नि.१४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४३३/२०१०
---------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – ११/०८/२०१०
तक्रार दाखल तारीखः – १२/०८/२०१०
निकाल तारीखः - २७/०९/२०११
----------------------------------------
श्री राजाराम केशव साबळे
वर्षे – सज्ञान, धंदा – शेती व पशुपालन
रा.मु.पो. रांजणी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय–१, १५, ए.डी.कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेंन्शन, सदर, नागपूर-४४०००१ ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री एस.व्ही.मोरे
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री के.ए. मुरचुटे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या पशु विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करतो व त्यासाठी त्याने गायी व म्हैशी सांभाळल्या आहेत. तक्रारदाराने त्याच्या संकरीत गायीचा रक्कम रु.२५,०००/- इतक्या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.३१/०३/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्याकडून विमा पॉलिसी ही देण्यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेली गाय आजारी पडून दि.१५/१२/२००८ रोजी मयत झाली. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना ताबडतोब दूरध्वनीवर कळविले. तक्रारदार याचे गायीचे शासनाचे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी गायीच्या कानातील बिल्ला काढून तक्रारदारांचे ताब्यात दिला. गायीचे मृत शरीर ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत निर्णय घेताना खोटी व चुकीची कारणे देऊन दि.१५/१२/२००९ च्या पत्राने विमा दावा नाकारल्याबाबत कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने ७ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.१० वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये मृत झालेली गाय व विमा उतरविलेली गाय ही एकच असल्याचे दिसत नाही असे नमूद केले आहे. विमा पॉलिसीतील अटी नुसार गाय आजारी पडल्यास १२ तासाच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे परंतु तक्रारदार यांनी त्याबाबत कळविले नाही. गाय आजारी पडल्यावर तिच्यावर कोणत्या डॉक्टरांच्याकडून उपचार घेतले याबाबत कोणताही तपशील अर्जात नमूद केला नाही. विमा उतरविलेली गाय मृत्यूसमयी दूध देत होती किंवा नाही याचा पुरावा अर्जदारने देणे बंधनकारक आहे. तक्रारदाराने तसा कोणताही पुरावा दिलेला नाही. प्रस्तुत विमा योजनेचा अंमल जनावरांच्या डॉक्टरांच्या मार्फत केला जातो. अनेक लबाडया व गैरप्रकारांमध्ये सदर डॉक्टरांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. विमा पॉलिसीमधील अटी व शर्तीचे तक्रारदार यांनी पालन केलेले नाही. गायीच्या कानातील बिल्ला तुकडयासह पाठविला नाही. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.११ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.१३ ला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. जाबदार यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही अथवा जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादाचे दरम्यान उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी लेखी युक्तिवादाप्रमाणेच तोंडी युक्तिवाद असल्याचे नमूद केले.
५. तक्रारदार याने याकामी नि.५/१ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये विमा पॉलीसीचा कालावधी नमूद नाही. सदरची विमा पॉलिसी ही दि.३१/३/२००८ रोजीची आहे. तक्रारदार यांने दाखल केलेल्या वैद्यकीय दाखल्यावरुन तक्रारदार यांची गाय ही दि.१५/१२/२००८ रोजी मयत झाली आहे. पॉलिसी उतरविलेपासून एक वर्षाचे आत तक्रारदार यांचे गायीचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच तक्रारदार यांचे गायीचा विमा कालावधीत मृत्यू झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्याचे पञ तक्रारदार यांनी नि.५/५ वर दाखल आहे. सदरचे पत्र दि.१५/१२/२००९ रोजीचे आहे. सदर पत्रामध्ये जनावराच्या कानाचा बिल्ला हा कानाच्या तुकडयासह पाठविला नाही असे नमूद केले आहे. जाबदार यांनी विम्याबाबतच्या करारपत्राची प्रत याकामी नि.११ च्या यादीने दाखल केली आहे. सदरच्या करारपत्रामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची जबाबदारी नमूद केली आहे. त्यामध्ये जनावर मयत झाल्यास त्याबाबतचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट, क्लेमफॉर्म व कानाच्या बिल्ल्यासह तुकडा इन्शुरन्स कंपनीला पाठविण्याची जबाबदारी सदरहू डॉक्टरांची आहे. सदर डॉक्टरांना सदर जनावराचे शवविच्छेदन करण्यासाठी व इतर सर्व पूर्तता करण्यासाठी मानधन देण्याचे दायित्व जाबदार यांनी स्वीकारले आहे. तक्रारदार यांनी नि.५/१ वर दाखल केलेल्या पॉलिसीमध्ये डॉक्टरांची सही आहे. अशा परिस्थितीत सदर डॉक्टर हे जाबदार यांचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत व सदर डॉक्टर यांनी काही त्रुटी ठेवल्यास त्याबाबत तक्रारदार यांना दोष देता येणार नाही व त्या कारणास्तव विमा दावा नाकारता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. विमा दावा नाकारण्यास दुसरे जे कारण नमूद केले आहे ते पॉलिसी कव्हर नोट व अन्य दावा फॉर्मवर जनावराच्या माहितीसंबंधी विसंगती आहे असे नमूद केले आहे परंतु जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये नेमकी काय विसंगती आहे हे नमूद केलेले नाही. त्यामुळे सदरचे कारण हे योग्य व संयुक्तिक वाटत नाही. विमादावा नाकारणेच्या कारणांमध्ये पॉलिसीवरील विमाधारकाची सही व इतर दावा फॉर्मवर असलेल्या सहयांमध्ये तफावत असल्याचे दिसून येते असे नमूद केले आहे. जाबदार यांनी प्रस्तुत प्रकरणी याबाबतची कोणतीही कागदपत्रे हजर केली नाहीत. त्यामुळे जाबदार यांच्या सदरच्या कथनामध्ये कोणतही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी विमादावा नाकारताना दूध क्षमतेबाबत प्रमाणपत्र नाही व उपचाराची कागदपत्रे जमा केली नाहीत ही दोन कारणे नमूद केली आहेत. उपचारासंदर्भात तक्रारदार याने आपल्या युक्तिवादामध्ये गाय आजारी पडून त्याचदिवशी दुपारी मयत झाली आहे त्यामुळे उपचारासंबंधीची कागदपत्रे दिली नाहीत तसेच दूध क्षमतेबाबत कोणतीही बिले जपून ठेवली नाहीत. त्याबाबतही वैद्यकीय प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी जनावराच्या व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये मृत्यूसमयी गाय दूध देत असल्याचे कलम नं.७ मध्ये Milk yield मधील उपकलम ड मध्ये At death, 14 litres per day असे नमूद केले आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा ज्या कारणासाठी नाकारला, ती कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्य कारणास्तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्यामुळे तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम रु.२५,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.१५/१२/२००९ पासून व्याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना गायीच्या विमा दाव्यापोटी रक्कम रु.२५,०००/-
( अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त ) दि.१५/१२/२००९ पासून द.सा.द.शे. ९
टक्के दराने व्याजासह अदा करावेत.
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा
करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.१२/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.