नि.29
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य – श्री.के.डी.कुबल
मा.सदस्य – श्रीमती व्ही.एन.शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.295/2010
तक्रार नोंद तारीख – 29/06/2010
तक्रार दाखल तारीख - 30/06/2010
निकाल तारीख - 09/07 /2013
-------------------------------------------------------------------------------------------
श्री.बाबासाहेब पांडूरंग वाकसे
व.व.32, धंदा – शेती,
रा.बागेवाडी, ता.जत, जि.सांगली. ... तक्रारदार
विरुध्द
1. शाखा अधिकारी,
दि ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
माता बिल्डींग, आंबेडकर रोड, सांगली.
शाखा अधिकारी
2. व्यवस्थापक,
जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि.
जायका बिल्डींग, सिव्हील लाईन
नागपूर – 01
3. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,
महाराष्ट्र शासन
मिरज, ता.मिरज, जि.सांगली. ... जाबदार
तक्रारदारतर्फे – ऍड.डी.एम.धावते जाबदार क्र.1 तर्फे - ऍड.बी.बी.खेमलापूरे
जाबदार क्र.2 व 3 - एकतर्फा
निकालपत्र
व्दारा – मा.अध्यक्ष श्री.ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल केलेली असून जाबदार विमा कंपनीकडून त्याने पशुधन विकास योजनेअंतर्गत त्याच्या गाईचा उतरविलेल्या विम्याची रक्कम रु.30,000/- व ती गाय मयत पावल्यानंतर त्या विम्याची रक्कम जाबदार कंपनीने अद्याप न दिल्याने झालेल्या सेवेतील त्रुटीबद्दल नुकसान भरपाई रु.10,000/- व विमा पॉलिसीच्या रकमेवर दि.07/11/2008 ते तक्रार दाखल करेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज, त्याची रक्कम रु.5,400/- अशी एकूण रक्कम रु.45,400/- ची मागणी केलेली आहे. तसेच, सदर रकमेवर तक्रार दाखल केलेपासून पुढील व्याज द.सा.द.शे.12 टक्के दराने व तक्रारीचा खर्च रु.3,000/- ची मागणी केलेली आहे.
2. तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी आहे की, तक्रारदाराच्या मालकीची एच.एफ.एक्स. जातीची गाय होती. तिच्या कानातील टॅग नंबर ओआयसी-181100/एसएनजी/101338 असा होता. जाबदार क्र.3 महाराष्ट्र शासनातर्फे 2007-2008 या कालावधीत सांगली जिल्हयात राबविलेल्या पशुधन विमा योजनेखाली तक्रारदाराने सदर गाईचा विमा जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरविलेला होता. सदर विम्याच्या पॉलिसीचा नंबर 101338 असा होता. सदर गाय दि.07/11/2008 रोजी मरण पावली. सदर मयताचा पंचनामा करण्यात आला. गावचे पोलिसपाटील व सरपंच, ग्रामपंचायत यांना गाय मयत झाल्याचे दाखवून त्यांच्याकडून दाखले घेण्यात आले. बागेवाडी येथील गावच्या डेअरी चालकाचादेखील सदर गाय मयत झाल्याबददल दाखला घेतला. पशुवैद्यक, बागेवाडी यांच्याकडून सदर गाईचे पोस्ट मार्टेम करुन घेण्यात आले व त्याचदिवशी सदर गाय मयत झालेचे तक्रारदाराने फॅक्सव्दारे जाबदार विमा कंपनीला कळविले. दि.13/11/2008 रोजी विहीत नमुन्यात तक्रारदाराने क्लेम फॉर्म भरला व त्यासोबत पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इतर सर्व दाखले व कानातील टॅग जाबदार क्र.2 हयांच्याकडे पाठवून दिले. कागदपत्रांची सर्व पूर्तता केली असताना देखील जाबदार क्र.1 व 2 हयानी तक्रारदारास आजतागायत त्याचा क्लेम मंजूर झाला किंवा नाही हे कळविलेले नाही. वेळोवेळी पत्रव्यवहार करुनसुध्दा त्यास कोणतेही उत्तर जाबदारांकडून मिळलेले नाही. अशा त-हेने जाबदार क्र. 1 व 2 यानी अनुचित व्यापार पध्दतीचा अवंलब करुन तक्रारदारास दुषीतसेवा दिली आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद मागण्या प्रस्तुत प्रकरणात केलेल्या आहेत.
