. तसेच सन्मा.राज्य आयोग यांनी 2008 (2) All M.R. Journal Page 13 हा ICICI Lombard General Insurance Co. Vs. Smt. Sindhubai Khairnar या निवाडयामध्ये The clause with regard to time limit prescribed for the submission of the claim is not mandatory. Provision with regard to time limit in this behalf cannot be used to defeat the genuine claim. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचा विमा दावा विलंबाने सादर झाला हे विमादावा नाकारण्यास पुरेसे कारण नाही असे या मंचाचे मत झाले आहे.
११. जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी मोटार अपघात न्यायाधीकरण यांचेकडे विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला आहे, त्यामुळे सदरचा विमा दावा नामंजूर होणेस पात्र आहे असे नमूद केले आहे. परंतु नि.१४ वरील महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाचे अवलोकन केले असता त्यातील कलम ९ नुसार शेतकरी अथवा त्यांचे वतीने अन्य कोणत्याही संस्थेने वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध नाही. या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील असे नमूद केले आहे. त्यामुळे जाबदार यांच्या म्हणण्यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांना रक्कम रु.१,००,,०००/- व सदर रकमेवर विमा दावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि. १५/१२/२००९ पासून द.सा.द.शे.९ टक्के व्याज देण्याबाबत आदेश करणे न्याय्य होईल असे मंचाचे मत झाले आहे.
१२. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत काय निर्णय घेतला हे जाबदार यांनी तक्रारदार यांना कळविले नाही. तसेच निष्कारण गरज नसलेल्या कागदपत्रांची मागणी करुन तक्रारदार यांच्या विमादाव्याबाबत निर्णय घेण्यास विलंब केल्याने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
१३. यातील जाबदार क्र.३ हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.२ यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार क्र.१ यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार नं.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये १,००,०००/-(अक्षरी रुपये एक लाख माञ) तक्रारअर्ज दाखल तारखेपासून म्हणजे दि.१५/१२/२००९ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक ८/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २३/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११