(आदेश पारीत व्दारा - श्री अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 13 जुलै, 2018)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम – 12 अन्वये विरुध्दपक्षाविरुध्द विमा दाव्यासबंधी असलेल्या सेवेतील त्रुटिबद्दल दाखल केली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ती ही किन्ही (धानोली), ता. हिंगणा, जिल्हा – नागपुर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री टेनेश्वर तुळशिराम तिलपाले (मृतक) यांचा शेतीचा व्यवसाय होता. तक्रारकर्तीचे पती महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजना 2016-17 चा लाभार्थी होते. तक्रारकर्तीच्या पतीचे निधनानंतर तक्रारकर्ती ही सदर विम्याची लाभधारक आहे.
3. विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 विमा कपंनी असून विरुध्दपक्ष क्र.3 हे सदर अपघात विमा योजनेचे सल्लागार आहेत. शासनाच्या वतीने वरील योजने अंतर्गत शेतकर्यांना विमा सरंक्षण देण्याचे काम विरुध्दपक्ष क्र.4 तर्फे करण्यात येते. सदर विमा योजनेनुसार विमा पॉलिसी क्रमांक 163500/47/2017/65 होता व सदर पॉलिसी दि 01/12/2016 पासून दि 30/11/2017 कालावधीत लागू होती.
4. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 13.1.2017 रोजी रस्ता ओलांडत असतांना एका आयशर ट्रक (क्रमांक MH 20 – EG 4111) चालकाने धडक दिल्याने झाला. तक्रारकर्तीच्या पतीचा शेतकरी अपघात विमा असल्याने व रस्ता अपघातात मृत्यु झाल्याने तिने विरुध्दपक्ष क्र.4 यांचेकडे दिनांक 11.4.2017 रोजी विमा दावा मिळण्यासाठी रितसर अर्ज केला व विरुध्दपक्षाच्या मागणीनुसार आवश्यक ते सर्व दस्ताऐवज पुरविले. विरुध्दपक्ष क्र.1 ने सदर विमा दावा दिनांक 29.8.2017 रोजी पत्र पाठवून अपघाता समयी तक्रारकर्तीचा पती हा मद्याच्या अमंलाखाली रस्ता ओलांडत असतांना झाला आणि पॉलिसीच्या अटींनुसार (अट क्रमांक 11 – Exclusion) विम्याचा दावा फेटाळला. तक्रारकर्तीच्या कथनानुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा दावा अकारण फेटाळला आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात मद्याच्या अमंलाखाली झाला याबाबत कुठलाही स्वतंत्र पुरावा नसताना विरुध्दपक्ष क्र.1 ने सदर विमा दावा चुकीच्या कारणासाठी फेटाळला असल्याने त्यासंबंधी दिलेल्या सेवेतील त्रुटीबद्दल तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/- आणि झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- आणि दाव्याचा खर्च म्हणून रुपये 10,000/- मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस देण्यात आली. त्यानुसार, विरुध्दपक्ष क्र.3 यांनी दिनांक 18.12.2017 रोजी लेखी उत्तर दाखल केले व प्रस्तुत दावा निवारण्यासबंधी विरुध्दपक्ष क्र.3 चा कुठलाही थेट सहभाग नसल्याचे नमुद केले आहे. तसेच, विरुध्दपक्ष क्र.3 हे विमा कंपनी, अर्जदार आणि शासन यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
6. त्यानंतर, विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी दिनांक 8.1.2018 रोजी तक्रारीसंबंधी लेखीउत्तर दाखल केले. त्यानुसार तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याबद्दल, सदर विमा पॉलिसीचा लाभार्थी असल्याबद्दल, रस्ता अपघातात मृत्यु झाल्याबद्दल तक्रारकर्तीचा दावा मान्य केला आहे. विरुध्दपक्षाने विमा दावा नाकारण्यासाठी विसेरा रिपोर्ट दि 21/03/2017 (दस्त क्रं.8 तक्रारकर्तीने सादर केल्यानुसार) नुसार तक्रारकर्तीचे पतीने जास्त प्रमाणात दारुचे सेवन केले होते व रस्ता ओलांडत असतांना अपघातात त्याचे निधन झाले, त्यामुळे दिनांक 29.8.2017 च्या पत्राव्दारे तक्रारकर्तीचा फेटाळण्यात आलेला विमा दावा हा विमा पॉलिसी Exclusion No.11 नुसार फेटाळण्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्याने तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
7. विरुध्दपक्ष क्र.4 ला पुरेशी संधी देऊनही उपस्थित न झाल्याने त्याचेविरुध्द एकतर्फा कारवाईचा आदेश पारीत करण्यात आला.
8. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, शपथ पत्र, विरुध्दपक्षाचे उत्तर, तसेच दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले व उभय पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो.
// निष्कर्ष //
9. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी जनता अपघात विमा योजना अंतर्गत सदर योजनेचा लाभार्थी होते. दिनांक 13.1.2017 रोजी त्यांचा अपघाती मृत्यु झाला व त्यासबंधी तक्रारकर्तीने विमा योजने अंतर्गत सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह विमा दावा दाखल केलेला होता, याबाबत विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी कुठलाही आक्षेप नोंदविला नाही व सदर बाब मान्य केली आहे. दाखल केलेल्या सर्व दस्ताऐवजांवरुन असे निदर्शनास येते की,
(i) तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु रस्ता ओलांडत असतांना दिनांक 13.1.2017 रोजी आयशर गाडीच्या चालकाने धडक दिल्याने झाला. त्यासबंधी पोलीस स्टेशन, हिंगणा येथे नरेंद्र दयारामजी चतुर यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार आयशर गाडी क्रमांक MH 20 – EG 4111 च्या चालकाने वाहन निष्काळजीपणाने व अती वेगाने चालवुन धडक दिल्याने झाला असल्याचे नमूद केले आहे. तसेच संबंधीत पोलीस अधिका-यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानुसार सुध्दा सदर गाडीच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून रस्ता ओलांडत असतांना तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्युस कारणीभुत असल्याचे नमूद केले आहे.
(ii) श्री नरेंद्र दयारामजी चतुर, तक्रारकर्तीच्या पतीचे मित्र, जे अपघाताच्या वेळेस प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते आणि त्यांनी पोलीसांना अपघाताची सूचना दिली व नंतर दि 10/01/2018 रोजी मंचासमोर शपथपत्र सादर केले आहे त्यानुसार देखील सदर गाडीच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवून रस्ता ओलांडत असतांना तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्युस कारणीभुत झाल्याचे नमूद केले आहे.
(iii) त्यानंतर ग्रामीण हॉस्पीटल हिंगणा येथे शवविच्छेदन दिनांक 14.1.2017 रोजी करण्यात आले. मृत्यूच्या संभाव्य कारणाची नोंद करताना तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु रस्ता अपघाता दरम्यान झालेल्या महत्वपूर्ण अवयवांना (मेंदुला (Brain) व प्लीहा (spleen)) ईजा झाल्यामुळे असल्याचे नमुद केले आहे. संपूर्ण शवविच्छेदन रिपोर्टमध्ये तक्रारकर्तीच्या पतीच्या शरीरात मद्याचा अंश असल्याबद्दलचा कुठलाही उल्लेख नाही, तसेच मृत्युचे कारण देखील मद्य प्राशन किंवा त्याचा अंमल असल्याबद्दल कुठलाही उल्लेख नाही.
(iv) “Regional Forensic Science Laboratory, Nagpur” यांनी दिलेल्या अहवालानुसार व्हीसेरा विश्लेषण दि 23/01/2017 रोजी आरंभ करून दि 28/02/2017 रोजी (अपघातांनंतर जवळपास दीड महिन्यांनंतर) पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. अहवालात Exhibit No 1 (101 mg), 2 (90 mg) & 3 मध्ये (94 mg) Ethyl Alcohol per 100 grams’ व Exhibit No 4 मध्ये (97 mg) Ethyl Alcohol per 100 Milliliters’ सापडल्याचे नमुद केले आहे. व्हीसेरा सरंक्षण (Preservation), त्याची स्थिति (Condition) व व्हीसेरा विश्लेषणा दरम्यान वापरलेल्या पद्धती याबाबत काहीही नमूद केलेले नाही.