3. तक्रारदाराने नि.3 ला शपथपत्र दाखल करुन नि.5 सोबत एकूण 10 कागदपत्रे दाखल केलेली असून नि.27 सोबत क्लेमफॉर्म स्पीड पोस्टाने जाबदार क्र.2 हयाकडे पाठवल्याची व ती जाबदार क्र.2 यास मिळाल्याची पोहोचपावती दाखल केलेली आहे.
4. जाबदार क्र.2 आणि 3 हे नोटीस बजावूनदेखील गैरहजर असल्याने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश झाले.
5. जाबदार क्र.1 विमा कंपनीने हजर होवून आपली लेखी कैफियत नि.12 ला दाखल केलेली आहे. जाबदार क्र.1 हयांनी तक्रारदाराचे संपूर्ण कथन व मागणी अमान्य करुन तक्रारदारास कोणतीही दुषीत सेवा दिली नसल्याचे कथन केलेले आहे. तक्रारदाराने आपल्या गायीचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता व जाबदार विमा कंपनीने तक्रार अर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी दिली होती ही बाब जाबदार क्र.1 विमा कंपनीने मान्य केलेली आहे. तथापी, तक्रारदाराने आपली गाय मयत झाल्याची माहिती विमा कंपनीस दिली व त्यानंतर, त्याबद्दल क्लेम दाखल केला ही बाब विमा कंपनीने स्पष्टपणे नाकारलेली आहे. विमा कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, सदरची गाय मयत झाल्याचे विमा कंपनीस माहित नसल्याने व त्याबददलचा क्लेम विमा कंपनीकडे मिळाला नसल्याने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्याचा आणि त्यायोगे त्यास कोणतीही दुषीत सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असून ती खारीज करण्यास पात्र आहे. अशा कथनांवरुन जाबदार विमा कंपनीने प्रस्तुत तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केलेली आहे. आपल्या कैफियतीच्या शेवटी जाबदार क्र.1 विमा कंपनीने आपले विभागीय व्यवस्थापक श्री.अरुनाभ बर्धन यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. जाबदार विमा कंपनीतर्फे कोणतीही कागदपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत.
6. तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.15 ला दाखल केलेले असून आपला पुरावा संपला असे घोषीत केलेले आहे. जाबदारतर्फे पुरावा देणेचा नाही अशी पुरशीस नि.13 ला दाखल करण्यात आलेली आहे.
7. तक्रारदारांचे विद्वान वकिल यांनी आपला युक्तिवाद सादर केला तर जाबदार क्र.1 विमा कंपनीचे विद्वान वकिलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.19 ला दाखल करुन नि.18 ला पुरशीस दाखल करुन आपला लेखी युक्तिवाद हाच तोंडी युक्तिवाद समजावा असे प्रतिपादन केलेले आहे.
8. दोन्ही पक्षकारांच्या कथनांवरुन, उपलब्ध पुराव्यावरुन व युक्तिवादावरुन खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरीता उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? - होय.
2. जाबदारांनी त्यास दुषीत सेवा दिली आहे
हे तक्रारदारांनी शाबित केले आहे काय ? - होय.
3. तक्रारदारास तक्रार अर्जात मागणी केलेल्या
रकमा मिळण्याचा त्याला हक्क आहे काय ? - होय. .
4. अंतिम आदेश ? - खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
10. मुद्दा क्र.1 - तक्रारदाराने आपल्या गाईचा विमा जाबदार क्र.3 महाराष्ट्र शासनाने 2007-2008 या कालावधीत राबविलेल्या पशुधन विमा योजनेखाली जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे उतरविला होता ही बाब जाबदार क्र.1 विमा कंपनीने मान्य केली आहे, तर जाबदार क्र.2 आणि 3 हे गैरहजर राहिल्याने त्यांनी आपल्या अनुपस्थितीने सदर बाब मान्य केलेली आहे हे स्पष्ट होते. तक्रारदार हयाची गाय मरण पावली हयाबाबत जाबदार क्र.2 आणि 3 हयांचा इन्कार दिसत नाही. त्यामुळे तक्रारदार हा जाबदार क्र.1 या विमा कंपनीचा ग्राहक होतो व जाबदार क्र.1 ते 3 हे त्यास सेवा देणारे होतात हे स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 याचे उत्तर होकारार्थी दयावे लागेल आणि तसे ते आम्ही दिलेले आहे.
