::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. श्रीमती कल्पना जांगडे (कुटे), सदस्या )
(पारीत दिनांक :- 30/06/2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, तक्रारकर्त्याचा सोनी ट्रेडर्स या नावाने चंद्रपूर येथे व्यवसाय आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दि.29/11/2012 रोजी विमा प्रिमियम रू.5,814/- भरून दुकानातील एकूण माल ज्यात फ्रिज, टिव्ही, वॉशिंग मशीन,ए.सी., माइक्रोवेव्ह ओवन व इतर विक्रीचे वस्तुंचा, माल चोरी, आग तसेच घरफोडी इत्यादी दुर्घटनांपासून होणारे नुकसानाकरीता रू.15,00,000/- चा विमा काढला. तसेच त्यात नगदी रक्कम रू.100000/- अशी मालमत्ता विमाकृत करण्यांत आली होती. सदर विमा पॉलिसीचा क्र.182500/48/2013/1752 असून तो दि. 30/11/2012 ते 29/11/2013 चे मध्यरात्रीपर्यंत वैध होता. अर्जदाराने पुढे कथन केले की, दिनांक 14/4/2013 चे रात्री अर्जदाराचे दुकानात चोरी झाली. सदर घटनेची माहिती अर्जदाराने दिनांक 15/04/2013 रोजी गैरअर्जदाराला दिली. तसेच अर्जदाराने दि. 02/05/2013 रोजी दावा प्रपत्र व त्यासोबतच 8,90,750/- रू. किमतीचे सामान /माल चोरी गेल्याची यादी गैरअर्जदाराकडे दिली. अर्जदाराच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दि. 15/4/2013 रोजी अपराध क्र.119/2013 अन्वये भा.द.वि.चे कलम 457,380 चा गुन्हा दाखल केला व मा.मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांचे न्यायालयात फौजदारी मामला क्र. 64/2014 दाखल केला. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या मागणी नुसार अंतीम अहवालाचे प्रत दिलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा दिनांक 11/12/2014 पर्यन्त निकाली काढला नाही व दिनांक 12/12/2014 रोजी पत्र पाठवुन अर्जदाराचा रू. 8,90,750/- चा विमा दावा फक्त रूपये 55,695/- करिता मंजुर केला आहे असे कळवुन त्यासोबत गैरअर्जदाराने अर्जदारास डिस्चार्ज व्हॉउचर, लेटर ऑफ अंडर टेकिंग इ. फॉर्म पाठविले. सदर पत्र प्राप्त होताच अर्जदाराने गैरअर्जदारास पत्र पाठवुन रूपये 8,90,750/- चा विमा दावा रूपये 55,695/- पर्यन्त कसा सिमीत केला याचा हिशोब मागितला त्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 15/01/2015 चे पत्र पाठवुन त्या सोबत यादी पाठवली. गैरअर्जदाराने कोणतेही कारण न दर्शविता अर्जदाराचा विमा दावा बहुतांश वस्तु करिता नाकारलेला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास लेखी कळविले की, अर्जदाराचा विमा दावा नेट लॉस बेसीस वर रूपये 55,695/- करिता मंजुर करण्यात आला आहे . परंतु अर्जदाराचे दुकानातील चोरी गेलेल्या सामानाचा विमा दावा नाकारण्यास गैरअर्जदारास कुठलेही कारण नाही. यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा रूपये 55,695/- पर्यन्त सिमीत करून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा न्युंनतापुर्ण व अनुचित व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फक्त रूपये 55,695/- करिता सिमीत करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून गैरअर्जदाराने अर्जदारास रूपये 8,90,750/- व त्यावर दिनांक 03/08/2013 पासुन रक्कम अर्जदाराच्या पदरी पडेपावतोचे द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज तसेच शारिरीक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रूपये 1,00,000/- व तक्रार खर्च रूपये 25,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यानी नि. क्रं. 10 वर आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरामधे अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द तक्रारीत केलेले आरोप हे चुकिचे असल्याने ते नाकबुल केले आहे परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन अर्जदाराचे दुकानातील मालाचा विमा काढला होता ही बाब मान्य केली आहे परंतु दुकानातील सर्वच मालाचा विमा काढला होताही बाब नाकबूल केली आहे. गैरअर्जदाराने पुढे कथन केले की, अर्जदाराकडुन चोरीच्या घटने संबंधी माहिती मिळताच गैरअर्जदाराने सर्वेयर नियुक्त केला. सदर सर्वेयरने शहानिशा करून तसेच पॉलीसीतील शेडयुलमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तु विचारात घेवून अहवाल दिला व सर्वेअरनी निश्चीत केलेल्या दायीत्वाची संपुर्ण रक्कम गैरअर्जदाराने मान्य केली. अर्जदार यांना पॉलिसीमध्ये कोणत्या वस्तु समाविष्ट होत्या हे पॉलिसीतील शेडयुलमध्ये नमूद असल्याने माहिती होते परंतु अर्जदार यांनी त्याबद्दल कधीही आक्षेप घेतला नाही तसेच पॉलिसीमध्ये आजपर्यंत सुधारणा करून मागितली नाही. त्यामुळे सर्व्हेयरने विमा पॉलिसीप्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीवर दावा दायित्व म्हणुन रूपये 55,695/- चा भार कायम केला. गैरअर्जदार कंपनीने सर्वेअरच्या शिफारशी नुसार अर्जदाराचा विमा दावा रूपये 55,695/- कायम करून अर्जदाराला तसे लेखी सुचित केले होते. गैरअर्जदाराने अर्जदारासोबत अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. अर्जदाराची संपुर्ण मागणी बेकायदेशीर आहे. सबब अर्जदाराची तक्रार खर्च व नुकसान भरपाई रू.45,000/- सह खारीज करण्यात यावी.
3. अर्जदाराचा अर्ज, दस्तावेज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय.
काय ?
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला होय.
आहे काय ?
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. तक्रारकर्त्याने दिनांक 29/11/2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनी कडे विमा प्रिमीयम रू.5,814/- भरून अर्जदाराचे दुकानातील मालाची 182500/48/2013/1752 क्रमांकाची विमा पॉलिसी घेतली ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या पॉलीसीवरुन सिध्द होत आहे. तसेच गैरअर्जदाराने सुध्दा आपले लेखी उत्तरामध्ये ही बाब मान्य केली आहे. सबब अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
5. तक्रारकर्त्याने सोनी ट्रेडर्स या दुकानातील मालाची विमा पॉलिसी गैरअर्जदाराकडुन काढली. त्यानंतर अर्जदाराच्या दुकानात दिनांक 14/4/2013 रोजी मध्यरात्री चोरी झाली तसेच अर्जदाराने विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला याबाबत वाद नाही∙ अर्जदाराने दुकानात चोरी झालेल्या वस्तुंची यादी गैरअर्जदाराला विमा दावा अर्जा सोबत दिलेली होती व सदर विमादावा अर्जाची प्रत व यादी प्रकरणात दाखल आहे. अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल केलेले दस्त क्रं. अ-1 ते अ 15 या दस्तावेजांचे अवलोकन करताना असे निदर्शनास आले कि, अर्जदाराचे दुकानात दिनांक 14/04/2013 चे मध्यरात्री मालाची चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने नियुक्त केलेल्या सर्वेयरने सर्वे केला व त्यांनतर गैरअर्जदाराने अर्जदारास दस्त क्रंमाक अ 15 असेसमेन्ट ऑफ लॉस ऑफ स्टॉक नुसार पॉलीसी मध्ये समाविष्ठ असलेल्या वस्तुंची एकूण् किंमत रूपये 73,506/ मधुन आवश्यकतेपेक्षा कमी रकमेचा विमा काढल्याबद्दल अंडर इश्योरन्स रक्कम रू.17,811/- वजा करून रूपये 55,695/ अर्जदारास घेण्याचे लेखी सुचीत केले आहे∙ दस्त क्रंमाक अ 1 पॉलिसीमध्ये मोबाईल्स, कॅमेरा, डी.व्ही.डी. इत्यादींचा समावेश नसल्याने सदर वस्तुची विमा रक्कम गैरअर्जदाराने अर्जदाराला दिली नाही असे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे. परंतु दस्त क्रंमाक अ 1 पॉलीसी .मध्ये ‘’ 1. Stock in trade of TV, FREEDGE, WASHING MACHINE, AC, MICRO-OWEN & GOODS OF SIMILAR HAZARDS” असे नमुद आहे व असे असतांनासुध्दा गैरअर्जदाराने अर्जदारास दुकानातील वस्तुंच्या चोरीमुळे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम पॉलिसीनुसार दिलेली नाही. अर्जदाराच्या दुकानात चोरी झाली तेंव्हा दस्त क्र.अ-5 यादीमध्ये नमूद असलेल्या वस्तु नव्हत्या ही बाब गैरअर्जदाराने कोणताही दस्तावेज वा पुरावा देवून सिध्द केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार अर्जदारास यादी क्रंमाक अ 5 मधील वस्तु, ज्यांचा पॉलीसी मध्ये समावेश आहे त्यांची विमा रक्कम देण्यास जबाबदार आहे. दस्त क्रं. अ-5 यादीमधील मोबाईल्स, कॅमेरा, लॅपटॉप व डिव्हीडी या वस्तू पॉलीसी मध्ये नमुद नाही ती रक्कम सोडून उर्वरीत रक्कम रू.1,52,900/- गैरअर्जदार अर्जदाराला देण्यास जवाबादार आहे हे अभिलेखावर दाखल असलेल्या दस्तावेजा वरून सिध्द होत आहे असे मंचाचे मत आहे. विरूध्द पक्षाने देऊ केलेली विमा रक्कम रू.55,695/- तक्रारकर्त्याने स्विकारलेली नाही. यासंदर्भात तक्रारकर्त्याने नि.क्र.16 वर पुरसीस दाखल केलेली आहे तसेच सदर बाब गैरअर्जदाराने नाकारलेली नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम न देऊन अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला तसेच सेवेत न्युनता दर्शविली हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं 2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
6. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.15/94 अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारांस सेवासुविधा देण्यांस कसूर केल्याचे
जाहीर करण्यांत येते.
(3) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास विमा दावा रक्कम रूपये 1,52,900/-
तसेच त्यावर तक्रार दाखल झाल्याचे दिंनाक 11/06/2015 पासुन संपूर्ण
रक्कम अदा होईपर्यन्त 8 टक्के व्याज आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30
दिवसाचे आत दयावे.
(4) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक
ञासापोटी नुकसानभरपाई रु. 10,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30
दिवसाचे आत तक्रारकर्त्यास दयावे.
(5) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 30/06/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.