रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 123/2008. तक्रार दाखल दि.- 24/11/08. निकालपत्र दि. – 20/2/2009. श्री. फारुख नवाबसाब शेख, रा. परतापुर, ता. बसवकल्याण, जि.बिदर, ह.मु. उमरगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. ..... तक्रारदार
विरुध्द
1. दि. ओरिएंटल इन्शुरंस कंपनी लि. तर्फे, विभागीय प्रबंधक, दि. ओरिएंटल इन्शुरंस कंपनी लि. द्वारका, दुसरा मजला, 79- युटीआय, अमर गांधी सलई, चेन्नई.
2. शाखा प्रबंधक, दि. ओरिएंटल इन्शुरंस कंपनी लि. पेण, जि. अलिबाग. ..... सामनवाले उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य तक्रारदारांतर्फे – अँड. आर.व्ही.ओक विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे – अँड. दरानदले विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे – अँड. मुकादम - नि का ल प त्र -
द्वारा मा.सदस्य, श्री.कानिटकर. तक्रारदारांचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे परतापुर, ता. बसवकल्याण जि. बिदर ह.मु. उमरगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. येथील रहिवासी असून ते मालट्रक टाटा एलपीटी KA- 39/5157 चे मालक आहेत. सदर ट्रक हा त्यांनी श्रीराम फायनान्स, बसवकल्याण यांच्याकडून कर्ज घेऊन खरेदी केला असून त्याचा विमा त्यांनी सामनेवाले 1 कडून उतरविलेला आहे. या विमा पॉलिसीची मुदत दि. 1/9/2006 ते 31/8/2007 अशी आहे. 2. दि. 4/4/07 रोजी या ट्रकमधून तक्रारदारांचे ड्रायव्हर हे वडखळ धरमतर जेट्टी येथून कोळसा घेऊन विजापूर येथे जात असता, धामणी गावाचे परिसरात या ट्रकला अपघात झाला व या अपघातात तक्रारदारांचे सुमारे 12,00,000/- रु.चे नुकसान झाले. त्या घटनेचा गुन्हा ट्रक ड्रायव्हर विरुध्द पोलिस स्टेशन खालापूर, जि. रायगड येथे दाखल झाला व ट्रक ड्रायव्हरने आपला गुन्हा मा.न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग खालापूर यांचेसमोर कबूल केला व त्याचा रु. 100/- दंड त्याने न्यायालयात भरला. तक्रारदारांनी झालेल्या अपघाताची माहिती सामनेवाले क्र. 1 ला देऊन नुकसान भरपाईचा आवश्यक तो क्लेम फॉर्म भरून दिला. त्यासोबत तक्रारदारांनी अपघातात ट्रकचे नुकसान व वस्तुस्थिती याचा अहवाल फोटोसह सामनेवालेकडे दाखल केला. 3. सदर गाडीच्या दुरुस्तीसाठी पुरेशी रक्कम नसल्याने तक्रारदारांनी सामनेवाले विमा कंपनीकडे स्वतः पाठपुरावा केला. परंतु सामनेवाले 1 ने तक्रारदारांना तुम्ही ट्रकची दुरुस्ती करुन घ्या विम्याच्या नुकसान भरपाईचे नंतर पाहू असे सांगून नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांची सांपत्तिक स्थिती चांगली नसल्याने तक्रारदार ट्रकची दुरुस्ती आजपर्यंत करु शकलेले नाहीत. इतका पाठपुरावा करुनही सामनेवाले 1 हे नुकसान भरपाईची रक्कम देत नसल्याने तक्रारदारांनी सामनेवाले 1 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु त्या नोटीसीलाही सामनेवाले 1 ने प्रतिसाद दिला नाही. सदर ट्रकचा अपघात दि. 4/4/07 रोजी झाल्याने त्यांचा हा तक्रार अर्ज मुदतीत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. 4. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असल्याने व सामनेवाले हे विम्याच्या रकमेची भरपाई करीत नसल्याने त्यांनी मंचाला विनंती केली की, सामनवाले 1 ने तक्रारदारांना रु. 12,00,000/- द्यावेत तसेच तक्रार अर्जाचा खर्च व त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु. 20,000/- सामनेवालेंकडून मिळावेत व न्यायिक खर्चापोटी रु. 2,000/- मिळावेत तसेच सदर गाडीचा अपघात हा रायगड जिल्हयात झालेला असल्याने मा.मंचाला सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तसेच सदर ट्रकच्या अपघाताची नुकसान भरपाई मिळण्याबाबत तक्रारदारांनी भारतात इतरत्र कुठेही तक्रार व अर्ज केलेला नाही असेही त्यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. 5. नि. 1 अन्वये तक्रारदारांनी आपला तक्रार अर्ज दाखल केला आहे. नि. 2 वर तक्रारदारांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि. 3 अन्वये तक्रारदारांतर्फे अँड. आर.व्ही.ओक यांनी आपले वकीलपत्र दाखल केले आहे. तसेच नि. 5 वर गाडीच्या अपघाताचा पंचनामा व ड्रायव्हरचा जबाब, विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि. 