11. मुद्दा क्र.2 ते 3 एकत्रित - जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराच्या गाईचा विमा उतरविलेला होता व तक्रार अर्जात नमूद केलेली पॉलिसी दिलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. तक्रारदाराची गाय मरण पावली ही बाब जाबदार क्र.1 विमा कंपनीने स्पष्टपणे नाकारलेली नाही, तथापी, तक्रारदाराची मयत गाय आणि जिचा विमा काढला होता ती गाय हया वेगळया होत्या आणि विमाकृत गाय मरण पावल्याची माहिती व त्याबाबतचा विमा दावा जाबदार क्र.1 विमा कंपनीस मिळालाच नाही, त्यामुळे तक्रारदारास विम्याची रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही अशी केस विमा कंपनीने मांडली आहे. विमा कंपनीच्या हया प्रतिदाव्यामुळे प्रस्तुत प्रकरणातील पुराव्याची व्याप्ती ही फार सिमीत स्वरुपाची होते.
12. तक्रारदाराने फेरीस्त नि.5 सोबत अनु.क्र.1 ला आपल्या गाईच्या विमा पॉलिसीची नक्कल हजर केलेली आहे. सदरची विमा पॉलिसी जाबदार विमा कंपनीने मान्य केलेली आहे. त्या विमा पॉलिसीमध्ये ज्या गाईचा विमा उतरविलेला आहे, त्या गाईचे संपूर्ण वर्णन दिलेले आहे. सदरची गाय एच.एफ.एक्स (होस्टेन) या प्रजातीची असून काळया रंगाची होती व तिला शिंगे नव्हती. तिच्या ओळखीच्या टॅगचा नंबर एसएनजी101338/ओआयसी181100 असा असल्याचे दिसत असून त्या गाईचे वय साडेपाच वर्षे असल्याचे दिसते. सदर गाईची किंमत रु.30,000/- दर्शविण्यात आलेली असून आश्वासित रक्कमदेखील रु.30,000/- ची दर्शविलेली आहे. पॉलिसीत दिलेले गाईचे सदर वर्णन जर तक्रारदारांनी दाखल केलेल्या क्लेम फॉर्म, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, सदर गाय पुरताना केलेला पंचनामा, सरपंचाचा दाखला, गावकामगार पोलिसपाटलाचा दाखला व दूध डेअरीच्या सचिवाने दिलेला दाखला हयात दिलेल्या गाईच्या वर्णनाशी पडताळून पाहिले तर विमापॉलिसीमध्ये नमूद केलेलीच गाय मरण पावल्याचे दिसते. हया पुराव्याला जाबदार विमा कंपनीने कोणतेही आव्हान दिलेले नाही. तक्रारदाराने आपल्या पुराव्याच्या शपथपत्रात हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, गाय मरण पावलेल्याच दिवशी त्याने जाबदार क्र.2 हयास त्याची विमाकृत गाय मरण पावल्याची माहिती फॅक्सने दिली होती. सदरबाबत तक्रारदाराने फॅक्स केलेल्या माहितीची स्थळप्रत व फॅक्स केल्याबद्दलची पावती इत्यादी फेरीस्त नि.5 सोबत अनु.क्र.8 व 9 ला दाखल केलेली आहेत. याही पुराव्याला जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून कसलेही आव्हान देणेत आलेले नाही. त्यामुळे ही बाब निर्विवादीतपणे शाबित होते की तक्रारदाराची विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेलीच गाय दि.07/11/2008 रोजी मरण पावली व त्याबाबतची माहिती तक्रारदाराने त्वरीत जाबदारास दिलेली होती.
13. तक्रारदाराने दि.13/11/2008 रोजी विहीत नमुन्यात सादर केलेल्या विमा दाव्याची प्रत फेरिस्त नि.5 सोबत दाखल केलेली असून त्याचसोबत अनु.क्र.10 ला स्पीड पोस्टाची जाबदार क्र.2 ची सही असलेली पोहोचपावती दाखल केलेली आहे. त्या पोहोचपावतीवरुन असे दिसते की सदरचा विमा दावा जाबदार क्र.2 हयास दि.20/11/2008 ला दुपारी 2.35 मिनीटांनी प्राप्त झाला. सदर पोहोचपावतीची मूळ प्रत आजरोजी तक्रारदाराने नि.27 सोबत दाखल केलेली आहे. सदर पशुधन विमा योजनेखाली जाबदार क्र.2 ही सदर पशुधन विमा योजना राबवण्याकरीता महाराष्ट्र शासन व संबंधीत विमा योजना हयामध्ये विमा दाव्यासंबंधी मध्यस्थाचे काम करीत असे. सदर योजनेतील जाबदार क्र.2 ही दुवा होती व संपूर्ण विमा दावे जाबदार क्र.2 कडून संबंधीत विमा कंपनीकडे, एकतर जाबदार क्र.3 शासनाकडून किंवा संबंधीत शेतक-याकडून पाठविले जात असत. ज्याअर्थी, जाबदार क्र.2 हयास तक्रारदाराने पाठवलेला विमा दावा प्राप्त झाला, त्याअर्थी, तो विमा दावा जाबदार क्र.1 विमा कंपनीस देखील प्राप्त झाला असे गृहीत धरावे लागेल. जाबदार क्र.1 विमा कंपनीस असा विमा दावा आपणास मिळालाच नाही किंवा तक्रारदराराची गाय मरण पावल्याची माहिती मिळालीच नाही असे म्हणता येणार नाही. या कथनांच्या शाबितीकरण्याकरीता जाबदार क्र.1 विमा कंपनीने कोणताही पुरावा दिलेला नाही किंवा तक्रारदाराचा उलटतपासदेखील घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा जाबदार विमा कंपनीस मिळाला ही बाब सिध्द होते. विमा काढलेल्या गाईच्या मत्युची माहिती मिळूनदेखील व त्याबददलचा विमा दावा मिळूनदेखील तक्रारदाराचा विमा दावा नाकारणे ही त्यास दिलेली दुषीत सेवा आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे वर नमूद मुद्दा क्र.2 चे उदत्तर होकारार्थी दयावे लागेल आणि तसे ते आम्ही दिलेले आहे.
14. प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.1 विमा कंपनीने सदरची विमाकृत गाय मरण पावल्याची माहिती त्यास मिळालीच नाही व विमा दावा मिळालाच नाही हयाशिवाय इतर कोणताही बचाव घेतलेला नाही. विमा कंपनीचा हा दावा वर नमूद केल्याप्रमाणे फोल ठरलेला आहे. तसेच, ज्या गाईचा विमा उतरविला होता ती गाय सोडून इतर दुसरीच गाय मरण पावली हा जाबदार क्र.1 चा दावा देखील कागदपत्रांवरुन फोल ठरलेला आहे. विम्याच्या आश्वासित रकमेबददल जाबदार क्र.1 विमा कंपनीने कोणताही उजर केलेला नाही. विमा दावा प्राप्त झाला असूनसुध्दा त्याची रक्कम विमाधारकास न देणे ही दुषीत सेवा होते त्याकरीता जाबदार क्र.1 विमा कंपनी ही तक्रारदारास विमापॉलिसीतील नमूद केलेली रक्कम रु.30,000/-, तसेच, तक्रारदारास दिलेल्या दुषीत सेवेबद्दल भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- तक्रारदारास देणेस जबाबदार आहेत. तक्रारदाराने विम्याच्या रकमेवर दि.07/11/2008 पासून तक्रार दाखल करेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज मागितलेले आहे व त्याकरीता रक्कम रु.5,400/- ची मागणी केलेली आहे ती योग्य वाटते व तशी ती तक्रारदारास मिळणेस तो पात्र आहे असा या मंचाचा निष्कर्ष आहे. तक्रारदाराने हया तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- मागितलेली आहेत. सदर तक्रारीतील एकूण वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराची ती मागणी देखील मंजूर करावी असे या मंचाचे मत आहे. तथापी, तक्रारदाराने रकमांवर तक्रार दाखल केल्यापासून रक्कम हातात प्रत्यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे. ती मागणी अवाजवी आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराने मागितलेले व्याज हे कोण्या व्यापारी प्रथेवर अवलंबून नाही किंवा उभय पक्षांतील कोणत्या करारावर आधारुन नाही त्यामुळे त्यास सदर दराने पुढील व्याज देण्याची आवश्यकता नाही. तथापी, प्रचलित प्रथेप्रमाणे त्यास विम्याच्या रकमेवर तक्रार दाखल केल्यापासून रक्कम प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत द.सा.द.शे.8.5 टक्के दराने पुढील व्याज मिळण्यास तो पात्र आहे असे या मंचाचे मत आहे करीता मुद्दा क्र.2 व 3 यांचे आम्ही होकारार्थी उत्तर देत आहोत.
15. प्रस्तुत प्रकरणामध्ये जाबदार क्र.2 आणि 3 यांचा सहभाग हा केवळ औपचारिक स्वरुपाचा आहे. जरी जाबदार क्र.3 महाराष्ट्र शासन यांनी पशुधन विमा योजना राबविली तरी महाराष्ट्र शासन आणि तक्रारदार यांचेमध्ये प्रत्यक्ष असा विम्याचा कुठलाही करार नव्हता. महाराष्ट्र शासन व जाबदार क्र.1 यांचेमध्ये सदर योजना राबविण्यासंदर्भात जो काही करार झाला, त्या करारान्वये महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांच्या पशुधनासंबंधी एका विहीत कालावधीकरिता जाबदार क्र.1 विमा कंपनीने विमा योजना राबविली होती व त्याचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी होते. सदर योजना राबविण्याकरिता जाबदार क्र.2 यांची एक मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जाबदार क्र.2 यांचे कर्तव्य एवढेच की, लाभार्थी शेतक-यांकडून दाखल झालेले विमा दावे तपासून पहावेत, त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली आहेत किंवा नाहीत हे पहावे आणि विमा दावा संबंधीत विमा कंपनीकडे पाठवावा. अशा परिस्थितीत तक्रारदाराचा विमादावा आजतागायत मंजूर जर झाला नसेल तरी त्यास जाबदार क्र.2 व 3 यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदाराचा विमादावा एक तर मंजूर करावा किंवा नाकारावा याची जबाबदारी जाबदार क्र.1 विमा कंपनीवर होती. जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास जी सेवेत त्रुटी दिली त्याकरिता जाबदार क्र.2 व 3 यांना दोषी धरता येऊ शकत नाही. जाबदार क्र.2 यांचेकडे तक्रारदाराचा विमादावा पोचला हे दाखविणारा कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने हजर केलेला आहे. त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तक्रारदाराने जोडल्याचे कथन तक्रारदाराने स्पष्टपणे केले आहे. अशा परिस्थितीत सदरचा विमा दावा जाबदार क्र.2 ने जाबदार क्र.1 विमा कंपनीकडे पाठविला हे गृहित धरावे लागेल व त्यायोगे तक्रारदारास जी सेवेत त्रुटी देण्यात आली आहे, त्यास केवळ जाबदार क्र.1 यास जबाबदार धरावे लागेल असे या मंचाचे मत आहे. करिता प्रस्तुत प्रकरणात आम्ही जाबदार क्र.1 यास केवळ जबाबदार धरीत आहोत आणि खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास विम्याची रक्कम रु.30,000/- द्यावी.
3. जाबदार क्र. 1 यांनी दि.07/11/2008 ते तक्रार दाखल करण्याच्या
तारखेपर्यंतच्या कालावधीकरीता द.सा.द.शे.12 टक्के दराने सदर विम्याचे रकमेवरील
व्याज रक्कम रु.5,400/- तक्रारदारास द्यावेत.
4. जाबदार क्र.1 यांनी रक्कम रु.10,000/- नुकसानभरपाई दाखल तक्रारदारास द्यावी.
5. जाबदार क्र.1 यांनी विम्याची रक्कम रु.30,000/- हयावर तक्रार दाखल केलेपासून
रक्कम प्रत्यक्ष हातात येईपर्यंत द.सा.द.शे.8.5 टक्के दराने व्याज तक्रारदारास द्यावे.
6. वरील सर्व रकमा हया आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात,
अन्यथा, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25 अथवा 27 खालील
प्रावधानांचा अवलंब करुन सदर रक्कम वसूल करावी.
दि.09/07/13.
ठिकाण – सांगली.
(व्ही.एन.शिंदे) (के.डी.कुबल) (ए.व्ही.देशपांडे)
सदस्य सदस्य अध्यक्ष