10. वरील वस्तुस्थितीचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर मंचाच्या मते तक्रारकर्तीचा पती रस्ता ओलांडत असताना आयशर ट्रक (क्रमांक MH 20 – EG 4111) चालकाने वेगाने व हलगर्जीपणे वाहन चालवून धडक दिली आणि त्यामुळेच त्याचा अपघाती मृत्यू झाला होता ही बाब दाखल पोलीस दस्तऐवज खबरी जबाब, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा तसेच शवविच्छेदन अहवाला वरुन स्पष्टपणे दिसून येते. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भा. द. वि. (I.P.C.) कलम 279, 304 (अ), मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलिस दस्तऐवजामध्ये तक्रारकर्तीच्या पतीने दारू प्राशन केली होती किंवा दारूच्या अमलाखाली होता अशी कुठलीही नोंद केलेली नाही किंवा त्या संबंधी कुठला गुन्हा देखील दाखल केलेला नाही. तसेच ग्रामीण हॉस्पीटल हिंगणा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात देखील मृत्यूचे संभाव्य कारण “ Head & Spleen Injury- Death due to Hemorrhagic shock, due to injury to vital organs i e Brain & Spleen” असे नमुद केले आहे. तसेच मृताने दारू प्राशन केल्याबद्दल किंवा त्याच्या शरीरात दारू असल्याबद्दल कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा पतीचा मृत्यू हा केवळ वेगाने व हलगर्जीपणे चालविलेल्या वाहनाच्या धडकेने झालेला रस्ता अपघात असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर रस्ता अपघाताचा व तक्रारकर्तीचा पतीचा मृत्यू त्याने दारू प्राशन केल्यामुळे/अंमलाखाली असल्यामुळेच घडल्याचा किंवा त्याचा थेट संबंध दर्शविणारा कुठलाही पुरावा विरुद्ध पक्षाने सादर केला नसल्यामुळे विमा दावा नाकारताना पॉलिसीच्या अटींनुसार (अट क्रमांक 11 – Exclusion) घेतलेला आक्षेप फेटाळण्यात येतो.
11. येथे विशेष नमुद करण्यात येते की, वरील बाबीं नाकारण्यासाठी विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी कुठलाही स्वतंत्र पुरावा दिला नाही किंवा वरील वस्तुस्थिती खोडून काढण्यासाठी तक्रारीला दिलेल्या उत्तरात देखील कुठलेही निवेदन दिले नाही. विमा दावा नाकारण्यासाठी विरुध्दपक्षाने केवळ व्हीसेरा अहवालावर भिस्त ठेऊन दावा नाकारल्याचे निदर्शनास येते. तसेच, विरुध्दपक्षाने त्याच्या समर्थनार्थ कुठलेही न्यायनिवाडे सादर केलेले नाही. याउलट, तक्रारकर्तीने तिच्या दाव्याच्या समर्थनार्थ मा.राष्ट्रीय आयोगाचे सहा न्यायनिवाडे दाखल केले आहे, त्यांचे अवलोकन केले असता त्या निवाड्यामधील नोंदविलेली काही निरिक्षणे, प्रस्तुत प्रकरणात देखील तंतोतंत लागु असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
1) Anil Kumar –Versus – National Insurance Co. Ltd., I(2018) CPJ 541 (NC).
2) Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. –Versus- Achala Rudranwas Marde, II(2015) CPJ 146 (NC).
3) M.Sujatha –Versus- Bajaj Allianz General Insurance Co. Ltd., III(2015) CPJ 104 (NC).
4) Executive Engineer, IPH Division –Versus- Shisma Devi and others, 2015 (2) CPR 316 (NC).
5) M/s. New India Assurance Co. Ltd. –Versus- Ashminder Pal Singh, Through his Attorney ,sh.Balwant Singh, 2015 (2) CPR 345 (NC).
6) Life Insurance Corporation of India and Anr. Co.Ltd. –Versus- Ranjit Kaur, III(2011) CPJ 232 (NC).
मा.राष्ट्रीय आयोगाने वरील निवाड्यामध्ये मध्ये विशेष नमुद केले आहे की, व्हीसेरा विश्लेषणानुसार रक्तामध्ये दारुचे प्रमाण (Blood Alcohol Combination-, BAC) मर्यादेपेक्षा जास्त असणे हेच केवळ दारु सेवनाचा निर्णायक पुरावा म्हणून धरला जाऊ शकत नाही. मृत्युचे एकमेव कारण हे केवळ दारु प्राशनामुळेच/अंमलामुळेच असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाल्याखेरीज किंवा त्याचा थेट संबंध असल्याचा प्रत्यक्ष पुरावा असल्याखेरीज विमा दावा नाकारला जाऊ शकत नाही.
मा.राष्ट्रीय आयोगाने वरील निवाड्यामध्ये मध्ये नमुद केले आहे की, व्हीसेरा विश्लेषणानुसार रक्तामध्ये दारुचे प्रमाण (Blood Alcohol Combination-, BAC) मर्यादेपेक्षा जास्त असणे हे इतर अनेक कारणावर अवलंबित असते (उदा, Process of Putrefaction after death, व्हीसेरा/रक्त नमुन्याचे प्रमाण, त्यात असलेले रक्त शर्करा प्रमाण, व्हीसेरा सरंक्षण (Preservation), त्याची स्थिति (Condition) व विश्लेषणा दरम्यान वापरलेल्या पद्धती तसेच विलंब कालावधी). त्यामुळे व्हीसेरा विश्लेषणानुसार रक्तामध्ये दारुचे प्रमाण (Blood Alcohol Combination-, BAC) मर्यादेपेक्षा जास्त असणे (Blood Alcohol Combination-, BAC) इतर सहाय्यक वैद्यकीय पुराव्याशिवाय दारु सेवनाचा निर्णायक पुरावा म्हणून धरला जाऊ शकत नाही.
मा.राष्ट्रीय आयोगाने वरील निवाड्यामध्ये मध्ये असे पण नमुद केले आहे की, दारू सेवन व दारूचा अंमल हा व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतो. हे त्याच्या शारीरिक स्थिति (Physical Condition), दारू सेवनाचे प्रमाण (Quantity), वारंवारता (frequency) व दारू सेवन आणि अपघात यामध्ये असलेला कालावधी अश्या इतर अनेक कारणावर अवलंबित असतो.
मा.राष्ट्रीय आयोगाच्या वरील निरीक्षणावर भिस्त ठेवत प्रस्तुत प्रकरणात देखील तक्रारकर्तीचा पती हा दारुच्या अमंलाखाली होता व केवळ त्यामुळेच त्याचा रस्ता अपघात होऊन मृत्यु झाला, असे दर्शविणारा कुठलाही थेट पुरावा विरुध्दपक्षाने सादर केला नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाचे निवेदन मान्य करता येत नाही, सबब फेटाळण्यात येते. उलटपक्षी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु रस्ता ओलांडताना भरधाव, निष्काळजीपणाने चालवीत आलेल्या वाहनामुळेच झाला असल्याचा पुरावा विविध व्यक्ति व अधिकार्याद्वारे उपलब्ध असल्यामुळे प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.1 व 2 ने सदर विमा दावा अयोग्य कारणासाठी फेटाळल्यामुळे सेवेतील त्रुटी असल्याचे व तक्रारकर्तीची तक्रार दाद मिळण्यास पात्र असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
Lic Of India & Anr. vs Smt.Ranjit Kaur REVISION PETITION NO.2433 OF 2007 on 11 July, 2011
“the specific clinical picture of alcohol intoxication also depends on the quantity and frequency of consumption and duration of drinking at that level and, therefore, mere presence of alcohol even above the usually prescribed limits is not a conclusive proof of intoxication. Apart from this, there is also no evidence that there was a nexus between the death caused by electric shock and consumption of liquor.”
12. विरुध्दपक्ष क्र.3 आणि 4 यांचा विमा दावा मंजुरीसबंधी कुठलाही प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे त्यांचेविरुध्द तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
13. प्रस्तुत प्रकरणात विमा दाव्याची देय रक्कम 9% द.सा.द.शे. अतिरिक्त व्याजासह आदेशीत केली असल्यामुळे, तक्रारकर्तीची शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी मान्य करणे आवश्यक नसल्याचे मंचाचे मत आहे.
सबब, प्रकरणातील वस्तुस्थिती आणि पुराव्याचा विचार करता खालील प्रमाणे आदेश देण्यात येतात.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे प्रस्ताव सादर केल्याचा दिनांक 11.4.2017 पासून द.सा.द.शे.9 % व्याजासह द्यावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.3 आणि 4 विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- तक्रारकर्तीस द्यावे.
(5) विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.