6 अन्वये मंचाने सामनेवाले 1 व 2 यांना नोटीस पाठविली. नि. 7 वर त्याची पोच अभिलेखात उपलब्ध आहे. नि. 9 अन्वये सामनेवाले 1 तर्फे अँड. एस.आर.दरानदले यांनी आपले वकीलपत्र दाखल केले आहे. नि. 12 अन्वये सामनेवाले 1 ने आपला लेखी जबाब दाखल केला आहे. नि. 13 अन्वये सामनेवाले 1 यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि. 14 अन्वये सामनेवाले 2 तर्फे अँड. मुकादम यांनी आपले वकीलपत्र दाखल केले आहे. आपल्या लेखी जबाबात सामनेवाले 1 असे म्हणतात की, तक्रारदारांनी आपली तक्रार कायदयाच्या कलमांप्रमाणे व्यवस्थित दाखल केलेली दिसून येत नाही व त्यामुळे त्यांची तक्रार मंचाने नामंजूर करावी अशी त्यांनी मंचाला विनंती केली आहे. 6. आपल्या लेखी जबाबात सामनेवाले 1 पुढे असे म्हणतात की, तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या विमा दाव्याची पूर्तता केलेली नाही. तसेच त्यांचा नुकसान भरपाईचा दावा मिळाल्यानंतर सामनेवाले यांनी सर्व्हेअरची नेमणूक केली व त्या सर्व्हेअरने अपघाताच्या जागेची पाहणी केली. त्याप्रमाणे सर्व्हेअरने आपला अहवाल सामनेवाले 1 कडे सादर केला. त्या अहवालानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर गाडीच्या दुरुस्तीचे एस्टीमेट देण्यास सुचविले. परंतु तक्रारदारांनी त्याप्रमाणे सुचनांचे पालन न केल्याने गाडीच्या नुकसानीचा अंदाज त्यांना करता आला नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या नुकसानीच्या दाव्याबाबत ते काहीही निर्णय घेऊ शकले नाहीत. जोपर्यंत तक्रारदार त्यांच्या गाडीच्या नुकसानीचे एस्टीमेट सामनेवाले कडे सादर करत नाहीत तोपर्यंत गॅरेजचा सर्व्हे त्यांच्या सर्व्हेअरला करता येणार नाही व ही त्रुटी तक्रारदारांवरच असल्याने त्यांच्या दाव्याबाबत पुढील निर्णय घेता येणार नाही. तक्रारदार हे त्यांच्या तक्रारीच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये म्हणतात त्याप्रमाणे त्यांची गाडी संपूर्ण क्षतीग्रस्त झाल्याचे सामनेवाले मान्य करु शकत नाहीत व त्यांच्या गाडीचे रु. 12,00,000/- चे नुकसान झाल्याचेही सामनेवाले यांना मान्य नाही. अपघाताच्या जागेच्या पंचनाम्यावरुन लहानमोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याचे सामनेवालेंनी म्हटले आहे. 7. अपघाताच्या जागेची पाहणी सामनेवाले यांनी ताबडतोब केली असल्याचे ते पुन्हा प्रतिपादन करतात. तक्रारदारांच्या दाव्याचे प्रकरण सामनेवालेकडे प्रलंबित असल्याने व तक्रारदारांनी जरुर ती पूर्तता न केल्याने त्यांनी दिलेल्या कायदेशीर नोटीसीला उत्तर देण्याचे सामनेवाले यांना काहीच कारण नाही. तसेच झालेल्या नुकसानीपोटी रु. 12,00,000/- ही रक्कम तक्रारदारांना देण्यास सामनेवाले नाकारतात. तक्रारदारांचा हा दावा प्रलंबित असण्याला सामनेवाले यांची दोषपूर्ण सेवा जबाबदार नाही. तक्रारदार हे कर्नाटक राज्यातील रहिवासी असून त्यांच्या गाडीच्या विम्याची पॉलिसी ही तामिळनाडू राज्यातून दिली गेली असल्याने ही तक्रार या मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नसल्याने या मंचाला सदरची तक्रार चालविण्याचा तसेच या प्रकरणात निकाल देण्याचा अधिकार नाही असे सामनेवाले यांनी प्रतिपादन केले आहे. तसेच कायद्याच्या तरतूदीनुसार ही तक्रार खोटी असल्याने ती नामंजूर करण्यात यावी अशी सामनेवाले यांनी मंचाला विनंती केली आहे. 8. दि. 13/2/09 रोजी प्रकरण अंतिम सुनावणीस आले असता, तक्रारदारांतर्फे त्यांचे वकील हजर होते. सामनेवाले 1 व 2 व त्यांचे वकील गैरहजर होते. सामनेवाले 1 यांनी आपल्या लेखी जबाबासोबत कोणतीही कागदपत्रे दाखल केली नाहीत. तक्रारदारांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद मंचाने ऐकला. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, सामनेवाले 1 यांचा लेखी जबाब यांचा विचार करुन मंचाने तक्रारीच्या अंतिम निराकरणार्थ खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले. मुद्दा क्रमांक 1 - सदर तक्रार या मंचाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात येते काय ? उत्तर - होय. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ? उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारांचा अर्ज त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मंजूर करता येईल काय ? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्रमांक 1 व 2 - सामनेवाले यांच्या लेखी जबाबाचा विचार करता, त्यांनी मंचाच्या भौगोलिक अधिकाराबाबतचा मांडलेला मुद्दा हा अयोग्य असल्याचे मंचाचे ठाम मत आहे. सदर अपघात हा रायगड जिल्हयात झालेला असून तसा पंचनामाही अभिलेखात दाखल आहे. तसेच सामनेवाले विमा कंपनीची शाखा पण रायगड जिल्हयात आहे. तसेच नि. 10 वर सामनेवाले यांनीच त्यांच्या पनवेल (जि.रायगड) येथील डिव्हिजनल ऑफिसचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा या मंचाला पूर्ण अधिकार आहे. तक्रारदारांनी जरुर त्या मागण्यांची पूर्तता केली नसल्याचे सामनेवाले यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे तशी मागणी केल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रातील पंचनाम्यावरुन असे दिसून येते की, अपघातामध्ये त्यांचे खरोखरच अतोनात नुकसान झालेले आहे. सदर वाहनात असलेला कोळसा हा इतरत्र पडलेला दिसून येत आहे व वाहन सुध्दा डाव्या कुशीवर पलटी झालेले असून त्याची केबीन संपूर्णपणे मोडलेली दिसत आहे. पुढील केबीनच्या काचाही फुटलेल्या असून, धडीपासून बॉडी वेगळी झालेली आहे तसेच मागच्या बॉडीच्या फाळका इत्यादी सर्व तुटलेले आहे. रेडीएटर फुटला असून इंजिनलाही मार लागलेला आहे असे त्यात वर्णन असून सदर गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाल्याचे त्यात नमूद केलेले आहे. सदर गाडीचे विमा पॉलिसीप्रमाणे जाहीर केलेले मूल्य रु. 12,00,000/- आहे. तक्रारदारांच्या वकीलांनी सदर ट्रक घेतल्यापासून एक वर्षांच्या आत अपघात झाल्याचे म्हटले आहे. Insurance Regulatory and Development Authority 2002 मधील तरतूदी नुसार सर्व्हेअरने अपघातग्रस्त गाडीचा अहवाल 30 दिवसांचे आत द्यावयाचा असतो. जास्तीचा लागणारा सर्व्हे अहवाल हा सुध्दा 30 दिवसांमध्ये विमा कंपनीकडे आला पाहिजे अशीही त्यात तरतूद आहे. असे असूनही तक्रारदार यांनी मंचात अकाली (premature) तक्रार दाखल केलेली आहे असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. परंतु अपघात हा दि. 4/4/07 रोजी झालेला असून आजपर्यंत विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा त्यांनी जरुर ती पूर्तता न केल्याने नाकारणे आवश्यक होते. तसे न करता त्यांनी ही खोटी तक्रार असल्याचे कारण दाखवून काढून टाकण्याची मंचाला विनंती केली आहे. आपल्या लेखी जबाबासह सामनेवाले यांनी काहीही पुरावा म्हणून दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व त्यांच्या वकीलांनी केलेला तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारांनी मंचाला केलेली विनंती विचारात घेता, व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, त्यांच्या गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले असल्याचे मंचाचे मत आहे. विमा कंपनीने याबाबत काहीच कागदपत्रे दाखल केलेली नाहीत तसेच अपघात झाल्यापासून बराच कालावधी लोटल्याने सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना त्यांच्या ट्रकच्या नुकसान भरपाईपोटी रु. 12,00,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी मानसिक त्रासापोटी जी रु. 20,000/- ची मागणी केली आहे ती मंचाला अवास्तव वाटत असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. तसेच न्यायिक खर्चापोटी तक्रारदारांनी केलेली रु. 2,000/- ची मागणी योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. सबब, आदेश पारीत करण्यात येतो की, -: अंतिम आदेश :- आदेश पारीत तारखेच्या 45 दिवसांचे आत, सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात :- अ) ट्रकच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी रु. 12,00,000/- (रु.बारा लाख मात्र) द्यावेत. ब) मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- (रु.दहा हजार मात्र) द्यावेत. क) न्यायिक खर्चापोटी रु. 2,000/- (रु.दोन हजार मात्र) द्यावेत. ड) विहीत मुदतीत उक्त आदेशाचे पालन सामनेवाले 1 यांनी न केल्यास, वरील सर्व रकमा वसूल करण्याचा तक्रारदार यांना अधिकार राहील. इ) या आदेशाच्या प्रती सर्व पक्षकारांना पाठविण्यात याव्यात.
दिनांक :- 20/2/2009. ठिकाण :- रायगड – अलिबाग. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |