जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 14/12/2010. तक्रार आदेश दिनांक : 14/06/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 659/2010. 1. सुनिल श्रीहरी सुर्वे, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वाणेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर. 2. सोलापूर जिल्हा सह. दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या., सोलापूर तर्फे व्यवस्थापकीय संचालक, रा. 24/1-अ, मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 660/2010. 1. सौ. हिराबाई अच्युत डांगे, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. पिंपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर. 2. सोलापूर जिल्हा सह. दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या., सोलापूर तर्फे व्यवस्थापकीय संचालक, रा. 24/1-अ, मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 661/2010. 1. आबासाहेब सोपान सुतार, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. पिंपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर. 2. सोलापूर जिल्हा सह. दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या., सोलापूर तर्फे व्यवस्थापकीय संचालक, रा. 24/1-अ, मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्श्योरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1-15, एडी कॉम्प्लेक्स, पहिला मजला, माऊंट रोड, सदर नागपूर - 10. 2. जयका इन्शुरन्स ब्रोकरेज, जयका बिल्डींग, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 01. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशूधन विकास महामंडळ, अकोला. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तिन्ही तक्रारींचा विषय, स्वरुप, विरुध्द पक्ष व उपस्थित झालेले सर्व प्रश्न इ. मध्ये साम्य असल्यामुळे एकत्रितरित्या निर्णय देण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 यांचे सभासद आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या पशुधन विमा योजनेनुसार तक्रारदार क्र.2 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम वर्ग करुन भरणा केलेली आहे आणि तक्रारदार यांच्या गाईचा विमा उतरविण्यात आलेला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | विमा रक्कम | गाईचा मृत्यू दिनांक | 659/2010 | एस.ओ.एल.पी. 109990 | रु.25,000/- | दि.16/6/2008 | 660/2010 | एस.ओ.एल.पी. 100635 | रु.20,000/- | दि.29/6/2009 | 661/2010 | एस.ओ.एल.पी.100638 | रु.20,000/- | दि.10/8/2009 |
3. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे दावा प्रपत्र व पोस्टमार्टेम रिपोर्टसह आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना विमा रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारींद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रकमेसह मानसिक त्रास व दैनंदीन नुकसान भरपाई व्याजासह मिळावी आणि तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 4. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 5. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याचे रेकॉर्डवर दाखल विमा पॉलिसीवरुन निदर्शनास येते. तसेच विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी दिसून येते. प्रामुख्याने, विमा कंपनीने कोणतेही कारण नसताना त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवल्यामुळे व नाकाल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. 7. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, पोस्टमार्टेम रु.50/- ची पावती इ. कागदपत्रांसह इतर पुरक कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. रेकॉर्डवर उपलब्ध असलेली कागदपत्रे विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? हे विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. तसेच विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव प्रलंबीत ठेवून सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईंच्या विम्याची रक्कम तक्रारदार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | विमा रक्कम (रुपयामध्ये) | व्याज द्यावयाचा दिनांक | 659/2010 | एस.ओ.एल.पी. 109990 | रु.25,000/- | दि.14/12/2010 | 660/2010 | एस.ओ.एल.पी. 100635 | रु.20,000/- | दि.14/12/2010 | 661/2010 | एस.ओ.एल.पी.100638 | रु.20,000/- | दि.14/12/2010 |
2. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/10611)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |