नि. 24
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 442/2010
तक्रार नोंद तारीख : 23/08/2010
तक्रार दाखल तारीख : 24/08/2010
निकाल तारीख : 08/04/2013
-------------------------------------------------
श्रीमती आकुबाई पांडुरंग पाटील
वय वर्षे – 75, व्यवसाय – सध्या काही नाही.
रा.नेर्ले ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.
डिव्हीजन ऑफिस नं.2, 8, हिंदुस्थान कॉलनी,
अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – 440 015
2. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.
101, शिवाजी नगर, 3 रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे 411 005
3. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी,
सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन. शेटे
जाबदारक्र.1 तर्फे : अॅड श्री ए.बी.खेमलापुरे
जाबदार क्र.2 : स्वतः
जाबदारक्र.3 : स्वतः
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज, जाबदार क्र.1 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा योजनेखाली तिची मयत जाऊ यशोदा शंकर पाटील हीच्या अपघाती मृत्यूबद्दल तक्रारदारास विम्याची रक्कम अद्यापी दिलेली नसल्याने जाबदार क्र.1 ते 3 यांनी सदोष सेवा दिलेली आहे या कलमाखाली दाखल करुन सदर अपघाती विम्याची रक्कम रु.1 लाख व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने दि.16/11/07 पासून व्याज, रक्कम रु.40,000/- मानसिक शारिरिक त्रासापोटी भरपाई म्हणून, तिचा विमादावा कोणताही कायदेशीर कारण नसताना फेटाळला म्हणून भरपाई रक्कम रु.50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- ची मागणी जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून संयुक्तरित्या करुन मागितली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, मयत यशोदा शंकर पाटील ही तक्रारदाराची जाऊ म्हणजे तक्रारदाराच्या नव-याच्या भावाची पत्नी होती. ती शेतकरी होती. तिचे गट नं.472/4 मौजे नेर्ले ता.वाळवा जिल्हा सांगली या शेतामध्ये 0 हे 10 आर इतकी जमीन होती. सदर यशोदा शंकर पाटील ही दि.16/11/07 रोजी दु.2.00 चे सुमारास मौजे वाठार ता.कराड येथे हायवेवर वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मरण पावली. शेतकरी अपघात विमा योजनेखाली देय असणारी विम्याची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार ही मयताचे वारस म्हणून पात्र आहेत. श्री दिनकर महादेव पाटील यांनी दि.10 मार्च 2008 रोजी गावकामगार तलाठी नेर्ले यांचेकडे यशोदा शंकर पाटील हीच्या अपघाती मृत्यूकरिता विमा प्रस्ताव दाखल केला. तो विमा प्रस्ताव गावकामगार तलाठी नेर्ले यांनी तहसिलदार वाळवा यांचेकडे योग्य शिफारशींसह पाठविला व त्यानंतर तहसिलदार वाळवा यांनी तो विमा प्रस्ताव दि.13/2/08 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडे योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह पाठविला. तथापि जाबदार क्र.1 विमा कंपनी हीने अद्यापपावेतो सदरचा विमा प्रस्ताव मंजूर केला नाही अथवा फेटाळलादेखील नाही. तक्रारदार ही वयोवृध्द असल्याने व यशोदा शंकर पाटील हीचे अपघाती निधन झाल्याने तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याने दिनकर महादेव पाटील यांनी विमा प्रस्ताव दाखल केला होता. तक्रारदार हीच कायदेशीर वारस असलेने प्रस्तुतची तक्रार तिने दाखल केली आहे. सदरचा विमा प्रस्ताव मिळालेपासून 30 दिवसांचे आत रु.1 लाख मयताचे वारसाचे खात्यावर जमा करण्याची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांची होती. संपूर्ण कागदपत्रे सोडून विमाप्रस्ताव योग्य त्या पध्दतीने भरुन योग्य अहवालासह जाबदार क्र.1 यांचेकडे दिलेली असतानाही जाबदार क्र.1 यांनी तो प्रस्ताव मंजूरही केला नाही किंवा फेटाळलादेखील नाही. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केलेली मागणी सदरच्या तक्रारअर्जात केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्ठयर्थ आपले शपथपत्र नि.3 ला दाखल करुन नि.5 सोबत एकूण 9 कागद दाखल केले आहेत.
3. सदरकामी जाबदार क्र.1 यांनी नि.20 ला आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदाराचे संपूर्ण कथन नाकबूल केलेले आहे व तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केलेली आहे. जाबदार क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदार हीने मयताचे मृत्यूसंबंधी विमा विमा प्रस्ताव दाखल केला हे म्हणणे स्पष्टपणे नाकबूल केले आहे. तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास काहीही कारण उद्भवले नाही असे देखील जाबदार क्र.1 चे म्हणणे आहे. मयत यशोदा शंकर पाटील हीचे इतर वारसांना प्रस्तुत तक्रारीत पक्षकार म्हणून सामील न केलेमुळे प्रस्तुतची तक्रार आवश्यक पक्षकारांच्या अभावी खारीज करण्यास पात्र आहे असे म्हटले आहे. तसेच सदरची तक्रार ही मुदतबाहय आहे आणि उशिरामाफीचा अर्ज न करता व झालेला उशिर माफ न करुन घेता सदरची तक्रार दाखल केली असल्यामुळे ती खारिज करण्यास पात्र आहे असेही जाबदार क्र.1 विमा कंपनीने म्हटलेले आहे. जाबदार क्र.1 विमा कंपनी तक्रारदारास काही रक्कम देऊ लागतात हे जाबदार क्र.1 ने स्पष्टपणे नाकबूल केलेले आहे. ज्याअर्थी तक्रारदाराने कोणताही विमा प्रस्ताव दाखल केलेला नाही, त्याअर्थी तिचा विमा प्रस्ताव नाकबूल करण्यात जाबदार क्र.1 यांनी कोणतीही सदोष सेवा दिल्याचा प्रश्न उद्भवत नाही. सरतेशेवटी प्रस्तुतची फिर्याद रदृबातल करण्यास पात्र आहे व तशी ती खर्चासह खारीज करावी अशी मागणी जाबदार क्र.1 विमा कंपनीने केली आहे.
4. जाबदार क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी आपली कैफियत नि.12 ला दाखल करुन आपल्या विरुध्दची मागणी नाकबूल केली आहे. त्यांचे म्हणणेनुसार जाबदार क्र.2 ही एक विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण, भारत सरकार यांची अनुज्ञप्तीप्राप्त विमा सल्लागार कंपनी असून ती महाराष्ट्र शासनाला शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास विनामोबदला सहाय्य करतात. त्यात मुख्यत्वेकरुन शेतक-यांचे विमा दावे अर्ज तालुका कृषी अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या मार्फत जाबदार क्र.2 यांचेकडे आल्यावर ते अर्ज योग्यपणे भरले आहेत का, सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहेत का, नसल्यास तहसिलदार किंवा कृषी अधिकारी यांना कळवून कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे आणि सर्व योग्य कागदपत्रे मिळालेनंतर योग्य त्या विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवून देणे आणि विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आल्यास धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच सहभाग जाबदार क्र.2 यांचा आहे यासाठी जाबदार क्र.2, राज्य शासन किंवा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाहीत. तसेच कोणीही विमा प्रिमिअम शेतक-यांकडून घेत नाही. प्रस्तुत प्रकरणात यशोदा शंकर पाटील
हीचा अपघाती मृत्यू दि.16/11/07 रोजी झाला. त्यांचा दावाअर्ज जाबदार क्र.2 यांचे कार्यालयास दि.17/3/2008 रोजी प्राप्त झाला त्यानंतर सदर प्रस्तावात काही कागदपत्रांची त्रुटी असल्याने तहसिलदार मार्फत त्रुटींची पूर्तता करण्यास अर्जदाराला कळविण्यात आले आणि नंतर विमा दावा अर्ज दि.4/2/09 रोजी जाबदार क्र.1 विमा कंपनी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. तथापी वारंवार चौकशी करुनदेखील सदरचा विमा दावा अर्ज जाबदार क्र.1 विमा कंपनी यांचेकडे प्रलंबित आहे. तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांना कोणतेही कारण नसताना सदर चौकशीस/तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडले असून ही तक्रार या अर्जाचा खर्च रु.5,000/- तक्रारदारावर लावून सदर तक्रार फेटाळून लावावी अशी मागणी केलेली आहे.
5. जाबदार क्र.3 शासन यांचेतर्फे दि.10/11/10 रोजी तहसिलदार वाळवा यांचे शपथपत्र व इतर कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यानुसार जाबदार क्र.3 यांचे म्हणणे असे दिसते की, यशोदा शंकर पाटील या शेतक-याच्या अपघाती विम्याबाबतचा प्रस्ताव तहसिलदार वाळवा या कार्यालयाने जा.क्र. एमएजी/247/2008 दि.10/3/08 अन्वये जाबदार क्र.2 यांचेकडे पाठवून देण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव पात्र किंवा अपात्र करुन संबंधीत व्यक्तीस विमा रक्कम अदा करणे किंवा नाकारणे ही बाब तहसिलदार वाळवा या कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येत नाही. करिता जरुर ते आदेश करण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
6. जाबदार क्र.1 विमा कंपनीने आपल्या लेखी कैफियतीचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे. तथापि काही कागदपत्रे हजर केलेली नाहीत. जाबदार क्र.2 तर्फे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना संबंधीत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र.पीएआयएस 1207/प्र.क्र.266/11ए दि.24/8/2007 त्याचे प्रपत्रासह तसेच महाराष्ट्र राज्य ग्राहकवाद निवारण आयोग, औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ यांचेसमोरील पहिले अपिल क्र.1114/08 मधील दि.16/6/09 यांच्या निकालाची प्रत दाखल केली आहे.
7. प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणत्याही पक्षकाराने मौखिक पुरावा दिलेला नाही. प्रस्तुत प्रकरणात खालील मुद्दे आमच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होतात का? - नाही
2. तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केलेली सदोष सेवा किंवा
सेवेतील त्रुटी सिध्द केली आहे काय? - उद्भवत नाही.
3. अंतिम आदेश - खालीलप्रमाणे
आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
8. मुद्दा क्र.1 ते 3
प्रस्तुत प्रकरणात मुख्य मुद्दा हा आहे की, तक्रारदार ही मयताची वारस होऊ शकते का आणि त्यायोगे शेतकरी अपघात विमा योजनेखली मयताच्या अपघाती मृत्यूबद्दल विम्याच्या रकमेस पात्र होऊ शकते काय ? सदर योजनेखाली मयत शेतक-याचे वारसदारच विम्याच्या रकमेस पात्र असतो. येथे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की मयत ही अर्जदाराची जाऊ आहे. जाऊ म्हणजे मयत ही तक्रारदाराच्या पतीच्या भावाची बायको. तक्रारदाराने आपल्या अर्जामध्ये कोठेही ही बाब स्पष्टपणे नमूद केलेली नाही की, ती मयताची सख्खी जाऊ होती काय किंवा या दोघींचे नवरे हे नात्याने दूरचे किंवा चुलतभाऊ होते काय ? वादाकरिता असे गृहीत धरुन चालले की, मयत ही तक्रारदाराची सख्खी जाऊ होती तरीही तक्रारदार ही मयताची सरळसरळ वारस होऊ शकत नाही, ती मयताची वर्ग-2 मधील वारस होऊ शकेल. परंतु हे दाखविण्याकरिता तक्रारदाराने हे सिध्द केले पाहिजे की, मयताला तिच्या मृत्यूसमयी नवरा नव्हता किंवा तिचे कोणतेही मूल जीवंत नव्हते. जर मयतास वर्ग-1 मधील काही वारस असतील तर त्यांच्या उपस्थितीत तक्रारदार ही मयताची वारस होऊ शकत नाही. करिता तक्रारदाराने हे म्हणणे सिध्द करणे आवश्यक होते की, मयताला तिच्या शिवाय इतर कोणीही वारसदार नव्हते. येथे हे उल्लेखनीय आहे की, तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे मयताचे मृत्यूनंतर एका दिनकर महादेव पाटील यांनी विमा दावा दाखल केला होता. हे दिनकर महादेव पाटील कोण ? याचा कसलेही स्पष्टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही. तक्रारदाराचे असे म्हणणे नाही की, हा दिनकर महादेव पाटील तिचा वटमुखत्यार होता किंवा तिचा अभिकर्ता होता किंवा तिने दिलेल्या अधिकाराखाली तिच्याकरिता म्हणून त्याने विमा दावा दाखल केलेला होता. दिनकर महादेव पाटीलने विमा दावा दाखल केला ही बाब जाबदारांना मान्य आहे. मग जर असे असेल तर हा दिनकर महादेव पाटील कोण हे जोपर्यंत तक्रारदार सिध्द करीत नाही तोपर्यंत तक्रारदार ही स्वतःला मयत यशोदाचे वारस म्हणून शकत नाही आणि त्यामुळे ती शेतकरी अपघात विमा योजनेखाली मयताचे मृत्यूकरिता विम्याची रक्कम मिळण्यास पात्र होऊ शकत नाही आणि म्हणून ती ग्राहक या संज्ञेत, या तक्रारीच्या संदर्भात, येत नाही असे या मंचाचे मत आहे. करिता आम्ही वर नमूद केलेल्या मुदृा क्र.1 चे उत्तर नकारार्थी दिले आहे.
9. ज्याअर्थी तक्रारदार ही ग्राहक होऊ शकत नाही, त्याअर्थी तिला कोणतीही सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी मिळाल्याचे कारणावरुन तक्रार करता येणार नाही आणि त्यायोगे तीला कसलीही मागणी या तक्रारीत मागता येणार नाही. वादाकरिता असे गृहीत धरले की, तक्रारदार ही मयताची वारसदार आहे आणि त्यायोगे ती विमा रकमेस पात्र आहे तरी देखील या कामी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांवरुन असे दिसते की, मयताचे मृत्यूबाबत जो विमा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तो विमा दावा उशिरा दाखल करण्यात आला होता आणि त्या कारणावरुन जाबदार क्र.1 यांनी तो विमा दावा फेटाळलेला होता. सदर विमा प्रस्ताव फेटाळण्यामध्ये जाबदार क्र.1 यांनी कोणतीही सेवेतील त्रुटी केलेली नाही किंवा सदोष सेवा दिलेली नाही असे या मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हा मुद्दा उद्भवत नाही असेच द्यावे लागेल.
10. वरील निष्कर्षानुसार प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येत नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही अमान्य करावी लागेल आणि खारीज करावी लागेल असे या मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारअर्जाचा खर्च ज्याचा त्याने सोसणेचा आहे.
सांगली
दि. 08/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.